सुभाष बावनी भाग १ | लाल किल्ल्यावरून –
सुभाष बावनी भाग १ –
“तात्या! सध्या कुठे जाऊ नका. थकले आहात. इथेच आराम करा. मी संध्याकाळी परत येतो तेव्हा ठरवू काय करायचे ते!”
ग्वाल्हेरच्या संस्थानाने पदच्युत केलेला नरवरचा जहागीरदार मानसिंग याने तात्या टोपे यांना आश्वस्त केले. बाहेर उभ्या असलेल्या तात्यांच्या घोड्याच्या पाठीवर प्रेमाने थाप मारून मानसिंग परोणच्या जंगलाबाहेर पडला.
“याच्यावर विश्वास ठेवावा की नाही?”
तात्या पडल्या पडल्या विचार करू लागले.
“आता दुसरा पर्यायही दिसत नाही. राणी लक्ष्मीबाईंच्या नसण्याने उजवा हातच कुणीतरी तोडून नेल्यासारखे वाटते आहे.
“नानासाहेबांचाही पत्ता नाही. मौलवीही मारला गेला. अयोध्येची बेगम हजरतमहलही मदत करण्याच्या स्थितीत नाही. त्यातून रावसाहेबांशीही वाद झाले.
“रावसाहेबांना सोडून यायला नको होतं का?
“पंचवीस पंचवीस हजाराच्या सेनेचं नेतृत्व केलेले आपण, रावसाहेबांपासून वेगळं निघाल्यावर जेमतेम तीन घोडे, एक तट्टू, दोन आचारी आणि एक चाकर दिमतीला घेऊन मानसिंगाकडे आलो. युद्ध तर आता गमावलंच आहे; मग कशासाठी हा पाठशिवणीचा खेळ?
“कशासाठी ही नवी सैनिकभरती? त्यांना धड लढण्याचे प्रशिक्षण नाही आणि शस्त्र विकत घ्यायला पैसाही नाही. मग त्यांनी तरी दिवसाला मैल न मैल धावण्याचा आणि उपासमारीचा पगार देणारी ही नोकरी का पत्करायची?
“आपण तरी का धावतो आहे?
“ग्वाल्हेरला वाट पाहणाऱ्या त्या वृद्ध माता-पित्यांप्रती आपली काहीच जबाबदारी नाही का?
“पण मग त्याच न्यायाने या मातृभूमीप्रती आपली काहीच जबाबदारी नाही का?
“ते काही नाही. आपल्याला लढावेच लागेल. हे हरलेले युद्धही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला गर्जत ठेवावेच लागेल” असा निश्चय मनोमन करत अविश्रांत धावपळ केलेला तात्यांचा देह झोपेच्या स्वाधीन झाला.
“माझी जहागिरी काढून घेता काय? आता दाखवतो तुम्हाला!”
दात-ओठ खात मानसिंग रीचर्ड मीडच्या मुक्कामाकडे निघाला. तात्यांना पकडून देण्याच्या बदल्यात मीडने त्याला त्याची जहागिरी परत देण्याचे आश्वासन दिले होते.
मानसिंग मीडसमोर जाऊन उभा राहिला. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत मीडने प्रश्न विचारला,
“कुठे?”
“परोणच्या जंगलात”
“नक्की तात्याच? की दुसरा कोणी?”
“तात्याच!” विजयी मुद्रेने मानसिंग उत्तरला.
मीडने आपले शिपाई मानसिंगासोबत परोणच्या जंगलात पाठवले.
मानसिंगाने दुरुनच बाहेर उभा असलेला घोडा सोबतच्या शिपायांना दाखवला. याच घरात तात्या लपला आहे, एवढे सांगून तो माघारी वळला.
दबक्या पावलांनी घरात शिरणाऱ्या शिपायांनी बेसावध अवस्थेत तात्या टोपे यांना गिरफ्तार केले.
आडव्या-तिडव्या भरार्या मारणारा, क्षणात इथे तर क्षणात तिथे अवतरणारा, पकडला पकडला म्हणता म्हणता नाहीसा होणारा, शत्रूला नेहमीच चडफडायला लावणारा तात्या रणांगणावरील पराक्रमाने नाही, तर फितुरीमुळे अलगदपणे ब्रिटिशांच्या हाती सापडला.
खटल्याचा देखावा पूर्ण झाला. तात्यांना फाशीची शिक्षा झाली. तिसऱ्या बंगाली-युरोपियन पलटणीच्या पहाऱ्यात तात्या वधस्तंभाकडे दमदार पावले टाकू लागले.
“शेवटची इच्छा?” तुरुंगाधिकाऱ्याने औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रश्न विचारला.
“माझ्या कुटुंबीयांना कुठल्याही प्रकारे त्रास देण्यात येऊ नये” तात्यांनी शेवटची इच्छा बोलून दाखवली.
हातापायातले साखळदंड काढले गेले. हात-पाय बांधण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या शिपायाला “याची आवश्यकता नाही” असे सांगत तात्यांनी स्वतःच पुढे होऊन फासामध्ये मान अडकवली. पायाखालची फळी सरकली. तात्यांचा निष्प्राण देह एक गचका खाऊन फाशीच्या तख्तावर लोम्बकळू लागला.
१८ एप्रिल १८५९! आज खऱ्या अर्थाने वादळ शमले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या पहिल्या सरसेनापतीच्या हौतात्म्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य शिप्रीला लाभलं.
बहादुरशहाला आधीच शिक्षा झालेली होती. दूर ब्रह्मदेशात जन्मठेप!
लाल किल्ल्यातून शिक्षा होऊन बाहेर पडणाऱ्या बहादुरशहाला कुणीतरी डिवचलं,
“काय बहादुरशहा? संपलं का सगळं शौर्य? आटला का पराक्रम? थंड झाली का तलवार?”
यावर तो कविमनाचा पराभूत बादशहा तशाही अवस्थेत उत्तर देता झाला,
“गाझीयोमें बू रहेगी जबतलक इमान की,
तख्ते लंदनतक पहुंचेगी तेग हिंदोस्तान की”
आसपासचे सोजीर “कविकल्पना- कविकल्पना” म्हणून खिदळत राहिले.
मंगल पांड्यानं प्रज्वलित केलेलं स्वातंत्र्ययुद्धाचं यज्ञकुंड वासुदेव बळवंतांनी जागतं ठेवलं; चापेकर बंधूंनी त्यात अंगार फुलवला.
२२ जून १८९७ ला रँडचा वध करून तीन सख्खे भाऊ एका मागोमाग फासावर चढले. रात्रीच्या अंधारात गणेशखिंडीत घुमलेल्या त्या पिस्तुलाच्या आवाजाने दूर बंगाल प्रांतातल्या कटकमध्ये जानकीनाथ बोस आणि प्रभावती देवी यांच्या पोटी २३ जानेवारी १८९७ रोजी जन्मलेल्या सुभाषला क्रांतीच्या भाषेची अक्षरओळखच जणू करून दिली. ‘चाळीस-पंचेचाळीस वर्षानंतर सजणाऱ्या सिंगापुरातील रणक्षेत्रावर या स्वातंत्र्ययज्ञाची पूर्णाहुती तुझ्या हाताने टाकली जायची आहे सुभाष!’ याची जाणीवच जणू तो गणेशखिंडीत घुमलेला आवाज त्या पाच महिन्याच्या बालकास करून देत होता.
‘तख्ते लंदनतक पहुंचेगी तेग हिंदोस्तान की’ ही कविकल्पना की भविष्यवाणी?
बहादुरशहाचे हे शब्द वास्तवाला गाठतील की हवेत विरून जातील?
काळ याचे उत्तर शोधण्यासाठी केव्हाच लाल किल्ल्यावरून पसार झाला होता. आणि अठठयांशी वर्षांनंतर या प्रश्नाचा निकाल आपल्याच साक्षीने लागायचा आहे, हे जाणून असल्यासारखा लाल किल्ला मात्र धीरगंभीरपणे उभा होता.
क्रमशः सुभाष बावनी भाग १ | लाल किल्ल्यावरून.
ग्रंथ सूची-
१) मृत्युंजयांचा आत्मयज्ञ- वि. श्री. जोशी.
२) १८५७ चे स्वातंत्र्यसमर- स्वातंत्र्यवीर सावरकर.
(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)
लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०