लढण्यातील मजा | संकटावर मात

bhampak-banner

लढण्यातील मजा –

आपल्या जीवनातील कोणतीही लढाई ही नेहमी एकट्यानेच लढायची असते. आपल्या जीवनातील संकटावर आणि अडचणीवर स्वसामर्थ्याने मात करण्याचा आनंद लढण्यातील मजा काही वेगळाच असतो. जीवनाची खरी मजा ही स्वसामर्थ्याची परीक्षा घेण्यातच आहे. स्वसामर्थ्याची परीक्षा ही संकट काळीच होत असते.

मदतीची अपेक्षा गैर नसते, परंतु मदतीची सवय लागणे गैर असते. मदतीची सवय लागलेली माणसे हळूहळू परावलंबी होत जातात. आज या कोरोनाच्या महामारीत रोग झाल्यापासून ते, तो नीट होईपर्यंत त्याच्याविरुद्धची लढाई आपल्या एकट्यालाच लढायची असते.

दवाखान्यातील वातावरणात एकलेपणा माणसाला नैराश्य आणतो. आजूबाजूला असलेल्या रुग्णांच्या वेदना मनाला अस्वस्थ करतात. त्यातही काही रुग्ण दगावतात, अशावेळी तेथे असलेला प्रत्येक रूग्ण घाबरलेला असतो. अशा काळात मनाची खंबीरता हेच सगळ्यात मोठे औषध असते.

खंबीर मन जीवनातील कोणत्याही संकटाला धीराने सामोरे जाते. घाबरलेले मन शरीराला कमजोर बनवते. घाबरलेल्या मनाला कितीही मोठे सुरक्षाकवच पुरविले तरी शरीर त्याला साथ देत नाही. लढण्याअगोदरच अशा व्यक्तीचा पराभव झालेला असतो. आज आपल्या हातात आपले खंबीर मन हेच सर्वात मोठे शस्त्र आहे.

मनाच्या खांबिरतेसाठी आपल्याला आपली लढाई एकट्यानेच लढायची आहे, हे निश्चित करावे लागते. आपण यासाठी कोणाकडेही मदत मागणार नाही, ही मानसिकताच आपल्याला आपल्या स्वसामर्थ्याची ओळख करून देत असते आणि यातच आपला विजय निश्चित होत असतो.

छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या जीवनातील लढाया मावळे सोबत असले तरी स्वतःच्या अंगावर अस्मानी संकट घेऊन लढल्या. अफजलखानाला भेटायला राजे एकटे गेले, शाहिस्तेखानाच्या एक लाखाच्या फौजेत वेशांतर करून स्वतः घुसले, सुरतेची लूट स्वतःच्या नेतृत्वाखाली केली. राजांचे पूर्ण जीवन मनाच्या खंबीरतेवरच उभारलेले होते.

याउलट शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्यानंतर, खानाची तीन बोटे तुटली आणि जीव वाचला, परंतु एक लाखाच्या फौजेतही आपण शिवाजीपासून सुरक्षित नाही, मीच काय, या जगातील कोणताही माणूस शिवाजीपासून सुरक्षित नाही ! अशी मानसिकता त्याची बनली. त्याचे मन घाबरले, इतिहास वाचून पहा, पुन्हा त्याच्या जीवनात एकाही लढाईचा उल्लेख इतिहासात नाही.

मला देवाने जन्माला घालताना परिपूर्ण स्वरुपात आणि पूर्ण शक्तीनिशी जन्माला घातले आहे. तरीही मी संकटकाळी भिकारी का होतो ? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज समाजातील प्रत्येक व्यक्ती भयभीत आहे. मी या रोगापासून सुरक्षित नाही, नव्हे जगातील कोणताही व्यक्ती या रोगापासून सुरक्षित नाही, अशी मानसिकता प्रत्येक व्यक्तीची झालेली आहे. या आपल्या मानसिकतेत आणि घाबरलेल्या शाहिस्तेखानाच्या मानसिकतेत काहीच फरक नाही. अशा मानसिक अवस्थेत साधी सर्दी किंवा जुलाब सुद्धा आपला जीव घेऊ शकते.

आज जीवनाच्या लढाईत शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची आपली मनाची तयारी करायला हवी.

बचेंगे तो और भी लढेंगे l

हा आपला तारक मंत्र आहे आणि तोच आपला खरा वारसा आहे. छत्रपती संभाजी महाराज, मृत्यूला ज्या धीराने सामोरे गेले, तो आमचा खरा वारसा आहे. मरणार तर सगळेच आहोत पण मरणापूर्वी आपण दिलेल्या झुंजीची आणि लढाईची चर्चाच झाली पाहिजे, हे खरे जगणे आहे .

जगाला आपल्याबद्दल काहीही देणे घेणे नसते, ते आपल्या लढाईची मजा लुटत असते. निकाल काहीही लागो आपल्यालाही आपल्या लढण्याची मजा लुटता आली पाहिजे.

तुका म्हणे रणी l जीव देता लाभ दूणी ll
कळे सकळा हा भाव l लहानथोरावरी जीव ll

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment