मुक्ती भाग ८ –
काही न बोलता अभिजीत पुढच्या पायऱ्या उतरू लागला. जवळपास हजारएक पायऱ्या उतरल्यावर कालजिताने एक मंत्र म्हटला तसा सगळीकडे उजेड दिसू लागला. त्यांच्या समोर एक मोकळी खोली दिसू लागली. काही हजार वर्षांपूर्वी खोदलेल्या त्या लेणीसदृश खोलीत सगळीकडे वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या होत्या. एखादे सभागृह असावे असे त्या खोलीचे स्वरूप होते. मात्र तिथे एकही झरोका अभिजीतच्या दृष्टीस पडला नाही. सगळीकडे कोंदट वास भरून राहिला होता. पण कुठेही त्याला जराही धूळ आढळून आली नाही. तो आता सगळ्या बाजूचे अगदी बारकाईने निरीक्षण करत होता. पाहता पाहता त्याची नजर समोरच्या भिंतीकडे गेली. तिथे काहीतरी पडलेले आहे असे त्याला दिसले म्हणून तो जरा जास्तच बारकाईने पाहू लागला. तिथे मानवी सापळ्यांची रास पडलेली आहे हे काही क्षणातच त्याच्या लक्षात आले. आपल्या नाकाला कसला वास झोंबतो आहे, हे आता कुठे त्याच्या लक्षात आले. अभिजीत हे निरीक्षण करत असताना कालजितचे लक्ष त्याच्याकडेच होते.
“हेच आता आपले घर आहे… घाबरू नकोस… तू इथे एकटा नसशील… हे सगळे तुझ्या बरोबर असतील… तुझे साथीदार म्हणून… हाहाहा…” कालजिताचे बोलणे पूर्ण होते न होते तोच एकेक करून त्याच्या समोर आकृत्या प्रकट होऊ लागल्या. आधी धूसर दिसणाऱ्या आकृत्या एकेक करून शरीर धारण करू लागल्या. काही वेळातच तिथे ५०/६० जणांचा जमाव दिसू लागला. त्यांचे पेहराव अगदी राजेशाही पोषाखा पासून जीन्स पर्यंत सगळ्याच प्रकारचे होते. इतकी विविधता असूनही एक गोष्ट मात्र त्यांच्यात सारखी होती. त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली प्रेतकळा. एकाच्याही चेहऱ्यावर साधी स्मितरेषाही त्याला दिसली नाही. त्यांचे डोळेही दगडाचे असल्याप्रमाणे निर्जीव भासत होते. त्यांच्या घशातून दम गुदमरल्यावर जसा आवाज येतो तसा हुंहुं चा आवाज येत होता. त्या सगळ्यांकडे पहात कालजित म्हणाला.
“हा पहा आपला नवीन जोडीदार. याला इथे यायला तसा वेळ आहे पण आधीच मी याला इथे घेऊन आलो आहे. तुम्हा सर्वांची ओळख करून देण्यासाठी. हाहाहा…”
सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि “होय” अशा अर्थी फक्त मान हलवली.
“जा आता सगळे. मी याला मधून मधून तुमच्या भेटीला घेऊन येत जाईन… हाहाहा.”
नंतर अभिजीतकडे पाहून कालजित म्हणाला.
“पाहिलेस आपले नवे घर?”
“कालजिता? तू इथे मला कशासाठी आणले होतेस?” काहीसे वैतागत अभिजीतने विचारले.
“का म्हणजे काय? तुझी बायको घरी नव्हती आणि तू एकटाच तिथे काय करणार होतास? म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. पहा बरं तुझा वेळ किती छान गेला ते. हाहाहा” अभिजीतला चिडवण्याच्या स्वरात कालजित म्हणाला.
“तुला कुणी सांगितले माझा वेळ जात नव्हता म्हणून?” कालजिताच्या चिडवण्याचा राग येऊन अभिजीतने विचारले.
“हाहाहा. तुमच्यात ती म्हण आहे ना? ‘रिकामं डोकं सैतानाचं घर.’ आता पासून तुझ्यासाठी ती म्हण बदलत आहे. ‘रिकामा वेळ, कालजिताचा खेळ.’ हाहाहा.” यावर मात्र अभिजीत भडकलाचं.
“हाहाहा… हेच तर मला पाहिजे आहे मुर्खा. तू जितका चिडशील, तितका मला जास्त आनंद होईल. हाच तर माझा खेळ आहे. हाहाहा…” कालजित मोठ्याने हसून म्हणाला आणि अभिजीतला आपली चूक समजली. तसेही चिडून काहीही फरक पडणार नव्हता. शेवटी विषय बदलायचा म्हणून त्याने कालजिताला विचारले.
“कालजिता. एक विचारू?”
“हं… विचार… मी आज खूप खुश आहे.” कालजित मुद्दाम त्याला खिजवण्याचा प्रयत्न करत होता.
“तू दोन वर्षानंतर मला इथे आणणार आहेस. त्यानंतर?”
“त्यानंतर? त्यानंतर काय. मी नवीन माणूस शोधणार. त्यालाही अशीच आमिषे दाखवणार आणि माझ्या जाळ्यात ओढणार. हाहाहा. इथे तू जे अभागी जीव पाहिलेस, त्या सगळ्यांना मी असेच तर इथे आणले आहे. हाहाहा…” अगदी बेफिकीर पणे कालजिताने सांगितले.
“अरे पण त्यांना इथे आणून तुझा काय फायदा?”
“वा… हे बरे आहे. तुम्ही लोकं मुलांना जन्म देतातच ना? कशासाठी? तुमची संख्या वाढवण्यासाठीच ना? मग मी अशा प्रकारे लोकांना इथे आणून आमची संख्या वाढवली तर त्यात चूक काय? असो… तू यात माझा फायदा काय म्हणून विचारलेस ना? ऐक तर मग… माझा खूप फायदा आहे. हे सगळे माझे गुलाम आहेत. माझे मनोरंजन म्हण हवं तर… मी त्यांना आज्ञा करतो आणि ते माझ्या आज्ञेचं पालन करतात. मी त्यांच्यावर हुकुमत गाजवतो… गेली १० वर्ष मी तुझा गुलाम होतो… आणि यापुढील सगळी वर्षे तू माझा गुलाम असशील… हाहाहा… चल आता…” इतके बोलून त्याने अभिजीतचा हात धरला. परत त्याला आपले शरीर पिसासारखे हलके हलके वाटू लागले. यावेळेस कालजिताने त्याला पायऱ्या चढायला बिलकुल लावले नाही. काही वेळातच अभिजीत स्वतःच्या घरी होता पण त्याला कालजित मात्र कुठेही दिसला नाही. राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर डोंगरावरील त्या गुप्त सभागृहात पाहिलेले दृश्य येत होते. आणि दोन वर्षांनी आपली काय गत होणार आहे या जाणिवेनेच तो अर्धमेला झाला.
अभिजीतच्या बाबतीत ही गोष्ट आता नित्याचीच झाली. कालजित मध्येच प्रकट व्हायचा आणि आता तुझ्या आयुष्यचे इतके दिवस राहिले, तितके दिवस राहिलेत असे डिवचून अभिजीतला त्रास द्यायचा. कित्येक वेळेस जर अभिजीतने त्याच्या बरोबर जायला नकार दिला तर तो अभिजीतच्या नजरेसमोरच अनेक भीतीदायक देखावे तयार करू लागला. अभिजीतच्या या मानसिक स्थितीचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागला. त्याचे शरीर दिवसेंदिवस वाळत चालले. लोकांना दिसायला अभिजीत हा सगळ्यात सुखी माणूस होता, पण इतके दिवस त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे सुखाचे तेज कुठेतरी लोप पावत चालले होते. याबद्दल सानिकानेही त्याला विचारले पण त्याने काहीतरी बोलून वेळ मारून नेली होती. शेवटी तिने त्याच्या मागे लागून त्याचे फिजिकल चेकअपही करून घेतले. त्यातही काही निष्पन्न झाले नाही. डॉक्टरांनी त्याला हवापालट करायला सांगितला म्हणून ती त्याच्या बरोबर १५ दिवस हिल स्टेशनवरही जावून आली. पण त्याचाही काहीच उपयोग झाला नव्हता. होईलही कसा? त्याच्या बरोबर कालजितही फिरत होता. जिथे जिथे अभिजीत, तिथे तिथे कालजित… कित्येक वेळेस तर सगळे आजूबाजूला असताना कालजित प्रकट होत होता आणि मोठमोठ्याने अट्टाहास करत अभिजीतला घाबरवून सोडत होता.
“अभिजीत, आज माझी आई येणार आहे. तिला तुझ्याशी काही बोलायचे आहे.” सानिकाने उठल्या उठल्या अभिजीतला सांगितले.
“माझ्याशी? कोणत्या विषयावर?”
“ते काही तिने मला सांगितले नाही. ती तुझ्याशीच बोलणार आहे.”
“ठीक आहे. सासुबाईंची आज्ञा मला कशी अमान्य करता येईल?” बोलण्यात काहीसा मिश्कीलपणा आणत अभिजीत म्हणाला. पण त्या काय बोलणार असतील हे त्याने आधीच ताडले होते. नक्कीच त्या एखाद्या देवी देवताचे नाव घ्यायला लावतील आणि ते आपण केले नाही तर सानिकाच्या तोंडाचा पट्टा चालू होईल. इकडे आड तिकडे विहीर. अभिजीतच्या चेहऱ्यावर होणारे बदल सानिका अगदी बारकाईने पहात होती. पण अभिजीतने नकार दिला नसल्याने तिला काहीच बोलता आले नाही.
आता सासूबाईंना कसे टाळायचे याचा तो विचार करू लागला. काही वेळ विचार केल्यावर त्याच्या डोक्यात एक कल्पना आली.
“सानिका… आई कधी येत आहेत?” त्याने आपल्या आवाजात सहजता आणत विचारले.
“ती दुपारच्या जेवणापर्यंत येते आहे.”
“ठीक आहे. मग मी तो पर्यंत माझे एक काम करून येतो. १० मिनिटाचेचं आहे फक्त.”
“अरे पण…”
“अगं आज पर्यंत मी तुझा शब्द कधी खाली पडू दिला आहे का? मग? लगेच येईल मी.”
हेही खरे होते. सानिकाने एखादी गोष्ट सांगितली आणि अभिजीतने ती केली नाही असे यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यामुळे तिने नाईलाजास्तव होकार दिला. सानिकाचा होकार मिळाला आणि आपले सगळे आवरून अभिजीत सानिकाची आई येण्याच्या आत घराबाहेरही पडला.
जेवणाच्या वेळेपर्यंत सानिकाची आई घरी आली.
“सानिका, जावाईबापू कुठे आहेत गं?”
“अगं तो जरा बाहेर गेला आहे. येईलच इतक्यात.”
“चल ठीक आहे. आपण ते आल्यावरच जेवायला बसू.”
त्यांचे संभाषण चालू असतानाच फोन वाजला. सानिकाने फोन उचलला.
“हेल्लो”
“सानिका. आई आल्या का?” पलीकडून अभिजीतचा आवाज आला.
“हो, आली आहे ती. तू कधी येतो आहेस? आम्ही थांबलो आहोत तुझ्यासाठी जेवायचे.”
“अगं तुम्ही बसून घ्या. मला इकडे थोडा वेळ लागतो आहे. काम झाले की लगेच येतो मी. पण तुम्ही उगाच उपाशी नका राहू.”
“अरे पण. ती तुझी वाट पाहते आहे.”
“हो. खरे आहे गं. पण कामही तसंच महत्वाचं आहे. झालं की येतो म्हणून सांगितलं ना?” अभिजीतने काहीसे वैतागून उत्तर दिले.
सानिकाने पहिल्यांदाच अभिजीतला असे वैतागलेले पाहिले होते.
“ठीक आहे. तू ये तुझे काम झाल्यावर. दुपारी आम्ही मात्र जरा बाहेर जाऊन येणार आहोत. चालेल ना?”
“अगं त्यात परवानगी काय विचारतेस? या जाऊन तुम्हाला कुठे जाऊन यायचे ते.” काहीशा हर्षभरित स्वरात अभिजीतने परवानगी दिली. खरं तर तो फक्त आपल्या सासूला टाळत होता. आणि या दोघी बाहेर गेल्यावर यायला नक्कीच नेहमी प्रमाणे वेळ लागणार आणि आपल्याला सानिकाच्या आईच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत हाच आनंद त्याला सगळ्यात जास्त वाटत होता.
“काय गं? अभिजीतरावांना काही काम आहे का?” सानिकाच्या आईने विचारले.
“हो, वेळ लागेल म्हणतोय…” अगदी फणकाऱ्यातचं ती उत्तरली आणि फोन खाली ठेवला.
“चल जाऊ दे… एका अर्थी बरेच झाले म्हणायचे.”
“आई????”
“अगं हो गं. तूच म्हणतेस ना की अभिजीतरावांचा देवावर बिलकुल विश्वास नाही म्हणून? आज मी तुला अशाच एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. अभिजीतरावं घरी असते तर आपल्याला जाता आले असते का? म्हणून म्हटलं. एका अर्थी बरं झालं म्हणून. चल आता जेवण करून घेऊ आणि ते घरी यायच्या आत पटकन जाऊन येऊ.”
क्रमशःमुक्ती भाग ८.
— मिलिंद जोशी, नाशिक…