मुक्ती भाग ४ –
सानिकाचे आणि अभिजीतचे लग्न ठरले याचे सगळ्यात जास्त वाईट जर कुणाला वाटले असेल तर तो होता सुमित. सुमितच्या मनात असलेल्या अभिजीतबद्दलच्या असूयेचे रुपांतर आता शत्रुत्वात झाले होते. तसे त्याने बऱ्याच वेळेस अभिजीतला शह देण्याचा प्रयत्नही केला होता, पण दरवेळेस त्याला फक्त अपयशच आले होते. आता तर सुमितचे मित्रही या बाबतीत सुमितची मदत करायला तयार नव्हते. एकेकाळचा सुमितचा सगळ्यात जवळचा मित्र, पराग… अभिजीतबद्दल एक अवाक्षरही ऐकून घेण्यास तयार नव्हता. सुमितच्या मनात धुमसत असलेला अभिजीत बद्दलचा द्वेष कुणापासूनच लपून राहिला नाही, अगदी अभिजीत पासूनही. पण सुमित आपले काहीही अहित करू शकत नाही हे अभिजीतला चांगलेच माहिती असल्यामुळे त्याने सुमितकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे धोरण ठेवले. आणि त्यामुळे तर सुमित अजूनच डिवचला गेला.
सगळ्याच बाबतीत अपयश आलेला सुमित आता पुरता सुडाने पेटला होता. आणि तशातच त्याला कुठूनतरी मंत्रतंत्राची माहिती मिळाली. हाही एक उपाय करून पहावा म्हणून त्याने असा कुणी मांत्रिक मिळतो का याचा तपास सुरु केला. काही दिवसातच त्याला अशा एका मांत्रिकाचा पत्ता मिळाला आणि तो मांत्रिकाच्या ठिकाणावर पोहोचला.
मांत्रिकाची झोपडी वजा खोली त्या मानाने खूपच छोटी होती. जमीन शेणाने सारवलेली. एका बाजूला एक झरोका वजा खिडकी, त्यातून आणि दारातून येणारा काय तो प्रकाश तिथे येत होता. त्यामुळेच दिवसाही तिथे लाईटची खूप गरज वाटत होती. एक झिरोचा प्रकाशित बल्प त्या खोलीत प्रकाश देण्याऐवजी अंधाराची साक्षच फक्त पटवत होता. एका बाजूला धुनीसारखी काही लाकडे जळत होती. समोर एक केसांच्या जटा झालेला मांत्रिक डोळे गरागरा फिरवत तोंडाने काहीतरी पुटपुटत होता. तो काय म्हणतो आहे ते अगदी मन एकाग्र करून आणि लक्ष केंद्रित करून ऐकले तरी समजत नव्हते. मध्येच तो हातवारे करत होता तर मध्येच काही शिव्या देत होता. इतर जरी काही समजत नव्हते तरी शिव्या मात्र मराठीत असल्यामुळे त्या अगदी स्पष्टपणे समजत होत्या. त्याच्या पुढे बसलेल्या भक्तांना मात्र त्याच्या शिव्यांचे काहीच वाटत नव्हते. एखादे कीर्तन ऐकावे या भक्तिभावाने ते त्या मांत्रिकाच्या शिव्या ऐकत होते. त्याच्या गळ्यातील पांढऱ्या कवड्यांच्या माळा, त्याच्या अंगातील काळ्या रंगाच्या डगल्यावर जास्तच उठून दिसत होत्या. पण तरी सामान्य माणसाचे लक्ष वेधून घेत होते ते त्याच्या गळ्यातील छोट्या आकाराचे कवटीचे लॉकेट. त्या कवटीच्या लॉकेटमध्ये डोळ्यांच्या ठिकाणी लाल रंगाचे लाईट लावले होते आणि ते थोड्या थोड्या वेळाने मिचकत होते. एकंदरीत लोकांच्या कमजोर मनावर कोणत्या गोष्टीने गारुड करता येईल याचे कसब त्याने पूर्णपणे अंगी बाणल्याचे दिसून येत होते.
सुमितच्या पुढे काही जण आधीच बसले होते. त्यांचा एकंदरीत पोशाख, भाषा आणि वागणूक यावरून त्यांच्यावर अशा गोष्टींचा पगडा असणे यात काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. तिथला तो सगळा प्रकार पाहून एकवेळ ‘आपण चूक तर करत नाहीत ना?’ असे सुमितच्या मनात येऊन गेले; पण एखाद्याच्या द्वेषाचा अतिरेक झाला की माणूस आपला विवेक गमावून बसतो. आणि त्याला सुमितही अपवाद नव्हता. त्याला काहीही करून फक्त अभिजीतचं वाटोळं झालेलं पाहायचं होतं. त्यामुळे त्याच्या मनातला तो विचार त्याने आल्या सरशी झटकून टाकला आणि तिथेच जमिनीवर फतकल मारली.
मांत्रिकाने त्याच्या पुढील माणसाला काही मुळ्या आणि गुलाल देऊन जायला सांगितले आणि सुमितच्या पुढे बसलेली बाई मांत्रिकासमोर जावून बसली.
“काय गं भागाबाई… तुह्या शेजारणीचा बंदुबस्त झाला ना?”
“व्हंय द्येवा… तुमी ती चौकी दिली, अन म्या टाकली न्हवं तिच्या दाराम्होरं… आता पडलीय हातपाय तानून… उटता बी येत न्हाई तिला… लय उपकार झाले बगा…” भागाबाई हात जोडत आणि तोंड वेंगाडत म्हणाली.
“मंग… आता कशापायी आलीयंस हिडं पुन्यांदा?” मांत्रिकाने विचारले.
“माही ती ननद हाय ना… पक्की अवदसा हाय मेली. अन तिचं ते अवलादी पॉर… लय बेरकी… माह्या पोरास्नी येताजाता मारतं, आपन काय बोलाया गेलं त, ती… डूचकी मेली, म्हनती कशी; माह्या पोरास्नी काय बी बोलायचं नाय… लयं आईकून घेतलं, पर आता नाय… त्येचाच काटा काढायचा हाय… द्येवा!!! तुमी काय बी करा, अन असं करां ना… त्यो मेला बी नाय पायजेल अन जगला बी नाय पायजेल.” द्वेषबुद्धीने पछाडलेल्या भागाबाईने मांत्रिकाला आपले गाऱ्हाणे सांगितले.
“बाई… त्ये समंद म्या पघून घितो. पन तुला खर्च करावा लागंन. कोंबडं द्यावं लागंल भैरुबाला. बाकी सामान बी लागंल, चारसं रूपे लागतीन. चालंल ना?” अगदी गंभीर चेहरा करून मांत्रिकानं विचारलं.
“व्हय चालंन की. फकस्त त्येचा काटा निघाया हवा.”
“निघल निघल… आजची येळ बराबर नाय… तू उदयाला ये… तुजं काम पयल्यांदा करतो..!!!”
“ठीक हाय द्येवा…” म्हणत भागाबाई उठली आणि सुमित मांत्रिकासमोर जावून बसला.
“बोला… काय प्राब्लेम हाय?” मांत्रिकाने सुमितला विचारले.
“एकाचा बंदोबस्त करायचा आहे… कायमचा…” काहीशा हळू आवाजात सुमितने सांगितले.
“करू की… तुमी सांगाल त्याचा बंदुबस्त करू…. त्येच्यासाठीच म्या बसेल हाय हिडं..!!!” काहीशा आढ्यतेने मांत्रिक म्हणाला. मग एकेक करून सुमितने मांत्रिकाला सगळं सांगितलं.
“पार्टी लय सॉंलिड दिसतेय सायेब… खर्च बी तसाच लागंल… चालन ना?” त्याचे सगळे ऐकून घेतल्यावर मांत्रिक म्हणाला.
“हो… मला काही हरकत नाही.” अगदी उतावीळपणे सुमितने होकार दिला. आणि मग यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील याची एक भलीमोठी यादीच मांत्रिकाने सुमितच्या हातात ठेवली.
“जावा आता घरला… ह्ये समदं आनलं का मंग तुमचं काम हुईल…” असे म्हणत मांत्रिकाने सुमितची बोळवण केली.
*********
सकाळी अभिजीत झोपेतून उठला तो त्याच्या समोर कालजित उभा होता. एव्हाना त्याला कालजितची सवय झाली होती, पण आज आपल्या उठण्याच्या आधीच हा कशासाठी आला असावा याचा अंदाज बांधण्याचा त्याने प्रयत्न चालू केला.
“तुला सावध करायला आलो आहे.” अभिजीतेने काही विचारायच्या आताच कालजिताने आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले.
“सावध करायला? कुणापासून आणि का?” काहीसे आश्चर्य वाटल्यागत अभिजीतने विचारले.
“हो… सावध करायला… त्या सुमित पासून… तो तुला संपविण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी त्याने एका मांत्रिकाचीही भेट घेतली आहे.”
“अस्सं !!! आता इथपर्यंत मजल गेली की काय त्याची…” अभिजीत काहीसे तोंडातल्या तोंडात पुटपुटला…
“आता मात्र त्याचा बदला तू घेतला पाहिजेस. इतके दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून त्याची अशी हिम्मत झाली. तू सांग फक्त… त्याला देशोधडीला लावायला मला एक क्षणही पुरेसा आहे.” काहीसे उत्साहात येऊन कालजित म्हणाला आणि अभिजीतच्या चेहऱ्याकडे आशेने पाहू लागला.
अभिजीतच्या चेहऱ्यावर आता गांभीर्य आले होते. मनाची चलबिचल चालू झाली. सुमितच्या या कृत्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर काही क्षणच चमकला आणि गायब झाला. परत हळूहळू त्याचा चेहरा पूर्ववत सौम्य झाला.
“नाही… नको… अशी कोणतीही गोष्ट करण्याची काही गरज नाही.” अतिशय सौम्यपणे त्याने कालजिताला नकार दिला.
“अरे मुर्खा… शक्ती असूनही लोकांचा अन्याय सहन करणाऱ्या लोकांना भ्याड म्हटले जाते हेही तुला माहित नाही काय? तो तुला कधीही अपाय करू शकतो, नव्हे यापूर्वीही अनेक वेळेस त्याने तुला संपवण्याचा प्रयत्न केला, पण केवळ माझ्यामुळे तू वाचला आहेस अजून पर्यंत. नाहीतर केव्हांच तुझा बळी गेला असता हेही तुझ्या लक्षात येत नाहीये?” चरफडत कालजिताने अभिजीतला डिवचण्याचा प्रयत्न केला.
“कालजिता… आता पर्यंत एक गोष्ट मला व्यवस्थित समजली आहे.”
“कोणती गोष्ट?”
“हीच… आता जगातली कोणतीही शक्ती मला अपाय करण्यास आली तर त्याच्यापुढे आधी कालजित उभा असेल. किमान अजून साडेअकरा वर्ष तरी. कारण त्यानंतरच माझ्यावर तुझा हक्क असणार आहे. त्यामुळे तो पर्यंत तरी मला काळजी करण्याचे कारणच नाही.” कालाजिताच्या डिवचण्याचा स्वतःवर काहीही परिणाम न होऊ देता अभिजितने अगदी शांतपणे उत्तर दिले.
यावर काय बोलावे याचा प्रश्न आता कालजिताला पडला. अभिजीतच्या हातून जितके जास्त होईल तितके पाप करून घ्यावे असे कालजित मनात ठरवत होता, पण अभिजीत मात्र जितके होईल तितके त्यापासून लांब राहून स्वतःचा फायदा करून घेत होता. शेवटी न राहवून त्याला चीथावण्याच्या उद्देशाने कालजित म्हणाला…
“अरे भेकडा… तुझे रक्त कसे तापत नाही? तुला राग कसा येत नाही त्या सुमितच्या वागणुकीचा? आज तुला मी वाचवेल पण त्यानंतर त्याने तुझ्या त्या सानिकावर अघोरी प्रयोग केले तर तिला कोण वाचवेल त्याच्यापासून? तुझे डोके कसे चालत नाही? तू इतका मूढ कसा काय झालास?” जो जो कालजित अभिजीतला चीथावण्याचा प्रयत्न करत होता, तो तो त्याचे रूप भयंकर होत होते…
“बोल… बोल ना आता… त्याने तुझ्या सानिकावर अघोरी प्रयोग केले तर तू काय करशील?”
“तसे काही होणार नाही… आणि झालेच तरी तिलाही तूच वाचवणार आहेस… किमान माझे सानिकाशी लग्न होत नाही तो पर्यंत तरी… कारण तिच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे आणि तू ती पूर्ण करून देणार आहेस… म्हणजे आता तिच्यावर जर काही संकट येणार असेल तर तेही तू निवारले पाहिजेस…” अगदी शांत स्वरात अभिजीत म्हणाला.
“चल हट… मी तिचे रक्षण करण्यास बांधील नाहीये…” काहीशा गुश्शातच कालजिताने नकार दिला.
“पण मला पाहिजे ते सुख देण्यास तर बांधील आहेस ना? तिला सगळ्या गोष्टींचा आनंद देणे आणि ती प्रत्येक संकटापासून सुरक्षित राहणे यातच तर माझे सुख आहे. आणि मला सगळ्या प्रकारची सुखं तू देणार आहेस असे तूच मला सांगितले आहेस… बरोबर ना?” अभिजीतचा स्वर अजूनही शांतच होता.
आता मात्र कालजिताचे शब्द खुंटले… पुढे काही न बोलताच कालजित दिसेनासा झाला. कालजित दिसेनासा होताच अभिजीतने घरातली सगळी कामे उरकली आणि तो बाहेर पडणार इतक्यात दरवाजावरील बेल वाजली. आता कोण आले असेल? याचा विचार करत त्याने दार उघडले तो समोर सुमित केविलवाणा चेहरा करून उभा होता.
“अरे सुमित… आज इकडे कसा काय? ये आत ये…” खरं तर तो कशासाठी आला आहे हे अभिजीतला चांगलेच समजले होते, पण तरीही त्याने आपल्या बोलण्यात हे काहीच दिसू दिले नाही.
“अरे काही नाही यार… खास तुलाच भेटायला आलो आहे.” आपला चेहरा सौम्य ठेवत सुमितने सांगितले.
“मला भेटायला? काय खास काम?”
“काम नाही रे… तुझी माफी मागायला आलो आहे मी.” सुमित हे वाक्य म्हणाला खरा पण त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव मात्र वेगळेच काही सांगत होते.
“माफी? कशाबद्दल?” सगळे माहिती असूनही अभिजितने वेड पांघरले.
“अरे आज पर्यंत जो मी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला होता त्याबद्दल.”
“जाऊ दे रे ते… दे सोडून… बरं मला सांग काय घेणार तू? चहा, कॉफी की थंड काही?” सुमितच्या खांद्यावर थोपटत अभिजीतने विचारले.
“चहा चालेल !!!” सुमितने ही अशीच अपेक्षा केली होती.
“ठीक आहे… बस जरा… टीव्ही पहा… तो पर्यंत मी चहा बनवतो.”
“हो… अगदी सावकाश होऊ दे… मी बसतो इथे टीव्ही पहात.” अभिजीतच्या बोलण्याचा अवकाश आणि सुमितने बैठक मारली.
अभिजीत जसा चहा करण्यासाठी किचन मध्ये गेला, सुमितने तिथे अभिजीतची काही वस्तू मिळते का ते पाहायला सुरुवात केली. त्याच्या सुदैवाने तिथेच टेबलावर एक रुमाल घडी करून ठेवलेला त्याला दिसला. अभिजीत अजून आतच आहे याची खात्री करून त्याने तो तत्काळ आपल्या खिशात घातला आणि टीव्ही पाहायला सुरुवात केली. पुढच्या काही मिनिटातच अभिजीत चहाचे कप घेऊन बाहेर आला. चहा घेऊन झाल्यावर अभिजीतला लग्नासाठी शुभेच्छा देऊन सुमित बाहेर पडला ते तडक मांत्रिकाच्या घरी पोहोचला.
क्रमशःमुक्ती भाग ४.
— मिलिंद जोशी, नाशिक…