मुक्ती भाग २

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग २ –

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अभिजीत झोपेतून जागा झाला तेव्हा आदल्या दिवशी घडलेली सगळी घटना त्याला जशीच्या तशी आठवत होती.पण तरीही त्याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. रोजच्या सवयीप्रमाणे त्याने टेपरेकॉर्डर चालू केला. सकाळी सकाळी काहीतरी चांगले कानावर पडावे यासाठी त्याने घरात असलेली भजनांची कॅसेट लावली. भजनाच्या दोन ओळीही पूर्ण झाल्या नव्हत्या आणि पहाता पहाता कालजित अभिजीत समोर प्रकट झाला.(मुक्ती भाग २)

“अरे अभाग्या… तुला सांगितले आहे ना मी. माझी मदत तुला घ्यायची असेल तर देवाचे नाव विसरून जायचे म्हणून? आणि तरी तू ती फालतू भजने ऐकत बसलास? आधी ते बंद कर नाहीतर माझ्याइतका वाईट कुणीही नसेल.” कालजिताच्या डोळ्यात रक्त उतरल्यामुळे ते लाल झाले होते. चेहऱ्यावर निष्ठुरतेचे भाव होते. त्याचा वर्ण कालपेक्षा जास्तच काळा दिसू लागला. त्याचे ते उग्र रूप पाहून अभिजीतच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने धावतच जावून टेप बंद केला आणि झालेल्या चुकीची कालजिताकडे क्षमायाचना केली.

“तुझी ही पहिलीच चूक आहे म्हणून मी तुला माफ करतो, पण यापुढे जर तुझ्याकडून अशी काही चूक झाली तर मात्र माफी मागण्याचीही गरज उरणार नाही हे लक्षात ठेव!!!” इतके बोलून कालजित दिसेनासा झाला. भीतीने थरथर कापत अभिजीत सगळे ऐकत होता. त्याचे एक मन त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देत होते. पण दुसरे मन मात्र आलेल्या गोष्टीचा फायदा घेण्यास सांगत होते. परत या वेळेसही त्याच्या दुसऱ्या मनाचा विजय झाला आणि अभिजीतच्या मनातील भाव एकदम बदलले. त्याला आता प्रचंड शक्तीचे पाठबळ मिळाले होते. तो जे काही मनात आणेल ते त्याच्यासाठी बिलकुल अशक्य राहणार नव्हते. ज्या लोकांचे तो फोन उचलत नव्हता त्या लोकांना त्याने एकापाठोपाठ एक फोन केले आणि मनातल्या मनात कालजिताचे स्मरण केले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कालजित त्याच्या समोर हजर झाला.

“बोल… काय हवे आहे तुला?”

“मी माझ्या सगळ्या सावकारांना बोलावले आहे… त्यांचे पैसे परत घेवून जाण्यासाठी…”

“ते मी केव्हाच तुझ्या कपाटात ठेवले आहेत. यापुढे ज्या वेळेस तू कपाट उघडशील, त्या वेळेस तुला हवे तितके पैसे काढून घेता येतील. एक मात्र लक्षात ठेव… तुला त्या पैशांचा उपयोग कधीही देवकार्यासाठी करता येणार नाही. त्या पैशातून तू कोणत्याही मंदिराला दान देवू शकणार नाहीस. जा… त्याचा हवा तसा उपभोग घे… पण लक्षात ठेव… फक्त १२ वर्ष… हाहाहा…” हास्याचा गडगडाट करत कालजित दिसेनासा झाला.

थोड्याच वेळात एकेक जण येऊ लागला. प्रत्येक सावकार येताना संतापलेला असला तरी जाताना मात्र आनंदी होऊन जात होता. इतक्या दिवसाचा उशीर झाल्यामुळे अभिजीतने सगळ्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिली होती. त्यामुळेच सगळ्यांचे अभिजीत बद्दल असलेले मतही एकदम बदलले.

कालजिताचे सहाय्य मिळाल्या पासून काही तासातच अभिजीत सगळ्या कर्जातून मुक्त झाला. तसेही लोकांच्या कर्जातून मुक्त होणे त्याला म्हणावे तितके अवघड नव्हतेच. अवघड होते ते म्हणजे सानिकाचे प्रेम मिळवणे. याआधी ज्या ज्या वेळेस त्याने सानिकाला त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले होते त्या त्या वेळेस तिने त्याचा सगळ्यांदेखत उपहास केला होता. त्याला कारणेही तशीच होती. एक तर सानिका दिसायला जशी सुंदर होती तशीच घरची श्रीमंतही होती. अभ्यासातही तिची गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये होत होती. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्येही टेबल टेनिस या खेळात ती तिच्या कॉलेजचे प्रतिनिधित्व करत होती. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे तिचे तिच्याच वर्गामधील एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण चालू झाले होते. यामुळेच तिने अभिजीतच्या प्रेमाला काडीचीही किंमत दिली नव्हती. सानिकाची आठवण झाल्या बरोबर त्याने कालजिताचे स्मरण केले. क्षणाचाही विलंब न लावता कालजित त्याच्यापुढे हजर झाला.

“मला आता सानिकाचे प्रेम मिळवायचे आहे.” कालजित समोर आल्या बरोबर अभिजीतने इच्छा प्रदर्शित केली.

अभिजीतच्या तोंडून प्रेमाचे नाव ऐकताच कालजिताने गडगडाटी हास्य केले.

“अरे मुर्खा… प्रेम ही एकदम खुळचट कल्पना आहे. दुनियेत फक्त एकच गोष्ट महत्वाची… ती म्हणजे स्वार्थ. बस… या दुनियेतील प्रत्येक माणूस हा स्वार्थाने प्रेरित आहे. त्यामुळे माझ्यापुढे तरी प्रेमाचे गुणगान करू नकोस. तुझ्या त्या सानिकापेक्षा कैक पटीने सुंदर मुली मी या क्षणाला इथे हजर करू शकतो.” अभिजीतकडे अगदी तुच्छतेने पहात कालजित उद्गारला.

“कालजिता, बस!!! तू १२ वर्ष माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास बांधील आहेस, हे विसरू नकोस…” आपल्या प्रेमाविषयी कालजिताचे असे उद्गार अभिजीतला सहन झाले नाहीत आणि त्या त्वेषात त्याने कालजिताला आठवण करून दिली.

“मला माहिती आहे ते. तू सांगितलेल्या कोणत्याच गोष्टी मी अस्विकार करणार नाही. बोल काय करायचे आहे मी?”

“तू काहीही करून उद्या सानिकाला आणि तिच्या मित्र मैत्रिणींना ज्या ठिकाणी आपण काल भेटलो होतो तिथे येण्यास भाग पडायचे.” त्यानंतर त्यापुढे काय करायचे हे ऐकल्यानंतर कालजित हास्याचा गडगडाट करत अदृश्य झाला.

*********

भल्या सकाळी सुमितचा फोन वाजला. त्यावेळेस सुमित अर्धवट झोपेतच होता. पहिल्यांदा त्याने थोडे दुर्लक्ष केले पण फोनची रिंग थांबत नाही हे पाहिल्यावर त्याने चरफडत फोन घेतला. दुसऱ्या बाजूला त्याचा मित्र पराग होता.

“च्यायला पऱ्या… सकाळी सकाळी कशाला झोपमोड केलीस?” एका हाताने डोळे चोळत आणि तोंडाने जांभई देत आळसटलेल्या आवाजात सुमितने विचारणा केली.

“साल्या… सकाळचे ७ वाजलेत आणि झोपतोस काय कुंभकर्णासारखा? त्या सानिकाचा फोन असता तर सकाळही तुला दुपार वाटली असती.”

“चूप बे… बोल कशाला फोन केलास?”

“अरे यार… आज अंजनेरीवर येतोस का? मस्त मजा करू. सध्या सगळे डोंगर हिरवेगार झाले आहेत…”

“नाही रे… आज सानिका आणि मी पिक्चरला जाणार आहोत.”

“अबे पिक्चर तर उद्या परवाही पाहता येईल… आणि हवे तर आपण तिलाही घेऊ बरोबर… मग तर झाले?” परागने उपाय सुचवला.

“ती आपल्या बरोबर एकटी कशी काय येणार? नाही… नकोच…“ सुमितने नकार दिला.

“अबे येडे… तिला तिच्या मैत्रिणींनाही बरोबर घ्यायला सांग की. १० पर्यंत निघालो तर दुपारी ४ पर्यंत वापस. आणि हो… त्या सईलाही बरोबर घे म्हणावं…” परागने हळूच सईचा विषय काढला.

“आयला! साल्या, आता मी समजलो, तुला आम्ही नाही तर ती सई महत्वाची आहे. चल ठीक आहे. मी करतो सानिकाला तयार. अन तुझ्या त्या सईलाही बरोबर घ्यायला सांगतो. बाय.” असे म्हणत सुमितने फोन कट केला.

अंजनेरी पर्वत म्हणजे पावसाळ्यात सहलीसाठी खूपच मस्त ठिकाण. नाशिकच्या अगदी जवळ असूनही स्वतःचे सौदर्य व्यवस्थित जपलेले. सुमितने लगेचच सानिकाला फोन लावला आणि ९ पर्यंत कॉलेज रोडवरील सलीमच्या चहाच्या टपरीवर बोलावले.

इकडे अभिजीत सकाळीच उठला होता. कालजित आपले काम नक्की करणार याची त्याला जणू खात्रीच होती. त्याचे सगळे आवरून होते न होते तोच कालजित त्याच्यासमोर प्रकट झाला.

“तुझे पहिले काम मी केले आहे. तुझी ती सानिका तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर बारा वाजेपर्यंत तू ठरवलेल्या ठिकाणी येईल. पण अजूनही तुला सांगतो. या प्रेमाच्या फंदात पडू नकोस. त्यात माणसाला दुःखचं जास्त मिळते. तुझ्या हातात फक्त १२ वर्ष आहेत. त्याच्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपभोग करून स्वर्गीय सुखाचा अनुभव या पृथ्वीवरच घे…” कालजिताने अभिजितला पुन्हा एकदा उपदेश करण्याचा प्रयत्न केला.

“कालजिता! यातील काहीही मी विसरलेलो नाही. पण १२ वर्ष माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे तू वचन दिले आहेस. तसेच तू सांगितल्या प्रमाणे मी कोणतेही धार्मिक कृत्य करत नसल्यामुळे तुला माझी इच्छा पूर्ण करणे भाग आहे.” आपल्या प्रेमाला कालजित काहीच किंमत देत नाही असे पाहून अभिजित वैतागला.

“ठीक आहे… जशी तुझी मर्जी…” असे बोलून कालजित दिसेनासा झाला.

सकाळी ९ च्या सुमारास सानिकाचे सगळे मित्र एकत्र जमले. सानिकाने सईबरोबरच अजून एका मैत्रिणीला आणले होते, तर सुमित आणि पराग सोबत त्यांचे इतर दोन मित्रही त्यांच्या बरोबर निघाले. काही वेळातच सगळ्यांनी अंजनेरीच्या दिशेने कूच केले. वीसएक मिनिटातच ते अंजनेरी गावात पोहोचले. तिथून काही अंतरापर्यंतच त्यांच्या गाड्या जाणार होत्या आणि नंतर चालू होणार होती पायपीट. आकाशात ढग जमा होऊन कधीही पाऊस पडू शकेल असे वातावरण तयार झाले होते. सगळ्यांनी आपापल्या गाड्या एका ठिकाणी लावून गप्पा गोष्टी करत पर्वत चढण्यास सुरुवात केली. लवकरच ते नवरा-नवरी सुळक्याजवळ आले.

“आयला… यांना खरं तर आपण नवरा-नवरी सुळके न म्हणता सुमित-सानिका सुळके म्हणायला पाहिजे…” पराग चेष्टेच्या स्वरात म्हणाला आणि सगळ्यांनीच त्याला हसून दाद दिली.

“अजून आमचं लग्न व्हायचंय पराग…” काहीसे लाजत सानिका म्हणाली.

“अगं पण हा सुम्या तर तुझी आतापासूनच किती काळजी घेतोय बघ… बायकोचे सगळे अधिकार याने तुला केंव्हाच देऊन टाकले आहेत.” पराग तिला जास्तच चिडवायच्या हेतूने म्हणाला.

“पऱ्या… आमचे सोड रे… ते सगळ्यांना माहिती आहे… तुझे काय? किती दिवस असा एकटा झुरत बसणार आहेस? जे मनात असेल ते बोलून टाकावं माणसानं…” सुमितने सईकडे पहात परागला म्हटले. त्याच्या बोलण्यातील हेतू सईच्याही लक्षात आल्यामुळे तीही काहीशी लाजली. बोलता बोलता ते कधी पहिल्या पठारावरील अंजनी मातेच्या मंदिराजवळ आले हे कुणाला समजलेही नाही.

अंजनी मातेचे दर्शन घेऊन आता सगळे जण पुढच्या चढणीला लागले. थंडगार वारा अंगाला जास्तच झोंबू लागला होता. मध्येच एखादी सर येत होती आणि कपडे ओले करून जात होती. रस्ताही काही ठिकाणी अगदीच निमुळता होत होता. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला डोंगराचा कातळ भाग, आणि त्याच्या मध्ये ३/४ फुट रुंद असलेली पायवाट हृदयाचा ठोका चुकवायला पुरेशी ठरत होती. आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या डोंगरांनी अंगावर पोपटी मखमली शाल पांघरल्यासारखे वाटत होते. मध्येच काही ठिकाणी डोंगराच्या कातळाला ओल येवून लहानसा ओघळ बनत होता. लांबून चकाकणारा तो भाग पार करताना मात्र धडकी भरत होती. एकमेकांची थट्टा करत, कधी एकमेकांना घाबरवत तर कधी एकमेकांना धीर देत सातही जण हळूहळू अंजनेरी पर्वताच्या सर्वात वरच्या पठाराकडे सरकत होते. ते जेव्हा पठारावरील अंजनी मातेच्या मंदिरात आले त्यावेळेस साडेअकरा वाजून गेले होते. एक पावसाची मोठी सर आली आणि सगळे मंदिरात आडोशाला आले. इतकी पायपीट झाल्यामुळे सगळ्यांनाच सडकून भूक लागली होती. अंजनी मातेचे आणि बालमारुतीचे दर्शन घेऊन त्यांनी बरोबर आणलेले खाद्यपदार्थ सोडले आणि सगळे त्यावर अक्षरशः तुटून पडले.

अंजनेरी पर्वतावरील हे पठार खूप विस्तीर्ण होते. तसेच ते खूप उंचही असल्यामुळे आजूबाजूचे अनेक गड, डोंगर यांचे खूप मनोहारी दर्शन इथे घडत होते. सगळे जण पोटात भर टाकून जेव्हा निसर्गाचे मनमोहक रूप पाहण्यास निघाले त्यावेळेस एक मोठा ढग तिथे आल्यामुळे सगळीकडे पांढरे धुके साठले. ओल्या कपडयामुळे वाराही जरा जास्तच थंड वाटू लागला. आधी काहीशे विरळ वाटणारे धुके हळूहळू इतके दाट झाले की अडीच तीन फुटापलीकडील कोणतीच गोष्ट त्यांना दिसत नव्हती. काहीसे अंदाजानेच सगळे एका मागोमाग चालत होते. पाण्याच्या सतत स्पर्शाने काही ठिकाणी दगडांना गुळगुळीतपणा आला होता आणि तशातच एकाएकी सानिकाचा पाय सटकला.

“सुमित… मी सटकले…” सरकत असतानाच ती मोठ्याने ओरडली आणि सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष गेले. तेवढ्यात तिच्या हाताला एका दगडाची खाच लागली आणि तिचे सरकणे थांबले.

“सुमित… पटकन हात दे…” सानिका परत एकदा ओरडली आणि सुमित तिला वाचवायला पुढे झाला. तो थोडा तिच्या पर्यंत उतरणार तेवढ्यात धुके पूर्णतः नाहीसे झाले आणि सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. धुके बाजूला झाले आणि समोरचे दृश्य पाहून सगळ्यांचे धाबे दणाणले. सानिकाचा पाय एका लहानशा ठिसूळ खडकाला आडला होता. तिच्या हातात जी दगडाची खाच आलेली होती त्यावर ती अजूनपर्यंत टिकून होती. तिथून अगदी काही फुटांवर भयानक खोल दरी चालू होत होती. आपण कोणत्या स्थितीत आहोत हे समजल्या बरोबर तिची हाताची पकड अधिकच मजबूत झाली. पण किती वेळ हाही प्रश्न होताच. तिने त्यासरशी परत एकदा सुमितला आवाज दिला. पण तिने जेव्हा वरच्या बाजूस पहिले त्यावेळेस तिला सुमित हळूहळू, सावधपणे वर सरकताना दिसला. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. आता पुढच्या कोणत्याही क्षणी आपण कायमचा या जगाचा निरोप घेणार हे तिने जाणले आणि देवाचा धावा सुरु केला.

क्रमशःमुक्ती भाग २.

— मिलिंद जोशी, नाशिक…

भाग एक – लिंक

Leave a comment