मुक्ती भाग ३

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग ३ –

आपल्या हाताची पकड हळूहळू सैल होत आहे असे सानिकाच्या लक्षात आले आणि आपल्या मित्र मैत्रिणींकडे एकवार पाहून घ्यावे म्हणून तिने वर पाहिले. सुमित हळूहळू वर चढत असतानाच अभिजीत मात्र तिला वाचवण्यासाठी येताना दिसला. एकेक पाऊल अगदी सावधगिरीने टाकत तो खाली उतरत होता. सानिकाला परत एकदा वाचण्याची आशा वाटू लागली. तिथेच एक साधारणशी खाच दिसताच अभिजीतने एका हाताने ती मजबुतीने पकडली आणि दुसरा हात सानिकाच्या बाजूने पुढे केला.

“घाबरू नको सानिका. मी नक्कीच तुला वाचवेन. माझा हात पकड. खाली पाहू नकोस. फक्त माझ्याकडे पहा. हात दे!” अभिजीतचा प्रत्येक शब्द आता तिच्या मनात घुमत होता.

आपल्याकडे आलेला अभिजीतचा हात तिने लगेचच पकडला. अभिजीतने अगदी सावधपणे हळूहळू आपला हात वर घेण्यास सुरुवात केली आणि सानिका हळूहळू वर येऊ लागली. तो पर्यंत सुमित वर पोहचून एका सुरक्षित जागी आडवा झाला होता. आपण अगदी मरता मरता वाचलो आहोत हेच फक्त त्याला दिसत होते. अजूनही त्याचे हृदय धाडधाड उडत होते. जिच्या साठी आपण हे भलते धाडस करत होतो, तिची काय स्थिती असेल हा विचारही त्याच्या मनात आला नाही. इतर मित्र अगदी श्वास रोखून अभिजीतकडे पहात होते. कुणाच्याच तोंडून एक अक्षरही फुटत नव्हते. सानिकाने अभिजीतच्या हाताचा आधार मिळताच एका दुसऱ्या दगडाचा आधार घेतला. त्यामुळे तिच्या शरीराचा भार काही प्रमाणात हलका झाल्या बरोबर अभिजीतने जरा जोर लावून तिला वर ओढले.

“अरे… कुणीतरी ओढणी किंवा काही खाली टाका.” काहीसे ओरडत अभिजीत उद्गारला आणि सानिकाच्या मैत्रिणीने तिची ओढणी सुमितच्या मित्रांजवळ दिली. त्यांनी एक टोक आपल्या हातात घट्ट धरून दुसरे टोक खाली सोडले. ओढणीचा आधार घेऊन पहिले सानिका आणि नंतर अभिजीत असे दोघेही वर आले.

एक खूप मोठा अपघात थोडक्यात टळला होता त्यामुळे सगळ्यांच्याच चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होते. अभिजीत मात्र अगदी निर्विकार दिसत होता. इतके सगळे घडूनही त्याच्या चेहऱ्यावर किंवा एकूणच त्याच्या वागणुकीत कोणताच बदल झालेला नव्हता. सुमितला जेव्हा परिस्थितीचे भान आले, तोपर्यंत अभिजीतने सानिकाला वाचवले होते. सगळे अभिजीतचे कौतुक करत होते आणि त्या दोघांच्या भोवती घोळका करून उभे होते. सानिका दृष्टीस पडताच सुमित घाईघाईने तिच्या जवळ आला.

“सानिका… तू ठीक आहेस ना? जास्त लागलं तर नाही ना तुला?” अगदी काळजीच्या सुरात त्याने सानिकाला विचारले.

“हो… आता ठीकच आहे…” सानिकाने अगदी रुक्षपणे उत्तर दिले. मदत करण्या ऐवजी सुमित आपल्याला वाऱ्यावर सोडून स्वतःचा जीव वाचवत होता हे दृश्य काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हते. तसेच इतके दिवस ज्याच्या प्रेमाचा तिने उपहास केला त्या अभिजीतने मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिला वाचवले हेही तिने अनुभवले होते.

“अभिजित… तू इथे कसा? कुणाबरोबर आला आहेस?” सुमितकडे दुर्लक्ष करत तिने अभिजीतला विचारले.

“काही नाही… ज्या वेळेस मला एकटेपणाची जाणीव होते त्या वेळेस मी इथे येतो… निसर्गाचे हे रूप पाहून मला बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. इथला सगळा परिसर मला अगदी पायाखालचा आहे असे म्हटले तरी चालेल.” हे वाक्य बोलताना अभिजीतचा अभिनय इतका चांगला होता की तो हे सगळे ठरवून बोलत आहे असे कुणाला खरेही वाटले नसते. खरे तर या सगळ्याच घटनाक्रमाचा तोच कर्ताधर्ता होता. या एका प्रसंगाने त्याच्या कित्येक गोष्टी साध्य झाल्या. सानिका ज्याच्यावर प्रेम करत होती, तो वेळप्रसंगी तिला वाऱ्यावर सोडू शकतो हे त्याने सिद्ध केले. आणि आपण सानिकावर किती जीवापाड प्रेम करतो हेही सप्रमाण दाखवून दिले. इतकेच काय तर सुमितचे मित्रही त्याने स्वतःच्या बाजूने वळवले.

“यार… असे काय म्हणतोस… आम्ही आहोत ना तुझे मित्र… आता कधीच स्वतःला एकटा समजू नकोस…” अभिजीतच्या खांद्यावर हात ठेवत पराग म्हणाला.

“हो… अभि… तू बिलकुल स्वतःला एकटे समजू नकोस…” सुमितकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत सानिका म्हणाली. सानिकाचे शब्द सुमितच्या जिव्हारी लागले खरे, पण त्यावर बोलून आता काहीच उपयोग नाही हेही त्याने जाणले.

“किती धाडसी आहेस रे तू? अगदी जीवाचीही पर्वा करत नाहीस इतरांसाठी…” सई अभिजीतकडे पहात उद्गारली.

“नाही गं, तसं काही नाही. मी आलो तेव्हा तुम्ही सगळे दरीत डोकावून पहात होते. मनात म्हटलं आपणही पाहावं काय आहे ते. आणि जवळ येताच मला सानिका दिसली. तिला मदतीची गरज होती आणि मी ती पुरवायचा प्रयत्न केला… बस… तिच्या जागी इतर कुणीही असती तरीही मी हेच केले असते.” अभिजीतने परत आधीच मनात ठरवलेली वाक्ये बोलून दाखवली.

सगळेच जण कौतुकाने अभिजीतकडे पहात होते आणि त्यांच्यापासून अगदी जवळच उभा असलेला कालजित मात्र गालातल्या गालात हसत होता.

काही दिवसातच सानिकाने सुमितबरोबरचे संबध संपवले आणि अभिजीतला स्वतः प्रपोज केले. अभिजीतनेही कोणतेही आढेवेढे न घेता तिचे प्रेम स्वीकारले. दिवसेंदिवस अभिजीत लोकप्रिय होत चालला तसे त्याचे शत्रूही वाढत चालले. परंतु कालजिताचे सहाय्य मिळाल्यामुळे त्या सगळ्या हितशत्रूंना अभिजीत पुरून उरला होता.

**************

आज सानिका जरा वेगळ्याच मूड मध्ये होती.

“अभि… अजून किती दिवस आपण असे भेटणार?” तिने अभिजीतला विचारले.

“किती दिवस म्हणजे? जो पर्यंत तुझी इच्छा असेल तो पर्यंत…” अभिजीत नेहमीच्याच बेफिकीरीने म्हणाला.

“तुझ्या या बेफिकीर पणाचीच मला कधी कधी भीती वाटते. आता माझ्या घरचे माझ्यासाठी स्थळे पाहायला लागले आहेत.” काहीशा चिंतेने ती म्हणाली.

“ए वेडाबाई, का उगाच काळजी करतेस? तू फक्त सांग लग्न कधी करायचे ते. मी आत्ताही तयार आहे.” तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेत अभिजीत म्हणाला.

“पण त्यासाठी तुला माझ्या घरच्यांशी बोलावे लागेल.” सानिका काहीशी लाजत म्हणाली.

“ठीक आहे. उद्याच येऊन भेटतो तुझ्या घरच्यांना. मग तर झाले?”

“हो. पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरे दे म्हणजे झाले. नाहीतर तिथेही तुझी बेफिकीर वृत्ती नवीन प्रॉब्लेमला आमंत्रण देईल.” सानिकाने आपली काळजी बोलून दाखवली.

“ती काळजी तू करू नकोस. सध्या जगात असा कोणताच प्रॉब्लेम नाही ज्याचे उत्तर माझ्याकडे नाही.” परत एकदा अभिजीत अगदी बेफिकीरीने म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अभिजीत सानिकाच्या घरी हजर झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने डायरेक्ट विषयालाच हात घातला.

“अंकल… तुम्हाला सानिकाने माझ्याबद्दल काही सांगितले आहे का?”

“तुमच्या बद्दल? नाही बुवा… कशाबद्दल बोलताय तुम्ही?” सानिकाने खरं तर अभिजीत बद्दल घरी सगळे सांगितले होते पण त्याचे वागणे, बोलणे याची पारख करता यावी म्हणून सानिकाच्या वडिलांनी आपल्याला काहीच माहित नाही असे दाखवले.

“ठीक आहे. नसेल सांगितले तर मीच सांगतो. मी आणि सानिका एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आता लग्न करू इच्छित आहोत. तशी ती माझ्या पेक्षा सगळ्याच बाबतीत सरस आहे हे देखील मी कबूल करतो. पण माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही याचीही हमी देतो. माझा एक छोटासा व्यवसाय आहे आणि तोही व्यवस्थित स्थिरावला आहे. माझ्या घरी माझ्या व्यतिरिक्त इतर कुणीच नाही. म्हणूनच बोलणी करायला मीच स्वतः आलो. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी सानिकाशी लग्न करू इच्छितो. तुम्हाला जर माझ्याबद्दल कुठे चौकशी करायची असेल तर नक्कीच करू शकता.”

अभिजीतचे इतके स्पष्ट आणि लाघवी बोलणे घरातील सगळ्यांनाच आवडले. सानिकाच्या वडिलांनी त्यांच्या बायकोकडे सहेतुक पाहिले आणि तिने त्यांच्या मनातील भाव नजरेतूनच ओळखून बोलायला सुरुवात केली.

“हे पहा अभिजीत रावं, लग्न म्हणजे देवकार्य आणि कन्यादान म्हणजे सगळ्यात मोठे दान. आम्हाला तरी तुमच्या सुखाशिवाय आणखी काय हवे आहे?”

सानिकाच्या आईच्या तोंडून देवकार्य हा शब्द आला मात्र आणि तिथे कालजित प्रकट झाला. एकटा अभिजीत सोडला तर इतर कुणालाही तो दिसला नाही की त्याचा आवाजही ऐकू आला नाही.

“अरे मूढा… तू परत परत तीच चूक करतोस? तुला सांगितले आहे ना की कोणतेही धार्मिक कार्य तू करता कामा नये. तरी तू लग्न करायला निघालास? तुझी आज जी स्थिती आहे ती देवाच्या कृपेने नाही तर माझ्या दयेने आहे. तुझ्या त्या देवाने काहीच केलेले नाही. जे काही केले ते मी केले आहे. परत एकदा तुला खबरदार करण्यासाठीच मी आलो आहे. एक लक्षात ठेव… तू जिथे जिथे जाशील मी तुझ्या सोबतच असणार. त्यामुळे माझ्यापासून काहीही लपू शकत नाही… समजलास?” कालजिताला समोर पाहून अभिजीतच्या चेहऱ्यावर असलेले तेज क्षणार्धात मावळले. त्याच्या चेहऱ्यात झालेला हा बदल सगळ्यांच्याच लक्षात आला.

“काहो अभिजीतरावं… तुमचा चेहरा असा एकदम बदलला का? काही चुकीचे बोलले का मी?” अभिजीतच्या चेहऱ्यात झालेला बदल पाहून सानिकाच्या आईने अभिजीतला विचारले. पण त्यावर काय बोलावे हे मात्र त्याला लवकर सुचत नव्हते. समोरच डोळे लाल करून कालजित नावाचा ब्रम्हराक्षस उभा होता. आणि त्याच्याबद्दल तो कुणाला सांगूही शकत नव्हता. कालजिताला आणि सानिकाच्या घरच्यांना मान्य होईल असा काहीतरी सुवर्णमध्य त्याला काढावा लागणार होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू लागले.

“अरे कसला इतका विचार करतो आहेस?” काहीसे वैतागून सानिकाने विचारले.

“काही नाही गं. मला आईंना दुखवायचेही नाही आणि माझे याबद्दलचे मत देखील सांगायचे आहे, त्याचीच जुळवणी कशी करावी याचा विचार करतोय.” घाईघाईत अभिजीत बोलून गेला.

“तुम्हाला जे बोलायचे ते स्पष्ट बोला. जर त्यात काही वावगे नसेल तर मला त्यात बिलकुल वाईट वाटणार नाही.”

“तसे नाही आई, ओह!!! तुम्हाला आई म्हटले तर चालेल ना?”

“हो हो तर, नक्कीच चालेल. बोला तुम्हाला काय वाटते ते.”

“तुम्हाला तुमच्या मुलीचा विवाह धुमधडाक्यात करावा असे मनापासून वाटत असेल. त्यात काहीही वावगे नाही. पण अशा विवाहाचा खर्च मला व्यक्तिशः पटत नाही. मी पूर्वी विचार केला होता की, जेव्हा कधी मी लग्न करेन ते रजिस्टर असेल आणि त्यामुळे जो काही खर्च वाचेल तो एखाद्या अनाथ आश्रमाला देणगी स्वरुपात देईल. धुमधडाक्यात लग्न केले तर आपण लग्नाला ज्यांना बोलावतो त्यांना एकवेळचे जेवण दिले काय किंवा नाही दिले काय. काही फरक पडत नाही. पण तेच जर आपण एखाद्या अनाथआश्रमांत देणगी स्वरुपात दिले तर त्याचा त्या लोकांना किती बरे उपयोग होतो?” अगदी मानभावी पणाचा आव आणत अभिजीतने सहेतुक सानिकाच्या आईकडे पाहिले.

“वा! वा!! वा!!! अभिजीतरावं. तुम्ही अगदी लाखातलं बोललात बघा.” अभिजीतच्या बोलण्याला सानिकाच्या वडिलांनी अगदी मनापासून दाद दिली.

तिथेच उभ्या असलेल्या कालजिताकडे अभिजीतने हळूच पाहिले तर त्याचे लाल झालेले डोळे पुन्हा पूर्ववत झाले होते. ही गोष्ट त्यालाही मान्य असल्याचे ते लक्षण होते. आपल्या बोलण्याने अभिजीतने परत एकदा बाजी मारली.

“ठीक आहे. तुम्ही म्हणताय तेही अगदी बरोबर आहे. आज प्रत्येकानेच सामाजिक भान राखले पाहिजे. हरकत नाही. मलाही मान्य आहे तुमचा मुद्दा” सानिकाच्या आईनेही त्याच्या मुद्द्याला दुजोरा दिला.

“ठीक आहे तर. मी आता तुमची रजा घेतो.” असे म्हणत अभिजित उठला.

“असे कसे? आता जेवूनच जा तुम्ही. सानिका. तू आणि अभिजीत बसा बोलत. मी स्वैपाकाची तयारी करते.” असे म्हणत सानिकाच्या आईने स्वैपाकघराकडे मोर्चा वळवला.

“थांब गं आई! मी पण येते तुला मदत करायला.” म्हणत सानिकाही आईच्या मागोमाग निघाली. एकाएकी कालजितही दिसेनासा झाला आणि अभिजीतच्या जीवात जीव आला. त्यानंतर सानिकाच्या वडिलांशी बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारून त्याने त्यांच्यावर एक प्रकारची मोहिनीच घातली. जेवणाच्या वेळीच ३ महिन्यानंतरची एक तारीख लग्नासाठी ठरवली गेली आणि लग्न पक्के केले गेले.

क्रमशःमुक्ती भाग ३.

— मिलिंद जोशी, नाशिक…

भाग २ लिंक –

Leave a comment