श्रीमद् भगवद् गीता भाग १४ –
श्रीमद् भगवद् गीता भाग १४ | अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.५ ते २.८ –
मूळ श्लोक –
गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ २-५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
महानुभावान् = महानुभाव, गुरून् = गुरुजनांना, अहत्वा = न मारता, इह लोके = या जगात, भैक्ष्यम् = भिक्षेचे अन्न, अपि = सुद्धा, भोक्तुम् = खाणे (हे), श्रेयः = कल्याणकारक (आहे असे मला वाटते), हि = कारण, गुरून् = गुरुजनांना, हत्वा = मारून, (अपि) = सुद्धा, इह = या जगात, रुधिरप्रदिग्धान् = रक्ताने माखलेले, अर्थकामान् = अर्थ व कामरूप, भोगान् एव = भोगच, तु = तर, भुञ्जीय = मी भोगेन ॥ २-५ ॥
अर्थ –
माझ्या परमपूज्य व श्रेष्ठ गुरूवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागूनजगणे अधिक श्रेयस्कर आहे. येथे भिक्षा याचा अर्थ उदर-भरणासाठी भीक मागणे असा नाही; परंतु सज्जनांची-सत्पुरुषाची सेवा करून त्याच्याकडून अक्षय्य सुखाची, कल्याणाची याचना करणे असा त्याचा अर्थ आहे. ‘ अन्न बहोति व्यजानात’ ( तैत्तिरीय ३/२/१ ) अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे. त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी तृप्त होत असतो. कधीही तो अतृप्त राहत नाही. महात्म्यांची-महापुरुषाची सेवा करून व त्याच्याकडून कल्याणप्राप्तीची याचना करून त्याद्वारे हळूहळू ब्रह्मामृताची प्राप्ती तर व्हावी; आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये ही अर्जुनाच्या भिक्षान्ञाची इच्छा आहे. या जगात असेच लोक जास्त असतात. त्यांची अशी इच्छा असते की कोटुंबिक स्नेह- संबंध तर तुटू नये पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी. परंतु ज्यांचे संस्कार श्रेष्ठ आहेत, ज्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या रक्तात क्षत्रियाचे तेज खेळत आहे अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षान्नाचे हे विधान लागू पडत नाही.
जे स्वत: निष्क्रिय राहून फक्त याचना करतात ती भिक्षा होय, ते भिक्षान्न होय. गौतम बुद्धांनीसुद्धा भिक्षु संप्रदाय असूनही मज्झिम निकायमधील धम्मदायाद सुत्तामध्ये( १/२/३ ) या भिक्षाज्ञाला आमिष-एक प्रकारची लाच समजून ते त्याज्य मानले आहे.
अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्णा, आमच्या या गुरूजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्ताने माखलेले असतील. अर्जुनाला कदाचित असे वाटत असावे की, हे महापाप करण्यापेक्षा भजन-पूजनाने भौतिक सुखाची मात्रा अधिक वाढेल; कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरे काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थयोग आणि कामभोगच ना ! म्हणून तो पुन्हा म्हणतो-
मूळ श्लोक –
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
एतत् = हे, (च) = सुद्धा, न विद्मः = आम्हाला कळत नाही, यत् = की, कतरत् = (युद्ध करणे वा न करणे यातील) कोणते, नः = आम्हाला, गरीयः = श्रेष्ठ आहे, वा = तसेच, जयेम = आम्ही विजयी होऊ, यदि वा = अथवा, (ते) = ते, नः = आम्हाला, जयेयुः = जिंकतील, यान् = ज्यांना, हत्वा = मारून, न जिजीविषामः = आम्ही जगू इच्छित नाही, ते = ते(हे आत्मीय असणारे), धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, एव = च, प्रमुखे = आमच्या पुढे युद्धाला, अवस्थिताः = उभे आहेत ॥ २-६ ॥
अर्थ –
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥ २-६ ॥
आम्हाला ऐश्वर्यभोग मिळेल हेदेखील कुठे निश्चित आहे? आणि आम्ही जे समजत होतो ते सर्व अज्ञान होते हे सिद्ध झाल्यामुळे आता आम्ही काय करणे श्रेयस्कर आहे हेही आम्हांला समजेनासे झाले आहे. शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्यापुढे उभे आहेत; पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही. अज्ञानरूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार? नंतर अर्जुनाला वाटले आपण जे म्हणत आहोत, सांगत आहोत तेही अज्ञान असेल तर? म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे-
मूळ श्लोक –
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ २-७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कार्पण्यदोषोपहतस्वभावः = कारुण्यरूपी कातरतेच्या दोषामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे, (च) = आणि, धर्मसम्मूढचेताः = धर्माच्या बाबतीत ज्याचे चित्त मोहित झाले आहे असा मी, त्वाम् = तुम्हाला, पृच्छामि = विचारतो, यत् = जे(साधन), निश्चितम् = निश्चितपणाने, श्रेयः = कल्याणकारक, स्यात् = असेल, तत् = ते, मे = मला, ब्रूहि = (तुम्ही) सांगा, (यत्) = कारण, अहम् = मी, ते = तुमचा, शिष्यः = शिष्य (आहे), (अतः) = म्हणून, त्वाम् = तुम्हाला, प्रपन्नम् = शरण आलेल्या (अशा), माम् = मला, शाधि = उपदेश करा ॥ २-७ ॥
अर्थ –
माझ्या भेकड दुर्बल स्वभावामुळे कर्तव्याच्या बाबतीत, धर्माधर्म जाणण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे व म्हणून मी आपल्याला विचारीत आहे की, माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक, सर्वात कल्याणकारक काय आहे ते सागा. तुम्ही म्हणाल, मी का सांगावे? भगवन् मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेलो आहे, म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा. अर्थात मला केवळ सांगू नका, केवळ शिकवू नका तर जेथे मी अडखळेन तेथे मला तुम्ही संभाळून घ्या. लादणे, लादवणेव लादवणारा ”, तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बऱ्या-समजा एखादा गठ्ठा खाली पडला तर तो पुन्हा कोण लादायला येणार? अशा प्रकारचे अर्जुनाचे येथे वागणे आहे. येथे अर्जुनाने स्वतःला संपूर्ण समर्पण केलेले आहे.
आतापर्यंत तो श्रीकृष्णाची व स्वत:ची योग्यता एक सारखी आहे असे समजत होता, किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता. येथे मात्र आपला स्वत:चा सांभाळ, स्वत:चे रक्षण करण्याचे कार्य अर्जुनाने श्रीकृष्णावर सोपवले आहे. मनुष्याच्या लक्ष्यपूर्तीपर्यंत, सद्गरू साधकाच्या हृदयात राहून त्याच्या बरोबर वाटचाल करतात. जर तसे ते त्याच्याबरोबर राहिले नाहीत तर मनुष्य हा भवसागर पार करु शकत नाही. ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचे शिक्षण देत तिचा विवाह होईपर्यंत तिचे कुटुंबिय तिचे रक्षण करतात, त्याच प्रकारे सदगुरू शिष्याच्या अंतरात्मारूपी रथाचे सारथी बनून संसाररूपी घाटातून त्याला बाहेर काढून इप्सित स्थळी त्याला पोहचवतात.
येथे अर्जुन धर्माधर्म जाणण्यास असमर्थ झालेला आहे म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, भगवन्, आणखी एक गोष्ट मला समजावून सांगा,
मूळ श्लोक –
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ २-८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
हि = कारण, भूमौ = भूमंडळाचे, असपत्नम् = निष्कंटक, ऋद्धम् = धनधान्यसंपन्न, राज्यम् = राज्य, च = तसेच, सुराणाम् = देवांचे, आधिपत्यम् = स्वामित्व, अवाप्य = मिळून, अपि = सुद्धा, (यत्) = जो (उपाय), मम = माझ्या, इन्द्रियाणाम् = इंद्रियांना, उच्छोषणम् = सुकवून टाकणारा, शोकम् = शोक, अपनुद्यात् = दूर करू शकेल, (तत्) = असा उपाय, न प्रपश्यामि = मला दिसत नाही ॥ २-८ ॥
अर्थ –
पृथ्वीवरील निष्कंटक व धनधान्याने संपन्न असे राज्य किंवा स्वर्गातील सर्व देवातांवर अधिपत्य गाजवणारे असे इंद्रपद जरी मला मिळाले तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण माझ्या इंद्रियाना शोषून टाकणारा हा शोक मला नाहीसा करता येणार नाही. माझ्या जीविताचे शोषण करणाऱया या शोकाने मला इतके ग्रासले असल्यामुळे मी हे सर्व घेवून करु तरी काय? जर माझ्या वाटयाला असा हा शोकच येणार असेल तर भगवन् , मला क्षमा करा. अर्जुनाला वाटले आपण असे म्हटल्यांवर श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाहीत.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग १४.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.