नटरंग | Natrang Marathi Book

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
नटरंग | Natrang Marathi Book

नटरंग –

‘नटरंग’ ही मराठी साहित्य विश्वातली अव्वल दर्जाची कादंबरी मानली जाते. नटरंगही एका कलावंताच्या- तमासगिराच्या आयुष्याची शोकांतिका आहे. ‘नटरंगप्रकाशित होऊन आता तीस वर्षांचा काळ लोटला. मात्र तिची लोकप्रियता आजदेखील कायम आहे.

आनंद यादव हे या कादंबरीचे किमयागार. त्यांनी उत्तमोत्तम साहित्य लिहिलं. विविध प्रकारचे साहित्य प्रकार हाताळले. आपली लेखनशैली अन् प्रतिभेच्या बळावर ते यशस्वी करुन दाखविले. ‘नटरंग’ त्याचंच एक रुप. त्यातली कलात्मकता, आशय, नाट्य वाचकाला गुंग करणारं आहे.

गुणा हा कादंबरीचा नायक. कलेचा भोक्ता. कलेवर प्रेम करणारा. कलेच्या वेडापायी त्याच्या अायुष्याची होणारी होरपळ ‘नटरंग’मध्ये रेखाटली आहे. तिला अनुभवाचे विविधांगी पदर आहेत. एका बाजूला जगण्यातलं दारिद्र्य अन् दुसऱ्या बाजूला कलेवरची निष्ठा या कात्रीतलं गुणाचं जगणं. त्यातून पदरी येणारा संघर्ष अन् परवडही ‘नटरंग’मध्ये प्रतिबिंबीत होते.

मनोहर तल्हार यांच्यासारख्या समीक्षकानं ‘मला ही कादंबरी महाकाव्य सदृश वाटली’ असं म्हटलं आहे. कादंबरीचा रचनाबंध अतिशय रेखीव आहे. देखणा आहे. एखाद्या शिल्पासारखा ! दगडातले शिल्प जिवंत व्हावे आणि बघणारा, अनुभवणारा दगडासारखा निश्चल व्हावा, तसे कलात्मकतेचे हे परिपूर्ण भान भुरळ घालणारे ठरावे, असंही त्यांना वाटतं.

वि. शं. पारगावकर यांनी चाकोरीबाहेर जाऊन निवडलेली कलावस्तू, निवेदनाचे साधेच परंतु आशयानुकूल आणि अर्थगर्भ स्वच्छ रूप, भोवतालच्या परिसराचे मूळ कथावस्तूशी निगडीत झालेले नाते, संपूर्ण आशयातून व्यक्त होत गेलेली मनाची स्पंदने ही कादंबरीची वैशिष्ठ्ये असल्याचं नमूद केलं आहे.

अलीकडच्या काळात 2010 मध्ये ‘नटरंग’वर त्याच नावानं सिनेमाही आला. तो प्रचंड गाजला. रवी जाधव यांचं कसबी दिग्‍दर्शन, गुरु ठाकूर यांची सदाबहार गीतं, संवाद, अजय-अतुल यांचं अतुलनीय संगीत, अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम आदी प्रतिभावान कलावंतांचा अजोड अभिनय ही सिनेमाची ओळख ठरली.

मलाही अध्येमध्ये तमासगिरांचं जगणं जवळून पाहता आलं. त्यावर लिहिता अालं. रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, कांताबाई सातारकरांसारख्या दिग्गजांशी गप्पा मारता आल्या. त्यातून त्यांच्या जगण्याची रुपं टिपता आली. ‘नटरंग’मधला गुणा अशांपैकीच एक. त्यामुळं तो माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय बनून गेला आहे, हे नक्कीच!

पुस्तकाचं नाव। नटरंग
लेखक। आनंद यादव
प्रकाशन। मोैज प्रकाशन
पृष्ठसंख्या। 187
किंमत। 200 /- रुपये

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment