श्रीमद् भगवद् गीता भाग ८ –
श्रीमद् भगवद् गीता भाग ८ | अध्याय १ – अर्जुनविषादयोग – श्लोक क्र. ३० ते ३३
मूळ श्लोक –
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥🐚
संदर्भित अन्वयार्थ –
हस्तात् = हातातून, गाण्डीवम् = गांडीव धनुष्य, स्रंसते = गळून पडत आहे, च = व, त्वक् = त्वचा, एव = सुद्धा, परिदह्यते = फार जळजळत आहे, च = तसेच, मे = माझे, मनः = मन, भ्रमति इव = भरकटल्यासारखे होत आहे, (अतः) = त्यामुळे मी, अवस्थातुम् = उभा राहाण्यास, च = सुद्धा, न शक्नोमि = समर्थ नाही ॥ १-३० ॥
अर्थ –
माझे गाण्डीव धनुष्य माझ्या हातातून गळू लागले आहे. शरीराचा फार दाह होत आहे. एवढा महारथी, पराक्रमी अर्जुन! पण स्वजनांशी लढण्याच्या कल्पनेने तो गलितगात्र झाला. व्याकूळ झाल्याने त्याचे शरीर तापू लागले, विषादाने तो कापू लागला. त्याचे मन भ्रमल्यासारखे होऊ लागले. तो विव्हळ होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता उभे राहण्याचेही सामर्थ्य माझ्यात नाही. माझ्या डोळ्यापुढे काळोख पसरत आहे. काही पाहण्याचेही सामर्थ्य माझ्यात नाही.
मूळ श्लोक –
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
केशव = हे केशवा, निमित्तानि = चिन्हे, च = सुद्धा, (अहम्) = मी, विपरीतानि = विपरीतच, पश्यामि = पाहात आहे, (च) = तसेच, आहवे = युद्धामध्ये, स्वजनम् = स्वजन-समुदायाला, हत्वा = ठार मारून, श्रेयः च = कल्याण सुद्धा (होईल असे), न अनुपश्यामि = मला दिसत नाही ॥ १-३१ ॥
अर्थ –
हे कृष्णा ! या युद्धाची लक्षणे चांगली दिसत नाहीत. मला तर सगळी विपरीतच चिन्हे दिसत आहेत. या युद्धात स्वजनांना मारून कोणतेही कल्याण होणार नाही हेही मला स्पष्ट दिसत आहे. अरे, कुळाचा नाश करून कोणाचे कधी कल्याण होते का ?
मूळ श्लोक –
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कृष्ण = हे कृष्णा, विजयम् = विजयाची, न काङ्क्षे = मला इच्छा नाही, च = तसेच, न राज्यम् = राज्याची (इच्छा) नाही, च = आणि, सुखानि = सुखांचीही (इच्छा नाही), गोविन्द = हे गोविंदा, नः = आम्हाला, राज्येन = राज्याचे, किम् = काय प्रयोजन आहे, वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च) = आणि, जीवितेन = जगण्याचा, किम् = काय उपयोग आहे ॥ १-३२ ॥
अर्थ –
हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे.
संपूर्ण परिवार रणांगणावर उभा आहे. त्याला मारून विजय मिळवणे व विजय मिळवलेल्या राज्याचे सुख भोगणे ही गोष्ट अर्जुनाला रुचेना. असे लांछित सुख त्याला नको होते व म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला – हे कृष्णा, मला असा विजय नको आहे. तसेच असे रक्तलांछित राज्य, भोग किंबा असे हे जीवनही मला नको आहे. असले राज्य व सुख प्राप्त करण्यात काय अर्थ आहे ? याचे कारण स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो –
मूळ श्लोक –
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
येषाम् = ज्यांच्या, अर्थे = साठी, नः = आम्हाला, राज्यम् = राज्य, भोगाः = भोग, च = आणि, सुखानि = सुखे (इत्यादी), काङ्क्षितम् = अभीष्ट आहेत, ते = ते, इमे = हे (सर्वजण), धनानि = धन, च = आणि, प्राणान् = प्राण (यांची आशा), त्यक्त्वा = सोडून, युद्धे = युद्धात, अवस्थिताः = उभे आहेत ॥ १-३३ ॥
अर्थ –
ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, उपभोग व सुखे यांची इच्छा करावयाची तेच हे आप्त-स्वकीय आपल्या जीविताची आशा सोडून युद्धासाठी सिद्ध होऊन या रणांगणावर उभे राहिळे आहेत. आम्हाला राज्य हवे होते, सुख, उपभोग, संपत्तीही आम्हाला हवी होती; पण ते सर्व आमच्या आप्त, स्वजन व मित्रांसह हवे होते. त्यांच्यासह ते भोगण्याची इच्छा होती. परंतु ते सर्व आपल्या जीविताची आशा सोडून येथे आले आहेत. तेव्हा आता मला असे राज्य, उपभोग, सुख, संपत्ती काहीही नको आहे. हे सर्व त्यांच्यासाठी व त्यांच्यामुळे प्रिय आहे. तेच जर राहणार नसतील तर सुखभोगाचे व राज्याचे प्रयोजन काय ? आम्हाला ते नको आहे. जोपर्यंत आप्त, स्वजन ब मित्र असतात तोपर्यंत मनुष्याच्या इच्छा-वासना तीव्र असतात.
आपले वैभव त्यांना दाखवण्याची, त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याची, त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांच्याशिवाय वैभवाचा उपभोग घेणे हे मानवी मनाला पटत नाही. अहो, झोपडीत राहणारा गरीब मनुष्यही आपल्या स्वजनांना मारून विश्वाचे साप्राज्य स्वीकारणार नाही. अर्जुन येथे हेच सांगत आहे की, आम्हाला उपभोग प्रिय आहेत, विजय हवा आहे परंतु ज्यांच्यासाठी हे सर्व हवे आहे तेच जर जिवंत राहणार नसतील तर त्या सुखवैभवाचे काय प्रयोजन ? कारण या युद्धात ज्यांना मारावयाचे आहे ते लोक कोण आहेत ते पहा.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ८.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.