लहानपण देगा देवा

bhampak-banner

लहानपण देगा देवा –

अधिकाराने वरिष्ठ असलेल्या व्यक्तीचा आदर, कनिष्ठ व्यक्तीने ठेवावा, असा एक सर्वसाधारण संकेत आहे. ज्या व्यक्तीला मनातून वरिष्ठ स्थान दिले जाते, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये आपोआप आदर धारण केला जातो. वरिष्ठ असलेल्या व्यक्तीची जबाबदारी त्यामुळे अधिकाधिक वाढत असते.

आदराने निर्माण झालेले वरिष्ठ स्थान अढळ असते. लादलेले वरिष्ठ स्थान नाईलाजाने स्वीकारले जाते. अशा लादलेल्या वरिष्ठ माणसाबद्दल कधीच आदर निर्माण होत नाही. असा आदर नसलेला वरिष्ठ माणूस नेहमी आपले वरिष्ठपण सिद्ध करण्यासाठी कनिष्ठांवर सतत दबाव आणतो आणि जमेल त्यावेळी, जमेल तसे त्याचा पाणउतारा करत असतो.

दुर्देवाने कनिष्ठ व्यक्ती स्वावलंबी, स्वाभिमानी आणि धाडसी असेल तर अशा व्यक्तीची मानहानी, त्या व्यक्तीला मृत्यू समान वाटते. एक वेळ मृत्यू बरा, परंतु ही मानहानी आणि अपमान नको म्हणून अशा व्यक्ती अपमानापेक्षा मृत्यूला जवळ करतात आणि आत्महत्या करतात. वरिष्ठांच्या मनमानीपणाला, लहरीपणाला आणि अपमानास्पद वागणूकीला कंटाळून अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्महत्या केलेली उदाहरणे ताजी आहेत.

अधिकारी होण्यासाठी चिकाटी, जिद्द ,मेहनत, त्याग या सर्व गोष्टी करून ही माणसे तिथपर्यंत पोहोचलेली असतात. वरिष्ठांच्या एका लहरीपणामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन पूर्णपणे उध्वस्त होते. वरिष्ठ असणे किंवा मोठे असणे, ही एक जबाबदारी आहे, याचे भान प्रत्येक वरिष्ठांना असायला हवे. कनिष्ठ असणारी सुद्धा माणसेच आहेत, याची जाणीव असायला हवी.

जेवढे आपण वरिष्ठ होऊ तेवढी आपली जबाबदारी इतरांच्या बाबतीत वाढत असते. खरे तर वरिष्ठ होणे किंवा असणे गर्वाचे नाही, तर जबाबदारीचे, सेवेचे,नम्रतेचे, त्यागाचे ठिकाण आहे. ज्याला हे समजत आणि जमत नाही त्याच्यासाठी वरिष्ठ पद म्हणजे,

चंदनाचा सूळ सोनियाची बेडी l
सुख नेदी उर फोडी ll
तुका म्हणे नरकी घाली अभिमान l
जरी होय ज्ञान गर्व ताठा ll

वरिष्ठ पदावर गेल्यावर गर्व किंवा अहंकार येऊ नये, असे वाटत असेल तर आपल्या अंगी *न म्र ता* असायला हवी. झाडाला जेवढी जास्त फळे असतात, तेवढे झाड वाकलेले आणि झुकलेले असते.

नम्र झाला भुता l त्याने कोंडिले अनंता ll
हेच शूरत्वाचे अंग l हरि आणिला श्रीरंग ll

आपल्या कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने आपण वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलो असलो, तरी ते एक वेळ मिळवणे सोपे असते, परंतु सांभाळणे अवघड असते. वरिष्ठ करून भगवंताने आपल्याला सेवा करण्याची एक संधी दिलेली आहे, असा भाव मनात असेल, तर आपण कोणत्याही कनिष्ठांना अपमानास्पद वागणूक देऊ शकणार नाही. अधिकारांचा वापर नाठाळ आणि निष्क्रिय असलेल्या कनिष्ठांना वठणीवर आणण्यासाठी जरूर करावा कारण त्यासाठीच ते पद आहे, परंतु त्याला अपमानास्पद आणि जिव्हारी लागेल असे शब्द टाळावेत.

जो कष्टाळू, प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे, त्याला कनिष्ठ असला तरी फक्त इज्जतीने वागविले, तर तो आपला झाल्याशिवाय रहात नाही. आपण कितीही वरिष्ठ झालो, तरी _स्वतःसाठी जगणे सोडून देऊन दुसऱ्यासाठी जगायला शिका, जग तुम्हाला वरिष्ठ म्हणून फक्त आदरानेच वागवेल असे नाही, तर तुमच्यासाठी जीवही द्यायला तयार होतो, हेच शिवरायांचे आणि त्यांच्या मावळ्यांची जीवनसूत्र होते.

कोणत्याही वरिष्ठ व्यक्तीने शिवरायांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारायला हवा. वरिष्ठ म्हणून तुम्ही फक्त शिवराय बना तुमचा प्रत्येक कनिष्ठ माणूस मावळा बनायला मागे सरणार नाही. हे वाचायला ऐकायला खूप सोपे आहे कारण मोठेपण सांभाळणे खूप कठीण असते, म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,

लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा ll
ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार ll
जया अंगी मोठेपण l तया यातना कठीण ll
तुका म्हणे जाण l व्हावे लहानाहुनी लहान ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment