श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३३

By Bhampak Articles 10 Min Read
श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३३ –

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र.३.९ ते ३.१२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३३.

मूळ श्लोक –

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यज्ञार्थात्‌ = यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या, कर्मणः = कर्मांव्यतिरिक्त, अन्यत्र = दुसऱ्या कर्मांमध्ये (गुंतलेला), अयम्‌ = हा, लोकः = मनुष्यांचा समुदाय, कर्मबन्धनः = कर्मांनी बांधला जातो, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (त्वम्‌) = तू, मुक्तसङ्गः = आसक्तिरहित होऊन म्हणजे फळाची अपेक्षा सोडून, तदर्थम्‌ = त्या यज्ञासाठी, कर्म समाचर = कर्तव्यकर्म चांगल्याप्रकारे कर ॥ ३-९ ॥

अर्थ –

हे अर्जुना, यज्ञाची प्रक्रिया म्हणजे कर्म आहे.ज्यामुळे यज्ञ पूर्ण होतो ती क्रिया म्हणजे कर्म होय. हे तर सिद्ध आहे की, कर्म एक निर्धारित प्रक्रिया आहे. मग या व्यतिरिक्त जे कर्म असते ते कर्म नव्हे का? श्रीकृष्ण म्हणतात- नाही, ते कर्म नव्हे. ‘ अन्यत्र लोकोयं कर्मबन्थन:’ या कर्माच्या व्यतिरिक्त जगात जे काही केले जाते, ज्यामध्ये सारे जग रात्रंदिवस व्यस्त असते, ते कर्म म्हणजे या लोकीचे बंधन आहे, ते कर्म नव्हे. कर्म ते असते ‘मोक्ष्यसेशुभात्‌’ जे अशुभ अर्थात संसारबंधनातून मुक्त करते. फक्त यज्ञाची प्रक्रिया म्हणजे कर्म होय. व म्हणून हे अर्जुना, त्या यज्ञाच्या पूर्तीसाठी संगदोषापासून अलग-दूर राहून चांगल्या प्रकारे कर्माचे आचरण कर, संगदोषापासून दूर राहिल्याशिवाय म्हणजेच अनासक्त झाल्याशिवाय हे कर्म होतच नाही.

आता यज्ञाची प्रक्रिया म्हणजे कर्म होय हे समजले. परंतु येथे पुन्हा ‘एक नवीन प्रश्न निर्माण झाला की, हा यज्ञ म्हणजे काय? तेव्हा श्रीकृष्णांनी प्रथम यज्ञ म्हणजे काय हे न सांगता हा यज्ञ येतो कोठून? तो देतो काय? त्याची विशेषता काय आहे यावर प्रकाश टाकला आहे व चौथ्या अध्यायात ज्या यज्ञाला आम्ही कार्यरूप देऊ व आमच्याकडून कर्म होऊ लागेल तो यज्ञ म्हणजे काय ते सांगितले आहे. योगेश्वर श्रीकृष्णांच्या शैलीवरून हे स्पष्ट होते की त्यांना ज्याचे चित्रण करावयाचे असते त्याची ते प्रथम विशेषता किंवा वैशिष्ट्ये सांगतात, ज्यामुळे त्या वस्तूविषयी मनात श्रद्धा निर्माण होईल. त्यानंतर त्याच्या बाबतीत घ्याव्या लागणार्‍या दक्षतेबद्दल सांगतात. आणि शेवटी मुख्य सिद्धांत प्रतिपादन करतात.

इथे लक्षात ठेवावे की, या ठिकाणी श्रीकृष्णाने कर्माच्या दुसऱया अंगावर प्रकाश टाकून सांगितले आहे की, कर्म एक निर्धारित क्रिया आहे. जे काही केले जाते ते सर्व कर्म नसते.

दुसऱ्या अध्यायात प्रथमच कर्माचा उच्चार केला. कर्माच्या वैशिष्ट्यांवर भर दिला. त्याच्या बाबतीत घ्यावयाच्या दक्षतेवर प्रकाश टाकला. परंतु त्यांनी तेथे कर्म म्हणजे काय ते मात्र सांगितले नाही. येथे तिसऱया अध्यायात त्यांनी सांगितले की कोणीही काम केल्याशिवाय राहत नाहीत. प्रकृतीच्या गुणांनी विवश होऊन मनुष्य कर्म करीत असतो. तथापि जे लोक इंद्रियांचा हट्टाने निग्रह करून मनामध्ये मात्र विषयांचे चिंतन करतात ते लोक दांभिक आहेत. ढोंगी आहेत यासाठी हे अर्जुना, मनाने तू इंद्रियांना आवर घालून मग तू कर्म कर. परंतु मूळ प्रश्न जसाच्या तसाच राहिला की, कर्म खरे पण कोणते कर्म करावे? यावर योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले की निर्धारित केलेले कर्म कर.

आता पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की निर्धारित कर्म म्हणजे काय? तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की यज्ञाला कार्यरूप देणे म्हणजे कर्म होय. आता प्रश्न निर्माण होतो की तो यज्ञ तरी काय आहे? या अध्यायात यज्ञाची उत्पत्ती, वैशिष्ट्ये सांगून गप्प राहतील व पुढे चौथ्या अध्यायात यज्ञाचे स्पष्ट झालेले निखळ स्वरूप प्राप्त होईल की जे करणे म्हणजे कर्म होय.

कर्माची ही परिभाषा म्हणजे गीतेला समजून घेण्याची चावी आहे, मेख आहे. यज्ञाच्या व्यतिरिक्त जगात लोक काही ना काही करीत असतात. कोणी शेती करत असतात, तर कोणी व्यापार! कोणी अधिकारी आहेत, तर कोणी सेवक! कोणी स्वतःला बुद्धिजीवी समजतात तर कोणी श्रमजीवी!

कोणी समाजसेवेला कर्म समजतात, तर कोणी देशसेवेला कर्म समजतात आणि या कर्मामध्ये लोक सकाम आणि निष्काम कर्माची भूमिका पण बजावतात. परंतु श्रीकृष्ण म्हणतात की, हे कर्म नाही. ‘ अन्यत्र लोकोयं कर्मबन्यन: ‘ यज्ञाच्या प्रक्रियेशिवाय दुसरे कोणतेही केले गेलेले कर्म हे या लोकांचे बंधनकारक कर्म आहे. मोक्ष देणारे कर्म नव्हे. वास्तविक यज्ञाची प्रक्रिया हेच कर्म होय. आता यज्ञ म्हणजे काय ते सांगताना यज्ञ कोठून आला ते सांगत आहेत-

मूळ श्लोक –

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ ३-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पुरा = कल्पाच्या पूर्वी, सहयज्ञाः = यज्ञाच्या बरोबर, प्रजाः = प्रजा, सृष्ट्वा = निर्माण करून, प्रजापतिः = प्रजापती ब्रह्मदेव, उवाच = (त्यांना) म्हणाले, (यूयम्‌) = तुम्ही लोक, अनेन = या यज्ञाच्या द्वारे, प्रसविष्यध्वम्‌ = उत्कर्ष प्राप्त करून घ्या, (च) = आणि, एषः = हा यज्ञ, वः = तुम्हा लोकांचे, इष्टकामधुक्‌ = इष्ट भोग देणारा, अस्तु = होवो ॥ ३-१० ॥

अर्थ –

प्रजापति ब्रह्मदेवाने कल्पाच्या पूर्वी यज्ञासहित प्रजा निर्माण करून सांगितले की या यज्ञाद्वारा बुद्धी प्राप्त होवो. हा यज्ञ तुम्हा लोकांना ‘इृष्टकामधुक्‌’ अनिष्टकारक न होवो. विनाशरहित इष्ट संबंधी कामनांची पूर्ती करणारा होवो.

यज्ञासहित प्रजेची रचना कोणी केली? प्रजापति ब्रह्माने? ब्रह्मा कोण? चार तोंडे, आठ डोळे असणारी प्रचलित देवता म्हणजे ब्रह्मा आहे का? नाही, श्रीकृष्णाच्या मताप्रमाणे देवता नावाची कोणती अलग सत्ताच अस्तित्वात नाही. मग प्रजापति कोण? वास्तविक ज्याने प्रजापतिचा मूळ उगम म्हणजे परमात्म्यामध्ये प्रवेश मिळविला आहे तो महापुरूष म्हणजे प्रजापती आहे. बुद्धीच ब्रह्म आहे. ‘ अहंकार शिव, बुद्धी, अज, मन शशि चित्त महान।’ ( रामचरितमानस ) ज्यावेळी बुद्धी यंत्राप्रमाणे असते, त्यावेळी त्या महापुरुषाच्या वाणीमधून परमात्माच बोलत असतो.

भजनाची वास्तविक क्रिया प्रारंभ झाल्यावर बुद्धीची उत्तरोत्तर उन्नती होते. सुरुवातीला ती बुद्धी ब्रह्मविद्येला जोडलेली असल्यामुळे ‘ ब्रह्मवित्‌’ म्हंटली जाते. क्रमाक्रमाने विकारांचे शमन झाल्यावर ब्रह्मविद्येत श्रेष्ठ झाल्यावर हिला ‘ ब्रह्मविद्वर ‘ म्हंटले जाते. उत्थान आणि सूक्ष्म झाल्यावर बुद्धी विकसित होते, तेव्हा तिला ‘ ब्रह्मविद्वरीयान ‘ म्हंटले जाते. त्या अवस्थेमध्ये ब्रह्मविद्धेत्ता ब्रह्मज्ञानी पुरुष दुसऱ्यांनाही उच्च मार्गावर आणण्याचा अधिकार मिळवतो.

बुद्धीची अत्युच्च स्थिती आहे-ब्रह्मविद्दरिष्ठ! अर्थात ब्रह्म जाणणार्‍याची. ती अवस्था जिच्यात दृष्ट प्रवाहित आहे अशी असते. या प्रकारे परमात्मस्वरूपी स्थित महापुरुषांनी भजनाच्या प्रारंभी यज्ञासहित संस्कारांना सुसंघटित करून सांगितले की, या यज्ञाने तुमची भरभराट होवो; तुम्हाला समृद्धी प्राप्त होतो. कसली समृद्धी? काय कच्ची घरे पक्की बनून जातील? आर्थिक प्राप्ती अधिक होईल? नाही यज्ञ ‘इष्टकामधुक्‌” इष्ट म्हणजे भगवंतासंबंधीची कामना तृप्त करेल. यज्ञ परमात्म्यासंबंधीची कामना तृप्त करणारा आहे. मग सहजच प्रश्न येतो की यज्ञ सरळ सरळ भगवंताची प्राप्ती करून देईल की क्रमाक्रमाने?

मूळ श्लोक –

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ३-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अनेन = या यज्ञाच्या द्वारे, देवान्‌ = देवतांना, भावयत = तुम्ही उन्नत करा, (च) = आणि, ते देवाः = त्या देवता, वः = तुम्हा लोकांना, भावयन्तु = उन्नत करोत, (एवम्‌) = अशाप्रकारे निःस्वार्थ भावनेने, परस्परम्‌ = एकमेकांना, भावयन्तः = उन्नत करीत, परम्‌ = परम, श्रेयः = कल्याण, अवाप्स्यथ = तुम्ही प्राप्त करून घ्याल ॥ ३-११ ॥

अर्थ

या यज्ञाचे द्वारे देवतांची उन्नती करा. अर्थात दैवी संपत्तीची उन्नती करा. त्या देवता तुमची उन्नती करतील. या प्रकारे परस्परांची वृद्धी करीत करीत परमश्रेय- की ज्यानंतर काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही अशा परम कल्याणाची प्राप्ती तुम्हाला होईल. जसजसे तुम्ही यज्ञात प्रवेश कराल ( पुढे यज्ञाचा अर्थ होईल-आराधनेचा विधी ) तसतसे हृयप्रदेशात दैवी संपत्ती वाढत राहील. ”परमदेव ” म्हणजे एकमात्र परमात्मा आहे, त्या परमदेवात प्रवेश देणारी जी संपदा आहे, अंत:करणाची जी सजातीय प्रवृत्ती आहे तिलाच ”दैवी संपदा ” असे म्हणतात. ती परमदेवाची प्राप्ती करून देणारी असल्यानेच तिला ‘ दैवी संपदा ” म्हंटले जाते. लोक कल्पना करतात तशा बाहेरील देवता म्हणजे पत्थर-पाणी नव्हे. श्रीकृष्णांच्या मते अशा वस्तूंचे अस्तित्वच नाही.

मूळ श्लोक –

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ३-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यज्ञभाविताः = यज्ञाने पुष्ट झालेल्या, देवाः = देवता, वः = तुम्हा लोकांना (न मागता), इष्टान्‌ = इष्ट, भोगान्‌ = भोग, हि दास्यन्ते = निश्चितपणे देत राहातील (अशाप्रकारे), तैः = त्या देवतांनी, दत्तान्‌ = दिलेले भोग, यः = जो मनुष्य, एभ्यः = त्यांना, अप्रदाय = न देता (स्वतःच), भुङ्क्ते = भोगतो, सः = तो, स्तेनः एव = चोरच आहे ॥ ३-१२ ॥

अर्थ –

यज्ञाद्वारे संवर्धित झालेली देवता ( दैवी संपदा ) आपल्याला ‘इृष्टान्‌ भोगान्‌ हि दास्यन्ते- इष्ट अर्थात आराध्यासंबंधी भोग देते. दुसरे काही नाही. ‘वै: दत्तान’ ते एकमात्र देणारे आहेत. परमात्माप्राप्तीसाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. या दैवी गुणांची वृद्धी न करता जो या स्थितीचा भोग घेतो तो निश्चितच चोर आहे. जे त्यांच्याकडून प्राप्त केलेले नाही ते भोगणार कसे? परंतु हे दांभिक लोक स्वत:ला पूर्ण समजतात, तत्त्वदर्शी समजतात. खरोखर असा बढाया मारणारा या मार्गाला जाण्यास मुळीच योग्य नाही. तो निश्चतपणे चोरच आहे. भगवतृप्राप्ती करून घेणारा तो उत्तम साधक नव्हे परंतु मिळवणारे काय मिळवतात?

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३३.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment