मुक्ती भाग ९

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग ९ –

“अगं पण जायचं कुठं आहे?”

“अंजनेरीच्या पायथ्याला असलेल्या मारुती मंदिरात. दोन दिवसांपासून एक स्वामीजी आले आहेत तिथे. खूप पोहोचलेले आहेत असे म्हणतात लोकं. आपण तिथे जाऊन एकदा त्यांनाही विचारून येऊ.”

“अगं आई, अभिचा बिलकुल विश्वास नाहीये अशा गोष्टींवर. तो कदापि हे मान्य करणार नाही.”

“हो गं. माहितीये मला. पण एकदा जाऊन पाहायला काय हरकत आहे? किमान माझ्या समाधानासाठी तरी?”

“चल बाई, तुझ्यासाठी म्हणून येते आहे मी. पण मीही जास्त विश्वास ठेवत नाही असल्या गोष्टींवर.”

दुपारचे जेवण उरकून दोघीही अंजनेरी गावातील मारुती मंदिरात पोहोचल्या. तसेही तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ फार काही नव्हतीच. तिथे कुठे स्वामीही दिसेना म्हणून त्यांनी चौकशी केली. पण स्वामी कुठे गेले असतील हे कुणालाच सांगता येईना. शेवटी अजून काही वेळ वाट पाहू आणि घरी जाऊ असे ठरवून त्या मंदिराच्या बाहेरच्या पायऱ्यांवर बसल्या. बराच वेळ वाट पाहून आता त्या जायला उठणार तितक्यात तेथील पुजारी म्हणाले.

“अहो ताई!!! तुम्ही ज्यांना भेटायला आला होतात ते स्वामीजी इकडेच येत आहेत.”

काही वेळातच स्वामींनी मंदिरात प्रवेश केला. त्यांचा संपूर्ण नाथपंथीय पोशाख, चेहऱ्यावरील तेज आणि प्रसन्न व्यक्तिमत्व समोरच्यावर छाप पाडण्यासाठी पुरेसं होतं. आल्या आल्या त्यांनी मारुतीला साष्टांग दंडवत घातलं आणि मंदिराबाहेर पडले.

स्वामी मंदिरा बाहेरील ओट्यावर बसतात न बसतात तोच सानिकाची आई पुढे झाली आणि तिने स्वामींना नमस्कार केला.

“शुभम भवतुं…” स्वामींनी आशीर्वाद दिला.

आईच्या मागोमाग सानिकाही स्वामींपुढे नमस्कारासाठी वाकली.

“शुभम भवतुं.” आशिर्वाद देतांना स्वामींचे लक्ष सानिकाच्या चेहऱ्याकडे गेले मात्र आणि त्यांचा चेहरा गंभीर बनला.

सानिकाच्या आईचे स्वामीजींकडे अगदी बारीक लक्ष होते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेले गांभीर्य तिला लगेचच समजले.

“स्वामीजी, तुमचा चेहरा इतका गंभीर का झाला?”

“ही तुमची मुलगी का?”

“हो! पण सांगा ना, तुम्ही गंभीर का झालात? हिच्यावर काही संकट येणार आहे का?”

स्वामींना काय बोलावे हे पटकन सुचेना.

“बाई गं, हिच्यावर संकट तर खूप आधीपासूनच आलेले आहे. अर्थात खरे संकट हिच्या नवऱ्यावर आले आहे आणि त्याची झळ मात्र हिला पोहोचणार आहे.” अगदी गंभीर बनत स्वामी म्हणाले.

“स्वामीजी, तुम्हीच आता हिला वाचवा. त्यासाठीच मी हिला तुमच्याकडे घेऊन आले.” सानिकाच्या आईने अगदी काकुळतीने स्वामींना विनंती केली. सानिका मात्र एकदम गप्प बसलेली होती. अर्थात तिला अजूनही हे सगळे फक्त थोतांड वाटत होते.

“बाई गं! मी आता काहीच सांगू शकणार नाही. उद्या याबद्दल मी तुम्हाला सगळे सांगू शकेन. पण याबाबत हिच्या नवऱ्याला आता काहीच सांगू नका. उद्या याच वेळेला तुम्हाला काय उपाय करता येण्यासारखा असला तर सांगेन. अलख निरंजन…” इतके बोलून स्वामी तिथेच समाधीसाठी पद्मासन घालून बसले.

स्वामींना नमस्कार करून दोघीही घरी निघाल्या. त्या घरी पोहोचल्या तेव्हा अभिजीतही घरी आलेला होता. सानिकाच्या आईने याबद्दल चकार शब्दही तोंडातून काढला नाही त्यामुळे अभिजीतलाही हायसे वाटले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सानिकाची आई घरी गेली. पण घरी जाताना तिने सानिकाला आताच अभिजीतला काही सांगू नको म्हणून बजावले होते.

स्वामींनी समाधी लावली ती सानिकावर कोणते संकट येत आहे हे पाहण्यासाठी. स्वामी आता बसल्या जागेवरूनच सगळे पहात होते. या समाधी अवस्थेत त्यांनी ब्रम्हराक्षस आणि अभिजीतची कधी भेट झाली इथपासून ते अभिजीतने ब्रह्मराक्षसाकडून कोणकोणती मदत घेतली इथपर्यंत सगळे माहित करून घेतले. इतर भूतबाधा असेल तर ती घालवणे स्वामींसाठी बिलकुल मोठे काम नव्हते पण इथे गाठ ब्रम्हराक्षसाशी होती. कोणती शक्ती सरस ठरेल हे लगेच सांगणे कठीण होते. म्हणून त्यांनी गुरुदेवांचे स्मरण केले. काही क्षण जातात न जातात तोच स्वामींच्या अंतरमनात एक अतिशय तेजस्वी पण मनाला शीतलता देणारे प्रकाश वलय निर्माण झाले. ते वलय हळूहळू मोठे होत जावून त्यात गुरूदेवांची आकृती दिसू लागली आणि काही क्षणातच गुरुदेव स्वामींपुढे हजर झाले.

“प्रमाण गुरुदेव”

“विजयी भवं…”

“गुरुदेव! तुम्ही तर सर्वज्ञ आहात. कोणतीच गोष्ट तुमच्या पासून लपून राहिलेली नाही.”

“होय वत्सा!!! मी जाणतो तुला काय विचारायचे आहे ते. ऐक, आता तुझा सामना ज्या शक्तीशी आहे ती शक्ती फार प्रबळ आहे. कित्येक दैवीशक्ती ब्रह्मराक्षसापुढे हतबल ठरतात. त्याचे कारण असते त्यांची आधीची साधना. त्यांनी आधी अर्जित केलेले पुण्य. त्यातून ज्याच्याशी तुझा सामना होणार आहे तो ब्रम्हराक्षस ज्या ठिकाणी राहतो त्या जागेचे पाठबळही त्याला मिळत आहे. त्यामुळे त्याच्याशी सामना करताना तुला शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर करावा लागणार आहे.”

“जशी आपली आज्ञा गुरुदेव…”

“आणि एक गोष्ट लक्षात ठेव. यानंतर जे काही करशील ते अलिप्त भावाने कर. तुझी एक चूक तुझा पराभव होण्यास पुरेशी आहे. आदेश…” इतके बोलून गुरुदेव अंतर्धान पावले. स्वामींनीही समाधी सोडली आणि ते गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी सानिका आणि तिची आई स्वामींच्या भेटीला आल्या. त्यांनी शिरस्त्याप्रमाणे स्वामींना नमस्कार केला आणि स्वामी काय सांगतात याची त्या आतुरतेने वाट पाहू लागल्या.

“मुली, मी आता काय सांगतो ते नीट ऐक. तुझ्या पतीवर ब्रह्मराक्षसाची छाया आहे. तीही तुमचे लग्न होण्याच्या आधीपासून. म्हणूनच तो कोणत्याही मंदिरात जात नाही किंवा कोणत्याच धार्मिक कृत्यात सहभागी होत नाही. इतके दिवस तो ब्रह्मराक्षस तुझ्या पतीची मदत करत होता, पण आता त्याने तुझ्या पतीला त्रास द्यायला सुरुवात केली आहे.”

“स्वामीजी, याला काही उपाय नाही का?” सानिकाने अगदी अधिरतेने विचारले.

“मुली, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात असे नाही. दैवापुढे कुणाचे चालले आहे? आपण फक्त आपल्याकडून सगळे प्रयत्न करून पाहायचे. पण त्याला यश येणे न येणे हे सगळे दैवाधीन आहे. यावेळेस फक्त तुमचीच नाही तर माझीही परीक्षा आहे. त्या परमात्म्यावरील विश्वास कायम ठेव. तो सगळे चांगलेच करेल.”

आता मात्र दोघींच्याही चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.

“उद्या तुला तुझ्या पतीला जिथे त्याने तुला वाचवले होते तेथे घेऊन यावे लागेल. येशील घेऊन?”

“ठीक आहे स्वामीजी. येईल मी त्याला घेऊन. पण कधी येऊ तिथे आम्ही?”

“दुपारी १२ नंतर आणि २ वाजण्याच्या आत. मी तिथेच असेल. फक्त कशासाठी येणार हे मात्र त्याला सांगू नकोस. पुढचं सगळं मी पाहून घेईन. अलख निरंजन…”

स्वामींना नमस्कार करून दोघी परत फिरल्या. अभिजीतला आता काय सांगून इथे आणायचे याचा सानिका विचार करू लागली.

रात्री जेवणानंतर अभिजीत पुस्तक वाचत बसलेला असताना सानिकाने विषय काढला.

“अभिजीत, माझ्या मनात खूप दिवसांपासून एक गोष्ट आहे.”

“बोल ना मग.”

“हो, पण तुला सध्या खूप काम असतं म्हणून बोलायचं धाडस होत नाही बघ माझं.”

“अगं जे काय असेल तर बोल तर खरं. त्याशिवाय मला कसं समजणार?” हातातील पुस्तक खाली ठेवत आणि दोन्ही हात सानिकाच्या खांद्यांवर ठेवत तिच्या डोळ्यात पाहत अभिजीतने विचारलं.

“मला ना, खूप दिवसांपासून वाटतंय, आपण दोघं कुठेतरी बाहेर फिरायला जावं. अगदी दोन तास असलं तरी चालेल मला.”

“बस. इतकंच? मला वाटलं इतकं काय मोठं मागणं असेल बाईसाहेबांचं?” तिला जरासं हलवत मिश्किलपणे अभिजीत म्हणाला.

“आज्ञा करा राणीसरकार? कुठे जायचं आपण?”

“अंजनेरी पर्वतावर. जिथे तू माझा जीव वाचवला. तिथेच. किती सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे ते. माझ्या सगळ्या आठवणी ताज्या होतील.” अगदी निरागस भाव चेहऱ्यावर आणत सहज बोलतोय अशा अविर्भावात सानिका बोलत होती. पण खरं तर सगळ्या वाक्यांची जुळवणी तिने आधीच करून ठेवली होती.

अंजनेरी पर्वताचे नाव ऐकताच अभिजीत थोडा चपापला. तिथेच तर ब्रम्हराक्षस रहात होता आणि परत त्याच्याशी गाठ पडल्यावर तो नवीन कोणतीतरी भीती आपल्याला दाखवेल असे अभिजीतला वाटत होते.

“अगं, तिथे तर आपल्याला कधीही जाता येईल. आपण दुसरीकडे कुठे जाऊ ना. मस्त पैकी लॉंगड्राईव्ह साठी. जव्हार आहे, इगतपुरी आहे, माळशेजघाट आहे. तू सांगायचे आणि मी ऐकायचे.” आता अभिजीतही एकेक शब्द तोलून मापून बोलत होता, पण आपण अगदी सहज बोलतोय असा अभिनय करत.

“नाही. मला तिथेच जायचे आहे. हवं तर हाच माझा हट्ट आहे असे समज.” चेहऱ्यावर लटका राग आणत सानिका हटून बसली.

“बरं बाई! तिथे जाऊ. मग तर झालं?” वेळ मारून नेण्यासाठी अभिजीत म्हणाला.

“नाही. असं आश्वासन नकोय मला. आपण उद्याच जायचं. पाहिजे तर दुपारच्या जेवणाचे डबेही घेऊन जाऊ.”

“अगं पण लगेच उद्या कसं शक्य आहे?” अभिजीत काहीसा वैतागलाच.

“ते काही मला माहिती नाही अभि! उद्या म्हणजे उद्याच. दुपारीच जायचं. काल तुला काम होतं तर मी काही म्हणाले का? माझी आई आली होती खास तुला भेटायला, पण तरीही मी तुला काही म्हटले नाही. आता मात्र मला बाकी काही ऐकायचं नाहीये. तुझं काम तू तुझ्या असिस्टंटला सांग हवं तर.” सानिकाने हिरमुसून रुसण्याचा अभिनय केला आणि ही मात्रा अगदी व्यवस्थित लागू पडली.

“बरं बाईसाहेब! तुम्ही जिंकल्या. मी हरलो. उगाच आता रुसू नका आमच्यावर. ते म्हणतात ना, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट. यापुढे सगळ्यांना नतमस्तक व्हावेच लागते. आता तुही सुखात झोप, अन मलाही सुखाने झोपू दे.” अभिजीत म्हणाला मात्र आणि त्याच्या बोलण्यावर सानिकाची कळी एकदम खुलली.

“अरे यार… तुम्हा बायकांकडे ना खूप वेगवेगळी अस्त्रे असतात. कोणत्या वेळेस कोणतं अस्त्र वापरायचं हे तुमच्याकडून शिकावं माणसानं.” तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पहात अभिजीत म्हणाला.

“नको उगाच टोमणे मारू. झोप आता. उद्या लवकर उठायचं आहे. जर उशीर झाला तर डोंगर चढताना धाप लागेल. आता काय आपण दहा वर्षांपूर्वी होतो तसे नवतरणे राहिलेलो नाही. काय?” सानिकाने हसत हसत अभिजीतला आज्ञा दिली.

दुसऱ्या दिवशी दोघेच साडेबाराच्या सुमारास डोंगरावर पोहोचले. सानिकाला तिथे काहीच बदल झालेला जाणवला नाही. फक्त एकदोन बदामाची झाडे कुणीतरी लावलेली होती आणि ती आता चांगलीच मोठीही झालेली होती. बाकी इतर काही फरक पडण्याचा प्रश्नच नव्हता. सानिकाने त्यातीलच एका झाडाखाली आपला ठिय्या दिला आणि ती स्वामीजी कधी येतात याची वाट पाहू लागली.

क्रमशःमुक्ती भाग ९.

— मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ८ लिंक

Leave a comment