घरोघरी ‘पॉर्न’च्या गोष्टी? – भाग २

By Team Bhampak Articles Entertainment Lifestyle 8 Min Read
porn addiction

घरोघरी ‘पॉर्न’च्या गोष्टी? – भाग २

(Porn Addiction Problems)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे या विषयावर ‘खुलेपणाने’ बोलण्याची खरंच गरज आहे ही बाब अधोरेखित करते. यावेळी सुरुवात आपण पोर्नोग्राफीपासून करू. जेणेकडून विषयाचं गांभीर्य सुरुवातीपासूनच राहील.

(यासाठी काही प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आधार घेत आहे.) तर देशात लॉकडाउन झाल्यापासून चाइल्ड पॉर्न, सेक्सी चाइल्ड आणि टिन सेक्स व्हिडीओ असे शब्द सर्वाधिक सर्च करण्यात आल्याची माहिती ऑनलाइन मॉनेटरिंग वेबसाईट्सच्या अहवालातून उजेडात आली. तर लॉकडाउनच्या काळात चाइल्ड पोर्नोग्राफीचं प्रमाण सरासरी ९५ टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, पुणेसारख्या शहरात बाल अश्लील सामग्रीला प्रचंड मागणी असल्याचे निरीक्षण बाळ संरक्षण निधीने नोंदवलंय. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता आदी शहरात चाइल्ड पोर्नोग्राफीचं प्रमाण किती याबाबत संशोधन केले असता, डिसेंबर २०१९ मध्ये १०० शहरांमध्ये सार्वजनिक वेबवर चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी सरासरी प्रतिमहिना ५० लाख इतकी मागणी होती. या अहवालानुसार, मुले गुदमरने, त्यांना रक्तस्त्राव होणे आणि त्यांचा छळ होणेअशा हिंसक सामग्रीच्या मागणीत २०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. एकीकडे बालशोषण होऊ नये म्हणून सरकार धोरणं राबवत असताना, लॉकडाउनमधील ११ दिवसात चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाइनवर तातडीची मदत व संरक्षण मागणारे तब्ब्ल ९२ हजाराहून अधिक कॉल्स आले हे वास्तव आहे.

हे सांगून भीती वगैरे निर्माण करायची नाही. मात्र वास्तवाचं भान असलं म्हणजे आपल्याला किती संयमाने वागायचंय याचा अंदाज येऊन जातो. स्वतःच्या मोबाईलवर काय पाहावं हा वैयक्तिक प्रश्न आहे. (अशा व्हिडीओ पाहून बलात्काराच्या घटना होऊ शकतात याबाबत कोणीतरी तज्ञांनी बोलणं योग्य ठरेल.) मात्र आपल्या मुलांनी एका ठराविक वयापर्यंत ‘काय पाहू नये’ ही देखील आपली जबाबदारी आहे. त्यासाठी २४ तास मुलांच्या मागेच उभं राहायला हवं असंही काही नाही. त्यांना ते आवडत नाही. आपल्यावर बंधनं घातली जाताहेत असं त्यांना वाटू लागतं. मग अनेकदा ही मुलं बंड करतात. हे करू नको म्हटलं की त्यांचं बालमन ते निश्चितच करणार ही मानवी प्रवृत्ती आहे. अशावेळी ‘संवाद’ मोलाची भूमिका बजावू शकतो. मात्र आपल्याकडे पाल्य-पालकांचा संवाद नाही हे खरेच आहे.

विषय काढावा कसा?, मुलांशी कसं बोलायचं या विषयावर असे अनेक प्रश्न उभे राहतात. आम्हाला नव्हतं कोणी शिकवलं. त्यांचं ते शिकतील ही भावना त्यांच्यात दृढ आहे. त्याला आपण कोणीही नाकारू शकत नाही. मात्र असा विचार करणारी पिढी आता वयाच्या चाळीशी-पन्नाशीत असेल. त्या अलीकडच्या पालक वर्गाने मोबाइलचं विश्व अनुभवलंय. त्यामुळे त्यांनी ‘संवाद साधण्याची सुरुवात’ घरातून सुरुवात करण्यास काहीएक हरकत नाही असे वाटते.

आता हे करावं कस?

लक्षात घ्या. पॉर्न व्हिडीओनंतर लैंगिक गोष्टींची ओळख करून देणारं दुसरं माध्यम म्हणजे शाळेतील मित्र! शाळेत या गोष्टी अलीकडे सातवी इयत्तेपासूनच समजतात. यात नवीन काही नाही. तुम्ही-आम्ही याच प्रक्रियेतून गेलो आहोत. आपल्याकडे आपलेच अनुभव आहेत की.. आपली वाट नेमकी कुठे चुकली हे स्वतःहून अधिक कोण चांगले सांगणार? यातील अनेकांनी पॉर्न बघताना पकडले गेलो म्हणून वडिलांचा बेदम मारही खाल्ला असेल. त्यामुळे आपला पाल्य या प्रक्रियेतून जाणार आहे ही मानसिकता आतापासून तयार करा. साधारण सातवीत आपला पाल्य असेल तर हीच संवादाला ‘सुरुवात’ करण्याची योग्य वेळ आहे हे लक्षात घ्या. आणि लैंगिक शिक्षण द्यायचं म्हणजे काय पहिल्याच दिवशी बसवून लैगिकतेची बाराखडी शिकवायची नाहीये.

शाळेत घडणाऱ्या गोष्टींपासून किमान गप्पा मारण्यास सुरुवात करता येईल. अलीकडच्या काळात मुलांना विश्वासात घेणं फार कठीण. अर्थात सुरुवातीला ते सर्वच सांगतील असं नाही. पण शाळांतील गप्पांवर भर देऊन त्यांना सावकाश विश्वासात घेण्यास सुरवात करा. आई-मुलगी आणि मुलगा-वडील हे सूत्र आलंच. आणि ‘वडिलांना घाबरतो, ते कडक आहेत एकदम’ हि पिढी आता कालबाह्य होतेय.’ त्यामुळे या पिढीला संवादाला कुठे बाधा येईल असे वाटत नाही. बदलत्या शारीरिक बदलांवर हळूहळू बोलण्यास सुरुवात करा. याप्रसंगी आई-मुलीचं जमून जातं. मासिक पाळीच्या निमित्ताने त्यांचा संवाद घडतो. मात्र त्यातही अनेकदा ‘ऑकवर्डनेस’ अधिक असल्याचे अनेकांशी बोलताना जाणवले. मुलांची मात्र पुरती गोची होते. त्यांना सांगणारे कोणीच नसते. मग अशावेळी शाळेतील मित्रच वाली होतात. मात्र चुकीची माहिती डिलिव्हरी होऊन काहीतरी होण्यापेक्षा आपण आधीच त्याबाबत बोलणं कधीही उत्तम! त्यामुळे मुलगा-मुलगी सातवी किंवा आठवीत असतानाच त्यांच्याशी बोलाल तितकं उत्तम. कारण त्यांच्या लहान वयात ‘पालक’ म्हणून तुम्ही ऑकवर्ड फील न करता बोलू शकाल. जस वय वाढेल तसं बोलण्याची कदाचित धाडस होणार नाही. आणि पुन्हा तेच सांगायचे आहे की हा बदल लगेच घडणार नाही. त्याला वेळ द्यावा लागेल.

कदाचित प्रत्यक्ष अनुभातून तुम्हाला कळेल म्हणून हा अनुभव शेअर करतो आहे. माझा एक जवळचा मित्र सांगतो, ‘माझ्या लहान बहिणीला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा घरात अस्पष्ट हालचाल सुरु झाली होती. मी हॉलमध्ये होतो. आई आणि बहीण आतमध्ये होते. तिचा रडण्याचा आवाज येत होता. अशावेळी आई पारंपरिक पद्धतीने तिला समजावत होती. मात्र फक्तच पुढारलेल्या गप्पा माऱ्यायच्या का म्हणून यावेळी मी पुढे गेलो. छोट्या बहिणीला समोर उभं केलं. तिला मासिक पाळीची प्रक्रिया समजून सांगितली. ते तिच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी किती योग्य आहे याची तिला कल्पना दिली. तीच रडणं थांबलेले होते. आईला आत्मविश्वास आला होता. काही फार मोठा तिर मारला नव्हता केवळ योग्य काय याची जाणीव करून दिली. मात्र ते करणं निश्चितच सोपं नव्हतं. अर्थात दादा इतक्या विश्वासाने काहीतरी सांगतोय, जे आपल्याच शरीराशी निगडित आहे. त्यामुळे ‘का’ हा प्रश्न तिला भविष्यात पडणार नाही. उद्या शाळेत किंवा इतर ठिकाणी कोणावर हा प्रसंग ओढवला तर ती स्वतः पुढाकार घेऊन परिस्थिती सक्षमपणे हाताळेल.’ त्याचा बोलतानाचा आत्मविश्वास पहिला तेव्हा बदलाला सुरुवात झालीय याचे बरे वाटले.

याचाच अर्थ, ‘मासिक पाळी आली म्हणजे आता हे कर, ते नको करू’ यावरून ‘ही प्रक्रिया नैसर्गिकच आहे. आणि त्यामुळे शरीर सुदृढ राहणार आहे.’ इथवरचा प्रवास सुरु झाला आहे. ‘केवळ डोळ्यात डोळे घालून, विश्वासाची भावना निर्माण करून त्यांना दिलासा देणे.’ गरजेचे आहे. त्याशिवाय शाळेत होणारे प्रेम याबाबत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. कारण काही गोष्टी आपण नाकारू शकत नाही. आणि थांबवू शकत नाही. एखाद्या गोष्टी बाहेरून चुकीच्या पद्धतीने कळणं यापेक्षा ‘मीच माझ्या मुलं-मुलीला विचारलं. त्यांनी मला सत्य सांगितलं. त्याचवेळी मी काय चूक काय बरोबर हे उदाहरणासहित सांगितले.’ विषय कट! मुलं विश्वासात असली म्हणजे पुढचा त्रास वाचतो. एकदा अनुभव घेऊन बघा.. त्यांना समजावले कि ते समजतात. कारण त्यांना मोठ्यांसारखं व्हायचं असतं. त्यांना प्रेम, आकर्षण, सेक्स, बलात्कार, नजर, मैत्री या गोष्टी ‘कॉन्सेप्ट’ म्हणून सांगा. प्रयत्न तर करा.

मी स्वतः माझ्या बहिणीला समजावलं आहे. हे वय प्रेम करण्याइतपत ‘मॅच्युअर’ नाही. सध्या अभ्यास आणि खेळ (ती खेळाडू आहे) यावर फोकस कर.  कॉलेजवयात (सिनिअर कॉलेज) अगदीच प्रेम वगैरे झालं किंवा तुझ्या कोणी प्रेमात पडलं तर बिनधास्त येऊन मला सांग. मी पहिलं पारखून घेईन. मग योग्य, अयोग्य काय हे सांगेन. मात्र लपवून काहीही ठेऊ नकोस.’ सुरुवातीला बोलताना मीही निश्चितच ऑकवर्ड होतो. मात्र अलीकडे आपण लहान (१ली, २रीच्या) मुलांना सुद्धा तुझी गर्लफ्रेंड आहे का असं मजेत विचारतो. मग तेच धाडस आपल्या मुलांसाठी, भावंडांसाठी का दाखवत नाही? बाकी काही नाही.. तुम्ही जस्ट इमॅजिन करा की, रात्रीच्या जेवणानंतर केवळ १५ मिनिटं तुम्ही एकमेकांशी गप्पा मारताय. दिवसभरातील स्ट्रेस शेअर शेअर करताय. किती मोकळं वातावरण असेल यामुळे… आणि आपण बोललेल्या गोष्टी या चार भिंतीतच राहणार आहेत. तसंच माझ्या मनातलं मला एक्स्प्रेस करण्याची संधी मिळते या विचारानेच मुलं सुखावतात ही भावना मुलांना ‘मॅच्युअर’ बनवण्यात मदतशीर ठरते असे एक समुपदेशक म्हणतात.

(हे दोन भाग म्हणजे सहज सुरुरवात होती. हा माझा अभ्यासाची नाहीतर निरीक्षणाचा भाग होता. भविष्यात या विषयावर आणखी लिहावे वाटले तर निश्चितच लिहेन. थ्रेड तर सुरु राहतीलच. यातून काही कुटुंबात छानसा संवाद सुरु झाला तर याहून मोठा आनंद तो काय?)

प्रथमेश सुभाष राणे

1 Comment