मुक्ती भाग ६ –
“सायेब… आपन मारलेला मंत्र वापस नाय आला… म्हंजी तुमचं काम झालं बगा…” काहीशा आत्मप्रौढीने मांत्रिक म्हणाला.
“वा… बरं झालं… आता मला आणि सानिकाला कुणीच वेगळे करू शकणार नाही…” काहीशा उत्साहाने सुमित म्हणाला.
मांत्रिक आपले आसन सोडायच्या विचारात असतानाच हवेचा झोत अचानक वाढला, खोलीचे दार जोरजोरात आपटून उघडझाप करू लागले, मांत्रिकाने खोलीतच एका बाजूला बनवलेल्या धुनीमधील गरम राख इतस्ततः विखुरली गेली. धुनीतील ज्वाला पूर्णपणे गायब झाल्या. आणि लाकडे खूप जास्त तापून काळ्याची तांबडी, तांबड्याची पिवळी आणि पिवळ्याची नंतर पूर्ण पांढरी दिसू लागली. मांत्रिकाच्या समोर मांडलेली पूजा केव्हांच विखुरली गेली होती. बाहेरून येणारा हवेचा झोत आपल्या झोपडीसोबत आपल्यालाही उडवतो की काय अशी भीती मांत्रिकाला वाटू लागली. खोलीत फक्त धूळ आणि धुराचे साम्राज्य पसरले होते. घरातील भिंतीला लावलेले वेगवेगळ्या अनिष्ट देवतांचे फोटो एकेक करून खाली पडून फुटत होते. शेवटी धुनीतील लाकडेही वाऱ्याच्या झोताने उडाली आणि कोपऱ्यात ठेवलेले मांत्रिकाचे सामान एकेक करून पेट घेऊ लागले. दारातून येणारा हवेचा झोत इतका प्रचंड होता की त्याच्या समोर उभे राहणेही सुमितला जमू शकले नाही आणि तो काहीसा कोलमडत मांत्रिकाजवळ येऊन पडला.
“महाराज! अहो हे… हे काय आहे?” उठण्याचा असफल प्रयत्न करत सुमितने विचारले.
“घात झाला. आवं आपल्यावर आपलाच मंत्र उलटला.” थरथर कापत मांत्रिक म्हणाला.
“बापरे!!! मग आता?”
“मंग काय? ह्यो मंतर लय पावरबाज ऱ्हातो. आता काय हुईल, मला बी ठाव नाय..!!!” थरथर कापतच मांत्रिक म्हणाला.
एकाएकी वातावरण परत शांत झालं. पण तो पर्यंत त्या खोलीची पूर्ण नासधूस झालेली होती. मांत्रिकाने जमवलेल्या सगळ्या वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून केंव्हाच स्वाहा झाल्या होत्या. मारण मंत्रासाठी मांडलेल्या पूजेचे नामोनिशाणही उरले नव्हते. मांत्रिकाच्या गळ्यातील कवड्याच्या, पोवळ्याच्या माळा तुटून विखुरल्या गेल्या होत्या. त्याचा चेहरा हवेने केस पिंजारल्यामुळे जास्तच भेसूर वाटत होता. सुमितचेही सगळे कपडे धुळीने माखले होते आणि क्षणापूर्वी आलेल्या त्या वादळाच्या खुणा तेव्हढ्या सगळीकडे पसरल्या होत्या.
धूळ झटकत सुमित उभा राहिला. शक्य तितक्या लवकर आपण इथून बाहेर पडावे म्हणून त्याने दाराकडे धाव घेतली पण दारात एखादी अदृश्य काच असल्याची त्याला जाणीव झाली. तो फक्त धडका देत होता पण बाहेर मात्र पडू शकत नव्हता. दारातून दिसणारे आकाश मात्र पूर्ण निरभ्र होते. असे कोणतेही वादळ आल्याचे कोणतेही चिन्ह त्याला बाहेर दिसले नाही.
“महाराज. मला बाहेर देखील पडता येत नाहीये.” सुमित ओरडलाच.
“ह्ये मला बी समजनां. मंतर उलटला म्हनायचं तर आपन आजून जीत्ये हाये. मंग ह्ये काय हु ऱ्हायलं?” मांत्रिक पुरता बावचळला.
एकाएकी कालजित प्रकट झाला. त्याचे डोळे पूर्ण लाल झाले होते. चेहरा काळाठीक्कर बनला होता. त्याचे ते रूप पाहून सुमितला तो यमदूत वाटला तर त्यात काहीच नवल नव्हते.
“महाराज. मला यमदूत दिसतो आहे. हा पहा यमदूत. देवा!!! देवा मला क्षमा कर. मी खरंच खूप घोर अन्याय केला आहे. मोठा अपराध केला आहे पण मला त्याची क्षमा कर. मी… मी… मला… मला नको नेऊस…” सुमित अगदी गयावया करत कालजिताच्या पाया पडू लागला. मांत्रिकही हे सगळे पहात होता. त्याची तर अगदी वाचाच बसली होती.
“हाहाहा… अरे भेकडा… आता तुला क्षमा आठवते काय? दुसऱ्याचा जीव घेताना कुठे गेली होती ही तुझी क्षमा? खरं तर तू जे केलं आहेस त्याला क्षमा शक्यच नाही. पण तुला माफ करण्याबद्दल तुझ्याच शत्रूने मला सांगितले आहे. त्याने तुला क्षमा केल्यामुळे मी तुझा जीव घेणार नाही. पण परत भविष्यात तू असे काही करू नये, यासाठी तुला काहीतरी शिक्षा देणे गरजेचे आहे. तु या सगळ्या गोष्टी त्या तुच्छ पोरीचे स्वप्न पाहूनच केल्यात ना? आता तू फक्त स्वप्नातच तिला पाहू शकशील. मी तुझी दृष्टीच काढून घेणार आहे.” असे बोलत कालजिताने सुमितच्या डोळ्यापुढे आपला हात धरला. कुणीतरी आपले डोळे काढून घेतो आहे अशा वेदना सुमितला होऊ लागल्या. तो मोठमोठ्याने ओरडला पण कालजितावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी सुमितला सगळीकडे फक्त अंधार दिसू लागला. त्याने आपल्या डोळ्यांना हात लावला. त्याला आपले डोळे जागच्या जागीच असल्याचे स्पष्ट जाणवले पण हात लावल्यामुळे कुणीतरी डोळ्यात सुया खुपसत आहे अशा वेदना त्याला झाल्या. त्याने झटकत आपले हात बाजूला केले आणि तो चाचपडत भिंतीचा आधार घेण्यासाठी धडपडला. थोड्याच वेळात त्याच्या हाताला दरवाज्याचे तावदान लागले आणि तो एकेक पाऊल टाकत दरवाजातून बाहेर पडला.
सुमितची दुष्टी काढून घेतल्यावर कालजिताने आपला मोर्चा मांत्रिकाकडे वळवला. मांत्रिक हे सगळे पहात जागच्या जागी थरथर कांपत उभा होता. तिथून कुठे हलण्याचेही त्याच्यात धैर्य उरले नव्हते.
“हाहाहा. मांत्रिका… इतके दिवस तू वाईट लोकांची खूप मदत केलीस. आता तुझा वाईट काळ आहे. तू नाही हाक मारणार कुणाला मदतीसाठी? हाहाहा…!!!” मांत्रिकाकडे पहात गडगडटी हास्य करत कालजित म्हणाला.
कालजिताचे बोल ऐकून मांत्रिक काहीसा भानावर आला.
“कोन? कोन हायेस तू? थांब… थांब तुला आताच बांधून टाकतो…” मांत्रिकाने जरी उसने आवसान आणून वरील शब्द उच्चारले तरी त्यात काहीच दम नव्हता. त्याच्या त्या शब्दांची कालजिताला गंमतचं वाटली.
“हाहाहा… मला बांधणार तू? हाहाहा… कर… कर… प्रयत्न कर… पाहू कसा बांधतो ते…”
मांत्रिकाने एकेक मंत्र म्हणायला सुरुवात केली पण त्याचा कालजितावर कोणताच परिणाम होत नव्हता. एकेक करून सगळे बंधन मंत्र म्हणून झाले पण कालजित मात्र त्याच्या समोर हसत उभा होता. हा आपल्या आवाक्यातील नाही हे मांत्रिक मनोमनी समजला आणि त्याने देवाचा धावा करायला सुरुवात केली.
“अरे हरामखोरा… आता तुला देव आठवला काय? इतके दिवस तर त्याच्याच विरुद्ध असणाऱ्या असुरी शक्तींचा तू वापर करत आलास. आता तो कशाला येईल तुझ्या मदतीला? आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो. देवाच्या शक्तीचे सहाय्य फक्त त्यालाच मिळते, ज्याचे वर्तन आणि मन स्वच्छ असते. तुझ्या सारख्या पाप्याला कधीच त्याचा वापर करता येणार नाही. तू मला विचारलेस ना? मी कोण आहे म्हणून? ऐक तर मग. मी ब्रम्हराक्षस आहे. देवाच्या शक्तीला आव्हान देण्याचे सामर्थ्यही मी बाळगतो. त्यामुळे आता माझ्यापासून तुझी कुणी सुटका करेल याची अपेक्षाच तू सोडून दे आणि माझ्याबरोबर यायला तयार हो.”
खरं तर मांत्रिक जितका जास्त प्रयत्न करत होता तितका कालजित खुश होत होता. एका अर्थी तो मांत्रिकाशी खेळत होता असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कालजिताच्या या बोलण्याचा मांत्रिकाच्या मनावर खूपच परिणाम झाला. त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना. त्याचे हातपाय गळाले आणि तो मटकन खाली बसला. थोडक्यात त्याने कालजितापुढे सपशेल शरणागती पत्करली.
“मांत्रिका, तुझी वेळ जवळ आली आहे. आतापर्यंत तू ज्या गोष्टी केल्या त्याची तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. तुला माफी नाही. हाहाहा..!!!” असे बोलत कालजिताने खाली बसलेल्या मांत्रिकाच्या डोक्यावर हात धरला. मांत्रिकाचे सगळे शरीर गरम होऊ लागले. आपल्याला असंख्य विचू डंख मारत आहेत असे त्याला वाटू लागले. त्याने ओरडायचा प्रयत्न केला पण त्याच्या मुखातून आवाजही बाहेर येईनासा झाला. त्याचे डोळे बोटभर बाहेर आले. त्याच्या नाकातून, तोंडातून, कानातून पांढऱ्या रंगाचा धूर बाहेर पडू लागला. त्याचे दात एकेक करून पडू लागले आणि त्यातच त्याच्या आत्म्याने शरीर सोडले.
क्रमशःमुक्ती भाग ६.
— मिलिंद जोशी, नाशिक…