श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १० –

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १० | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. ३८ ते ४१

मूळ श्लोक –

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यद्यपि = जरी, लोभोपहतचेतसः = लोभाने बुद्धिभ्रष्ट झालेले, एते = हे (लोक), कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशाने उत्पन्न झालेला, दोषम्‌ = दोष, च = तसेच, मित्रद्रोहे = मित्राशी द्रोह करण्यातील, पातकम्‌ = पाप, न पश्यन्ति = पाहात नाहीत, (तथापि) = तरी, जनार्दन = हे जनार्दना, कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या, दोषम्‌ = दोषाला, प्रपश्यद्भिः = जाणणाऱ्या, अस्माभिः = आम्ही, अस्मात्‌ पापात्‌ = या पापापासून, निवर्तितुम्‌ = परावृत्त होण्यासाठी, कथम्‌ = का (बरे), न ज्ञेयम्‌ = विचार करू नये ॥ १-३८, १-३९ ॥

अर्थ –

हे जनार्दना, लोभामुळे ज्यांचे चित्त भ्रष्ट झाले आहे अशा या लोकांना कुलनाश केल्याने लागणारे पाप दिसत नाही. ते जाणून घेण्याची त्यांच्यात कुवत नाही हे जनार्दना, मित्रदोह करणे किंवा कुलनाश करणे हे महापाप आहे हे आम्हाला समजत असताना या विचारापासून आम्हाला परावृत्त व्हायला नको का? श्रीकृष्णा, मी हे पाप करत आहे असे नाही; तर आपणही चुकत आहात. येथे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णावरही दोषारोप केले आहे. येथे तो स्वत:ला श्रीकृष्णाच्या बरोबरीचा समजत आहे. प्रत्येक नवीन साधक जेव्हा सदगुरुला शरण जातो तेव्हा तो स्वतःला सदगुरुच्या बरोबरीचा समजतो. ज्ञानामध्ये आपण आपल्या गुरूच्या समान आहोत असे त्याला वाटते. म्हणून येथे अर्जुन म्हणतो की, त्या लोकांना जरी ही गोष्ट समजली नाही तरी तुम्ही-

आम्ही तर ही गोष्ट जाणत आहोत. तेव्हा मित्रद्रोह व कुलनाश केल्याने लागणाऱ्या दोषांबाबत आम्हाला विचार करायला हवा. या कुलनाशाने काय घडते?

मूळ श्लोक –

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कुलक्षये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, प्रणश्यन्ति = नष्ट होऊन जातात, धर्मे नष्टे = धर्माचा नाश झाल्यावर, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, कुलम्‌ = कुळात, अधर्मः उत = पापसुद्धा, अभिभवति = मोठ्या प्रमाणात पसरते ॥ १-४० ॥

अर्थ –

कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥

कुलाचा क्षय झाला की, परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. येथे अर्जुन परंपरागत कुलधर्म व कुलाचार यांनाच सनातन धर्म समजत होता. जेव्हा धर्म नष्ट होतो तेव्हा संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो. संपूर्ण कूळ पापाखाली चिरडले जाते.

मूळ श्लोक –

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कृष्ण = हे कृष्णा, अधर्माभिभवात्‌ = पाप अधिक वाढल्याने, कुलस्त्रियः = कुळातील स्त्रिया, प्रदुष्यन्ति = अतिशय दूषित होतात, च = (आणि), वार्ष्णेय = हे वार्ष्णेया, स्त्रीषु दुष्टासु = स्त्रिया दूषित झाल्या असताना, वर्णसङ्करः = वर्णसंकर, जायते = उत्पन्न होतो ॥ १-४१ ॥

अर्थ –

हे कृष्णा, जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते, पाप वाढते तेव्हा कुलातील स्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णव्यवस्थेचा नाश होतो. त्यांच्या अधःपतनाने वर्णसंकर होतो. नको असलेली संतती, प्रजा उत्पन्न होते. अर्जुनाला असे वाटत होते की, कुलस्त्रियांच्या अध:ःपतनाने वर्णसंकर होतो. परंतु अर्जुनाच्या या विचाराचे खंडन करून श्रीकृष्णाने त्याला पुढे सांगितले की, मी किंबा स्वस्वरूपात स्थित असणाऱ्या महापुरुषांनी आराधनाक्रमात भ्रम उत्पन्न केला की वर्णसंकर निर्माण होतो. तेव्हा वर्णसंकराने कोणते दोष घडतात ते सांगताना अर्जुन म्हणतो.

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १०

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment