श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ११

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ११

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ११ –

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ११ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. ४२ ते ४५ –

मूळ श्लोक –

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कुलघ्नानाम्‌ = कुळाचा नाश करणाऱ्यांना, च = आणि, कुलस्य = कुळाला, सङ्करः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जाण्यासाठी (असतो), लुप्तपिण्डोदकक्रियाः = पिंड व पाणी यांच्या क्रियांना म्हणजे श्राद्ध व तर्पण यांना मुकलेले (असे), एषाम्‌ = यांचे, पितरः हि = पितरसुद्धा, पतन्ति = अधोगतीस प्राप्त होतात ॥ १-४२ ॥

अर्थ –

वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱयांना व कुळालाही नरकात नेतो. कारण श्राद्ध-तर्पणादी क्रिया लुप्त झाल्याने त्यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकरामुळे वर्तमान पिढीचे अध:पतन होते, त्यांचे पूर्वजही अधोगतीला जातात व भावी पिढीचेही असेच अध:पतन होत असते. इतकेच नाही तर –

मूळ श्लोक –

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

वर्णसङ्करकारकैः = वर्णसंकर करणाऱ्या, एतैः दोषैः = या दोषांमुळे, कुलघ्नानाम्‌ = कुलघाती लोकांचे, शाश्वताः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, च = आणि, जातिधर्माः = जातिधर्म, उत्साद्यन्ते = नष्ट होऊन जातात ॥ १-४३ ॥

अर्थ –

कुळक्षय करणाऱ्यांच्या ह्या वर्णसंकरकारक दोषांनी जातीधर्म व शाश्वत-परंपरागत कुलधर्म उध्वस्त होतात. अर्जुनाला असे वाटत होते की, कुलधर्म हा सनातन आहे. कुलधर्म शाश्वत आहे. परंतु श्रीकृष्णाने त्याच्या या विचारांचे खंडन करून त्याला सांगितले की, आत्मा हाच सनातन-शाश्वत धर्म आहे. वास्तविक या सनातन धर्माचे ज्ञान होण्यापूर्वी मनुष्य धर्माच्या नावावर एखाद्या रुढीला धर्म समजतो. अर्जुनाला यामुळेच कुलधर्मच हा सनातन धर्म वाटला. परंतु कुलधर्म म्हणजे श्रीकृष्णाच्यामते एक रूढी आहे.

मूळ श्लोक –

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

जनार्दन= हे जनार्दना, उत्सन्नकुलधर्माणाम्‌ = ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशा, मनुष्याणाम्‌ = मनुष्यांचा, नरके = नरकातील, वासः = निवास (हा), अनियतम्‌ = अनिश्चित काळापर्यंत, भवति = होतो, इति = असे, अनुशुश्रुम = आम्ही ऎकत आलो आहोत ॥ १-४४ ॥

अर्थ –

हे जनार्दना, ज्या लोकांचे कुलधर्म नष्ट झाले आहेत त्यांना नरकवास प्राप्त होतो असे ऐकले आहे. त्यांचा केवळ कुलधर्मच नष्ट होत नाही तर शाश्वत-सनातन धर्म नष्ट होत असतो. जेव्हा धर्मच नष्ट होतो तेव्हा धर्म नष्ट करणाऱ्या लोकांना अनंत कालापर्यंत नरकवास भोगावा लागतो असे ऐकले आहे. अर्थात पाहिले नाही, केवळ ऐकले आहे.

मूळ श्लोक –

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अहो = अरेरे, बत = किती वाईट, राज्यसुखलोभेन = राज्य व सुख यांच्या लोभाने, वयम्‌ = आम्ही (बुद्धिमान असूनही), यत्‌ = जे, स्वजनम्‌ = स्वजनांना, हन्तुम्‌ = मारण्यास, उद्यताः = तयार झालो आहोत, (तत्‌) = (ते म्हणजे), महत्‌ = मोठे, पापम्‌ = पाप, कर्तुम्‌ = करण्यास, व्यवसिताः = आम्ही तयार झालो आहोत ॥ १-४५ ॥

अर्थ –

अहो, आम्ही बुद्धिमान असूनही केवढे महत्पाप करण्यास उद्युक्त झालो आहोत ! राज्याच्या व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांना मारण्यास सिद्ध झालो आहोत. येथे अर्जुन स्वतःला बुद्धिमान, ज्ञानी समजत आहे. प्रथम प्रत्येक साधक स्वत:ला असे ज्ञानीच समजत असतो. महात्मा बुद्ध म्हणतात, ‘ जेव्हा मनुष्याचे ज्ञान अधुरे-अर्धवट असते; तेव्हा तो स्वत:ला महान ज्ञानी समजत असतो. परंतु जेव्हा तो खरे ज्ञान प्राप्त करू लागतो तेव्हा तो स्वतःला महामूर्ख समजू लागतो.’. याप्रमाणे येथे अर्जुन स्वत:ला ज्ञानी समजत आहे. म्हणून तो प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला समजावत आहे की, आम्ही जे पाप करावयास निघालो आहे त्याने कोणतेही कल्याण साधणार नाही. आम्ही राज्याच्या व सुखाच्या लोभाने कुलनाश करावयास तयार झालो आहोत. आम्ही खरोखर फार मोठी चूक करीत आहोत. आणि हे श्रीकृष्णा, तूही आमच्याबरोबर मोठी चूक करीत आहेस. परमज्ञानी व परिपूर्ण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला असे म्हणून अर्जुनाने चांगलाच धक्का दिला व शेवटी तो आपला निर्णय देतो.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ११.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment