श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६ –

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. २२ ते २५

मूळ श्लोक –

यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२॥

संदर्भित अन्वयार्थ –

अस्मिन्‌ = या, रणसमुद्यमे = युद्धाच्या उद्योगात, कैः सह = (ज्या) कोणाकोणाबरोबर, मया = मला, योद्धव्यम्‌ = लढणे योग्य आहे, योद्धुकामान्‌ = (त्या) युद्ध करण्याच्या इच्छेने, अवस्थितान्‌ = रणांगणात सज्ज झालेल्या, एतान्‌ = या (शत्रुपक्षातील योद्ध्यां) ना, यावत्‌ अहम्‌ निरीक्षे = (मी) जोपर्यंत नीट पाहून घेत आहे (तोपर्यंत रथ उभा करा.) ॥ १-२२ ॥

अर्थ –

मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, मध्यभागी रथ उभा केल्यास कोणाकोणाला युद्ध करावयाची इच्छा आहे ते मला पाहता येईल. या महायुद्धात मला कोणाकोणाबरोबर युद्ध करावयाचे आहे तेही मला पाहता येईल.

मूळ श्लोक –

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

दुर्बुद्धेः = दुष्टबुद्धी अशा, धार्तराष्ट्रस्य = दुर्योधनाचे, युद्धे = युद्धात, प्रियचिकीर्षवः = हित करू इच्छिणारे, ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अत्र = या सैन्यात, समागताः = एकत्र आले आहेत (त्या), योत्स्यमानान्‌ = युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना, अहम्‌ = मी, अवेक्षे = पाहीन ॥ १-२३ ॥

अर्थ –

दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. धृतराष्ट्राच्या हटवादी पुत्राचे कल्याण इच्छिणारे कोण कोण राजे येथे लढायला आले आहेत ते मला पाहू दे. त्यासाठी हा रथ दोन सेन्यांच्या मध्यभागी उभा कर. दुर्योधन मोहाचे प्रतीक आहे. तेव्हा या मोहमयी प्रवृत्तीचे हित इच्छिणारे असे जे जे राजे येथे आहेत त्या सर्वांना पाहण्याची इच्छा आहे.

मूळ श्लोक –

सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, भारत = हे धृतराष्ट्र, गुडाकेशेन = अर्जुनाने, एवम्‌ = असे, उक्तः = म्हटले असता, हृषीकेशः = श्रीकृष्णांनी, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, भीष्मद्रोणप्रमुखतः = भीष्म व द्रोण यांच्या समोर, च = तसेच, सर्वेषाम्‌ = सर्व, महीक्षिताम्‌ = राजांच्या समोर, रथोत्तमम्‌ = उत्तम रथ, स्थापयित्वा = उभा करून, इति = असे, उवाच = म्हटले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), समवेतान्‌ = युद्धासाठी एकत्र जमलेल्या, एतान्‌ = या, कुरून्‌ = कौरवांना, पश्य = पाहा ॥ १-२४, १-२५ ॥

अर्थ –

संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा.

संजय म्हणाला – निद्राजयी अर्जुनाने असे म्हटल्यानंतर हृदयाचा स्वामी भगवान श्रीकृष्णानी दोन्ही सैन्यांमध्ये भीष्म, द्रोण आणि महीक्षिताम्‌ म्हणजे शरीररूपी पृथ्वीवर अधिकार गाजवणाऱ्या राजांच्या मध्ये आपला उत्तम रथ उभा केला. आणि ते म्हणाले, पार्था ! येथे जमलेल्या कौरवांना पहा. येथे उत्तम रथ म्हणजे सोन्या चांदीचा रथ असा अर्थ नाही. या जगाच्या परिभाषेत उत्तमता ही नश्वर शरीराच्या अनुकूलतेवरून किंवा प्रतिकूलतेवरून ठरत असते. ही परिभाषा अपूर्ण आहे. जर आमच्या आत्म्याची प्रकृतीला-स्वभावाला साथ असेल, जिथे कसलेही म्हणजे लेशमात्रही मालीन्य नसेल तेच उत्तम. उत्तम रथाचा अर्थ असा ध्वनित होतो.

|| ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ||

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ६.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment