मुक्ती भाग १२

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग १२ –

 

“ऐक तर मग. तू काय, मी काय किंवा हे दोघे काय, प्रत्येक जण त्या पराशक्तीचा एक अंश आहोत. जे चैतन्य तुझ्यात आहे तेच माझ्यातही आहे. पण माणूस स्वतःच्या अहंकारात हीच गोष्ट विसरतो. जसा सोन्यापासून एखादा अलंकार घडवल्यावर त्याला वेगळी ओळख प्राप्त होते तसेच आपल्यालाही त्या चैतन्यापासून वेगळे झाल्यावर नवीन ओळख प्राप्त होते. पण त्यातील चैतन्य मात्र तसेच राहते. आता तू ब्रम्हराक्षस का बनला याबद्दल सांगतो. आधीच्या जन्मात तू एक कर्मठ माणूस होतास. परोपकारापेक्षा कर्मकांडाला तू जास्त महत्व दिलेस. जपजाप्य ही मोक्षाकडे जाण्याची पहिली पायरी आहे पण तू मात्र त्याचं पायरीवरच बसून राहिलास. त्यामुळे तुला शक्ती तर मिळाली, पण ब्रम्हज्ञान तुझ्यापासून दूरचं राहिले. कर्मकांड शक्ती प्रदान करतात तर परोपकार मुक्ती प्रदान करतो. जसजशी तुझी शक्ती वाढली, तसतसा तुझा अहंकार वाढत गेला. ह्याच अहंकारामुळे तू या योनीत पोहोचलास आणि अजूनही या योनीतून मुक्त होऊ शकला नाहीस.” स्वामी बोलत होते आणि तिघेही ऐकत होते.

“ज्याला तुम्ही मुक्ती किंवा मोक्ष मानतात तोही काही वेगळा नाही. तो तुम्हाला जिवंतपणीही मिळू शकतो. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती. या दशेत तुम्हाला ना जीवनाची आसक्ती ना मरणाची भीती, या आवस्थेत सुख आणि दुःख दोन्ही समानच. ज्याला ही गोष्ट समजली तो ज्ञानी आणि ज्याला ही गोष्ट कळूनही वळत नाही तो अज्ञानी.” जितके लक्ष देऊन कालजित ऐकत होता तितकेच लक्ष देऊन अभिजीतही ऐकत होता. परंतु यातील बऱ्याच गोष्टी सानिकाच्या डोक्यावरून जात होत्या. अर्थात तिला त्याची तितकीशी गरजही वाटत नव्हती. तिच्या दृष्टीने तिच्या नवऱ्यावर आलेले संकट टळणे हेच काय ते महत्वाचे होते.

“स्वामीजी… तुम्ही जर म्हणतात की सगळे एकाच शक्तीचे अंश आहोत तर मग कालजिताने माझ्यावर मंदिरात जायला बंदी का घातली?” अभिजीतने मनात आलेला प्रश्न विचारला.

“याचेही उत्तर फक्त अहंकार हेच आहे. याच अहंकारामुळे कालजित ब्रम्हराक्षस बनला, याच अहंकारामुळे तो त्या शक्तीशी स्पर्धा करू लागला, ज्या शक्तीपासून तो निर्माण झाला. मोह आणि अहंकार हेच सगळ्या समस्येचे मूळ आहे.” त्यानंतर ते कालजिताला उद्देशून म्हणाले.

“कालजिता, तुला नेहमी वाटत होते की फक्त देवांची पूजा का केली जाते? बरोबर ना? पण तुझा हा ग्रह चुकीचा आहे. पूजा करणे म्हणजे फक्त अस्तित्व आणि मोठेपणा मान्य करणे. त्यामुळे फक्त देवांचीच पूजा केली जाते असे काही नाही. प्रत्येकाचा आराध्य वेगळा असू शकतो. कुणी देवाची पूजा करतात तर कुणी माणसाची, तर कुणी भुताखेतांची. ज्याची तुम्ही पूजा करतात त्यांचा स्वभाव तुम्हात उतरतो. त्यामुळे भूतांची पूजा करणारे मांत्रिक तामसी वृत्ती बाळगताना दिसतात तर सत्पुरुषांची पूजा करणारे परोपकार करताना दिसतात.”

“कालजिता… तुझी आणि त्या परमेश्वराची शक्ती सारखीच आहे हाही असाच एक भ्रम. तुझ्याजवळ शक्ती आहे पण त्या जगतनियंत्या परमेश्वराइतकी मात्र खचितच नाही. आता हेच पहा ना… मी त्या परमेश्वराचा यकिंचित सेवक असूनही मी तुला पाहू शकतो, तुझ्याशी दोन हात करण्यासही सिद्ध होतो… पण ज्या परमेश्वराशी तू स्पर्धा करतो आहेस, त्याला अजून तू पाहूही शकलेला नाहीस. मग त्याच्याशी सामना करणे तर दूरच. तीच गोष्ट ज्ञानाच्या बाबतीत. तुझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही तुला मिळालेली नाहीत. तुझी शक्ती इतरांपेक्षा खचितच जास्त आहे पण ज्ञानाअभावी असलेली शक्ती ही बहुतांशी घातकचं ठरते. तू लोकांना भौतिक सुख देऊ शकतो पण मानसिक शांती त्या ईश्वराच्या भक्तीमध्येच मिळते. आता तूच पहा… आता पर्यंत इतक्या जणांना तू तुझे गुलाम बनवले… पण मग? परत नवीन सावज तू शोधतोच आहे ना? त्यातून शांती कुठे आहे. सतत नवीन गुलाम मिळवण्यासाठी आधी त्यांचीच गुलामी करतोस? हे कुठवर चालणार? शेकडो वर्ष झालेत पण यात काही बदल झाला आहे?” स्वामींच्या या कथनाने मात्र कालजित विचारात पडला. याचा अंत काय याचे उत्तर त्याला बराच विचार करूनही मिळाले नाही.

“कालजिता… तुला जर या योनीतून मुक्त व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुला तुझ्या अहंकाराचा त्याग करावा लागेल, आणि तुझ्या वचनातून आणि बंधनातून सगळ्यांना मुक्त करावे लागेल. त्यांची मुक्ती हाच एक तुझ्या मुक्तीचा मार्ग आहे. पण शेवटी निर्णय मात्र तुलाच घ्यावा लागणार आहे.” स्वामींच्या कथनाचा कालजितावर आता योग्य परिणाम होत होता.

“ठीक आहे स्वामीजी… मी माझ्या सगळ्या वचनातून याला मुक्त करतो. अभिजीत, तू माझ्या सगळ्या वचनातून मुक्त आहेस.” कालजित अभिजीतकडे वळून म्हणाला.

“पण स्वामीजी… इथूनच थोड्या अंतरावर एक तळघर आहे. तिथेच मी सिद्धी मिळविण्याच्या लालसेने प्रवेश केला असता जीव गमावला होता. माझा देहही तिथेच आहे. त्यामुळेच माझे कोणतेच उत्तरकर्म घडले नाही. मग आता मी मुक्त होऊ शकेल का?” काहीशा संशयाने कालजिताने विचारले.

“कालजिता… इतके दिवस तू या मुलाला सहाय्य केले आहेस, कित्येक संकटातून वाचवले आहे. कित्येक वेळेस तर पोटच्या पोराप्रमाणे तू याचे रक्षण केलेस. त्यामुळे हाच आता मुलगा म्हणून तुझे उत्तरकार्य करून तुला पुढची गती प्रदान करेल.” अभिजीतकडे इशारा करत स्वामी म्हणाले.

“बेटा… त्यासाठी आपल्याला त्या जागी जावे लागेल… तुझी तयारी आहे ना?” अभिजीत या आधीही बरेचदा तिथे गेलेला होता त्यामुळे त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. पण ज्या कालजिताने आपल्याला याआधी बरीच मदत केली त्याला पुढची गती देणे आपले कर्तव्य आहे असे समजून त्याने याला स्वीकृती दिली.

काही वेळातच सगळे कालजिताच्या तळघराजवळ आले. कालजिताने आपल्या सामर्थ्यावर तळघराचा मार्ग मोकळा केला. सगळ्यांना आता तिथे खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. अभिजीतने सानिकाला वरतीच थांबायला सांगितले पण सानिका या सगळ्या प्रकाराने घाबरली असल्यामुळे तसेच तिलाही मनातून असे तळघर पाहण्याची इच्छा असल्यामुळे तीही त्यांच्या बरोबर निघाली. थोडे खाली उतरल्यावर सानिकाला आणि अभिजीतला धाप लागू लागली पण कालजिताने स्वतःच्या शक्तीच्या जोरावर त्यांची ही समस्या दूर केली. काही वेळातच ते तळघरात पोहोचले. सगळीकडे अंधार पसरलेला होता. कालजिताने परत एकदा मंत्र म्हटला आणि सगळीकडे प्रकाश निर्माण केला.

सगळीकडे लक्ख दिसू लागल्यामुळे समोरच्या बाजूला पडलेली मानवी सापळ्यांची रासही सानिकाला दिसली. तिच्या तोंडून अस्पष्टची किंकाळी बाहेर पडली आणि तिने घाबरून अभिजीतला घट्ट पकडले. तिला जरी फक्त तिथे मानवी सापळे दिसत असले तरी अभिजीतला आणि स्वामींना मात्र तिथे धूसर असलेल्या अनेक आकृत्याही दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील औदासिन्य अगदी उठून दिसत होते. आम्हालाही यातून सोडवा अशा प्रकारची विनंती सगळे आपल्याला करत आहेत असा अभिजीतला भास झाला.

“स्वामीजी… यांना पुढची गती नाही का देता येणार आपल्याला?” अभिजीतने त्यांच्याकडे इशारा करत स्वामींना विचारले.

“बेटा… त्यासाठी तुला गेल्या १० वर्षात केलेला तुझा सगळा पुण्यसंचय खर्चावा लागेल. तुला मान्य आहे का हे?”

“स्वामीजी… जीवन आहे तर पुण्यसंचय परत करता येईल. कुणा एकट्याचा उद्धार होण्यापेक्षा अनेकांचा उद्धार होणे मला जास्त महत्वाचे वाटते. मी तयार आहे. सांगा त्यासाठी काय करावे लागेल?” क्षणाचाही विचार न करता अभिजीतने उत्तर दिले.

“शाब्बास बेटा… ईश्वर तुझे कल्याण करेल… चल…” असे म्हणून स्वामीजी अभिजीतला घेऊन त्या सापळ्यांच्या राशीजवळ आले. आपल्या झोळीत हात घालून त्यांनी भस्म हातात घेतले आणि मंत्र म्हणून त्या सगळ्या राशीच्या दिशेने फुंकले. काही वेळातच त्या ठिकाणी राखेचा ढिग दिसू लागला.

“बेटा ही राख आता एखाद्या पात्रात भरून घे. आणि दोन दिवसांनी त्र्यंबक क्षेत्री जावून कुशावर्तावर श्रद्धापूर्वक श्राद्धविधी कर. तुझ्या पूर्वपुण्याच्या जोरावर या सगळ्यांची या योनीतून मुक्तता होऊन त्यांना त्यांच्या कर्मानुसार पुढची गती प्राप्त होईल. कालजिता या दोघांना घेऊन वर जा… मी अजून काही गोष्टी उरकून लगेच येतो…”

काही क्षणातच कालजिताने आपल्या सामर्थ्याने दोघांना वर आणले. पण स्वामीजी मात्र थोड्या वेळाने पायऱ्या चढून वर आले. त्यानंतर कालजिताने त्या तळघराचा मार्ग कायमचा बंद करून टाकला.

“बेटा… माझे इथले कार्य आता संपले… येतो मी… देव तुमचे कल्याण करो… अलख निरंजन…” सानिका आणि अभिजीतने स्वामींना दंडवत घातले. स्वामी परत फिरले. ते थोडे पुढे जातात न जातात तोच कालजित त्याच्या समोर हजर झाला.

“स्वामीजी… माझ्या मनात एक प्रश्न आहे… विचारू?”

‘हो… जरूर विचार…”

“तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात की अभिजीतला त्याने गेल्या १० वर्षात केलेला पुण्यसंचय खर्चावा लागेल. पण गेल्या दहा वर्षात ना त्याने कोणत्या मंदिरात जाऊन दान दिले, ना कोणत्या देवाचे नाव घेतले, ना कोणत्या देवाची पूजा केली. पण तरीही त्याने पुण्यसंचय केला कसा? आणि ते मला कसे नाही समजले?” कालजिताचा प्रश्न ऐकून स्वामींच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली.

“कालजिता… अरे त्याने जरी देवाचे नाव घेतले नाही, पूजा केली नाही किंवा मंदिराच्या दानपेटीत १ रुपयाही टाकला नाही म्हणून काय झाले? तुझी शक्ती मिळाल्यावरही त्याने त्याचा वापर लोकांच्या कल्याणासाठी केला. लोकांसाठी हॉस्पिटल उभारले, शाळा काढल्या, निरश्रीतांसाठी आश्रम काढून त्यांच्या पोटापाण्याची सोय केली. या सगळ्यांचे त्याला पुण्य मिळाले. शक्ती मिळूनही तो अहंकारापासून दूर राहिला, सूड भावनेला त्याने आपल्या मनात जागा करू दिली नाही आणि शत्रू असला तरी त्यालाही माफ करण्याचे औदर्य त्याने दाखवले यामुळेच त्याला पुण्य मिळाले. हेच तुला पूर्वी समजले नाही म्हणून तू ब्रम्हराक्षस झालास… पण हेच तुला अजूनही उमगले नाही म्हणूनच परमेश्वराशी वरकरणी वैर करत नकळतपणे अभिजीतला धार्मिक कार्यात मदत करत राहिलास आणि त्यातून तू जे पुण्य अर्जित केले त्याच्या जोरावर आज मुक्तीच्या जवळ पोहोचलास.” स्वामींचे बोल ऐकून कालजिताने त्यांना दंडवत घातले.

“गुरुदेव… आजपासून तुम्ही माझे गुरु झालात. इतकी साधी गोष्ट मला न समजल्यामुळे मी या योनीत भटकत राहिलो. पण तुमच्या उपदेशाने माझा मुक्तीचा मार्ग सुकर झाला… प्रणाम…”

कालजिताला आशिर्वाद देऊन स्वामींनी आपला मार्ग धरला.

दोन दिवसांनी अभिजीतने सानिकासह कुशावर्तावर जावून श्रद्धापूर्वक श्राद्धविधी केला. सानिकाला जरी कुणी दिसत नसले तरी अभिजीतला मात्र कालजिताच्या जागेत अडकलेले सगळे अतृप्त आत्मे दिसत होते. आज त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान वास करत होते. श्राद्धविधी पूर्ण झाल्यावर कालजिताची जाण्याची वेळ झाली तेव्हा मात्र त्याने अभिजीतला विचारले.

“अभिजीत… आता मी या योनीतून मुक्त होतो आहे. पण जाण्याआधी मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते मला सांग. मला नक्कीच ते करायला आवडेल.”

“कालजिता… मला काही द्यायचेच असेल तर फक्त तुझे आशिर्वाद दे. इतर सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वकर्तृत्वावर मिळवेन.” इतके म्हणत अभिजीतने कालजिताला प्रणाम केला.

“अभिजीत. तुम्हा दोघांचे कल्याण होवो… माझे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील…” इतके बोलून कालजित अंतर्धान पावला, ते कायमसाठी…

समाप्त.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ११ लिंक

Leave a comment