श्रीमद् भगवद् गीता भाग ४ –
श्रीमद् भगवद् गीता भाग ४ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. १३ ते १६
मूळ श्लोक –
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १-१३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
ततः = त्यानंतर, शङ्खाः = शंख, च = आणि, भेर्यः = नगारे, च = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व शिंगे (इत्यादी रणवाद्ये), सहसा एव = एकदमच, अभ्यहन्यन्त = वाजू लागली, (तेषां) = (त्यांचा), सः = तो, शब्दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत् = झाला ॥ १-१३ ॥
अर्थ –
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥
त्यानंतर शंख, नगारे, तुताऱ्या, ढोल, रणशिंग ही रणवाचे एकदम वाजविली गेली, तेव्हा त्यांचा फारच मोठा आवाज झाला. त्यामुळे वातावरण भयावह झाले व पांडव सेनेत भय उत्पन्न करणे हाच तर कौरवांचा उद्देश होता. अशाप्रकारे दृष्ट प्रवृत्तीचे बाह्य आक्रमण सफल झाल्यावर मोहमय बंधन अधिक घट्ट-मजबूत बनते. यानंतर पुण्यप्रवृत्तीच्या पांडव सेनेत रणवाद्ये फुंकली गेली यात पहिला मान योगेश्वर श्रीकृष्णाला दिलेला होता.
मूळ श्लोक –
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः॥१-१४॥
संदर्भित अन्वयार्थ –
ततः = त्यानंतर, श्वेतैः = पांढऱ्या, हयैः = घोड्यांनी, युक्ते = युक्त अशा, महति = उत्तम, स्यन्दने = रथात, स्थितौ = बसलेल्या, माधवः = श्रीकृष्ण महाराजांनी, च = आणि, पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), एव = सुद्धा, दिव्यौ = अलौकिक, शङ्खौ = शंख, प्रदध्मतुः = वाजविले ॥ १-१४ ॥
अर्थ –
यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) ही दिव्य शंख वाजविले. ॥ १-१४ ॥
पांढर्या शुभ्र घोड्यांनी युक्त असणाऱया ( येथे पांढरा रंग सात्विक व निर्मलतेचे प्रतीक आहे ) – ‘ महति स्यन्दने’ म्हणजे महान रथावर आरूढ झालेल्या योगेश्वर श्रीकृष्णाने व अर्जुनाने आपापले अलौकिक शंख फुंकले. येथे अलौकिक या शब्दाचा अर्थ आहे सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ ! मृत्युलोक, देवलोक, ब्रह्मलोक व जेथे जेथे जन्ममृत्यूचे भय आहे त्या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ अशी पारलौकिक व पारमार्थिक स्थिती प्रदान करणे हा योगेश्वर कृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. ह्या योगेश्वराचा रथ सोन्याचांदीचा किंवा लाकडाचा नाही तर तो रथ अलौकिक आहे, त्याचा शंख अलौकिक आहे व त्यामुळे त्याचा घोषध्वनीही अलौकिकच आहे. लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे असे फक्त एक ब्रह्म तेवढे आहे. सरळ त्या ब्रह्माशी संपर्क साधून देणे हा श्रीकृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. परंतु ही स्थिती श्रीकृष्ण कशा प्रकारे प्रदान करतील?
मूळ श्लोक –
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५॥
संदर्भित अन्वयार्थ –
हृषीकेशः = श्रीकृष्ण महाराजांनी, पाञ्चजन्यम् = पांचजन्य नावाचा, धनञ्जयः = अर्जुनाने, देवदत्तम् = देवदत्त नावाचा, (च) = आणि, भीमकर्मा = भयानक कर्मे करणाऱ्या, वृकोदरः = भीमसेनाने, पौण्ड्रम् = पौण्ड्र नावाचा, महाशङ्खम् = मोठा शंख, दध्मौ = वाजविला ॥ १-१५ ॥
अर्थ –
श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥
‘ हुषिकेश’ : – जो ह॒दयाचा जाणता आहे, स्वामी आहे त्या कृष्णाने “पांचजन्य’ शंख फुंकला आणि पाच ज्ञानेंद्रियांना त्यांच्या ( शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ) गुणांसह वश करून ( तो निग्रह ) आपल्या भक्तगणांना प्रदान करण्याचा घोष श्रीकृष्णाने केला. विक्राळ रूपात बंड करणाऱ्या इंद्रियांना वश करून आपल्या भक्तांना इंद्रियनिग्रहाची देणगी सदगुरूच देत असतो आणि योगेश्वर श्रीकृष्ण हे महान सदगुरू होते. ‘ शिष्यस्तेहं’ भगवन!
मी आपला शिष्य आहे. तेव्हा ब्राह्म विषय-उपाधी इकडे लक्ष जाऊ न देता दृष्ट गोष्टीवरच लक्ष केंद्रित होऊ दे. अयोग्य असे काहीही माझ्या कडून पाहिले जाऊ नये, ऐकले जाऊ नये किंवा स्पर्शिले जाऊ नये. अर्थात या सर्व गोष्टी सदगुरूवरच अवलंबून असतात.
देवदत्त धनंजय: ‘, दैवी संपत्ती आपल्या काबूत ठेवणारा अनुराग म्हणजेच अर्जुन होय. येथे अनुराग म्हणजे यथोचित, इष्ट असणाऱया गोष्टीबद्दल प्रेम असणे यात विरह, वैराग्य, अश्रुपात याही गोष्टींचा समावेश होतो. ‘गदगद् गिरा नयन बह नीरा’ रोमांचक गोष्टीही यात येतात, पण येथे विषयवासनेला, विकाराला लेशमात्र शिरकाव असत नाही. जर हा अनुराग यशस्वी झाला तर प्रत्यक्ष परमात्म्यात प्रवेश देणाऱ्या दैवी संपत्तीवर तो अधिपत्य प्राप्त करू शकतो. याचेच दुसरे नाव धनंजय आहे. धन म्हणजे दौलत, संपत्ती यामुळे शरीराचा उदरनिर्वाह व इतर गरजा पूर्ण होत असतात. पण या बाह्य संपत्तीचा आत्म्याशी काहीच संबंध नसतो. या संपत्तीपेक्षा आत्मिक संपत्ती हीच खरी स्वतःची संपत्ती आहे. बृहद््आरण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने मैत्रेयीला समजवताना हेच सांगितले की, पृथ्वीचे स्वामित्व जवळ असले तरी त्यामुळे अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. ते प्राप्त करण्यासाठी आत्मिक संपत्तीच जवळ असणे आवश्यक आहे. तोच त्यावर एकमेव उपाय आहे.
यानंतर भयावह, अचाट कर्म करणाऱया भीमाने पौण्डू म्हणजे प्रीती नावाचा महाशंख फुंकला. प्रीती म्हणजेच भाव-प्रेम ! त्याचा उद्गम व निवास हृदय असते. म्हणूनच भीमाला वृकोदर असे म्हणतात. हे प्रेम, हा भाव लहान मुलात दिसून येतो; परंतु वस्तुत: ते प्रेम आपल्या हृदयात असते, ते मुलांमध्ये फक्त प्रकट होत असते. हा भाव अगाध आहे, सामर्थ्यवान आहे. त्याने म्हणजे भावरूपी भीमाने पौण्डू-प्रीती नावाचा महाशंख फुंकला, हा भाव महान आहे, बलवान आहे, सामर्थ्यवान आहे पण प्रेमाचे माध्यम असले तरच !
हरि व्यापक सर्वत्र समाना।
प्रेम ते प्रगट होरहहि मै जाना! ।
(रामचरित मानस, १/१८४/५)
मूळ श्लोक –
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कुन्तीपुत्रः = कुन्तीपुत्र, राजा = राजा, युधिष्ठिरः = युधिष्ठिराने, अनन्तविजयम् = अनंतविजय नावाचा, (च) = आणि, नकुलः = नकुलाने, च = व, सहदेवः = सहदेवाने, सुघोष-मणिपुष्पकौ = सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंङ्ख, (दध्मौ) = वाजविले ॥ १-१६ ॥
अर्थ –
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ॥ १-१६ ॥
कुन्तीपुत्र राजा युधिष्ठिराने ‘ अनंत विजय ‘ नावाचा शंख फुंकला. महाभारतात कुन्ती हे कर्तव्याचे प्रतीक आहे; तर युधिष्ठिर हे धर्माचे प्रतीक आहे. धर्म जर स्थिर व सुदृढ ठेवला तरच ‘ अनन्त विजय ‘ अनन्त परमात्म्याची स्थिती प्राप्त करून देईल. जो युद्धामध्ये स्थिर असतो, निश्चिल असतो त्याला युधिष्ठिर म्हणतात. जो प्रकृति-पुरुष, क्षेत्र-क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षामध्ये स्थिर राहू शकतो, जो महाभयंकर दुःखानेही विचलित होत नाही असा स्थितप्रज्ञच एक दिवस अनन्त, अविनाशी अशा परमतत्त्व परमेश्वरावर विजय मिळवू शकतो. नियमरूपी नकुलने ‘ सुघोष’ नावाचा शंख फुंकला. येथे नकुल हा आचारपरंपरेचे नियम पाळण्यात अत्यंत काटेकोर होता व म्हणून त्याला ‘नियम’ असे म्हटले आहे. तेव्हा जो जो नियम भव्य होईल, उन्नत होईल म्हणजेच शुद्ध आचारविचार वाढतील तेव्हा अशुभ-अमंगल नष्ट होत जाईल व मंगलकारक, कल्याणकारक, शुभकारक स्थिती निर्माण होईल. नंतर सत्संगरूपी सहदेवाने ‘मणिपुष्पक ‘ नावाचा शंख फुंकला. विद्वानांनी प्रत्येक श्वासाला “बहुमूल्य रत्न’ असे म्हटले आहे. ‘ हीरा जैसी स्वांसा बातो में बीती जाय’ आता येथे सत्संग व बहुमूल्य श्वास याचा काय संबंध आहे ? त्यासाठी सत्संगाचे स्वरूप समजावून घ्यायला हवे.
सत्संग दोन प्रकारचे असतात. एक सत्पुरूषांच्या सान्निध्यात बसून त्यांची अमृतवाणी श्रवण करणे. हा झाला बाह्य सत्संग पण दुसरा सत्संग हा आंतरिक असतो. भगवान श्रीकृष्णांच्या मते आत्मा हेच एकमेव सनातन सत्य आहे. तेव्हा सर्व प्रकारांनी-बाजूंनी इंद्रियांचे नियमन करून जर मन आत्म्याच्या संगतीत राहील, आत्म्याच्या ठिकाणी रत होईल तेव्हा तो खरा, वास्तविक सत्संग होतो. सतत ध्यान, चिन्तन व चित्ताची एकाग्रता याचा सतत सराव, अभ्यास केल्याने हा सत्संग साधला जातो. या सनातन सत्याच्या सात्रिध्यात मन जसजसे अधिक रममाण होईल – रत होईल तसतसे प्रत्येक श्वासावरही नियंत्रण ठेवणे शक्य होईल व मग मनासहित इंद्रियाचा विरोध होऊ शकेल त्या दिवशी मन संपूर्ण इंद्रिय निग्रह करू शकेल त्या दिवशी त्याला सनातन तत्त्वाची प्राप्ती होईल. त्यानंतर एखाद्या वाद्याच्या सुराप्रमाणे चित्ताचा सूर वाद्याच्या सुरात मिसळून जाईल वब हाच खरा सत्संग ठरेल. या अर्थाने सहदेवाला सत्संगरूप असे म्हंटले आहे.
बाह्य रत्न कठीण आहे; परंतु श्वासरूपी रत्न फुलापेक्षाही कोमल आहे. फूल तर विकसित झाल्यानंतर किंवा देठापासून तुटल्यावर कोमेजून जाते, परंतु मनुष्य पुढचा श्वास घ्यायला जिवंत राहू शकेल की नाही याची शाश्वती नाही. परंतु आंतरिक सत्संग सफल झाला तर मात्र प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवून परम लक्ष्याची प्राप्ती करून घेता येते. पांडवांचे हेच लक्ष्य आहे; त्या व्यतिरिक्त दुसरे ध्येय-लक्ष्य त्यांना नाही. परंतु प्रत्येक साधन निर्मलतेच्या मार्गात काही ना काही अंतर निर्माण करत असते.श्रीमद् भगवद् गीता भाग ४.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ४.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.