श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७ –

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. २६ ते २९

मूळ श्लोक –

तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥
श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अथ = त्यानंतर, पार्थः = पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने), तत्र उभयोः अपि = त्या दोन्हीही, सेनयोः = सैन्यांमध्ये, स्थितान्‌ = उभे असलेले, पितॄन्‌ = काका, पितामहान्‌ = आजे, पणजे, आचार्यान्‌ = गुरू, मातुलान्‌ = मामे, भ्रातॄन्‌ = भाऊ, पुत्रान्‌ = मुलगे, पौत्रान्‌ = नातू, तथा = तसेच, सखीन्‌ = मित्र, श्वशुरान्‌ = सासरे, च = आणि, सुहृदः = सुहृद (यांना), एव = च, अपश्यत्‌ = पाहिले ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥

अर्थ –

यानंतर अचूक लक्ष्यवेध साधणाऱ्या आपल्या पार्थिव शरीराला रथ बनवणाऱ्या पार्थाने, दोन्ही पक्षांच्या सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, गुरु, मामे, भाऊ, पुत्र, नातू, मित्र तसेच त्याचे सासरे व हितचिंतक या सर्वांना पाहिले. म्हणजे दोन्ही सेनेत अर्जुनाला आपला परिवार, आपल्या मामाचा, सासरचा परिवार दिसला तसेच आपले मित्र व गुरुजन त्याला दिसले. हे सर्व मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य होते म्हणजे प्रचलित परिमाणा प्रमाणे साडेसहा अब्ज इतके सैन्य झाले. महाभारत परिमाणा प्रमाणे अठरा अक्षौहिणी म्हणजे अंदाजे चाळीस लाख इतके सैन्य झाले !

म्हणजे आजच्या संपूर्ण विश्वाच्या संख्येइतकी ही संख्या झाली. इतक्या लोकांसाठी कधी तरी अन्नसमस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. पण बिशेष म्हणजे एवढी प्रचंड संख्या फक्त अर्जुनाच्या परिवाराची होती. एवढा मोठा कधी कोणाचा परिवार असू शकतो का ? हे कधीच शक्‍य असणार नाही. हे हृदयरूपी देशाचे चित्रण होते.

मूळ श्लोक –

तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ॥ १-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अवस्थितान्‌ = उपस्थित असलेल्या, तान्‌ सर्वान्‌ बन्धून्‌ = त्या सर्व बंधूंना, समीक्ष्य = पाहून, परया = आत्यंतिक, कृपया = करुणेने, आविष्टः = परवश झालेला, सः = तो, कौन्तेयः = कुन्तीपुत्र अर्जुन, विषीदन्‌ = शोक करीत, इदम्‌ = हे(वचन), अब्रवीत्‌ = बोलला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥

अर्थ –

तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध)

जेव्हा कुन्तीपुत्र अर्जुनाने त्या सार्‍या बांधवांना स्वजनांना पाहिले तेव्हा करूणेने अत्यंत व्याकुळ होऊन शोक करू लागला. कारण हा सगळा आपलाच परिवार आहे. त्यांना मारून टाकण्याच्या कल्पनेने तो अत्यंत व्याकूळ झाला व म्हणाला,

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, युयुत्सुम्‌ = युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम्‌ = रणांगणावर उपस्थित असणाऱ्या, इमम्‌ स्वजनम्‌ = या स्वजन समुदायाला, दृष्ट्वा = पाहिल्यावर, मम = माझे, गात्राणि = अवयव, सीदन्ति = गळून जात आहेत, च = आणि, मुखम्‌ = तोंड, परिशुष्यति = कोरडे पडत आहे, च = तसेच, मे = माझ्या, शरीरे = शरीरांच्या ठिकाणी, वेपुथः = कंप, च = व, रोमहर्षः = रोमांच, जायते = निर्माण झाले आहेत ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥

अर्थ –

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥

क्रमश – श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ७.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment