श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३७ –

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.२५ ते ३.२८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३७.

मूळ श्लोक

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भारता (भरतवंशी अर्जुना), कर्मणि = कर्मांमध्ये, सक्ताः = आसक्त असणारे, अविद्वांसः = अज्ञानी लोक, यथा = ज्याप्रमाणे, (कर्म) = कर्मे, कुर्वन्ति = करतात, तथा = त्याचप्रमाणे, असक्तः = आसक्तिरहित (अशा), विद्वान्‌ = विद्वानाने सुद्धा, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रह, चिकीर्षुः = करण्याच्या इच्छेने, (कर्म) = कर्मे, कुर्यात = करावीत ॥ ३-२५ ॥

अर्थ

हे भारता, ज्याप्रमाणे कर्मामध्ये आसक्त झालेले अज्ञानी लोक जसे कर्म करतात, तसेच लोकांच्या कल्याणाची इच्छा करणार्‍या अनासक्त झालेल्या विद्वानाने आपले कर्म करावे. ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष जाणणे. जोपर्यंत परमात्म्यापासून आम्ही लेशमात्र अलग आहोत, आराध्य अलग आहे तोपर्यंत अज्ञान शिल्लक असते आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्मामध्ये आसक्ती राहते. अज्ञानी जितक्या आसक्तीने आराधना करतो त्याच प्रकारे अनासक्त! ज्याला कर्माशी काही प्रयोजन नाही त्याला आसक्ती कशी होईल? अशा पूर्ण ज्ञानी महापुरुषाने पण लोकहितासाठी कर्म करावे, दैवी संपत्तीची वृद्धी-उत्कर्ष करावा की ज्यामुळे समाज त्यांचे अनुकरण करेल.

मूळ श्लोक

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ ।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ ३-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

युक्तः = परमात्म्याच्या स्वरूपात अढळपणे स्थित असणाऱ्या, विद्वान्‌ = ज्ञानी मनुष्याने, कर्मसङ्गिनाम्‌ = शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ती असणाऱ्या, अज्ञानाम्‌ = अज्ञानी मनुष्यांचा, बुद्धिभेदम्‌ = बुद्धिभ्रम म्हणजेच कर्मांमध्ये अश्रद्धा, न जनयेत्‌ = उत्पन्न करू नये (या उलट), सर्वकर्माणि = शास्त्रविहित सर्व कर्मे, समाचरन्‌ = नीटपणे (स्वतःच) आचरण करावीत (तशीच त्यांच्याकडूनही कर्मे), जोषयेत्‌ = करवून घ्यावीत ॥ ३-२६ ॥

अर्थ

ज्ञानी पुरुषांनी कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. अर्थात, स्वरूपस्थित महापुरुषाने हे लक्षात ठेवावे की, त्यांच्या कोणत्याही आचरणाने पाठीमागून येणाऱ्यांच्या मनात कर्माबद्दल अश्रद्धा उत्पन्न होणार नाही. परमात्म-तत्त्वाने युक्त असणाऱ्या महापुरुषाने स्वतः चांगल्या प्रकारे नियत कर्म करावे व त्यांच्याकडूनही करवून घ्यावे.

या कारणामुळेच पूज्य महाराजश्री पण वृद्धावस्थेमध्ये रात्री दोन वाजता उठून बसत. खोकायला लागत. तीन वाजता सर्वांना हाक मारून म्हणत, “उठा, मातीच्या पुतळ्यांनो, उठून चिंतनाला लागा. ” सर्वजण उठून चिंतनात मग्न झाले की पुन्हा थोडे पडत, थोड्या वेळाने पुन्हा उठून बसत व म्हणत- “तुम्हा लोकांना असे वाटत असेल की, महाराज झोपले आहेत; परंतु मी झोपलेलो नाही. मी श्वास घेत आहे. वृद्धावस्थेतील शरीर आहे. बसायला त्रास होत असतो. त्यामुळे मी पडून राहतो. परंतु तुम्ही मात्र स्थिर आणि सरळ बसून चिंतन करावे. जोपर्यंत तेलाच्या धारेप्रमाणे श्वासाची लय लागत नाही, क्रम तुटत नाही, अन्य संकल्प मध्ये मध्ये कोणतेही व्यवधान उत्पन्न करू शकत नाही, तोपर्यंत सतत चिंतनात राहणे हा साधकाचा धर्म आहे.

माझा श्वास तर ह्या अवस्थेतही बासरीप्रमाणे स्थिर उभा आहे’ ‘ हेच कारण आहे की अनुयायांकडून करवून घेण्यासाठी तो महापुरुष चांगल्या प्रकारे आचरण करतो. ‘“जिस गुन को सिखावै, उसे करके दिखावै।”

या प्रकारे स्वरूपात स्थित महापुरुषांनी स्वतः: कर्म करीत करीत साधकानांही आराधनेसाठी उद्युक्त करावे. साधकाने पण श्रद्धापूर्वक आराधना करावी. परंतु तो ज्ञानयोगी असो अगर समर्पणाचा भाव असणारा निष्काम कर्मयोगी असो, साधकात साधनेचा अहंकार असता कामा नये. कर्म कशाच्या द्वारे होते? ते होण्यासाठी कोण कारणीभूत आहे? यावर प्रकाश टाकताना श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्माणि = सर्व कर्मे (खरे पाहाता), सर्वशः = सर्व प्रकारांनी, प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणैः = गुणांच्या द्वारे, क्रियमाणानि = केली जातात, (तथापि) = तरीसुद्धा, अहङ्कारविमूढात्मा = अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य, अहम्‌ कर्ता = मी कर्ता आहे, इति = असे, मन्यते = मानतो ॥ ३-२७ ॥

अर्थ

आरंभापासून पूर्तीपर्यंत सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांनी केली जातात. तरीही अहंकारामुळे मोहित झालेला मूर्ख मनुष्य ‘मीच कर्ता आहे ‘ असे मानतो. पण हे कसे मानायचे की आराधना प्रकृतीच्या गुणांद्वारे होत असते? असे कोणी पाहिले? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ ३-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो(अर्जुना), गुणकर्मविभागयोः = गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी हा, गुणाः = सर्व गुण हेच, गुणेषु = गुणांमध्ये, वर्तन्ते = वावरतात, इति = असे, मत्वा = जाणून (त्यामध्ये), न सज्जते = अडकत नाही ॥ ३-२८ ॥

अर्थ

हे महाबाहो, गुण आणि कर्म यांच्या विभागाचे तत्त्व ‘ तत्त्ववित्‌’ परमतत्त्व परमात्म्याला जाणणाऱ्या महापुरुषांनी पाहिले. सर्व गुण म्हणजेच इंद्रिये गुणांच्या ( विषयांच्या ) ठिकाणी प्रवृत्त होतात असे मानून ते गुण आणि कर्म

यांच्या कर्तेपणात ते आसक्त होत नाहीत. येथे तत्त्व म्हणजे परमतत्त्व परमात्मा असा अर्थ आहे. पांच किंवा पंचवीस तत्त्वे असे अनेक लोक समजतात, तसे नाही. योगेश्वर श्रीकृष्णांच्या शब्दांत तत्त्व म्हणजे एकमात्र परमतत्त्व परमात्मा आहे. अन्य कोणते तत्त्व अस्तित्त्वात नाही. गुणांच्या पलीकडे गेलेले परमतत्त्व परमात्म्यात स्थित असणारे महापुरुष गुणांनुसार कर्माचे विभाजन- कर्माची विभागणी पाहू शकतात. समजा तामसी गुण असेल तर त्याचे कार्य असते- आळस, निद्रा, प्रमाद कर्मामध्ये प्रवृत्त न होण्याचा स्वभाव! जर राजस गुणांचे प्राबल्य असेल तर आराधनेपासून मागे न हटण्याचा स्वभाव- शोर्य, स्वामीनिष्ठेने कर्म करणे, व सात्त्विक गुण कार्यरत असताना ध्यान, समाधी, अनुभव प्राप्त होणे, सातत्याने चिंतन करणे, स्वभावाने सरलता हे गुण असतात. गुण परिवर्तनशील असतात. गुणांना अनुरूप कर्माचा उत्कर्ष किंवा अध:पतन होत असते ही गोष्ट फक्त प्रत्यक्ष साक्षात्कारी ज्ञानीच पाहू शकतो. गुण आपले कार्य करून घेत असतात. अर्थात्‌ गुण गुणांच्या ठिकाणीच प्रवृत्त होत असतात. असे समजून तो प्रत्यक्ष द्रष्टा, कर्मामध्ये आसक्त होत नाही. परंतु जो गुणांच्या पलीकडे गेला नाही, जो अजून रस्त्यावरच आहे, त्याने तर कर्मात आसक्त राहायलाच हवे-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३७.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment