त्याग | Sacrifice

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

त्याग | Sacrifice –

आपल्या जीवनातील कोणत्याही नात्याची उंची, ही त्या व्यक्तीसाठी आपण करत असलेल्या त्यागावर ठरत असते. आज त्याग हा शब्दच इतिहास जमा झालेला आहे . त्यागाचा खरा अर्थ आपण अनुभवल्याशिवाय समजत नाही.

आपल्या कृतीतून समोरच्याला होत असलेला आनंद पाहून , ज्याला आपल्या कष्टाचे चीज झाले, असे वाटू लागले की आपल्याला त्याचे काहीच श्रम वाटत नाहीत , ही त्यागाची खरी ओळख आहे आणि स्वतःसाठी जगायला विसरून जाऊन केवळ समोरच्याच्या सुखासाठी आणि कल्याणासाठीच जगणे हा खरा त्याग आहे.

कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात हा त्याग अतिशय गरजेचा आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची, समाजातील आणि कुटुंबातील स्थान, हे आपण करत असलेल्या त्यागावर ठरत असते. जो त्याग करत असतो, तो कधीच आपल्या मुखातून स्वतः केलेल्या त्यागाचा उल्लेख करत नाही कारण त्याला कधीच त्याची गरज भासत नाही.

जी व्यक्ती मी तुझ्यासाठी किती करतोय किंवा करतेय ? हा विचार मनात आणते किंवा तसे बोलून दाखवते, ती कधीच त्यागी नसते, ही खरंतर वैतागी असते. काही व्यक्तींना उभ्या आयुष्यात त्याग आणि वैताग यातला फरकच कळत नाही.

आपल्याबद्दल आदर निर्माण करायचा असेल, तर त्याची पहिली पायरी त्याग आहे.* जगातील सर्वच व्यक्ती गद्दार नसतात, एखाद्या माणसाने आपल्यासाठी केलेला त्याग, हा आपण कधीच विसरू शकत नाही आणि हे न विसरणेच त्याच्याबद्दल आदर निर्माण करत असते.

माझ्या पत्नीला किंवा माझ्या पतीला माझ्याबद्दल आदर वाटला पाहिजे, ही प्रत्येक व्यक्तीची भावना असते आणि प्रसंगानुसार पती-पत्नी हे तपासतही असतात. ज्यावेळी आदराचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी स्वतःला आपण त्यासाठी काय त्याग केलेला आहे ? हा प्रश्न स्वतःला विचारावा. या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी असेल, तर आपल्याला आदर मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

पुराण, इतिहास आणि धर्म यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामाता हे दांपत्य सर्वोत्तम आदर्श म्हणून पाहिले जाते. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळी वनवासाची आज्ञा झाली, त्यावेळी सीतामातेला आणि लक्ष्मणाला ती आज्ञा नव्हती, तरीही त्या दोघांनी आपल्या जीवनातील ऐहिक ऐश्वर्याचा, राज वैभवाचा, सुखाचा आणि लौकिकाचा त्याग केला. आज प्रभू रामचंद्रांबरोबर या दोघांचीही प्रतिमा त्यांच्या बरोबरीने पूजली जाते. प्रभू रामचंद्रांबरोबर हे दोघे नाहीत, असे राम मंदिर अजून तरी माझ्या पाहण्यात आले नाही. सीता मातेचे जीवन हे परिपूर्ण त्यागाचे जीवन मंदिर आहे.

माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यामाता, सावित्रीबाई फुले या सर्वांचे जीवन फक्तत्याग आणि त्यागच असेच आहे.

जीवनामध्ये देवत्व प्राप्त करायचे असेल, तर त्याचा फक्त एकच निकष आहे, तो म्हणजे त्याग. पती-पत्नींना एकमेकाबद्दल आदर निर्माण करायचा असेल तर एकमेकांसाठीत्याग करायला शिका . हा आजच्या जीवनशैलीच्या बरोबर विरुद्ध टोकाचा प्रवास आहे.

नवरा-बायकोमध्ये एकमेकांबद्दल आदर नसेल, तर ते जीवन फक्त नाटकी आणि ढोंगी ठरते, ज्यामध्ये नाचलो तर टाळ्या आणि थकलो तर औषधाच्या गोळ्या, याच्यापलीकडे काहीच नसते.

सुखासाठी आणि शांतीसाठी केलेल्या संसारामध्ये, हे दोन्ही वगळून उरलेले सर्व काही असते कारण त्यासाठी लागणारा त्याग आम्हाला समजलेला नसतो. श्रीमद्भगवद्गीता सांगते,

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाध्द्यानं विशिष्यते l
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् l

डॉ. आसबे  ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment