श्रीमद् भगवद् गीता भाग ३५ –
अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.१७ ते ३.२० | श्रीमद् भगवद् गीता भाग ३५.
मूळ श्लोक –
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तु = परंतु, यः = जो, मानवः = मनुष्य, आत्मरतिः एव = आत्म्यामध्येच रमणारा, च = आणि, आत्मतृप्तः = आत्म्यामध्येच तृप्त, च = तसेच, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, सन्तुष्टः = संतुष्ट, स्यात् = असतो, तस्य = त्याच्यासाठी, कार्यम् = कोणतेही कर्तव्य, न विद्यते = नसते ॥ ३-१७ ॥
अर्थ –
जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रत असतो, जो आत्मतृप्त असतो व आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट असतो, अशा साधकासाठी काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. हेच तर लक्ष्य होते. जेव्हा अव्यक्त सनातन, अविनाशी, आत्मतत्त्व प्राप्त झाले, तेव्हा पुढे शोधायचे कोणाला? अशा पुरुषासाठी ना कर्माची आवश्यकता आहे ना कसली आराधनेची. आत्मा आणि परमात्मा हे ‘एकदुसऱयांचे पर्याय आहेत. याचेच पुन्हा ते चित्रण करत आहे.
मूळ श्लोक –
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तस्य = त्या महामनुष्याचे, इह = या विश्वामध्ये, कृतेन = कर्म करण्यात, कश्चन = कोणतेही, अर्थः न = प्रयोजन असत नाही, (च) = तसेच, अकृतेन एव च = कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही, च = तसेच, सर्वभूतेषु = संपूर्ण प्राणिमात्रात सुद्धा, अस्य = याचा, कश्चित् = किंचितही, अर्थव्यपाश्रयः = स्वार्थाचा संबंध, न = राहात नाही ॥ ३-१८ ॥
अर्थ –
या संसारात त्या पुरुषाने काही केल्याने त्याला काही लाभ होत नाही आणि करायचे सोडून दिल्याने त्याचे काही नुकसान होत नाही. त्याचा सर्व प्राण्यांमध्ये स्वार्थसंबंध असत नाही. आत्माच तर शाश्वत, सनातन, अव्यक्त, अपरिवर्ततशील आणि अक्षय आहे. जेव्हा त्यालाच प्राप्त केले, त्याच्यापासून संतुष्ट, त्याच्यात तृप्त, तसेच त्याच्यात ओतप्रत व स्थित झाल्यानंतर पुढे कोणतीही सत्ता नाही. मग शोधायचे कोणाला? व त्यामुळे मिळणार तरी काय? त्या पुरुषाने कर्म करण्याचे सोडून दिल्याने त्याचे काहीही नुकसान होत नाही कारण, विकार ज्याच्या अंकित असतात ते चित्तच रहात नाही. त्याला संपूर्ण भूतमात्रात, बाह्य जगत आणि आंतरिक संकल्यपांच्या पूर्तीमध्ये लेशमात्र अर्थ राहत नाही. त्याचा सर्वात मोठा अर्थ होता परमात्मा! जेव्हा तोच त्याला उपलब्ध, प्राप्त झाला आहे, तर दुसऱ्यांसाठी त्याचे काय प्रयोजन असणार?
मूळ श्लोक –
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तस्मात् = म्हणून, सततम् = निरंतरपणे, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कार्यम् कर्म = कर्तव्य कर्म, समाचर = नीटपणे तू करीत राहा, हि = कारण, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कर्म = कर्म, आचरन् = करणारा, पूरुषः = मनुष्य, परम् = परमात्म्याला, आप्नोति = प्राप्त करून घेतो ॥ ३-१९ ॥
अर्थ –
तेव्हा ह्या स्थितीला प्राप्त करण्यासाठी तू अनासक्त होऊन, कर्तव्य असे जे कर्म ते तू चांगल्या प्रकारे कर, कारण अनासक्त होऊन कर्माचे आचरण करणारा पुरुष मोक्षपद मिळवतो. परमात्म्याला प्राप्त करून घेतो. नियत् कर्म व कार्य कर्म एकच आहे. कर्माची प्रेरणा देताना ते म्हणतात-
मूळ श्लोक –
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३-२० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कर्मणा एव = (आसक्तिरहित) कर्माचरणाद्वारेच, जनकादयः = जनक इत्यादी ज्ञानीजन सुद्धा, संसिद्धिम् = परमसिद्धीला, आस्थिताः = प्राप्त झाले होते, हि = म्हणून, (तथा) = तसेच, लोकसङ्ग्रहम् = लोकसंग्रहाकडे, सम्पश्यन् अपि = दृष्टी ठेवून सुद्धा, कर्तुम् एव = कर्म करण्यासच, अर्हसि = तू योग्य आहेस म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित आहे ॥ ३-२० ॥
अर्थ –
जनक म्हणजे राजा जनक नव्हे. जन्मदात्याला जनक म्हणतात. योग म्हणजेच जनक होय. तो आपल्या स्वरूपाला जन्म देतो, प्रकटही करत असतो. योगाने युक्त असणारा प्रत्येक महापुरुष जनक असतो. असे योगयुक्त अनेक क्रषी ‘जनकादय:’ जनक इत्यादी ज्ञानीजन महापुरुषांनी पण ( कर्मणा एव संसिद्धिम’ ) कर्माच्या योगानेच परमसिद्धी प्राप्त केली आहे. परमसिद्धी म्हणजेच ‘परमतत्त्व, परमात्म्याची प्राप्ती. जनक इत्यादी पूर्वी जेवढे महर्षी झाले आहेत ते सर्व ‘कार्यम कर्म’ च्या योगानेच जे कर्म म्हणजे यज्ञाची प्रक्रिया आहे- ते कर्म करीत ‘सांसिद्धिम्’ परमसिद्धी प्राप्त करीत असतात. परंतु प्राप्तीनंतर लोकांसाठी समाजासाठी कर्म करीत राहतात. लाकहितासाठी ते कर्म करतात. तेव्हा तू देखील परमात्म्याच्या प्राप्तिसाठी व परमात्म्याच्या प्राप्तीनंतर लोकनायक होण्यासाठी कार्य करण्याला योग्य नाहिस का?
आताच श्रीकृष्णांनी सांगितले होते की प्राप्तीनंतर महापुरुषाने कर्म करण्याने ना काही लाभ किंवा न केल्याने ना काही नुकसान होत असते. परंतु लोकसंग्रहासाठी, लोकहिताच्या व्यवस्थेसाठी ते चांगल्या प्रकारे नियत कर्माचे आचरण करीत असतात.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ३५.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.