श्रीमद् भगवद् गीता भाग ९ –
श्रीमद् भगवद् गीता भाग ९ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. ३४ ते ३७
मूळ श्लोक –
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥१-३४॥
संदर्भित अन्वयार्थ –
आचार्याः = गुरुजन, पितरः = काका, पुत्राः = मुलगे, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, पितामहाः = आजे, मातुलाः = मामे, श्वशुराः = सासरे, पौत्राः = नातू, श्यालाः = मेहुणे, तथा = तसेच, सम्बन्धिनः = आप्त लोक, (सन्ति) = आहेत ॥ १-३४ ॥
अर्थ –
गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥
मूळ श्लोक –
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
मधुसूदन = हे मधुसूदना, घ्नतः अपि = (मला) मारले तरी सुद्धा, (अथवा) = किंवा, त्रैलोक्यराज्यस्य = तीन लोकांच्या राज्याच्या, हेतोः = साठी, अपि = सुद्धा, एतान् = या सर्वांना, हन्तुम् = ठार मारण्याची, न इच्छामि = मला इच्छा नाही (मग), महीकृते = (या) पृथ्वीसाठी (तर), नु किम् = काय सांगावे ॥ १-३५ ॥
अर्थ –
हे मधुसूदना, मला जरी कोणी त्रैलोक्याचे राज्य देऊ केले तरी मला ठार मारण्याची इच्छा करणाऱया या लोकांना मी मारू इच्छित नाही; मग या पृथ्वीची काय कथा ?
रणांगणावर उभ्या असणाऱ्या अठरा अक्षौहिणी सैन्यात अर्जुनाला आपले सर्व स्वकीयच दिसले. वास्तविक अर्जुन म्हणजे करूणा ! करूणेने ओथंबलेल्या प्रत्येक भक्तापुढे उपासनेच्या प्रारंभी हीच समस्या उभी असते. त्यांना वाटते की, भजन-पूजन, उपासना, आराधना करून परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी. परंतु एखाद्या अनुभवी सदगुरुच्या सहवासात किंवा त्याच्या मार्गदर्शनाखाली उपासना करणाऱ्या भक्ताला जेव्हा क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाचे स्वरुप समजते व मग आपल्याला खरे कोणाशी लढावयाचे आहे हे समजते तेव्हा तो हताश होतो. त्याला असे वाटत असते की पित्याकडील परिवार, सासुरवाडीचा परिवार, मामाकडील परिवार, इतर सहद, मित्र व गुरुजन यांच्यासह रहावे, सर्वांनी सुखी असावे, त्यांची नीट व्यवस्था ठेवावी व ते करत असतानाच परमेश्वराची उपासना करून त्याचीही प्राप्ती करून घ्यावी. परंतु जेव्हा त्याला समजते की, परमेश्वराची आराधना करण्यासाठी प्रथम सर्व आप्तांनांच सोडावे लागते, प्रथम त्यांच्याविषयी असणाऱ्या प्रेमाचाच त्याग करावा लागतो तेव्हा तो व्याकूळ होतो.
पूज्य महाराजश्री म्हणायचे – ‘ साधू होणे व मृत्यू पावणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. त्याच्यासाठी जगात कोणीही जिवंत नसते व कोणी जिवंत असले तर तो मोह, आसक्ती असते. या मोहावर व आसक्तीवर विजय मिळवणे हाच साधूचा खरा विजय असतो. या मोहाचा, आसक्तीचा प्रसार म्हणजे तर आयुष्य असते. अन्यथा आयुष्यात आमचे काय आहे ?
“तुलसीदास कह चिद् विलास जग, बूझत बूझत बूझे ‘ मनाचा प्रसार म्हणजेच हे जगत आहे. योगेश्वर कृष्णानेही मनाच्या प्रसारालाच ‘ जगत’ म्हंटले. जो या मनाच्या प्रसाराला रोखतो, त्याच्यावर विजय मिळवतो, तो चराचर जगावर विजय मिळवतो. इहेव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थित मन: ( गीता ५/१९ ).
केवळ अर्जुन व्याकूळ झाला असे नव्हे. अनुराग-प्रेम सर्वाच्या हृदयात असते. ज्याच्या हृदयात हे प्रेम आहे, करुणा आहे ते सर्वच असे व्याकूळ होतात. प्रथम त्यांना वाटते की, भजन-पूजनापासून काही फायदा होईल व त्यामुळे सर्वजण सुखी होतील, त्यांच्याबरोबर सुखाचा उपभोग घेऊ. परंतु ते जर जिवंतच राहणार नसतील तर सुख मिळवून काय उपयोग ? अर्जुनाची दृष्टी राज्यसुखा पर्यंतच सीमित होती. त्रेलोक्याच्या साप्राज्य प्राप्तीलाही तो सुखाची पराकाष्ठा समजत होता. त्याच्याही पलीकडे काही सत्य आहे ही गोष्ट अद्याप अर्जुनाला समजलेली नाही.
मूळ श्लोक –
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
जनार्दन = हे जनार्दना, धार्तराष्ट्रान् = धृतराष्ट्राच्या मुलांना, निहत्य = मारून, नः = आम्हाला, का = कोणते, प्रीतिः = सुख, स्यात् = मिळणार, एतान् = या, आततायिनः = आततायींना, हत्वा = मारल्यावर, अस्मान् = आम्हाला, पापम् एव = पापच, आश्रयेत् = लागेल ॥ १-३६ ॥
अर्थ –
हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला का आनंद होणार आहे ? धृतराष्ट् म्हणजे धृष्टतेचे राष्ट. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या मोहरूपी दुर्योधनादींना मारून आम्हाला काय समाधान मिळणार आहे ? जनार्दना, या आततायी लोकांना मारून आम्हाला उलट पापच लागेल; जो यत्किंचित लाभासाठी अनीतीच्या मार्गाचा अवलंब करतो, त्याला आततायी म्हंटले जाते. परंतु जो आत्म्याच्या मार्गात अडथळा बनतो तो महा आततायी असतो. काम, क्रोध, लोभ, मोह हे मोक्षाच्या मार्गातील अडथळे आहेत.
मूळ श्लोक –
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥🐚
संदर्भित अन्वयार्थ –
तस्मात् = म्हणून, माधव = हे माधवा, स्वबान्धवान् = आपल्याच बांधवांना (म्हणजे), धार्तराष्ट्रान् = धृतराष्ट्राच्या मुलांना, हन्तुम् = मारण्यास, वयम् = आम्ही, न अर्हाः = योग्य नाही, हि = कारण, स्वजनम् = आपल्याच कुटुंबाला, हत्वा = मारून, कथम् = कसे (बरे), सुखिनः = आम्ही सुखी, स्याम = होऊ ॥ १-३७ ॥
अर्थ –
म्हणून हे माधवा, धृतराष्ट्राच्या या पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. अरे, हे स्व-बांधव कसे ? ते तर शत्रू होते ना ? वास्तविक नाती ही अ ज्ञानातून उत्पन्न होत असतात. हा मामा आहे, हा काका आहे, ही सासुरवाडी आहे, हे आमचे स्वजन आहेत – आप्त आहेत हे सर्व संबंध अज्ञानातून उत्पन्न होत असतात. अहो, आमचे हे शरीरच जर नश्वर आहे तर ही नाती कुठून टिकणार ?
जोपर्यंत मोह असतो तोपर्यंत आम्हाला परिवार असतो, आमचे सुहृद असतात, आमची एक दुनिया असते. परंतु जेथे मोह असत नाही, तेथे हे कोणतेही संबंध-ही नाती उपस्थित होतच नाहीत. येथे मोहामुळे अर्जुनाला त्याचे शत्रूही सुहृद वाटू लागले व म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे की, या आप्तांना मारून आम्ही कसे सुखी होणार ? जर हे अज्ञान आणि मोह नष्ट झाला तर कुटुम्बाचे अस्तित्वच राहणार नाही. अर्थात, हे अज्ञानच ज्ञानाचे प्रेरक बनत असते. भर्तृहरी, तुलसीदास इत्यादी अनेक महानुभवांना वैराग्याची प्रेरणा त्यांच्या पत्नीपासून मिळाली आहे, तर कोणी सावत्र आईच्या वागण्यामुळे खिन्न होऊन वैराग्याचा मार्ग पत्करला आहे असे आपल्याला दिसून येते.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ९.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.