रंगनाथस्वामींची निगडी!
कोरेगाव तालुक्यातली निगडी म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थळ. कोरेगाव अन् रहिमतपूर यांच्या मध्ये वसलेलं हे गाव. गावाचा उल्लेखही होतो रंगनाथस्वामींची निगडी असा. दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं अन् मध्ये रस्ता. इथं रंगनाथस्वामींची समाधी आहे.
निगडी हे छोटंसं गाव. कोरेगाव- रहिमतपूर रस्त्यावरून अात प्रवेश केला, की गाव येतं. सरळ रस्त्यानं गेल्यावर उजव्या हाताला वळसा घातला, की लगेच मंदिर. भोवताली दगडांची भक्कम भिंत. त्याला जोडून असलेलं प्रवेशद्वारही आकर्षक आहे. मंदिराचं बहुतेक बांधकाम घडीव दगडातलं आहे. कळसाचं नक्षीकामही सुबक अन् लक्षवेधक आहे. मंदिर परिसरात नीरव शांतता असते. प्रसन्नतेची अनुभूती लाभते.
रंगनाथस्वामी हे मूळचे नाझरे (जि. सोलापूर) गावचे देशपांडे होते. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला. त्यानंतर दैवी संकेत मानून ते निगडीत राहू लागले. मंदिर परिसरात घोड्याच्या खुराचे स्थळ आहे. स्वामींनी 1684 मध्ये समाधी घेतली. निगडीतला स्वामींचा उत्सव प्रसिद्ध आहे. हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप यासारखे प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे श्रीधरस्वामी हे त्यांचे पुतणे.
निगडीतल्या प्राथमिक शाळेचा लोैकिकही मोठा आहे. समाज, पालक अन् शिक्षक- विद्यार्थ्यांच्या समन्वयातून शाळेनं भरीव यश पटकाविलं आहे. मित्रवर्य रुपेश जाधव यांच्यामुळं या शाळेस भेट देण्याचा योग आला होता.
निगडीलगतच काही अंतरावर दुघी हे गाव आहे. ग्रामीण साहित्यात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे प्रा. व. बा. बोधे याच गावचे. लगतच्या सासुर्वे गावात भरणारा कुस्त्यांचा फडही राज्यभर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यलढ्यातील दादासाहेब साखवळकर हेदेखील नजीक असलेल्या एकसळ गावचे. राजकीय पटलावर नाव असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ हेदेखील मूळचे निगडीशेजारच्या शिरंबे इथले.
एकूणच काय तर, कराड तालुक्यातली निगडी ते कोरेगाव तालुक्यातली निगडी हा प्रवास अनुभवसंपन्न करणारा ठरतो, हे नक्कीच!
(उत्तरार्ध)
सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा