मुक्ती भाग ११

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग ११ –

“अरे ए जोग्या, पहा माझ्यापुढे तू किती याकिंचीत आहेस. आता तू तुझ्या प्राणांची पर्वा कर.”

कालजिताने धारण केलेले रूप पाहिल्यावर स्वामीजीनी फक्त एकदा डोळे बंद केले. आपल्या गुरूंचं स्मरण केलं आणि ते त्याच्याशी मुकाबला करायला सिद्ध झाले.

क्षणाचा अवधी होतो न होतो तोच कालजिताचे हात हवेत फिरले, एक अघोरी मंत्र वातावरणात घुमला. यावेळेस त्याचा आवाज मेघगर्जना व्हावी तसा प्रचंड होता. काही क्षणातच स्वामींच्या आजूबाजूला आग दिसू लागली. त्या आगीची धग इतकी होती की स्वामीजी उभे असलेल्या भागातील आजूबाजूचे गवत क्षणार्धात कोमेजून गेले. सानिकाला कालजित जरी दिसत नसला तरी हवेत निर्माण झालेली ही उष्णता तिलाही अस्वस्थ करू लागली. अभिजीत तर स्वामींपासून कैक फुट दूर पळाला. काही वेळातच स्वामी या आगीत जळून खाक होणार असे अभिजीतला वाटले. खरं तर हीच गोष्ट आपण टाळावी यासाठी तो मनात नसतानाही स्वामींशी बेआदबीने बोलला होता. पण काही वेळातच हळूहळू ज्वाळा कमी होऊ लागल्या आणि त्यात स्वामी अगदी निर्विकारपणे उभे असलेले त्याला दिसले.

स्वामींच्या चेहऱ्यावर असलेला निर्विकारपणा मात्र कालजिताला अजूनच विचलित करून गेला.

“जोगड्या, ही तर माझी सुरुवात आहे. पाहू किती टिकाव धरून ठेवतोस ते…”

स्वामी अजूनही शांतच होते आणि हाताची घडी घालून फक्त कालजित काय करतो हे पहात होते. या सगळ्या प्रकाराकडे अभिजीत स्तंभित होऊन पहात होता. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हे सत्य आहे की स्वप्न हेच मुळी त्याला समजत नव्हते. त्याने जे स्वामींचे आकलन केले होते त्याच्या कैकपट जास्त शक्ती स्वामी बाळगून होते. परत एकदा कालजिताचे हात हवेत फिरले आणि खूप मोठा दगड त्याच्या हातात दिसू लागला. काही वेळातच तो वेगाने स्वामींच्या दिशेने येऊ लागला. आता मात्र स्वामीजींनी हाताची घडी सोडली आणि वेगाने येणाऱ्या दगडाच्या दिशेने आपला हात रोखला. क्षणाचाही अवधी न लागता दगड फुटून त्याची माती झाली आणि स्वामींचे सगळे कपडे धुळीने माखले गेले.

“ब्रम्हराक्षसा, अजूनही सावध हो. स्वतःला ओळख. तू कोण आहेस, तुझे ध्येय काय आहे हे जाणून घे.”

सानिकाला फक्त स्वामी आकाशाकडे पाहून बोलत आहेत इतकेच दिसले. ना तिला आग दिसली ना दगड. पण आगीची धगही तिला जाणवली होती आणि अचानक स्वामींचे कपडे मातीने माखलेलेही तिने पाहिले. हे सगळे पाहून ती बरीच गोंधळली आणि अभिजीतच्या हाताला धरून इथून निघून जाण्यासाठी आग्रह करू लागली. पण अभिजीतचे लक्ष होतेच कुठे? तो अगदी खिळल्यासारखा झाला होता. बराच वेळ त्यांची अशी स्थिती होती. नवीन नवीन गोष्टी घडत आहेत हे तिला फक्त जाणवत होते तर अभिजीतला सगळे दिसत होते. या कालावधीत स्वामींनीही कालजिताला काबूत आणण्यासाठी त्याच्यावर अनेक वार केले होते पण त्या कोणत्याच वाराला कालजिताने दाद दिली नव्हती. त्यांचे प्रत्येक वार खाली जात होते. कालजित ब्रम्हराक्षस असल्यामुळे अशा गोष्टी त्याच्यासाठी अगदी खेळ होत्या पण स्वामींचे तसे नव्हते. काही झाले तरी मानवी शरीराच्या मर्यादा त्यांना जाणवत होत्या. स्वामींनाही आता आपली शक्ती कमी पडते आहे हे जाणवले आणि त्यांनी गुरुदेवांचे स्मरण केले.

“गुरुदेव… साहाय्य करा गुरुदेव…”

काही क्षणातच त्यांच्या अंतर्मनात गुरुदेव प्रकट झाले.

“आदिनाथा, अरे मी तुला सांगितले आहे ना. ब्रम्हराक्षसाला तुला शक्तीने नाही तर युक्तीने जिंकावे लागेल म्हणून. मग का उगाच स्वतःची शक्ती क्षीण करून घेतो आहेस? हीच तर तुझी परीक्षा आहे. आदेश…” इतके बोलून गुरुदेव अंतर्धान पावले.

“जशी आज्ञा गुरुदेव. अलख निरंजन.”

आता स्वामींनी आपल्या हाताची मुठ वळली, डोळे बंद केले, हात वर आकाशाकडे नेला आणि साबरी बंधन मंत्राला आवाहन केले. काही क्षणातच त्यांनी हात खाली आणला त्यावेळेस त्यांच्या हातात विभूती दिसू लागली. कालजिताकडे पहात त्यांनी ती हातावरील विभूती त्याच्या दिशेने फुंकली आणि काही वेळासाठी कालजित बंधिस्त झाला.

“बेटा, तुम्ही दोघेही आता इथून निघून जा. माझी शक्ती उत्तरोत्तर क्षीण होत चालली आहे. मानवी देहाच्या मर्यादा मला पाळाव्याच लागतील. जा. तुमच्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन.” सानिकाकडे पहात स्वामी काहीशा हताश स्वरात म्हणाले. पण अभिजीत मात्र त्यांना असे सोडून जायला तयार होईना. तो पर्यंत कालजिताने बंधन मंत्र तोडून टाकला होता.

“हाहाहा… अरे दांभिका, तुझी अक्कल आधी का नाही चालवली? हे तुला आधी सुचले असते तर कशाला तुला हा त्रास पडला असता? तू जर आपली हार मानशील तर अजूनही मी तुला जीवदान देईन. पण तुला इथून तत्काळ निघून जावे लागेल.” हा जोगी जर आपली हार मान्य करून निमूटपणे निघून जाणार असेल तर काय वाईट असा विचार करून कालजित म्हणाला.

“ब्रम्हराक्षसा, यात हार आणि जीतचा प्रश्न येतोच कुठे? मी जर स्वतःच्या स्वार्थासाठी लढत असतो तर नक्कीच हार आणि जीत असती, पण मी लढतोय ते माझे कर्म म्हणून. आणि कर्म करताना त्याचे परिणाम काय होतील याची चिंता वाहिली जात नाही. तुझी शक्ती माझ्यापेक्षा निर्विवाद जास्त आहे यात शंकाच नाही. पण मला जे वाईट वाटते ते माझी हार होते म्हणून नाही तर याने तुझेही अहित होणार आहे यासाठी.” अगदी शांतपणे स्वामी म्हणाले.

“तुझी हार झाल्याने माझे अहित कसे होणार? हाहाहा… जरा मलाही समजू दे याबद्दल?” कालजित थट्टेच्या सुरात म्हणाला.

“हो. तुझ्या बद्दल वाईटही वाटते आणि तुझी काळजीही वाटते मला.” स्वामी मात्र आपल्या शब्दांवर ठाम होते.

“हाहाहा… माझी काळजी? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना?” कालजित काहीसा चिडलाच.

“हो… हे मी समजून उमजूनच बोलतो आहे. शक्तीच्या बाबतीत जशा माझ्या मर्यादा आहेत तशा ज्ञानाच्या बाबतीत तुझ्याही मर्यादा आहेत. अनेक वर्षांपासून तुझ्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर अजूनही तुला सापडलेले नाही. आणि म्हणूनच अजूनही तू या योनीत भटकतो आहेस. त्यामुळे परिपूर्ण तुही नाहीसच.” स्वामींच्या या बोलण्याने मात्र कालजित काहीसा गंभीर झालेला दिसला पण लगेचच सावरून म्हणाला…

“उगा तोंडाची वाफ दवडू नकोस. सांग बरं कोणते प्रश्न मला सतावत आहेत? तुला तर सर्व कळते ना?” काहीसे दरडावणीच्या सुरात कालजिताने विचारले.

“हेच प्रश्न की तू खरा कोण आहेस? तू ब्रम्हराक्षस का बनला? मुक्ती म्हणजे काय? ती कशाने मिळू शकते आणि तुझी आणि देवाची शक्ती जवळपास सारखी असूनही फक्त देवाचीच पूजा का केली जाते? बोल. ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधतो आहेस ना तू?” अगदी निर्विकार चेहऱ्याने स्वामी उत्तरले.

आता मात्र कालजिताचा चेहरा सौम्य बनू लागला. काही वेळातच त्याचे स्वरूप हळूहळू बदलू लागले आणि तो आपल्या सामान्य रुपात स्वामींपुढे उभा राहिला.

“तू… तुम्ही… तुम्हाला माहिती आहे या प्रश्नांची उत्तरे?” त्याने अधिरतेने विचारले.

“हो. माहिती आहेत… माझ्या गुरूने माझ्यावर हीच जबाबदारी सोपवली आहे. जसे या आणि अशा प्रश्नांची उकल तुला होत नाही तशीच सामान्य जनांनाही होत नाही. परिणामी मग ते त्यात गुरफटतात आणि या फेऱ्यात अडकतात. आणि त्यातून लोकांना मुक्त करणे हेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट्य आहे. पण यासाठी तुझी हे सगळे समजून घेण्याची तयारी असली पाहिजे. आहे तयारी?”

“हो.. हो.. माझी तयारी आहे…” कालजिताने होकार दर्शवला.

“तर मग मी तुला सगळे सांगतो. पण आधी मला झाडाच्या सावलीत बसून थोडा विश्राम करू दे. तु माझी फार दमछाक केली आहेस. तुझी शक्ती अफाट आहे, पण योग्य ज्ञानाच्या आभावी त्याचा काय उपयोग?” स्वामी ब्रम्हराक्षसाला म्हणाले.

“बेटा, तुम्हीही या…” अभिजीत आणि सानिकाकडे पहात स्वामी म्हणाले आणि पूर्वी ज्या झाडाखाली ते बसले होते तिथेच सगळ्यांना घेऊन गेले.

“बेटा मी जरा विश्राम करतो तो पर्यंत तुम्ही भोजन करून घ्या.” स्वामी अभिजीतला म्हणाले. अभिजीतने त्यांनाही जेवणाचा आग्रह केला परंतु त्यांनी व्रतस्थ असल्याचे सांगून त्याला नम्रपणे नकार दिला.

काही वेळ विश्राम केल्यावर स्वामींनी बोलायला सुरुवात केली.

“कालजिता सर्वप्रथम तुझ्या मनात असलेल्या प्रश्नाबद्दल बोलू… तू हेच शोधतो आहे ना? तू कोण आहेस म्हणून?”

“होय स्वामी…” आता प्रथमच कालजिताने त्यांना आदरार्थी संबोधले होते.

क्रमशःमुक्ती भाग ११.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग १० लिंक

Leave a comment