श्रीमद् भगवद् गीता भाग ५ –
श्रीमद् भगवद् गीता भाग ५ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. १७ ते २१
मूळ श्लोक –
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ॥ १-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
परमेष्वासः = श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा, काश्यः = काशिराज, च = आणि, महारथः = महारथी, शिखण्डी = शिखंडी, च = व, धृष्टद्युम्नः = धृष्टद्युम्न, च = तसेच, विराटः = राजा विराट, च = आणि, अपराजितः = अजिंक्य, सात्यकिः = सात्यकी, द्रुपदः = राजा द्रुपद, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, च = तसेच, महाबाहुः = मोठ्या भुजा असणारा, सौभद्रः = सुभद्रापुत्र(अभिमन्यू), (एते, सर्वे) = या सर्वांनी, पृथिवीपते = हे राजन्, सर्वशः = सर्व बाजूंनी, पृथक्-पृथक् = वेगवेगळे, शङ्खान् = शंख, दध्मुः = वाजविले ॥ १-१७, १-१८ ॥
अर्थ –
श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. ॥ १-१७, १-१८ ॥
महाधनुर्धारी काशीचा राजा, महापराक्रमी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट व अजिंक्य असा सात्यकि यांनी आपापले शंख फुंकले. हा शब्दश: अर्थ झाला तरी ध्वन्यार्थ वेगळाच आहे. कायारूपी काशी ! मनुष्य मनासहित सर्व इंद्रियांचा निग्रह करून कायेमध्येच केंद्रित करीत असतो. तेव्हा तो परमेश्वास: ‘ परमेशाच्या अंत:करणात प्रविष्ट होतो. परमेश्वराच्या अंतःकरणात प्रवेश देणारी सक्षम शरीर-काया हीच काशी आहे. शरीरात परमश्रेष्ठ ईश्वराचा निवास असतो. ‘ परमेश्वास’ म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असा नाही. परंतु ‘परमईशवास असा आहे.
शिखा व सूत्राचा ( जानव्याचा ) त्याग म्हणजे शिखंडी, आजकाल लोक मुंडण करतात, जानवे काढून टाकतात, व अग्नी पेटवणे सोडून देतात व मग स्वतःला संन्यासी समजतात. या गोष्टी न करणे म्हणजे संन्यास ! पण तसे होऊ शकत नाही. कारण शिखा ही ध्येयाचे प्रतीक आहे, जे प्राप्त करावयाचे त्या लक्ष्याचे प्रतीक आहे व जानवे हे संस्काराचे प्रतीक आहे. जोपर्यंत परमेश्वराला प्राप्त करणे बाकी आहे तोपर्यंत मनुष्य कशाचा वब कसा त्याग करू शकणार ? मग संन्यास तरी कसला ? अजून तर ‘पथिकाची मार्गक्रमणा सुरू आहे. जेव्हा प्राप्तव्य प्राप्त होईल, मागे चिकटलेला संस्काराचा दोर कापला जाईल तेव्हा भ्रम पूर्णपणे नष्ट होईल व म्हणून शिखंडीच भ्रमरूपी भीष्माचा नाश करणारा आहे. शिखंडी म्हणजे चिंतनाच्या मार्गातील महारथी आहे.
‘धृष्टययुम्न’ – दृढ आणि अचल, स्थिर मनाचे प्रतीक म्हणजे धृष्टद्युम्न होय. ‘ विराट’ – सर्वत्र भरून राहिलेल्या विराट ईश्वराला पाहण्यासाठी लागणाऱ्या दैवी सम्पदेच्या गुणांनी युक्त असणारा असा योद्धा म्हणजे विराट होय. सात्यकी म्हणजे सात्त्विकता होय. सत्याचे चिंतन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सात्त्विकता. ती जर अंगी बाणली तर घसरण्याचे – पडण्याचे भय राहणार नाही आणि ही वृती या संघर्षात पराजित होऊ देणार नाही. ती विजयच देईल.
अचल, स्थिर पददायक म्हणजे द्रुपद आणि सहृदयता, वात्सल्य, लावण्य, सौम्यता इत्यादींमध्ये श्रेष्ठ व महापराक्रमी असणारे द्रौपदीचे पाच पुत्र व महाबाहू अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख फुंकले. महाबाहू हे कार्यक्षेत्राचे प्रतीक आहेत. जेव्हा मन भयरहित होते तेव्हा त्याचे सामर्थ्य खूप वाढत असते.
हे राजन, या सर्वांनी आपापले शंख फुंकले या प्रत्येकाने काही ना काही ठरवलेले आहे, तेव्हा त्याचे पालन करणे आवश्यक आहे व म्हणून तर त्या सर्वाची येथे नावे सांगितली. याशिवाय काही गोष्टी मनबुद्धीच्या पलीकडे असतात, परमेश्वर स्वत:च अंत:करणात एकीकडे स्वत: दृष्टी बनून आत्म्यासमोर उभे रहातात आणि निर्णय घेतात आणि स्वतःचीच ओळख करून देतात.
मूळ श्लोक –
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
(च) = आणि, नभः = आकाशाला, च = तसेच, पृथिवीं = पृथ्वीला, एव = सुद्धा, व्यनुनादयन् = दुमदुमून टाकीत, सः = त्या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धार्तराष्ट्राणाम् = धार्तराष्ट्रांची म्हणजे आपल्या पक्षातील लोकांची, हृदयानि = हृदये, व्यदारयत् = विदीर्ण करून टाकली ॥ १-१९ ॥
अर्थ –
आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥
आकाश व पृथ्वी दणाणून सोडणार्या आवाजाने धृतराष्ट्पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. मात्र श्रीकृष्ण आपला पाठीराखा आहे या आत्मविश्वासामुळे पांडवांची सेना किंचितही भ्यायली नाही. उलट कुरुक्षेत्रावर पांचजन्यच्या घोषामुळे दैवीशकततीवरील अधिपत्यामुळे, अनन्तावर मिळवलेल्या विजयामुळे तेथे अशुभ नष्ट होऊ लागले आणि आसुरी संपदा, बहिर्मुखी प्रवृत्ती विदीर्ण झाल्या, त्यांचे सामर्थ्य क्षीण होऊ लागले. सर्वत्र सफलता प्राप्त होऊ लागताच मोहमयी प्रवृत्ती नेहमीच शांत होतात, नाहीशा होतात.
मूळ श्लोक –
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
महीपते = हे राजा, अथ = त्यानंतर, कपिध्वजः = ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे (अशा), पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), व्यवस्थितान् = मोर्चा बांधून उभ्या असलेल्या, धार्तराष्ट्रान् = धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना, दृष्ट्वा = पाहून, तदा = तेव्हा, शस्त्रसम्पाते प्रवृत्ते = शस्त्र चालविण्याच्या तयारीचे वेळी, धनुः = धनुष्य, उद्यम्य = उचलून, हृषीकेशम् = हृषीकेश श्रीकृष्णांना उद्देशून, इदम् = हे, वाक्यम् = वाक्य, आह = उच्चारले, अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, अच्युत = हे अच्युता, मे = माझा, रथम् = रथ, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्यभागी, स्थापय = उभा करा ॥ १-२०, १-२१ ॥
अर्थ –
महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥
संयमरूपी संजयाने अज्ञानाने झाकाळून गेलेल्या धृतराष्ट्राच्या मनाला समजावले की हे राजन, अर्जुनाच्या ध्वजावर वैराग्यरूपी हनुमान विराजले आहेत. येथे कपिध्वज म्हणजे ध्वज चंचल असतो म्हणून त्याला कपिध्वज म्हटलेले नाही. येथे ध्वजावर आरूढ झालेला कपी म्हणजे साधेसुधे सामान्य बानर नाही. ते स्वयं हनुमान आहेत. नरोत्तम श्रीरामांचे सेवक वानरोत्तम आहेत. ते मूर्तिमंत वैराग्य आहेत. ज्यांनी मान-अपमान यांचे हनन केले आहे – ‘ राम मान निरादर आदरही ‘ प्रकृतीमध्ये उपलब्ध असणाऱया वस्तूंचा, विषयांचा, विकारांचा त्याग म्हणजेच येथे वैराग्यरूपी ध्वजा म्हटले आहे. ध्वजा ही राष्ट्राची प्रतीक असते तेव्हा ज्याचे वैराग्य हीच ज्याच्या रथाची ध्वजा आहे अशा अर्जुनाने कौरव युद्धसिद्ध झाले आहेत व शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे असे पाहून आपले धनुष्य उचलून जो हृदयाचा, स्वामी आहे त्या योगेश्वर कृष्णाला म्हणाला, हे अच्युता, ( जो कधी च्यूत होत नाही असा ) दोन्ही सैन्यांच्या मध्यमागी माझा रथ उभा कर”. येथे हा सारथ्याला दिलेला आदेश नाही तर सदगुरुला केलेली प्रार्थना आहे. परंतु हा रथ मध्यमागी कशासाठी न्यायचा आहे ?
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ५.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.