मुक्ती भाग ७

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग ७ –

लग्नाचा दिवस आता जवळ येत होता. सुमितची दृष्टी गेली ही गोष्ट सगळ्यांनाच समजली होती पण त्याचे खरे कारण मात्र कुणालाच कळले नव्हते. सुमितनेही ते कुणाला कळू दिले नाही. अनेक वैद्यकीय उपचारही करून झाले पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. सानिकाला आणि अभिजीतला सुमितच्या या परिस्थितीचे खूप वाईट वाटले, पण जिथे डॉक्टरांनी हात टेकले तिथे ते तरी काय करणार? एक मात्र झाले, इतक्या दिवसात अभिजीतने सानिकाच्या घरच्यांच्या मनात एक आदराचे स्थान नक्कीच मिळवले. त्यासाठी त्याने कालजिताचा खूपच वापर करून घेतला होता.

लग्नच्या दिवशी आधीच ठरल्याप्रमाणे अभिजीत, सानिका आणि तिचे आईवडील कोर्टात त्यांच्या लग्नाची नोंदणी करून आले. सानिकाच्या बाजूने सई आणि अभिजीतच्या बाजूने पराग यांनी साक्षीदार म्हणून सही केली. एकदम साधेपणाने लग्न उरकले. नोंदणी झाल्याबरोबर नवदाम्पत्य घरी जायच्या आधी जवळपासच्या सगळ्या अनाथआश्रमात गेले आणि त्यांच्या लग्नाप्रीत्यर्थ तिथे देगण्या देऊन आले. सानिका तर अभिजीतच्या या स्वभावावर खूपच खुश होती. कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य न करता अभिजीतने लग्न उरकले होते. पण त्याची चिंता आता वाढली होती. सानिका जरी खूप धार्मिक नव्हती तरी सानिकाची आई मात्र खूपच धार्मिक होती. आणि त्यामुळे त्याच्यापुढे असे अनेक प्रसंग येणार होते. कालजिताने तर स्पष्टपणे त्याला धार्मिक कार्यापासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे वरवर आनंदी दिसणारा अभिजीत कधीकधी खूप विचारात पडायचा.

पहिले काही दिवस सानिकाच्या काहीच लक्षात आले नाही, पण जसजसा काळ पुढे सरकत होता तसतसे अभिजीतचे वागणे तिला लक्षात येऊ लागले. एरवी समंजस दिसणारा अभिजीत एखादे धार्मिक कृत्य करायचे म्हटले की काहीसा विचलित व्हायचा. काहीही सबबी काढायचा पण अशा कोणत्याच प्रसंगी हजर राहायचा नाही. अर्थात त्याने सानिकाला तू देवाचे नाव घेऊ नको किंवा देवधर्म करू नको असे कधीच स्पष्ट सांगितले नाही. याबाबतीत काही वेळेस त्याचे तर्क इतके हास्यास्पद असायचे की सानिकाला त्यावर काय बोलावे हेच समजत नव्हते. तिच्या आईनेही अनेक वेळेस हे तिच्या लक्षात आणून दिले होते, पण अभिजीत नास्तिक असेल असे वाटून तिने परस्पर थातूरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेली होती. तसेही ही एक गोष्ट सोडली तर अभिजीतच्या वागण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळेच तर तिलाही जास्त खोलात शिरण्याची कधीच गरज वाटली नाही.

महिन्यांमागून महिने जात होते. सानिकाच्या पुढे सगळी सुखे हात जोडून उभी होती. खूप प्रेम करणारा नवरा, समाजात मिळत असलेली प्रतिष्ठा, जिथे वाटेल तिथे खर्च करण्यासाठी चिक्कार पैसा, हवी तेवढी मोकळीक आणि सुखोपभोगाच्या आणि चैनीच्या सगळ्या वस्तू. मग अजून काय पाहिजे? तिने फक्त म्हणायचा अवकाश आणि अभिजीत तिच्या समोर हजर होत होता, पाहिजे ती वस्तू हजर करत होता. पण या सगळ्या काळात अभिजीत एकदाही कोणत्याही मंदिराची पायरी चढला नाही, की कोणत्या मंदिराच्या दानपेटीत त्याने रुपयाही टाकला नाही. त्यामुळे कालजितही त्याला सगळी मदत करत होता. बोलता बोलता १० वर्ष कसे निघून गेले हे त्यांना समजलेही नाही.

आज जेव्हा अभिजीत घरी आला तेंव्हा सानिका आईकडे गेलेली होती. आज त्याला येण्यास नेहमीपेक्षा जरा जास्त उशीर झाल्यामुळे संध्याकाळ उलटून गेली होती. सानिका घरात नसल्यामुळे अभिजीतचे मन कशातच लागेना. काहीतरी मनोरंजन म्हणून त्याने टीव्ही लावण्यासाठी रिमोट उचलला आणि कालजित प्रकट झाला.

“चल… आज आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे.” आजचा कालजिताचा आवाज अभिजीतला जरासा चमत्कारिक वाटला.

“आपल्याला?” अभिजीतने आश्चर्याने विचारले.

“हो… आपल्याला…”

“कुठे?”

“मी नेईल तिकडे…”

काय बोलावे अभिजीतला समजेना. एकदम त्याच्या मनात विचार आला की १२ वर्षाचा कालावधी संपला की काय? त्याच्या मनात हा विचार येतो न येतो तोच कालजित म्हणाला.

“घाबरू नको… अजून त्या गोष्टीला २ वर्ष अवकाश आहे.” अभिजीतच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव पाहून कालजिताला मजा वाटली.

“मग? मग आपण आज कुठे जाणार आहोत?” काहीसे बिचकतच अभिजीतने प्रश्न केला.

“हाहाहा… आज मी तुला तुझे नवे घर दाखवणार आहे.” अभिजीतला चिडवण्याच्या स्वरात कालजिताने सांगितले.

“नवे घर?”

“हो… नवे घरच… अजून दोन वर्षांनी मी तुला कुठे घेऊन जाणार आहे ते माहिती करून घेण्याची तुझी इच्छा नाही काय?” तसेही कालजिताला नाही म्हणायची त्याची प्राज्ञा नव्हती. त्यामुळे तो काहीच बोलला नाही.

“हाहाहा… बहुतेक तू याबद्दल विसरला होतास… तीच आठवण मी तुला करून देण्यासाठी मुद्दाम आलो आहे. चल… माझा हात धर…” कालजिताने एकदा अभिजीतकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला आणि त्याचा हात हातात घेतला. अभिजीतला त्याचे शरीर पुन्हा एकदा पिसासारखे हलके हलके वाटू लागले. काही वेळातच दोघे अंजनेरी पर्वताच्या त्याचं भागात होते जिथे त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. पोर्णिमा असल्यामुळे आकाशातील चंद्र जरा जास्तच मोठा दिसत होता. त्याचा प्रकाश इतका लक्ख पडला होता की पर्वतावरील सगळ्या गोष्टी अगदी स्वच्छ दिसत होत्या. आजूबाजूचा परिसरही त्या प्रकाशात उजळून निघाला होता. फरक फक्त इतकाच होता की दिवसा दिसणारे सगळे रंग लोप पावले होते आणि त्यांची जागा घेतली होती काळ्या आणि धूसर पिवळसर पांढऱ्या रंगाने.

डोंगरमाथ्यावर टिपूर चांदण्यात खरं तर खूप छान वाटते, पण अभिजीतचे हृदय मात्र धडधडत होते. या आधी कोणतेही संकट आले तरी ते कालजित निभावून नेत होता. पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. कालजिताची त्याला प्रथमच भीती वाटत होती.

“हाहाहा… कारे… घाबरलास की काय? हाहाहा…” काहीसे कुच्छित स्वरात कालजिताने विचारले.

“नाही… बिलकुल नाही… पण वाईट मात्र नक्कीच वाटते आहे.” सानिकाचा आणि आपला सहवास आता फक्त दोनच वर्ष उरलेला आहे हा विचार मनात येऊन अभिजीत म्हणाला.

“तुम्हा माणसांचा हाच सगळ्यात मोठा दुर्गुण आहे… मोह… मोहापायी तुम्ही माणसे माझ्या सारख्या ब्रह्मराक्षसाच्या तावडीत सापडतात. आणि माझ्या प्रलोभनाला बळी पडतात. त्यानंतर तुम्ही इतके वाहवत गेलेले असता की कोणतीही ईश्वरी शक्ती तुम्हाला मदत करत नाही आणि माझ्यापासून तुमची सुटका होत नाही. आता मी ज्या ज्या वेळेस तुझ्या समोर येईल त्या त्या वेळेस तुला तुझ्या परिणामांची आठवण करून देईल. असे करताना खरंच मला खूपच मजा वाटते. हाहाहा… हाच तो असुरी आनंद. चल पुढे…” अट्टाहास करत कालजित एका उंचवट्याकडे निघाला. अभिजीतही त्याच्या मागून चालू लागला. त्या टेकडी वजा उंचवटया समोर आल्यावर कालजिताने हवेत हात फिरवून काहीतरी पुटपुटले आणि तो उंचवटा दोन भागात विभागाला जाऊन तिथे खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या.

“चल… तुला आता आपली दुनिया दाखवतो.” असे म्हणत कालजित पुढे झाला. अभिजीत काही न बोलता त्याच्या मागे चालू लागला. ८/१० पावलांवरच दगडी पायऱ्या लागल्या. दोघेही एकेक पायरी उतरून खाली जाऊ लागले. बराच वेळ ते पायऱ्या उतरत होते. सगळीकडे मिट्ट काळोख होता पण कालजिताने स्वतःच्या शक्तीच्या जोरावर त्यांच्या गरजेपुरता उजेड निर्माण केल्यामुळे अभिजीतला पायऱ्या उतरणे सोपे जात होते. कालजित अगदी सराईतपणे उतरत होता पण अभिजीत मात्र जपून पाय टाकत होता. मध्येच एखाद्या पायरीवर लहान मोठ्या आकाराचे खेकडे नजरेस पडत होते. काही ठिकाणी तर त्याला बोटभर जाडीचे दीड दोन फुट लांबीचे सापही नजरेस पडले. आजूबाजूच्या दगडाला ओल आल्यामुळे सगळीकडे शेवाळे उगले होते. त्यामुळे जर त्याला स्पर्श झाला तर दगडाचा कठीणपणा जाणवण्या ऐवजी काहीसा मखमली स्पर्श अनुभवास येत होता. आपण बरेच खाली उतरलो आहेत हे त्याला जाणवले. हळूहळू एक कुजट आणि काहीसा उग्र वास त्याच्या नाकाला झोंबू लागला. त्या जागेत ऑक्सिजन विरळ झाल्यामुळे आता त्याला श्वास घेणेही जड जाऊ लागले. आणि ४/६ पायऱ्या उतरल्यावर लगेचच त्याला धाप लागू लागली.

“हाहाहा… थकलास? इतक्या लवकर? अजून आपल्याला निम्मे खाली उतरायचे आहे…” हसत हसत कालजित म्हणाला.

“कालजिता… मला आता श्वास घेता येत नाहीये… अजून काही वेळातच मी श्वास गुदमरून मरणार असे वाटते. तू ठरवले तर आपण एका क्षणात तिथे पोहचू. मग तू माझा असा छळ का मांडला आहेस?” अगदी केविलवाण्या स्वरात अभिजीतने विचारले.

“हाहाहा… हीच सगळ्यात मोठी समस्या आहे तुम्हा मानवांची. तुम्हाला सगळी सुखे तर पाहिजे असतात, पण त्यासाठी कष्ट करण्याची तुमची तयारी नसते. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त सुख मिळवण्याच्या मागे तुम्ही लागतात आणि त्यासाठी प्रसंगी चांगले वाईट सगळे मार्ग तुम्ही अवलंबतात. जाऊ दे… मला काय त्याचे… घाबरू नकोस… तू बिलकुल मरणार नाही याची मी काळजी घेईन. पण तुला हा थोडासा त्रास सहन करावा लागेल. इतके दिवस विनासायास सगळ्या गोष्टी मी तुला दिल्याच ना? आता त्यासाठी करावे लागले असते ते कष्ट मी तुझ्याकडून अशा प्रकारे करून घेतले तर त्यात अन्याय कुठला?” मानभावीपणाचा आव आणत कालजिताने विचारले.

“अरे पण तू मला १२ वर्षाची मुदत दिली होती, ती अजून संपली नाहीये… मग तरीही तू मला असे कष्ट का देतो आहेस?” अभिजीतने गोंधळून विचारले.

“हाहाहा… तुला कुणी सांगितले की ब्रम्हराक्षस प्रत्येक वचन पाळतातच म्हणून? आम्ही आमच्या सोयीने स्वतः निर्णय घेत असतो. आणि अजूनही मी माझे वचन पाळतोच आहे. तुझ्या बरोबर मी नसतो तर तुला इथे येण्यासाठी जे कष्ट पडले असते, तेच आता ही पडत आहेत इतकेच. मी कोणतेही वेगळे कष्ट तुला देत नाहीये… आणि तू एक विसरतो आहेस… स्वर्ग मेल्यानंतर दिसतो… पण नरक मात्र जिवंतपणीही भोगावा लागतो. हाहाहा…” यावर काय बोलावे हे अभिजीतला सुचेना.

क्रमशःमुक्ती भाग ७.

— मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ६ लिंक

Leave a comment