श्रीमद् भगवद् गीता भाग ३ –
श्रीमद् भगवद् गीता भाग ३ | अध्याय १ – श्लोक क्र. ९ ते १२
मूळ श्लोक –
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अन्ये = इतर, च = सुद्धा, मदर्थे = माझ्यासाठी, त्यक्तजीविताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुष्कळ, शूराः = शूरवीर, (सन्ति) = आहेत, सर्वे = ते सर्व, नानाशस्त्रप्रहरणाः = निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज, युद्धविशारदाः = युद्धात पारंगत, (सन्ति) = आहेत ॥ १-९ ॥
अर्थ –
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥
माझ्यासाठी जीवावर उदार झालेले, अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज वयुद्धात कुशल असणारे पुष्कळ वीर येथे युद्धासाठी सिद्ध झालेले आहेत. ते सर्व माझ्यासाठी आपले प्राण द्यायलाही तयार आहेत. अर्थात, ते निश्चितपणे किती आहेत हे सांगता येणार नाही. आता कोणती सेना कोणामुळे सुरक्षित आहे? यावर दुर्योधन म्हणतो –
मूळ श्लोक –
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १-१० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
भीष्माभिरक्षितम् = भीष्म-पितामहांकडून रक्षिले गेलेले, अस्माकम् = आमचे, तत् = ते, बलम् = सैन्य, अपर्याप्तम् = सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे, तु = आणि, भीमाभिरक्षितम् = भीमाकडून रक्षिले गेलेले, एतेषाम् = या पांडवांचे, इदम् = हे, बलम् = सैन्य, पर्याप्तम् = जिंकण्यास सोपे आहे ॥ १-१० ॥
अर्थ –
भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥
भीष्माने रक्षण केलेली आमची सेना अफाट सेना असून ती अजिंक्य आहे. तर भीमाने रक्षण केलेली पांडवांची सेना जिंकण्यास सोपी असून ती पर्याप्त म्हणजे मोजकी आहे. येथे ‘ पर्याप्त’ व ‘ अपर्याप्त’ हे क्लिष्ट दुर्बोध शब्द दुर्योधनाच्या मनातील शंका-संदेह व्यक्त करीत आहेत. आता ज्यांच्यावर कौरवांची भीस्त आहे ते पितामह भीष्म म्हणजे कोणती सत्ता आहे ? तसेच ज्याच्यावर पांडव अवलंबून आहेत तो भीम म्हणजे कोणती सत्ता आहे हे पहावयाचे आहे. यानंतर दुर्योधन सेनेला सूचना देताना सांगत आहे –
मूळ श्लोक –
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
च = म्हणून, सर्वेषु = सर्व, अयनेषु = व्यूहद्वारात, यथाभागम् = आपापल्या जागेवर, अवस्थिताः = राहून, भवन्तः = आपण, सर्वे एव = सर्वांनीच, हि = निःसंदेहपणे, भीष्मम् एव = भीष्म पितामहांचेच, अभिरक्षन्तु = सर्व बाजूंनी रक्षण करावे ॥ १-११ ॥
अर्थ –
म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥
तेव्हा सेनाव्यूहरचनेत आपापल्या मोक्याच्या जागी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्याचेच रक्षण केले पाहिजे. जर भीष्माचार्य जिवंत राहतील तरच आम्ही अजिंक्य राहणार आहोत. तेव्हा पांडवांशी लढण्यापेक्षा तुम्ही फक्त भीष्माचार्याचेच रक्षण करावे. जो स्वत:चे रक्षण करू शकत नाही, ज्याच्या रक्षणाचा भार कोरवांना उचलावा लागत आहे, त्या भीष्माला योध्दा कसे म्हणावे ? तो कसला योध्दा ? पण येथे भीष्म म्हणजे भ्रम, विपरीत ज्ञान, संदेह भ्रांती. भीष्म म्हणजे हाडामांसाचा योद्धा नव्हे. म्हणून भीष्म म्हणजे भ्रम-भ्रांती जोपर्यत टिकून आहे, तोपर्यंत विजातीय म्हणजे दुष्ट प्रवृत्ती अजिंक्य आहेत, अजेय आहेत. अर्थात ‘ अजेय ‘ म्हणजे ज्याला जिंकताच येत नाही. असा नव्हे तर अजेय म्हणजे दुर्जय, म्हणजेच कष्टाने ज्याला जिंकता येते असा.
महा अजय संसार रिपु, जीति सकडइ सो बीर।। ( रामचरितमानस, ६/८० क)
जेव्हा भ्रम किंवा भ्रांती नाहीशी होते तेव्हा अज्ञान संपूर्णपणे नष्ट होते. ते अस्तित्वहीन बनते. आणि आंशिकरूपाने उरलेले मोह वगैरे रिपूही शीघ्र नाहीसे होतात. भीष्माची इच्छा होती इच्छामरण ! पण इच्छा म्हणजेच भ्रांती. इच्छेचा अंत व भ्रम नष्ट होणे या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ही गोष्ट संत कबीराने अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहे.
इच्छा काया इच्छा माया, इच्छा जग उपजाया।
कह कबीर जे इच्छा विवर्जित, ताका पार न पाया।।
जेथे भ्रम-भ्रांती नसते, तो अमर्याद व अव्यक्त असतो. हे शरीर निर्माण होण्याचे कारणही इच्छा हेच आहे. इच्छा म्हणजेच माया आहे आणि इच्छा हीच जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे. ( ‘ सोहकामयत् तदैक्षत बहुस्यां प्रजायेय इति ‘ छान्दोग्य ६/२//३ ). कबीर म्हणतात, जे संपूर्णत: निरिच्छ आहेत, ‘तिनका पार न पाया’ – ते अपार, अनंत व असीम अशा परमात्म स्वरूपात प्रवेश मिळवू शकतात. ( ‘ यो$कामो निष्काम आप्तकाम आत्मकामो न तस्य प्राणा उत्क्रामन्ति ब्रहौव सन् ब्रह्माप्येति । ‘ ( बृहदारण्यक ४/४/६ ) जे ‘कामनारहित आहेत, जे आत्म्यामध्ये स्थिर म्हणजे आत्मस्वरूप बनले आहेत, त्यांचे कधीच पतन होत नाही. ते ब्रह्माशी एकरूप होऊन जातात.
सुरुवातीला इच्छा अनंत असतात. पण अनंत-अपार अशा परमेश्वर प्राप्तीची इच्छा मात्र बाकी असते. परंतु जेव्हा परमेश्वरप्राप्तीची इच्छाही पूर्ण होते, तेव्हा इच्छाही शिल्लक राहत नाही. जर यापेक्षाही मोठी किंवा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तू असती तर तुम्ही तिच्या प्राप्तीची इच्छा नक्की ठेवली असती. जर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अशी दुसरी कोणती वस्तूच नाही तर मग कशाची इच्छा करणार? जेव्हा प्राप्त होण्यासारखी वस्तूच शिल्लक रहात नाही, तेव्हा इच्छेचे तेथून समूळ उच्चाटण होते आणि इच्छा नष्ट होताच भ्रांतीही समूळ नष्ट होते. हेच भीष्माचे इच्छामरण आहे. म्हणून दुर्योधन म्हणतो की, भीष्माकडून रक्षित असणारी आमची सेना अजेय आहे. सारांश – जोपर्यंत भ्रांती असते तोपर्यंत अज्ञानाचे – अविद्येचे वास्तव्य असते. भ्रांती नष्ट होताच अज्ञानही नाहीसे होते.
भीम म्हणजे भावरूप आहे. त्याच्याकडून रक्षण केली गेलेली पांडवांची सेना जिंकण्यास सुलभ आहे. ‘ भावे विद्यते देव:’ – अविदित परमेश्वराला विदित – ज्ञात करण्याचे सामर्थ्य – क्षमता भावामध्ये आहे. ‘ भाव वस्य, भगवान, सुख निधान करूना अयन ‘ ( रा. मानस ७/९२ ख ), श्रीकृष्णाने या भावालाच श्रद्धा म्हटले आहे. या श्रद्धेमध्ये परमेश्वराला वश करण्याचे सामर्थ्य असते. या भावातून, श्रद्धेतूनच संपूर्ण पुण्यमय प्रवृत्तीचा विकास होतो. हा भावच पुण्याचे संरक्षण करतो. ही श्रद्धा, हा भाव इतका सामर्थ्यवान आहे की, परमदेव परमात्म्याला तो जन्म घ्यायलाही भाग पाडतो. परंतु त्याबरोबरच हा भाव इतका नाजूक असतो की, आज भाव आहे तर उद्या त्याचे अभावात परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. कारण इच्छिलेल्या म्हणजे इष्ट गोष्टीत थोडी जरी त्रुटी जाणवली की भाव-श्रद्धा डळमळू लागते, पुण्यमय सात्विक प्रवृत्ती विचलित होते व ‘ इृष्ट’ शी संबंध दुरावला जातो. व म्हणून भीमाकडून रक्षण केली जाणारी पांडवांची सेना जिंकणे सोपे आहे. महर्षि पंतजलींचेही हेच म्हणणे आहे – ‘स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारासेविंतो दृढभूमिः'( १/१४ ) दीर्घकालपर्यंत निरन्तर श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेली गोष्टच दृढ-भक्कम होऊ शकते.
मूळ श्लोक –
तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥ १-१२॥
संदर्भित अन्वयार्थ –
तस्य = त्या(दुर्योधना)चा(च्या हृदयात), हर्षम् = आनंद, सञ्जनयन् = निर्माण करीत, कुरुवृद्धः = कौरवातील वृद्ध, प्रतापवान् = महापराक्रमी(अशा), पितामहः = पितामह भीष्मांनी, उच्चैः = मोठ्या सुरात, सिंहनादम् = सिंहाच्या आरोळीप्रमाणे, विनद्य = गर्जना करून, शङ्खम् = शंख, दध्मौ = वाजविला ॥ १-१२ ॥
अर्थ –
कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. ॥ १-१२ ॥
अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या शक्तीप्रमाणे शंख फुंकले. हा शंखध्वनी म्हणजे त्या त्या वीरांनी आपल्या शक्तीप्रमाणे केलेली पराक्रमाची घोषणा होती. कुरुवंशातील महान पराक्रमी पितामह भीष्मांनी दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणू सिंह गर्जनेप्रमाणे मोठया जोराने आपला शंख फुंकला. हा ध्वनी फार भयावह होता. सिंह म्हणजे भयाचेच प्रतीक; निबीड जंगलात एकांत स्थळी या सिंहाची गर्जना आपल्या कानावर पडली; तर सिंह आपल्यापासून कितीतरी मैल लांब असला तरी भीतीने आपल्या हृदयाचा थरकाप होतो व भयाने शरीरावर सरसरून काटा उभा राहतो, शरीर भीतीने कापू लागते. आपली अशी दशा होण्याचे कारण काय? कारण सिंहाविषयीचे भय आपल्या मनात दडून बसलेले असते.
म्हणजे हे भय आपल्या प्रकृतीमध्ये असते, परमात्म्याच्या ठिकाणी नसते. कारण परमात्मा म्हणजे निर्भयतेचे साप्राज्य! जर भ्रमरूपी भीष्माचार्य विजयी होणार असतील तर आपण ज्या मायारूपी जंगलात भरकटत आहोत ते जास्तच भरकटले जाऊन भयाची मात्रा वाढेल, भयाचे काळोखी आवरण अधिक दाट होईल, भयाची तीव्रता वाढेल. भयाचा अंध:कार मनात अधिक दाटेल, भय भयाशिवाय आपल्याला दुसरे काही देऊ शकत नाही. तेव्हा या प्रकृतीपासून निवृत्त होणे हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे. ही माया ( प्रकृती ) म्हणजे घोर अंध:काराची पडछाया आहे. कौरव म्हणजे या मायेचे प्रतीक ! ते भयाशिवाय दुसरे काही देऊ शकणार नाहीत. त्यामुळे कौरवांच्या सैन्यात सर्व रणधुरंधरांची रणवाद्ये
एकदम वाजली तरी भयाशिवाय दुसरे काहीही उत्पन्न झाले नाही. लक्षात ठेवा की प्रत्येक विकाराच्या मुळाशी काही ना काही भय असतेच ! म्हणून त्यांनी आपली रणवाद्ये जोरजोराने फुंकून घोषणा केली.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ३.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.