मुक्ती भाग ५ –
सुमित जेव्हा मांत्रिका समोर आला, त्यावेळेस मांत्रिकाने बरीचशी पूजा आधीच मांडून ठेवलेली होती. समोरच एक मोठ्या आकाराचं वर्तुळ केलेलं होतं. त्यात काळी हळद पसरवलेली होती. त्या वर्तुळात गुलालाने एक त्रिकोण काढला होता. त्याचे तिन्ही कोन वर्तुळाला छेडून ३/४ इंच बाहेर आलेले होते. त्या प्रत्येक कोनात एकेक तीन धारेचे लिंबू प्रत्येकी ५ अशा १५ टाचण्या टोचून ठेवले होते. त्या लिंबातील एकावर हळद कुंकू, एकावर गुलाल आणि एकावर बुक्का टाकण्यात आला होता. जवळच एक कणकेची बाहुली बनवून ठेवण्यात आली होती. तिला रीतसर नाक, डोळे, तोंड काढण्यात आले होते. वर्तुळाच्या मध्यावर तीन बाजूंना तीन त्रिकोण काढून त्यात काही आकडे लिहिले होते. जवळच एक फुटके खापर ठेवून त्यात थोडेसे काळे तीळ, जवस, गुलाल, बुक्का, कुंकू अशा गोष्टी ठेवल्या होत्या. तिथेच जमिनीवर लव्हाळा वनस्पतीचा वळलेला पाला ठेवण्यात आला होता. त्याच्या शेजारीच एक धारदार सुरा देखील ठेवण्यात आला होता. पूजा मांडलेल्या जागेपासून थोड्या अंतरावर मांत्रिक बसला होता. त्याच्या जवळच एक देशी दारूची बाटली रिकामी होऊन आडवी पडली होती. आणि तो स्टीलच्या ग्लास मध्ये ओतून घेतलेल्या दारूचे चवीचवीने घोट घेत होता. मांत्रिकाचे लक्ष दारात उभ्या असलेल्या सुमितकडे गेले आणि त्याने विचारणा केली.
“काय वो? आनल्या का समद्या गोष्टी?”
“हो… रुमाल आणला आहे. चालेल ना?” सुमितने विचारले.
“व्हयं… चालंन की… बाकीचं सामान म्या आनलंच हाये… तुमी फकस्त त्याचे पैशे द्या म्हंजी झालं.”
“हो… पैसेही आणले आहेत मी… हे घ्या…” पाचशेच्या काही नोटा मांत्रिकापुढे करत सुमित म्हणाला.
सुमितच्या हातात नोटा पाहताच मांत्रिकाच्या डोळ्यात चमक आली. काहीसे हिसकतच त्याने सुमितच्या हातातून नोटा काढून स्वतःच्या डगल्याच्या खिशात कोंबल्या आणि एका घोटातच ग्लासातील सगळी दारू पोटात ढकलून तो मांडलेल्या पुजेपुढे जाऊन बसला.
“कपडा द्या त्याचा…”
सुमितने काही न बोलता अभिजीतचा रुमाल मांत्रिकापुढे केला. मांत्रिकाने आपल्या एका हाताच्या पंजावर तो रुमाल अंथरला आणि दुसऱ्या हाताने जवळ ठेवलेली कणकेची बाहुली त्या रुमालावर ठेवली. नंतर मुंडक्याचा भाग सोडून तो रुमाल त्या कणकेच्या बाहुलीला गुंढाळला आणि ती वर्तुळाच्या मधोमध ठेवून त्याच्या सहकाऱ्याला हाक मारली.
“लख्या… आरं ती मसणातील माती घेऊन यी…”
“व्हयं जी…” लख्या लगेचच एका पिशवीत ठेवलेली स्मशानातील माती घेऊन आला.
“आरं ये रत्ताळ्या… कवापास्नं हायीस हितं? तुला ठावं हायं ना? माती म्हनल्यावर मातीच आनली व्ह्यं? ते कोंबडं कोन आननार? तुहा बाप?” फक्त मातीची पिशवी घेऊन येणाऱ्या लख्याच्या अंगावर मांत्रिक खेकसलाच.
“चल आन ती पयले… जाय कोंबडं घीवून यी…” लख्याच्या हातातली मातीची पिशवी हिसकावत मांत्रिकाने आज्ञा सोडली.
काही न बोलता लख्या बाहेर पळाला. मांत्रिकाने मातीच्या पिशवीतून ओंजळभर माती काढली आणि आपल्या आसनाखाली घातली. नंतर शेजारी ठेवलेल्या लव्हाळा वनस्पतीचा वाळलेला पाला हाताने तोडला आणि तोही आपल्या आसनाच्या चारी बाजूला अभिमंत्रित करून पसरला. थोड्याच वेळात लख्या बाहेरून एक गुबगुबीत दिसणारा कोंबडा घेऊन आत आला. मांत्रिकाने आभाळाकडे एकवार पाहिले आणि विचित्र हावभाव करत मंत्र म्हणायला सुरुवात केली. ५ एक मिनिटानंतर त्याने लख्याच्या हातून कोंबडा आपल्या हातात घेतला. कोंबड्याने सुटून पळण्याचा प्रयत्न केला पण मांत्रिकाची पकड बरीच मजबूत होती. कोंबड्याचा कोककोक आवाज जरा जास्तच केविलवाणा वाटू लागला. त्यानंतर मांत्रिकाने कोंबड्याला कणकेच्या बाहुलीवर धरले. एखाद्याची नजर उतरवताना जसे आपण मीठ मोहरी त्याच्या अंगावरून उतरवतो तसे त्याने तो कोंबडा बाहुलीच्या पायाकडून डोक्याकडे अशा पद्धतीने ३ वेळेस उतरवला. नंतर त्याने आपल्या एका हाताच्या मजबूत पंजात कोंबड्याचे डोके घट्ट पकडले आणि दुसऱ्या हाताने मानेखालाचा भाग पकडला. कोंबड्याची तडफड आता जास्तच वाढली. त्याचा श्वास गुदमरू लागला. जसजशी कोंबड्याची तडफड वाढत होती तसतसा सुमित बेचैन होत होता. सुमित जरी मांसाहारी होता तरी त्याने अजून पर्यंत कधी अशी गोष्ट पाहिलेली नव्हती. मांत्रिकाने मंत्र पूर्ण होताच हाताला हिसका दिला. एक अस्पष्टसा “कोक” असा आवाज करून कोंबड्याची तडफड बंद पडली. ते दृश्य पाहून सुमितला काही काळ स्वतःचाच राग आला. त्याचे मन काहीसे हेलावले. आपल्या एका तुच्छ स्वार्थासाठी आपण एका प्राण्याचा नाहक बळी दिला आणि आता याचाच वापर करून एका मनुष्यालाही हालहाल करून मारणार आहोत हा विचार मनात आला आणि त्याचे मन उद्विग्न झाले. अजूनही आपण मांत्रिकाला हे सगळे थांबवायला सांगावे आणि या सगळ्यापासून दूर निघून जावे असेही त्याचे एक मन त्याला सांगू लागले.
इकडे मांत्रिकाने आपली मांडी घातलेली बैठक सोडली. दोन पायांवर उकिडवे बसत दोन गुडघ्यांमध्ये कोंबड्याचे शरीर घट्ट पकडले. एका हाताने बाजूला ठेवलेला सुरा उचलला आणि एक काहीसा जोरदार वार कोंबड्याच्या मानेवर केला. एका वारासरशी कोंबड्याचे मुंडके दूर जाऊन पडले आणि त्याच्या मानेतून रक्ताची चिळकांडी उडाली. घाईघाईने त्याने त्या रक्ताची अंघोळ रुमालात गुंढाळलेल्या कणकेच्या बाहुलीला घातली. समोर घडणारा तो बीभत्स प्रकार आता सुमितला पाहवेनासा झाला. मांत्रिकाचे लक्ष जसे सुमितच्या चेहऱ्याकडे गेले तसे त्याला सुमितच्या मनात चाललेली घालमेल स्पष्ट जाणवली.
“काय इचार करून ऱ्हायले? तुमचा दुश्मन बी असाच मरनं… मंग तुमी हाय नी ती बाई हाय…” इथून सुमितने माघार घेऊ नये यासाठी मांत्रिकाने मुद्दामच सानिकाचा उल्लेख केला होता.
सानिकाचा विचार डोक्यात येताच सुमितचे आधीचे सगळे विचार मावळले आणि अभिजीत आता संपलाच पाहिजे हाच एकमेव विचार त्याच्या डोक्यात फिट बसला.
मांत्रिक एकेक करून त्या कणकेच्या बाहुलीला टाचण्या टोचू लागला. सगळ्या टाचण्या टोचून झाल्या आणि सुमितला घरघर ऐकू येऊ लागली. हळूहळू हा आवाज वाढत चालला. एखादी गोष्ट जर जोरात फिरू लागली की जसा त्याचा “सूऽऽसूऽऽ“ आवाज येतो तसाच तो आवाज होता. काही क्षणच फक्त तो आवाज ऐकू आला आणि लगेचच तो खूप स्पीडने आपल्या पासून दूर जात असल्याचे सुमितला जाणवले. पुढच्या ८/१० सेकंदात तो आवाज पूर्णपणे बंद झाला होता.
अभिजीत ऑफिसवर आला तेव्हापासून त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. कसल्या तरी अनामिक भीतीने तो ग्रासला गेला होता. याचे कारण काय असेल ते जरी त्याला नक्की माहिती नव्हते तरीही कालजिताने त्याला तशी पूर्वसूचना दिली होती. अभिजीतचे डोके आता जड होऊ लागले. हळूहळू त्याला कसलीसी घरघर स्पष्ट ऐकू येऊ लागली. तो आवाज आता वाढू लागला आणि क्षणार्धात कालजित प्रकट झाला. आता त्याला जोराचे वारे वाहत असल्यासारखे वाटायला लागले आणि काही वेळातच आपल्या भोवती काहीतरी खूप जोरात फिरते आहे असा त्याला भास झाला.
“अरे मुर्खा… तुला मी सांगितले होते, पण अजूनही तू योग्य विचार करत नाहीयेस?” एकाएकी कालजिताचा आवाज घुमला.
“अजूनही विचार कर. तुला पाहायचे आहे का तुझ्या भोवती काय फिरते आहे ते? हे पहा.” असे म्हणत कालजिताने अभिजीतच्या डोळ्यासमोरून हात फिरवला.
हळूहळू अभिजीतच्या समोर एक लिंबासारखी पिवळी वस्तू खूप जोरात फिरते आहे हे स्पष्ट दिसू लागले. त्याचा वेग इतका प्रचंड होता की ती वस्तू इतकी लहान असूनही त्याचा आवाज मात्र अतिशय जोरात येत होता. त्याच्या फिरण्याने उत्पन्न होणारे वारेही त्याला स्पष्ट जाणवत होते. अभिजीतच्या छातीच्या रेषेत ती वस्तू फिरता फिरता काहीशी खालीवर होत होती. आता मात्र अभिजीत काहीसा घाबरला. अशा गोष्टी त्याने यापूर्वी कधीही पाहिलेल्या नव्हत्या.
“पाहिलेस? हा मारण मंत्र आहे… याला थोपविण्याची शक्ती भल्या भल्या लोकांमध्ये नसते. पण माझ्यापुढे याचे काहीही चालत नाही. तू जर सांगशील तर मी हाच मंत्र उलटवू शकतो. तो मांत्रिक आणि तुझा शत्रू दोघेही एकाच वेळी कायमचे नष्ट झालेले असतील. बोल, अजूनही बोल.” कालजित आपले मोठे डोळे अभिजीतकडे रोखत म्हणाला.
“कालजिता… मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. तुझ्या शक्तीबद्दल मी कधीच संशय घेतला नाही… घेणारही नाही. तुझ्या शक्तीपुढे ते लोक अगदीच क्षुद्र आहेत. त्यांना मारून काय असा मोठेपणा मिळणार आहे? जो पर्यंत मला तुझे साहाय्य आहे तोपर्यंत मला कशाची भीती?” अभिजीतने परत आपला नकार दिला. पण त्याच बरोबर कालजिताच्या शक्तीची स्तुतीही केली. अभिजीतने केलेली स्तुती ऐकून कालजित प्रसन्न झाला.
“अभिजीत…!!! माहिती नाही का, पण तुझे बोलणे मला मनापासून आवडते. त्यामुळेच माझ्या बऱ्याच गोष्टी तू अव्हेरतो, तरीही मला तुझा राग येत नाही. ठीक आहे. जशी तुझी मर्जी. पण माझे काम जास्त वाढू नये यासाठी मात्र मी माझ्या परीने त्यांचा बंदोबस्त करणारच आहे. आणि यापासून त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही.”
कालजिताने पहिल्यांदाच अभिजीतला नावाने हाक मारली होती आणि हे अभिजीतच्याही लक्षात आले. तिथे उभ्या उभ्याच कालजिताने एकदा त्या फिरणाऱ्या वस्तूकडे पाहिजे आणि नंतर अभिजीतच्या ऑफिसच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे बोट केले. ती वस्तू क्षणाचाही विलंब न करता त्या घड्याळावर जावून आपटली आणि घड्याळाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
क्रमशःमुक्ती भाग ५.
— मिलिंद जोशी, नाशिक…