श्रीमद् भगवद् गीता भाग १५ –
श्रीमद् भगवद् गीता भाग १५ | अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.९ ते २.१२ –
मूळ श्लोक –
सञ्जय उवाच
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, गुडाकेशः = निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाने, हृषीकेशम् = अंतर्यामी श्रीकृष्णांना, एवम् = असे, उक्त्वा = सांगून, न योत्स्ये = मी युद्ध करणार नाही, इति = असे, ह = स्पष्टपणे, गोविन्दम् = गोविंदाला, उक्त्वा = म्हणून (मग तो), तूष्णीम् = गप्प, बभूव = झाला ॥ २-९ ॥
अर्थ –
संजय म्हणाला – हे राजन, मोहनिशाजयी अर्जुनाने हृदयाचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाला म्हंटले की, हे गोविंदा, ‘ मी युद्ध करणार नाही’ आणि असे सांगून तो स्तब्ध झाला. अजून अर्जुनाची वृत्ती सनातनी आहे की ज्यामध्ये कर्मकांड, सुखभोग यावर भर असून स्वर्ग म्हणजे अंतिम लक्ष्य समजले जाते. आता श्रीकृष्ण अर्जुनाची ही विचारसणी कशी चुकीची आहे ते पुढे सांगतील.
मूळ श्लोक –
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २-१० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
भारत = हे भरतवंशी धृतराष्ट्रा, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, विषीदन्तम् = शोक करणाऱ्या, तम् = त्या (अर्जुनाला), हृषीकेशः = अंतर्यामी श्रीकृष्ण, प्रहसन् इव = जणू स्मित करून, इदम् = हे, वचः = वचन, उवाच = म्हणाले ॥ २-१० ॥
अर्थ –
त्यानंतर हे भरतकुलोत्पन्ना धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अशा प्रकारे हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखे करून, भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले –
मूळ श्लोक –
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, (अर्जुन) = हे अर्जुना, अशोच्यान् = शोक करण्यास योग्य नसणाऱ्या माणसांसाठी, त्वम् = तू, अन्वशोचः = शोक करीत आहेस, च = आणि, प्रज्ञावादान् = पंडितांच्याप्रमाणे वचने, भाषसे = बोलत आहेस, (परन्तु) = परंतु, गतासून् = ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, च = आणि, अगतासून् = ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी (सुद्धा), पण्डिताः = पंडित लोक, न अनुशोचन्ति = शोक करत नाहीत ॥ २-११ ॥
अर्थ –
अरे अर्जुना, तू ज्यांचा शोक करणे योग्य नाही त्यांचा तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या पोकळ गोष्टी करीत आहेस. जे ज्ञानी आहेत, जे खरे पंडित आहेत ते जिवंत असलेल्यांबद्दल किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत. तू पांडित्यपूर्ण गोष्टी खूप करतोस, परंतु तू खरा ज्ञानी नाहीस कारण –
मूळ श्लोक –
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २-१२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
जातु = कोणत्याही काळी, अहम् = मी, न आसम् = नव्हतो, त्वम् = तू, न (आसीः) = नव्हतास, (अथवा) = अथवा, इमे = हे, जनाधिपाः = राजेलोक, न (आसन्) = नव्हते, (इति) = असे, तु = तर, न एव = मुळीच नाही, च = तसेच, अतः परम् = यापुढे, वयम् = आपण, सर्वे = सर्वजण, न भविष्यामः = असणार नाही, (एवम्) न एव = असेही नाही ॥ २-१२ ॥
अर्थ –
मी म्हणजे अध्यात्मिक सदगुरु पूर्वी नव्हतो असे नाही. किंवा दयाशीलतेचा अधिकारी तू अगर हे राजे म्हणजे राजसी वृत्तीत वसत असणार अहंकार पूर्वी नव्हता असे नाही. तसेच आपण सर्वजण ह्यापुढे असणार नाही असेही नाही. अरे, सद्गुरुचे अस्तित्व सदैव असते तसेच दयाशीलतेचे अस्तित्व सदैव असते. येथे योगेश्वर कृष्णाने योगाच्या सनातनात्वावर प्रकाश टाकला आहे व सांगितले आहे की योग भविष्यातही अस्तित्वात असणार आहे. जे मृत्यू पावले आहेत त्याच्याबद्दल शोक का करु नये? त्याचे कारण सांगताना ते म्हणतात –
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग १५.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.