घरोघरी ‘पॉर्न’च्या गोष्टी?

By Team Bhampak Articles Entertainment Lifestyle 7 Min Read
porn addiction

घरोघरी ‘पॉर्न’च्या गोष्टी? | Porn Addiction

विषयाची नेमकी सुरुवात कुठून करावी या विचारांचं काहूर माजलंय. विषय सुचणं, त्यावर लिहितोय हे सांगणं आणि प्रत्यक्षात लिहिणं हे फार कठीण काम आहे. असो! काल परवाची गोष्ट. न्यूझीलंड सरकारची एक जाहिरात पाहिली. आपल्या देशवासियांना तुमची

कोवळी मुलं, कोवळ्या वयातच काय पाहतायत हे जाहीरपणे सांगण्यासाठी ती जाहिरात तयार करण्यात आली होती. यामध्ये पॉर्न इंडस्ट्रीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या मज्जाकरांना घेण्यात आलं होतं. त्या जाहिरातीत, एक ‘नेक्ड’ म्हणजेच निर्वस्त्र जोडपं एका घराची बेल वाजवतात. घरातील स्त्री दार उघडते. समोरचं दृश्य पाहून तिचेही डोळे फिरतात. दारात उभे असलेले पॉर्न स्टार्स त्या महिलेला सांगतात.’आम्ही इथे प्रत्यक्षात आलो आहोत कारण, तुमचा मुलगा काल रात्री आम्हाला पाहत होता. तो रोजच पाहतो. मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड सर्वच ठिकाणी.आम्ही या गोष्टी प्रौढ लोकांसाठी (कायद्यानुसार १८ वर्षांवरील) करतो. मात्र तुमचा मुलगा लहान आहे. नाती कशी काम करतात हे त्यांना माहित नाही. व्हिडीओमध्ये आम्ही परवानगी मागत नाही. सरळ सेक्स सुरु करतो. मात्र वास्तविक आयुष्यात आपण तसे वागत नाहीत.’ हा संवाद सुरु असतानाच तो लहान मुलगा बाहेर येतो. ऑनलाइन पाहिलेल्या त्या पॉर्न स्टारला प्रत्यक्षात पाहून तो मुलगाही थबकतो. (याप्रसंगी सर्व एकमेकांसमोर आहेत हे लक्षात घ्या.) यावेळी त्याची आई मनाशी काहीसं ठरवून म्हणते, ‘मॅट्टी, आपल्याला बोलायला हवं. व्हिडिओतील सेक्स आणि वास्तविक आयुष्य यात फरक आहे..’ आणि पुढेही जाहिरात संपते.

ही जाहिरात पाहिल्यानंतर बरेच विचार डोक्यात आले. अनेक मुद्दे लगेच नोटडाउन करून घेतले. काय आणि कशाप्रकारे लिहिता येईल यावर विचारमंथन सुरु झालं. व्हिडिओत काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले होते. फक्त अडचण एकच होती की, यावर आपल्याइथे कसं बोलावं? आपल्या इथे अशी जाहिरात बनवण्यात आली असती तर त्याचा परिणाम झाला असता का? की काही आंबटशौकीन लोकांनी ती व्हिडीओ मागेपुढे करून फक्त त्या निर्वस्त्र बाईला बघूनच आपली लिंगपिपासू वृत्ती शांत केली असती? या अशा मानसिकता रुजलेल्या आपल्या समाजात हे विषय सोशल प्लॅटफॉर्मवर बोलणं थोडं धाडसाचं होतं. मात्र काल कोणीतरी सुरुवात केली होती, आज कोणीतरी बोलतोय आणि उद्या कोणीतरी ते बोलत राहायला हवं. समजावत राहायला हवं. म्हणून हा लेख लिहिण्याचं ठरलं.

न्यूझीलंड सरकारने ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्या गृह विभागाच्या ट्रीन लौरी म्हणतात.आम्हाला देशातील पालकांना ‘मुलांच्या नजरेतील’ ऑनलाइन विश्वाची जाणीव करून द्यायची होती. लहान मूळ पोर्नोग्राफीकडे वळत आहेत हे लक्षात आणून द्यायचे होते. काही वयात आलेली मुलं हे जाणीवपूर्वक पाहत आहेत. आणि त्यांना ‘सेक्स’ची माहिती अशाप्रकारे मिळणं फार धोकादायक आहे. याविषयी मुलांसोबत बोलणं फार गरजेचं आहे. ऑनलाइन असताना ते कसे वागतात, काय पाहतात हे महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी ते ऑनलाइन पाहत आहेत त्याची वास्तविक आयुष्याशी तुलना करायला हवी.’ मी मगाशी म्हटलं तसं.. यातून काही मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात.

० आपलं लेकरू करतंय काय हे आपल्याला माहित नसणं
० शाळा कॉलेजांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल ‘फक्तच’ चर्चा होणं
० वर्षानुवर्षे रुजलेल्या समाजव्यवस्थेमुळे पालक-मुलांमधील संवादाचा अभाव
० (अतिमहत्त्वाचे) पोर्नस्टार म्हणतात, व्हिडिओत आम्ही जे करतो तसे वास्तविक आयुष्यात काहीच नसते (११/२३)
सध्या या चार मुद्द्यांवर बोलू. हवंतर अजून एक थ्रेड उर्वरित मुद्द्यांवर लिहेन. (शक्य असल्यास गानकॉलॉजिस्टच्या सूचनांचा समावेश करेन) पुन्हा विषयाकडे..

अलीकडेच नेटफ्लिक्सवर सेक्स एज्युकेशन म्हणून वेबसिरीज आली होती. अनेकांनी तर त्यात ‘सेक्स’ पाहायला मिळणार म्हणूनच पाहिली. मात्र सीरिजच्या नावातील ‘महत्त्व’ देखील कळू न देण्याइतके, किंवा कळूनही ते वळू न देण्यामुळे आपण काय काय गमावत आहोत हे आपल्याला कळत नाहीये. या विषयावर भाष्य करणारा ‘बालक-पालक’ हा अख्खा चित्रपट आपल्या रवी जाधव यांनी मराठीजनांना दिला. मात्र त्यातून आपण काही बोध घेतला नाही. याचा अर्थ आपण वेबसिरीज किंवा चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून पाहतो हे सिद्ध झाले. काही वर्षांपूर्वी नववीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाबद्दल माहिती दिली जात होती. मात्र सध्या ती माहिती दिली जात नाही. कारण आमचा शिक्षक वर्ग देखील ‘पालक’ आहे. तो देखील या विषयावर पुढाकार घेऊन बोलावं इतका पुढारलेला नाही. जिथे शिक्षकांची डाळ शिजत नाही तिथे सामान्य पालकांचे काय? प्रश्न इतकंच उरतो, की अनेकदा चुकीच्या पध्दतीने मिळालेल्या माहितीमुळे त्यामुळे बलात्कार, विनयभंग याचे प्रमाण वाढते आहे. वरचेवर विनोदी वाटणारा ‘सेक्स’ हा विषय तितकाच गंभीर आणि समजावल्यास सोपा आहे.

आपल्या शिक्षण व्यवस्थेने हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. आपल्याकडे प्रशासन पातळीवर फक्तच चर्चा झडतात. शाळांमध्ये समुपदेशक बंधनकारक आहेत त्याचप्रमाणे वर्षातून किमान दोन सेशन्स लैंगिक शिक्षणावर होतील हे पाहायला हवे.

व्हिडिओत ‘आम्ही जे करतो त्यात एकेमकांचा विचार करत नाही. ते मनोरंजन आहे.’ हा महत्त्वाचा मुद्दा ते जोडपं सांगतं. आमच्याकडे मात्र मानसिकता वेगळी आहे. बालक-पालक पाहिला, सेक्स एज्युकेशन पाहिलं. त्यातून काडीमात्र उपदेश घेतला नाही. मात्र पोर्न पाहिल्यावर, त्यात दाखवण्यात आलेला हिंसकपणा आम्हाला आमच्या जोडीदाराबरोबर करायचा होता. त्याच पोजिशन जबरदस्तीनं करून घ्यायच्या होत्या. समोरच्या व्यक्तीची सहमती आहे का याचा काही विचार नाही. आमचे के गायनॅकोलॉजिस्ट मित्र सांगतात, अनेक महिलांची याबाबत तक्रार असते. सेक्स नाहीतर घरातच बलात्कार होत असतो हे फार विदारक आहे. याबाबत नंतर विस्कटून लिहिता येईल. मात्र इथे लक्षत घेण्यासारखा मुद्दा म्हणजे, ‘तिथे दाखवण्यात येणार अंतिम सत्य नाही.’

अजून एक हास्यास्पद बाब म्हणजे, लैंगिक शिक्षण म्हणजे ‘सेक्स’ हा गैरसमज आपलीकडे पसरलाय. प्रत्यक्षात लिंगओळख, त्याची निगा राखणं, प्रत्येक अवयवाप्रमाणे या अवयवाचे काम काय, विरुद्ध लिंगाची ओळख आणि त्याचे महत्त्व, पॉर्न म्हणजे काय, त्यात दाखवले जाते ते केवळ मनोरंजन असते किंवा सेक्स आपल्या जोडीदाराच्या सहमतीनं होणं असे अनेक मुद्दे लहानग्यांना समजावून सांगायचे असतात. मात्र तितका मोकळेपणा अनेक जोडप्यांमध्येही नसतो. तर ते पालक मुलांशी काय बोलणार हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. मात्र याक्षणी आपण यातून बाहेर पडायला हवे. आता तरुणवयात पदार्पण केलेल्या पिढीनं हि जबाबदारी उचलायला हवी. कुठलीही मानसिकता अशीच रुजत नाही. ती रुजवणारी खंबीर डोकी समाजात असावी लागतात. आज आपण सुरुवात केलीय विषय कुठेही अश्लीलतेकडे न झुकता यावर चर्चा व्हायला हव्यात. केवळ चर्चा नाहीतर अंमलबजावणीचा विडा उचलून आपल्या मुलांना ‘चांगल्या-वाईटाची’ ओळख आपण करून द्यायला हवी.

अजून काय बोलावे, योग्य ते जाणिजे.

आपल्याकडील पोर्नोग्राफीचं प्रमाण घरातील बलात्कार, बलात्कार करण्याची मानसिकता निर्माण होणं, पालक-मुलं यांच्यातील संवाद आणि अनुभव (थोडं सविस्तर), कुतूहल ते विकृती तसेच ठोस उपाय आदी अनेक मुद्दे बाकी आहेत. वाचायचे असल्यास नक्की लिहेन. काही सूचना, मुद्दे सुचवायचे असल्यास आवर्जून सुचवा. धन्यवाद!

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथमेश सुभाष राणे

Leave a comment