श्रीमद् भगवद् गीता

श्रीमद् भगवद् गीता

श्रीमद् भगवद् गीता –

आजपासून संपुर्ण विश्वातील सर्व श्रेष्ठ धर्मग्रंथ  “श्रीमद् भगवद् गीता” चे मराठीतून अध्ययन चालु करत आहे. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.

श्रीमद् भगवद् गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. ‘महाभारत’ या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे..

हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.

कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)

भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे.

गीता निर्मितीचा काळ महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.

उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता ‘महर्षी व्यास’ यांनी लिहिली

गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा .

भगवद्‌गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.

भगवद्‌गीता (एकुण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.)

गीतेतील अध्यायांची नावे

अध्याय १ – अर्जुनविषादयोग
अध्याय २ – सांख्ययोग
अध्याय ३ – कर्मयोग
अध्याय ४ – ज्ञानसंन्यासयोग
अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग
अध्याय ६ – आत्मसंयमयोग
अध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग
अध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग
अध्याय ९ – राजविद्याराजगुह्ययोग
अध्याय १० – विभूतियोग
अध्याय ११ – विश्वरूपदर्शनयोग
अध्याय १२ – भक्तियोग
अध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
अध्याय १४ – गुणत्रयविभागयोग
अध्याय १५ – पुरुषोत्तमयोग
अध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग
अध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग
अध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग

अठरा अध्यायांत मिळून अर्जुनासाठी केवळ ‘युध्द कर’ एवढाच उपदेश नाही. चारी वर्णां साठी स्वभावधर्माप्रमाणे नियोजित असलेली आपआपली कर्मे करण्यामध्ये पाप नसून ईश्वरावर नितांत भक्ती आणि विश्वास ठेऊन, निरिच्छबुध्दीने, म्हणजे फलाची आशा न धरता आणि, ‘हे मी त्या परम् ईश्वरासाठी करतो आहे’ ही भावना बाळगून केली तर त्या त्या कर्मात असलेल्या नसलेल्या सर्व दोषांचे आपोआप निवारण होते. किंबहुना कर्मे करणार्‍याला जरी ती तो स्वत: करतो आहे असे वाटत असले तरी ती सारी त्या परम् ईश्वराच्या प्रेरणेवरून घडत असतात. त्यामुळे कर्म करणेच नको अशी भावना धरून निष्कर्मी रहाणे अथवा कर्मसंन्यास घेणे हे व्यर्थ आणि त्या परम् ईश्वराच्या आदेशाच्या बाहेर होईल म्हणून तसे करणे टाळावे.

फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून ईश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली म्हणजे मनुष्याला पुनर्जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते. असे हे ब्रम्हज्ञान स्वत: भगवान श्रीकॄष्णाने कुरूक्षेत्रावरील महाभारतयुध्दाच्या निमित्ताने अर्जुनाला दिले. त्याला युध्द करण्याने आपणच आपल्या आप्तजनांचा संहार करणार असल्याबद्दलची जी शंका होती ती स्वत:च्या परम् ईश्वर या विराट स्वरूपाचे दर्शन दाखवून आणि तो संहार अर्जुन नव्हे तर आपण स्वत:च करीत असल्याचे स्पष्ट करून निवारण केली आणि अर्जुनाच्या मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दूर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडून अपेक्षित असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवॄत्त केले.

हे सारे ज्ञान संजय, जो त्याला व्यासमुनीनी दिलेल्या दिव्य दॄष्टीमुळे कुरूक्षेत्रावरील घटनाक्रम बसल्या जागेवरून समक्ष पाहू शकत होता, याने धॄतराष्ट्रासाठी वर्णन केलेल्या भगवान श्रीकॄष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाच्या रूपात पण मराठी श्लोक स्वरूपात मी पुढे सादर करत आहे.

संस्कॄत भाषेत समास आणि संधि यांच्या सहाय्याने वाक्यरचना छोटया स्वरूपाची करता येते मराठीत तसे संधिरूपातले शब्द वापरण्याने दुर्बोधता येते ती टाळावी आणि मूळ श्लोकाचा संपूर्ण अर्थ मराठी रचनेत यावा म्हणून काही श्लोक दोन चरणांऐवजी चार अथवा प्रसंगी आठ चरणांचेही केले आहेत

हे मराठीकरण करताना मूळ संस्कॄतमधील ‘गीतोपनिषद’, कै. विनोबा भावे यांची ‘गीताई, कै. लोकमान्य टिळकांनी केलेला मराठी गद्यात्मक अनुवाद ‘श्रीमद्भगवद्गीता मूळ श्लोक व भाषांतर’, ‘भावार्थ दीपिका­ज्ञानेश्वरी’, श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे अनुवादित पुस्तक ‘भगवद्गीता जशी आहे तशी’ आशाप्रकारे  माहिती या सार्‍यांचे परिशीलन करून मी हा प्रयत्न केला आहे

माहिती संकलन :  श्री रमेश साहेबराव जाधव

Leave a comment