श्रीमद् भगवद् गीता भाग १ –
अध्याय_पहिला | अर्जुन_विषाद_योग | श्रीमद् भगवद् गीता भाग १
(कुरुक्षेत्रावरील युध्दस्थळावर सैन्याचे निरीक्षण)
मूळ श्लोक:
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |
मामकाः पाण्डवाश्र्चेव किमकुर्वत सञ्जय ||१||
धृतराष्ट्रः उवाच = राजा धृतराष्ट्र म्हणाला; धर्मक्षेत्रे = धर्माक्षेत्रावर;
कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर; समवेता = एकत्रित असलेल्या; युयुत्सव = युद्धाची इच्छा करणाऱ्या; मामकाः = माझा पक्ष (पुत्र);
पाण्डवः = पांडुपुत्र; च = आणि; एव = निश्चितपणे; किम् = काय;
अकुर्वत = त्यांनी केले; सञ्जयः = हे संजया
अर्थ :
धृतराष्ट्र म्हणाला : हे संजया ! कुरुक्षेत्र या पवित्र धर्माक्षेत्रावर एकत्रित आलेल्या, युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले ?
अज्ञानरूपी धृतराष्ट्् आणि संयमरूपी संजय ! अज्ञान हे मनाच्या अंतरंगात वसत असते. या अज्ञानात मन गुरफटले जाते. धृतराष्ट् हा जन्मांध आहे; परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे, ऐकू शकत आहे. त्याला निश्चित माहीत आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे; परंतु त्याचा मोहरूपी पुत्र दुर्योधन जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचे लक्ष कौरवांवर म्हणजेच पर्यायाने विकारांवर केंद्रित झाले आहे.
धर्म हे एक पवित्र क्षेत्र आहे. जेव्हा हृदयरूपी देशात दैवी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा हे शरीर धर्मक्षेत्र बनते. आणि जेव्हा येथे आसुरी संपत्तीचा प्रभाव असतो तेव्हा तेच शरीर कुरुक्षेत्र बनते. ‘ कुरु’ म्हणजे करा’ हा शब्द आदेशात्मक आहे. श्रीकृष्ण म्हणतात – “ प्रकृतीतून निर्माण होणार्या त्रिगुणांनी प्रवृत्त होऊन, मनुष्य कर्म करीत असतो. तो क्षणमात्रही कर्माशिवाय राहू शकत नाही”. ते गुण त्याच्याकडून कर्म करवून घेत असतात. तो झोपलेला असला तरी त्याचे कर्म चालूच असते. अर्थात ते कर्म म्हणजे शरीर निरोगी ठेवण्याचा तो एक प्रकारचा आहारच आहे. हे तिन्ही गुण मनुष्याला देवापासून क्षुद्र किड्यापर्यंत देहबद्ध करीत असतात.
जोपर्यंत प्रकृती व प्राकृतीपासून उत्पन्न होणारे तिन्ही गुण अस्तित्वात आहेत, तोपर्यंत ‘ कुरु-करा’ चालूच राहील व म्हणून जन्ममृत्यूचे क्षेत्र, विकारांचे क्षेत्र हे कुरुक्षेत्र आहे व परमश्रेष्ठ परमात्म्यात प्रवेश देणारे, विलीन करणारे पुण्यशील प्रवृत्तीचे ( पांडव ) क्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र आहे. पुरातत्त्ववेते पंजाब, काशी, प्रयाग, मध्यप्रदेश तसेच इतरही अनेक ठिकाणी कुरुक्षेत्राचा शोध घेत आहेत. परंतु गीताकार श्रीकृष्णाने स्वत:च हे युद्ध कोठे झाले ते सांगितले आहे –
‘ इदं शरीर कोन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । ‘
“हे अर्जुना, हे शरीर हेच क्षेत्र आहे आणि जो हे जाणतो, त्याची मर्यादा समजतो तो क्षेत्रज्ञ आहे. ” पुढे त्यांनी या क्षेत्राची व्याप्ती सांगितली आहे. त्यात दहा इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, पाच विकार आणि त्रिगुणांचे वर्णन केले आहे. शरीर हेच क्षेत्र आहे, एक आखाडा आहे. त्यात परस्परांशी झुंजणाऱ्या-झगडणाऱ्या दोन प्रवृत्ती आहेत. एक दैवी संपत्ती व दुसरी आसुरी संपत्ती-पाण्डवरुपी सत् प्रवृत्ती व कौरवरुपी असत्-दुष्ट प्रवृत्ती ‘.
अनुभवी महापुरुषाला शरण गेल्यानंतर या दोन्ही प्रवृत्तींमधील संघर्ष संपुष्टात येतो. हा क्षेत्र व क्षेत्ज्ञामधील संघर्ष आहे आणि हाच वास्तविक लढा आहे, युद्ध आहे. विश्वयुद्धांनी इतिहासाची पाने भरून गेलेली आहेत.
परंतु त्या युद्धांत विजयी झालेल्या पक्षालासुद्धा शाश्वत विजय मिळू शकला नाही. जय-पराजय हे बदल असतात. प्रकृतीचे संपूर्णपणे शमन करून, तात्पुरते प्रकृतीच्या पलीकडे असणाऱया सत्तेचे दर्शन घेणे, ज्ञान मिळवणे व त्यात प्रवेश करणे हा वास्तविक विजय आहे. हा एक असा विजय आहे की ज्याच्या नंतर कधीही हार नाही – पराजय नाही. हीच खरी मुक्ती आहे की जिला जन्ममृत्यूचे बंधन नाही.
या प्रकारे अज्ञानाने प्रभावित असणारे प्रत्येक मन संयमाच्या द्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या युद्धात काय झाले हे जाणू शकते. अर्थात संयम जेवढा जागृत होईल त्याच प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होईल.
मूळ श्लोक –
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा |
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ||२||
सञ्जयः उवाच = संजय म्हणाला; दृष्ट्वा = पाहून; तु = पण;
पाण्डव-अनीकम = पांडवांचे सैन्य; व्युढम् = व्यूहरचना;
दुर्योधन = राजा दुर्योधन; तदा = त्यावेळी; आचार्यम् = शिक्षक, गुरु;
उपङ्गम्य = जवळ जाऊन; राजा = राजा; वाचनम् = शब्द;
अब्रवीत = म्हणाला
अर्थ :
संजय म्हणाला – पाण्डवांचे सैन्य व्यूहरचनेने उभे राहिलेले पाहताच, राजा दुर्योधन द्वोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला द्वैतभावाचे आचरण म्हणजेच“ द्रोणाचार्य”.
जेव्हा परमात्म्यापासून आम्ही अलग झालो आहोत, वेगळे झालो आहोत याची जाणीव होते ( हेच द्वैतभावाचे ज्ञान होय ) तेव्हा त्या भगवंताच्या प्राप्तीची तळमळ, अभिलाषा मनात निर्माण होते. त्यामुळे गुरूची आवश्यकता वाटून आम्ही गुरुचा शोध घेऊ लागतो. दोन प्रवृत्तींमधील प्रथम गुरू हाच असतो ज्याचा शोध घेतो; परंतु त्यानंतरचे सदगुरु योगेश्वर श्रीकृष्ण हेच असतात जे योगसिद्ध आहेत. राजा दुर्योधन आचार्यांच्या जवळ जातो. मोहरूपी दुर्योधन! मोह हे सर्व व्याधींचे मूळ आहे, मुख्य कारण आहे. दुर्योधन – दुर् म्हणजे दोषयुक्त, योधन म्हणजे आत्मिक दूषित संपत्ती असे धन, आत्मिक संपत्ती हीच स्थिर शाश्वत संपत्ती आहे. तिच्यात जो दोष निर्माण करतो तोच मोह असतो. तो मनुष्याला प्रकृतीकडे खेचत असतो तसेच तो वास्तव ज्ञान प्राप्त करून घेण्याची प्रेरणाही देत असतो. मोह असतो तोपर्यंत प्रश्न शिल्लक असतात, मोह संपला की मग सर्व पूर्णच असते.
व्यूहरचनायुक्त पांडवांचे सैन्य पाहून म्हणजेच पुण्यशील सत् प्रवृत्तीचा जमाव – संघटन पाहून दुर्योधन गुरू द्वोणांच्या जबळ जाऊन उपहासाने म्हणाला –
मूळ श्लोक:
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् |
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ||३||
पश्य = पहा; एताम् = ही; पाण्डु-पुत्राणाम् = पांडूच्या पुत्रांची;
आचार्य = हे आचार्य, गुरु; महतीम् = विशाल; चमूम् = सैन्यदल;
द्रुपद-पुत्रेण = द्रुपद पुत्राने; तव = तुमचा; शिष्येण = शिष्य;
धी-मता = अत्यंत बुद्धिमान
अर्थ :
हे आचार्य ! तुमचा बुद्धिमान शिष्य, द्रुपदपुत्र, याने कौशल्याने रचिलेली ही विशाल पांडवसेना पहा. अचार्य, दुपदाचा पुत्र आणि तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्न याने व्यूह रचना केलेली ही मोठी पाण्डवसेना पहा.
शाश्वत व स्थिर परमात्म्यावर श्रद्धा असणारा, दृढ मनोबळ असणारा तो धृष्टद्युम्न ! तोच पुण्यशील प्रवृत्तींचा नेता आहे, प्रमुख आहे. ‘ साधन कठिन न मन कर टेका’ नुसते साधन बळकट असून उपयोग नाही तर मनाची सिध्दता बळकट असली पाहिजे. मनोनिग्रह असला पाहिजे.
मूळ श्लोक:
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि |
युयुधानो विराटश्र्च द्रुपदश्र्च महारथः ||४||
अत्र = येथे; शूरा = शूरवीर; महा-इषु-आसाः = महान धनुर्धर;
भीम-अर्जुन = भीम आणि अर्जुन; समः = बरोबरीचे; युधि – युद्धामध्ये; युयुधानः = युयुधान; विराटः = विराट; च = सुद्धा; द्रुपदः = द्रुपद;
च = सुद्धा; महारथः = महान योद्धा
अर्थ :
येथे (या सैन्यामध्ये) भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. या सेनेत ‘ महेष्वासा ‘ – महान अशा ईश्वराच्या ठिकाणी आश्रय देणारे, भावरूपी भीम, अनुरागरूपी ‘ अर्जुना’ सारखे अनेक शूर वीर, जसे सात्विकतारूपी ‘ सात्यकी’, चराचरात सर्वत्र ईश्वर भरून राहिलेला असे ईश्वराचे विराटत्व सुचवणारा विराट, तसेच अचल-स्थिर स्थितीचे द्योतक असा महारथी राजा दुपद –
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग १.
माहिती संकलन : श्री रमेश साहेबराव जाधव.