श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २५ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.४९ ते २.५२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २५.

मूळ श्लोक –

दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ २-४९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

बुद्धियोगात्‌ = या समत्वरूपी बुद्धियोगापेक्षा, कर्म = सकाम कर्म (हे), दूरेण अवरम्‌ = अत्यंत खालच्या श्रेणीचे (आहे), (अतः) = म्हणून, धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, बुद्धौ = समत्वबुद्धीमध्येच, शरणम्‌ = रक्षणाचा उपाय, अन्विच्छ = तू शोध (म्हणजे बुद्धीयोगाचा आश्रय घे), हि = कारण, फलहेतवः = फळाचा हेतू बनणारे लोक, कृपणाः = अत्यंत दीन, (सन्ति) = असतात ॥ २-४९ ॥

अर्थ –

हे धनंजया, ‘ अवरं कर्म’ म्हणजे निकृष्ट कर्म. हे निकृष्ट कर्म म्हणजेच आसक्तीयुक्त कर्म. ते बुद्धियोगापासून फार दूर आहे. फलाची अभिलाषा ठेवणारे कृपण असतात. ते आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये कधीच रत होत नाहीत. तेव्हा समत्व बुद्धियोगाचा आश्रय कर. अरे, इच्छेप्रमाणे फल मिळाले तरी त्यात कल्याण कोठून असणार? साधकाने तर मोक्षाचीही अभिलाषा ठेवता कामा नये कारण वासनां पासून मुक्त होणे यालाच तर मोक्ष म्हणतात.

फलप्राप्तीचा चिंतनाने साधकाचा वेळ वृथा वाया जातो आणि फल प्राप्त झाल्यावर त्यामध्येच साधक गुंतून पडतो. त्याची साधना तिथेच समाप्त होते. मग पुढे तो भगवंताचे भजन-पूजन काय करणार? तेथूनच तो विचलित होतो- कुमार्गाला लागतो. म्हणून समत्व बुद्धीने योगाचे आचरण करा. ज्ञानमार्गालाही श्रीकृष्णाने बुद्धियोग म्हंटले होते व सांगितले होते की, अर्जुना, हा बुद्धियोग तुला ज्ञानयोग सांगताना सांगितला होता आणि येथे निष्काम कर्मयोगालाही बु्धियोग म्हंटला आहे. वस्तुतः दोन्हीमधील दृष्टीकोन वेगळा आहे. ज्ञानयोगात लाभ-हानीचा विचार करून, त्याची चिकित्सा करून आचरण करावे लागते निष्काम कर्मयोगामध्ये बौधिक स्तरावर समत्व राखावे लागते म्हणून त्याला समत्व बुद्धियोग असेही म्हटले जाते, व म्हणून हे अर्जुना, तू समत्व बुद्धियोगाचा आश्रय ग्रहण कर, कारण फलाची अभिलाषा ठेवणारे फार कृपण असतात.

मूळ श्लोक –

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

बुद्धियुक्तः = समबुद्धीने युक्त असा पुरुष, इह = याच लोकात, सुकृतदुष्कृते उभे = पुण्य आणि पाप या दोहोंचाही, जहाति = त्याग करतो म्हणजे त्यातून मुक्त होऊन जातो, तस्मात्‌ = म्हणून, योगाय = समत्वरूप योगाला, युज्यस्व = तू लागून राहा, योगः = (हा) समत्वरूप योगच, कर्मसु = कर्मांतील, कौशलम्‌ = कौशल्य आहे म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे ॥ २-५० ॥

अर्थ –

साम्यबुद्धीने युक्त असणारे पुरुष या लोकीच पाप व पुण्य या दोन्ही गोष्टींचा त्याग करतात. ते त्यात बद्ध होऊन राहत नाहीत. म्हणून तू बुद्धियोग संपादन करण्यास तयार हो. योग: कर्मसु कौशलम- म्हणजे कर्माचरणात समत्व बुद्धिरूप योग साधणे हे खरे कोशल्य आहे. या जगात कर्म करण्याच्या दोन पद्धती रूढ आहेत. लोक कर्म करून

फलाची अपेक्षा करतात किंवा फल मिळाले नाही तर ते कर्म करूच इच्छित नसतात. योगेश्वर श्रीकृष्णांनी या प्रकारच्या कर्मांना बद्धकारक समजले असून आराधने’ला ते एकमात्र कर्म समजत आहेत.

या अध्यायात त्यांनी कर्माचा केवळ उच्चार केला आहे. तिसऱ्या अध्यायातील सुरूवातीच्या एलोकात त्याची परिभाषा दिली आणि चौथ्या अध्यायात कर्माचे स्वरूप विस्ताराने सांगितले आहे. प्रस्तुत श्लोकात श्रीकृष्ण सांसारिक परंपरेने युक्त असणारे कर्म बाजूला ठेवून कर्म करण्याची कला सांगताना म्हणतात, ‘ तुम्ही अत्यंत

श्रद्धायुक्त भावनेने कर्म करा; परंतु फलाचा मात्र स्वेच्छेने त्याग करा. मग कर्म कुठे जाईल? कर्म करणाऱ्याचे हे तर कौशल्य आहे. निष्काम साधकाची समग्र शक्ती अशा प्रकारची कर्मे करण्यात खर्च होत असते. आराधना करायला शरीराची गरज असते परंतु केवळ कर्मे करायची काय? ही जिज्ञासासुद्धा स्वाभाविक आहे. अन्यथा सदैव कर्मच करायचे की त्याचा काही परीणामही असू शकतो.

मूळ श्लोक –

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ २-५१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

हि = कारण, बुद्धियुक्ताः = समबुद्धीने युक्त (असे), मनीषिणः = ज्ञानी लोक हे, कर्मजम्‌ = कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या, फलम्‌ = फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, जन्मबन्धविनिर्मुक्ताः = जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन, अनायम्‌ = निर्विकार (असे), पदम्‌ = परमपद, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात ॥ २-५१ ॥

अर्थ –

अरे, बुद्धियोगी असे ज्ञानी पुरुष भौतिक कर्मापासून निर्माण झालेल्या फलाचा त्याग करुन जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतात व अत्यंत निर्दोष, दुःखरहित असे अमृतमय स्थान प्राप्त करतात.

अर्जुनाची दृष्टी त्रेलोक्याचे साप्राज्य व स्वर्गातील इंद्रपद येथपर्यंत सीमित होती. या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या तरी तो युद्ध करायला तयार होत नव्हता. येथे श्रीकृष्ण एक नवीन गोष्ट त्याला सांगतात की, आसक्तीरहित, कर्मद्वारा अनामय, दु:खाच्या पलीकडील, ब्रह्मानंद देणारे असे पद प्राप्त होते. निष्काम कर्मयोगाने परमपदाची प्राप्ती होते, जेथे मृत्यूला प्रवेश नाही, अशा अढळ स्थानाची प्राप्ती होते. परंतु अशा प्रकारचे कर्म करण्याची मनाची वृत्ती केव्हा होईल?

मूळ श्लोक –

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ २-५२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यदा = जेव्हा, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, मोहकलिलम्‌ = मोहरूपी दलदल, व्यतितरिष्यति = चांगल्या प्रकारे पार करून जाईल, तदा = तेव्हा, श्रुतस्य = ऐकलेल्या, च = आणि, श्रोतव्यस्य = ऐकिवात येणाऱ्या (इह-पर लोकातील सर्व भोगांच्या बाबतीत), निर्वेदम्‌ = वैराग्य, गन्तासि = तुला प्राप्त होईल ॥ २-५२ ॥

अर्थ –

हे अर्जुना, तेव्हा तुझी ( अर्थात साधकाची ) बुद्धी मोहरूपी दलदलीतून बाहेर पडेल, जेव्हा तिला धन, संतती व प्रतिष्ठा यांचा लेशमात्र मोह राहणार नाही, या सर्व गोष्टींबाबत असणारी आसक्ती नाहीशी होईल त्यावेळी जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकशील. तसेच ऐकलेल्या तत्त्वानुसार

तुझ्यात वैराग्य भावना निर्माण होईल, त्याप्रमाणे तू आचरण करू शकशील. आता तर जे ऐकण्यास योग्य आहे ते तू ऐकू शकत नाहीस मग आचरण करण्याचा तर प्रश्न नाही. तेव्हा ही योग्यता केव्हा प्राप्त होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २५.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment