श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३६ –

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.२१ ते ३.२४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३६.

मूळ श्लोक –

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रेष्ठः = श्रेष्ठ मनुष्य, यत्‌ यत्‌ = जे जे, आचरति = आचरण करतो, इतरः जनः = अन्य लोकसुद्धा, तत्‌ तत्‌ एव = त्या त्या प्रमाणे (आचरण करतात), सः = तो, यत्‌ = ज्या गोष्टी, प्रमाणम्‌ = प्रमाण (म्हणून मान्य), कुरुते = करतो, लोकः = सर्व मनुष्यसमुदाय, तत्‌ = त्यालाच, अनुवर्तते = अनुसरून वागतो ॥ ३-२१ ॥

अर्थ –

श्रेष्ठ पुरुष जे व जसे आचरण करतात, अन्य लोकदेखील त्यानुसारच आचरण करतात. तो महापुरुष जे काही ‘ प्रमाण ” आदर्श ‘ करून ठेवतो- संसार, हे जग, त्याप्रमाणे त्याचेच अनुकरण करते. श्रीकृष्णांनी प्रथमतः स्वरूपामध्ये स्थित, आत्मतृप्त महापुरुषाच्या राहणीवर प्रकाश टाकला की, त्याच्या कर्म करण्याने त्याला काही लाभ होत नसतो किंवा कर्म सोडल्याने त्याचे काही नुकसान होत असते. तरी देखील जनकादि महर्षी आपले कर्म उत्तम प्रकारे करीत होते. तेथे श्रीकृष्णांनी त्या महापुरुषांबरोबर आपली हळूच तुलना करून सांगितले आहे की मीही एक महापुरुष आहे.

मूळ श्लोक –

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्रिषु लोकेषु = तिन्ही लोकांत, मे = मला, किञ्चन कर्तव्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न अस्ति = नाही, च = तसेच, अवाप्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू, अनवाप्तम्‌ न = मिळालेली नाही असेही नाही, (तथापि) = तरीसुद्धा, कर्मणि एव = कर्मांचे आचरण, वर्ते = मी करीतच आहे ॥ ३-२२ ॥

अर्थ –

हे पार्था, या तिन्ही लोकांत मला कर्तव्य असे काहीही नाही. मागे त्यांनी सांगितले आहे की त्या महापुरुषाला समस्त प्राणिमात्रांशी कोणतेच कर्तव्य शेष राहिलेले नाही. येथे सांगतात की त्रैलोक्यात मला कर्तव्य शेष राहिलेले नाही. तसेच मला प्राप्त झाली नाही, अशी किंचितदेखील वस्तू शेष राहिलेले नाही. म्हणजे प्राप्त होण्यासारखी कोणतीही गोष्ट मला अप्राप्य राहिलेली नाही. तरी देखील मी कर्माचे उत्तम प्रकारे आचरण करीत असतो.

असे का बरे?

मूळ श्लोक –

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ३-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

हि = कारण, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदि = जर, जातु = कदाचित, अहम्‌ = मी, अतन्द्रितः = सावध राहून, कर्मणि = कर्मे, न वर्तेयम्‌ = केली नाहीत (तर मोठी हानी होईल, कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुकरण करतात ॥ ३-२३ ॥

अर्थ –

हे पार्था कारण जर मी सावध राहून कर्म केले नाही तर अन्य लोकदेखील माझ्या आचरणाप्रमाणे, त्यानुसार वागू लागतील. तर मग आपले अनुकरण करणे वाईट आहे का? श्रीकृष्ण म्हणतात- हो!

मूळ श्लोक

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ ३-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(अतः) = म्हणून, चेत्‌ = जर, अहम्‌ = मी, कर्म = कर्मे, न कुर्याम्‌ = केली नाहीत (तर), इमे = ही, लोकाः = सर्व माणसे, उत्सीदेयुः = नष्ट-भ्रष्ट होऊन जातील, च = आणि, सङ्करस्य = संकराचा, कर्ता = कर्ता, स्याम्‌ = मी होईन, (तथा) = तसेच, इमाः = या, प्रजाः = सर्व प्रजांचा, उपहन्याम्‌ = मी घात करणारा होईन ॥ ३-२४ ॥

अर्थ –

जर मी सावधान होऊन कर्म केले नाही तर सर्व लोक भ्रष्ट होऊन जातील व मी ‘संकरस्य’ वर्णसंकर करणारा होईन. तसेच या सर्व प्रजेचे हनन करणारा व मारणारा ठरेन. स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असणारा महापुरुष सावध होऊन जागृत राहून जर आपल्या आराधनेमध्ये-साधनाक्रमात व्यस्त राहिला नाही, तर समाज त्याचे अनुकरण करीत, त्याची नक्कल करीत, भ्रष्ट होऊन जाईल. महापुरुषाने तर आराधना पूर्ण करून नैष्कर्म्य स्थिती प्राप्त केलेली आहे. त्यामुळे त्याने कर्म केले नाही तर त्याचे नुकसान होणार नाही; परंतु समाजाने अद्याप आराधनेला प्रारंभच केला नाही. तेव्हा अशा या मागाहून येणाऱया लोकांच्या मार्गदर्शनासाठी महापुरुष कर्म करीत असतो.

मीसुद्धा म्हणूनच कर्म करीत असतो. अर्थात श्रीकृष्ण एक महापुरुष होते. वैकुंठातून आलेले कोणी विशेष ईश्वर नव्हे. त्यांनी सांगितले की, महापुरुष लोकसंग्रहासाठी कर्माचरण करीत असतात. मी देखील लोकसंग्रहासाठीच कर्म करीत असतो. जर कर्माचरण केले नाही तर लोकांचे पतन होईल. सर्वजण कर्म करण्याचे सोडून देतील.

मनुष्याचे मन मोठे चंचल असते. त्याला सर्व काही हवे असते, फक्त त्याला भजन नको असते. जर स्वरूप स्थित महापुरुषाने कर्म केले नाही तर साहजिकच मागून येणारे लोकदेखील लगेच कर्म करण्याचे सोडून देतील. त्यांना एक सबब मिळेल की, हे महापुरुष असूनसुद्धा भजन करीत नाहीत, उलट पान खातात, अत्तर लावतात, सामान्य गोष्टींवर बोलतात. तरी देखील त्यांना महापुरुष म्हटले जाते- असा विचार करून तेसुद्धा आराधनेपासून दूर होतात व मग त्यामुळे त्यांचे अध:पतन होते. श्रीकृष्ण म्हणतात जर मी कर्म केले नाही तर सर्व लोक-समाज भ्रष्ट होईल ब मी वर्णसंकरांचा कर्ता-निमित्त बनेन’.

स्त्रियांच्या दूषित होण्याने वर्णसंकर होतो असे पाहावयास मिळते- ऐकावयासही मिळते. अर्जुनाला सुद्धा हे भय होते की, स्त्रिया दूषित बनतील, तर वर्णसंकर निर्माण होईल. परंतु श्रीकृष्ण म्हणतात- जर मी सावधान राहून आराधना केली नाही, तर मी वर्णसंकराचा कर्ता ठरेन. वास्तविक आत्म्याचा शुद्ध वर्ण आहे परमात्मा. आपल्या शाश्वत स्वरूपाच्या मार्गावरून घसरणे म्हणजेच वर्णसंकरता होय. जर स्वरूपस्थित महापुरुष नियत कर्माचे योग्य प्रकारे आचरण न करेल, तर लोक त्याचे अनुकरण करून निष्क्रिय बनतील, आत्मपथावरून घसरतील, भरकटत जातील व त्यामुळे वर्णसंकर होईल, ती प्रकृतीमध्ये मिसळून जातील.

स्त्रियांचे स्त्रीत्व व शरीराची शुद्धी ही एक सामाजिक व्यवस्था आहे. समाजासाठी ते उपयुक्त पण आहे. परंतु माता-पित्यांच्या चुकांचा मुलांच्या साधनेवर काही प्रभाव पडत नाही. ‘ आपन करनी पार उतरनी’- हनुमान, व्यास, वसिष्ठ, नारद, शुकदेव इत्यादी उत्तम प्रकारचे महापुरुष जगात होऊन गेले; परंतु सामाजिक कुलीनतेशी त्यांचा काही एक संबंध नाही. आत्मा आपल्या पूर्वजन्मातील गुणधर्म घेऊन येत असतो.

श्रीकृष्ण म्हणतात- “मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। ‘ ( १५/७ )- मनासह इंद्रियांकडून जे कार्य या जन्मात होते त्यांचे संस्कार घेऊन जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. यात जन्मदात्याचा काय वाटा? काय भाग? त्यांच्या विकासात काही अंतर राहिले नाही. तेव्हा स्त्रिया दूषित किंवा भ्रष्ट होण्याने वर्णसंकर होत नाही. स्त्रियांचे भ्रष्ट होणे व वर्णसंकर यांचा काही एक संबंध नाही. शुद्ध स्वरूपाकडे न जाता प्रकृतीमध्येच मिसळले जाणे, विखुरले जाणे म्हणजेच वर्णसंकर होय.

जर महापुरुष सावधान होऊन नियत कर्माचे आचरण करीत लोकांकडून तसे कर्म करून न घेतील तर, तो प्रजेचे हनन करणारा व मारणारा ठरेल. साधना क्रमानुसार चालून मूळ अविनाशी तत्त्वाची प्राप्ती हेच जीवन आहे; व प्रकृतीमध्ये विखुरले जाणे, हरवून बसणे हा मृत्यू आहे. परंतु त्या महापुरुषाने जर या सर्व प्रजेला मार्गभ्रष्ट होण्यापासून रोखून सत्पथावर आणले नाही तर त्या सर्व प्रजेचे हनन करणारा, हत्या करणारा व हिंसक ठरेल व क्रमशः चालत असताना जो चालवून घेतो ती शुद्ध अहिंसा आहे. गीतेच्या प्रमाणे शरीराचे निधन, नश्वर कलेवरांचे निधन हे फक्त परिवर्तन आहे, हिंसा नाही.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३६.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment