श्रीमद् भगवद् गीता भाग १२ –
श्रीमद् भगवद् गीता भाग १२ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. ४६ ते ४७
मूळ श्लोक –
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥ १-४६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यदि = जरी, अशस्त्रम् = शस्त्ररहित, अप्रतिकारम् = प्रतिकार न करणाऱ्या (अशा), माम् = मला, शस्त्रपाणयः = हातात शस्त्र घेतलेले, धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, रणे = युद्धामध्ये, हन्युः = मारतील, (तथापि) = तरी, तत् = ते (मारणे), मे = माझ्यासाठी, क्षेमतरम् = अधिक कल्याणकारक, भवेत् = होईल ॥ १-४६ ॥
अर्थ –
धृतराष्टाच्या पुत्रांशी लढण्यापेक्षा त्यांनी शस्त्रविरहित व प्रतिकार न करणाऱ्या मला युद्धभूमीवर ठार मारले तरी ते माझ्यासाठी अधिक कल्यांणकारक ठरेल. निदान इतिहास म्हणेल की, अर्जुन खरोखर समजुतदार होता म्हणून त्याने आपले प्राण देऊन एवढी मोठी प्राणहानी करणारे भयंकर युद्ध टाळले. भोळ्याभाळ्या व निष्पाप मुलांचे प्राण वाचवण्यासाठी व कुळ नष्ट होऊ नये म्हणून लोक आपल्या प्राणांची आहुती देत असतात. इथे मोहाचे प्राबल्य वाढल्यामुळे, आत्मज्ञान झाले नसल्यामुळे, अज्ञानामुळे अर्जुन असे म्हणत आहे.
जेव्हा मोह प्रबळ होतो तेव्हा असेच घडत असते. मनुष्य अगदी परदेशात जाऊन वैभवशाली प्रासादात राहत असला तरी काही दिवसांनंतर त्याला आपली झोपडी आठवते. अर्जुनाचे इथे असेच झाल्याने तो म्हणत आहे की, धृतराष्ट्राच्या शस्त्रधारी पुत्रांनी शस्त्रांचा त्याग केलेल्या व प्रतिकार न करणार्या मला रणभूमीवर ठार केले करी ते कल्याणकारकच ठरेल. कारण निदान ते तरी सुखी होतील.
मूळ श्लोक –
संजय उवाच –
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, सङ्ख्ये = रणांगणावर, शोकसंविग्नमानसः = शोकामुळे मन उद्विग्न झालेला, अर्जुनः = अर्जुन, एवम् = असे, उक्त्वा = बोलून, सशरम् = बाणासह, चापम् = धनुष्य, विसृज्य = टाकून, रथोपस्थे = रथाच्या मागील भागी, उपाविशत् = बसला ॥ १-४७ ॥
अर्थ –
संजय धृतराष्ट्राला म्हणाला की, दु:खाने अति व्याकुळ झालेल्या अर्जुनाने असे म्हणून आपले धनुष्य व बाण बाजूला ठेवून दिले व रथाच्या मागील भागात खाली जाऊन बसला. याचाच अर्थ क्षेत्र-क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षात भाग न घेता तो त्या संघर्षातून बाजूला झाला.
निष्कर्ष-
भगवद्गीता म्हणजे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षाचे निरूपण आहे. गीता म्हणजे ईश्वरी ऐश्वर्याने संपन्न अश्या भगवतस्वरूपाचे संगीत आहे. हे संगीत जेथे होते ते युद्ध-क्षेत्र आहे शरीर ‘? या शरीरात दोन प्रवृत्ती वसत असतात –
एक धर्मक्षेत्र’ व दुसरे “कुरुक्षेत्र ‘ येथे त्या दोन्ही क्षेत्रांतील सेनांचे स्वरूप व त्यांच्या सामर्थ्याचा आधार काय आहे हे सांगितले. शंखध्वनींनी त्यांच्या पराक्रमाचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्या सेनांबरोबर युद्ध करावयाचे आहे, तिचे निरीक्षण झाले. ती सेना अठरा अक्षोहिणी( म्हणजे जवळ साडेसहा अब्ज) इतकी विशाल होती असे म्हंटले आहे, परंतु ती अनंत-अमर्याद आहे.
प्रकृतीचे दोन दृष्टिकोन आहेत – एक इष्टोन्मुखी प्रवृत्ती – दैवी संपदा,
दुसरी बर्हिमुखी प्रवृत्ती – आसुरी संपदा दोन्ही प्रकतीचीच स्वरूपे आहेत.
फक्त एक कल्याणकारक मार्गाने प्रयाण करत असते, परमधर्म परमात्म्याकडे घेऊन जात असते; तर दुसरी प्रकृतीला दिलासा देत असते. प्रथम दैवी संपदा प्राप्त करून आसुरी संपदेचा नाश केला जातो आणि मग शाश्वत सनातन परब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग दैवी संपदेची आवश्यकताही कमी होत जाते आणि मग युद्धाचा निकाल – परिणामही समजला जातो:
अर्जुन जेव्हा सैन्याचे निरीक्षण करतो तेव्हा ज्यांना मारावयाचे आहे तो सगळा आपला परिवार आहे, आप्त, मित्र, स्वजन आहेत असे त्याला दिसते. जेवढा आपला संबंध तेवढेच आपले जग असे प्रत्येकाला वाटत असते. इथे अर्जुनालाही तसेच वाटले आहे. दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात पारिवारिक मोह अडसररूप बाधक ठरत असतो, परंतु जेव्हा साधकाला समजते की, या मधुर संबधानेच भयंकर विच्छेद होणार आहे, आपण त्यांना जसे समजतो तसे ते संबंध मधुर नाहीत तेव्हा साधक घाबराघुबरा होतो. त्याला प्रथम स्वजनासक्तीला मारणे अयोग्य, अनिष्ट वाटते व म्हणून तो प्रचलित रूढीमध्येच आपल्या संरक्षणाचा उपाय शोधू लागतो. इथे अर्जुनाने असेच केले आहे.
येथे तो म्हणतो – “कुलधर्म हाच सनातन-शाश्वत धर्म आहे. या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल, कुळातील स्त्रियांचे अध:पतन होईल, त्यातून वर्णसंकर होईल व त्यामुळे संपूर्ण कुळात व कुलक्षयी लोकांना अनंतकालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. ” म्हणून आपल्या सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी येथे अर्जुन व्याकूळ झाला आहे. तो श्रीकृष्णाला विचारतो की, आम्ही लोक बुद्धिमान व विवेकी असताना आम्ही हे महापाप का करावे? अर्थात, त्याच्या मते श्रीकृष्णही हे पाप करायला सिद्ध झाले आहेत. तेव्हा नरकवासाकडे नेणाऱ्या पापांतून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो म्हणतो, ‘मी हे युद्ध करू शकणार नाही. ‘ असे म्हणून तो रथाच्या मागील बाजूस खाली बसला. म्हणजेच क्षेत्र-क्षेत्रजञ यांच्यातील संघर्षामधून त्याने माघार घेतली.
टीकाकारांनी या अध्यायाला अर्जुन विषाद योग ‘ असे म्हटले आहे. अर्जुन दयाशीलतेचे प्रतीक आहे. सनातन धर्मासाठी विकल होणारे दयाशील लोकच विषाद-योगाचे निमित्त बनत असतात. असाच विषाद मनूलाही झाला होता. “हदय बहुत दुःख लाग, जनम गरयउ हारे भरगति विज रा. १» १४२ मनात संशय, किन्तु निर्माण झाल्यानेच मनुष्य दु:खी बनत असतो. अर्जुनाच्या मनात असा संदेह निर्माण झाला की, या युद्धामुळे कुलक्षय होईल व त्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल व वर्णसंकरामुळे आमच्या सर्व कुलाला अनन्त्तकाळापर्यंत नरकवास भोगावा लागेल. कुलधर्मालाच त्याने सनातन धर्म समजल्याने तो नष्ट होण्याचे दु:ख त्याला झाले व त्या दु:खाने तो विव्हळ झाला व म्हणून या अध्यायाला “संशय विषाद योग’असे खरे म्हणायला हवे तेव्हा –
मूळ पहिल्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अर्थ –
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुनविषादयोग नावाचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. ॥ १ ॥
इति श्रीमत् परमहंसपरमानन्दस्य शिष्यस्वामीअडगड़ानन्दकृते
श्रीमदभगवदगीताया: ‘यथार्थगीता’ भाष्ये ‘ संशयविषादयोगो’ नाम प्रथमोध्याय:।।१॥।
क्रमशःश्रीमद् भगवद् गीता भाग १२
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.