सुभाष बावनी भाग १० | स्वातंत्र्य मागणी दिन –
कलकत्त्याच्या रस्त्यावर ‘दाहीने-बाये’, ‘आस्तेकदम’ च्या आरोळ्या घुमत होत्या. लष्करी गणवेश परिधान केलेले दोन हजार युवक-युवती शिस्तीत कदमताल करत चालले होते. कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांची भव्य शोभायात्रा लष्करी थाटात अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराकडे सरकत होती. त्या शोभायात्रेच्या सर्वात अग्रभागी ‘आस्तेकदम’चे आदेश देणारे सुभाषबाबू लष्करी गणवेशात घोड्यावर बसले होते.(सुभाष बावनी भाग १०)
हे कवायतीचे दृश्य गांधीजींना व्यथित करून गेले. त्यात पुन्हा सुभाषने अधिवेशनात ‘संपूर्ण स्वातंत्र्या’ची उपसूचना मांडली. भर सभेत! आणि त्याला जवाहरनेही पाठिंबा द्यावा? ते तर बरं की १३५० विरुध्द ९७३ मतांनी ही उपसूचना फेटाळली गेली. पण ९७३? ही संख्या काही कमी नाही?
या सुभाषचं काय करावं? त्याच्या नादाला लागून जवाहरनेही अधिवेशनात धुमाकूळ घातला. आता एकच उपाय- ही जोडी फोडावी लागणार!
खेळी खेळली गेली. पुढच्या वर्षी – १९२९ मध्ये लाहोर येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरूंकडे दिलं गेलं. सुभाषबाबूंना कार्यकारणीतून वगळण्यात आलं.
त्याच दरम्यान देशात आणखीही घटना घडत होत्या. जॉन सायमन यांच्या नेतृत्वात सायमन कमिशन भारतात आलं. या कमिशनला ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवले जाऊ लागले. ‘सायमन गो बॅक’ चे फलक जागोजागी झळकू लागले. पण या सगळ्यात लाहोरचा नूर काही वेगळाच होता. स्वतः लाला लजपत राय आंदोलकांच्या अग्रभागी उभे राहून घोषणा देत होते. गर्दी आवरेना! रेटारेटी, धक्काबुक्की, घोषणा यांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. लालाजींच्या छातीवर लाठीचे प्रहार बसले. काही दिवसात लालाजींचा मृत्यू झाला.
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या विप्लव नक्षत्रांनी याचा बदला घ्यायचे ठरवले. साँडर्सला उडवलं गेलं. भगतसिंग-बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्ब फेकून स्वतःला अटक करून घेतली.
या क्रांतिकारकांच्या खटल्याने देशाचा कानाकोपरा हादरू लागला. त्यावर जतीन दासने कळस चढवला. राजबंद्यांच्या न्याय्य हक्कासाठी उपोषण करत असताना एकसष्ठाव्या दिवशी जतीन दासने प्राण सोडला.
याच सुमाराला सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू झाले. पंच्याहत्तर हजार स्त्री-पुरुष रस्त्यावर आले. शांततामय मार्गाने कायदा मोडू लागले. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडू लागले. तुरुंगं कैद्यांनी भरून गेली.
२६ जानेवारी आली. काँग्रेसचा स्वातंत्र्य मागणी दिन! चौरंगी रस्त्याजवळील मैदानात तरुण-तरुणी जमू लागले. तिरंगी झेंडे हवेच्या तालावर हेलकावे खाऊ लागले. सुभाषबाबू शुभ्र खादीच्या पेहेरवात हाती ध्वज घेऊन मोर्चाचे संचालन करत होते. पोलिसांनाही ही संधी हवीच होती. पोलीस आयुक्त टेगार्टने आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला- “आपली घोडी तयार ठेवा. आज हा माणूस वाचता कामा नये.”
मोर्चा निघाला. हजारो तरुण-तरुणी ‘वंदेमातरम्’ च्या घोषणा देत समोर सरकू लागले. कलकत्त्याचे महापौर असलेले सुभाषबाबू अग्रभागी चालत होते. पोलिसांनी समोर येऊन जमावबंदीचा हुकुम दाखवला. सुभाषबाबूंनी तो कागद फाडून टाकला. मोर्चेकऱ्यांचं पाऊल पुढे टाकण्यासाठी उचललं गेलं मात्र; त्यांच्या अंगाखांद्यावर, मस्तकावर बॅटनचे प्रहार होऊ लागले. एकेक जण ‘वंदेमातरम्’ च्या उच्चारासरशी आघात होऊन खाली कोसळू लागला. सुभाषबाबू हट्टाने एकेक पाऊल पुढे टाकत होते. एव्हाना त्यांच्या मस्तकावर आघात होऊन खादीच्या कपड्यांवर रक्त सांडलं होतं. डोळ्यासमोर येणारी अंधारी झटकत त्यांनी पाऊल उचलले! तोच घोडेस्वारांचा वेढा पडू लागला. आसमंत धुळीने भरून गेला. माणसाला माणूस दिसेना! घोड्यांचं खिंकाळणं वातावरणाला अधिकच रौद्ररूप आणत होतं. ज्योतिर्मयी गांगुलीने पाहिलं- एका घोडेस्वाराने आपल्या घोड्याचे पुढचे दोन पाय हवेत अधांतरी उचलले आहेत. आता कुठल्याही क्षणी मस्तकावर प्रहार! अंतिम प्रहार! सुभाषबाबूंचा खेळ खलास!! ज्योतिर्मयी क्षणाचाही विचार न करता समोर झेपावली. चार आंदोलकांना हाताशी धरून तिने सुभाषबाबूंच्या भोवती कडं केलं. घोड्याच्या टापांना सुभाषबाबूंच्या मस्तकापर्यंत पोहोचताच येईना. शेवटी तो नाद सोडून द्यावा लागला. पण दंडुक्याचे प्रहार मात्र झेंडा धरलेल्या हातावर होतच होते. बोटांवर तडाखे बसत असतानाही प्राणप्रिय तिरंगी झेंडा काही हातून सुटत नव्हता. शेवटी सुभाषबाबू बेशुद्ध होऊन खाली कोसळले. तुटलेल्या बोटांनीही झेंड्याची पकड सैल न होऊ देता!
एका बाजूला सत्याग्रहींनी दाखवलेले संघटन, दुसऱ्या बाजूला क्रांतिकारकांचा सर्वस्वार्पणाचा अविष्कार! आयर्विनला गरगरल्यासारखं व्हायला लागलं. शेवटी नाइलाजाने त्यानं गांधीजींना भेटायला बोलावलं. भेट ठरली. पाच मार्च १९३१! भारतातली जनता श्वास रोखून पाहू लागली. रावी नदीच्या तीरावर घेतलेली पूर्ण स्वातंत्र्याची शपथ त्यांना आठवली. फाशीची शिक्षा घोषित झालेले भगतसिंगप्रभृती क्रांतिकारक आठवले. मिळेल का स्वातंत्र्य? सुटणार का क्रांतिकारक?
भेट झाली. बोलणी झाली. झरझर पायऱ्या उतरत गांधीजी गाडीत बसून निघूनही गेले. काय ठरलं?
गांधी-आयर्विन करारातली कलमं अपराध्यासारखी लोकांसमोर खालच्या मानेने येऊन उभी राहिली.
सर्व सत्याग्रहींची मुक्तता, पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची चौकशी आणि गोलमेज परिषदेचे आमंत्रण बस्स! आणि स्वातंत्र्य? त्याचा उल्लेखही नाही. कायदेभंगाचा एवढा प्रचंड खटाटोप फक्त गोलमेज परिषदेच्या आमंत्रणासाठी केला होता का?
सुभाषबाबू क्रांतिकारक बचाव समितीत होते. ते लक्षपूर्वक आयर्विन करारातील कलमं पुन्हा पुन्हा वाचू लागले- ‘सत्याग्रही सुटणार पण क्रांतिकारकांचं काय?’
या प्रश्नाचं उत्तर अवघ्या १८ दिवसात मिळालं. भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांचे तरुण देह लाहोरच्या तुरुंगात फासावर लोम्बकळू लागले.
सुभाषबाबूंना देशबंधूंचे शब्द आठवले- ‘गांधीजी कुठल्याही आंदोलनाचा प्रारंभ खूप चांगला करतात पण ऐन वेळी निर्णायक प्रहार करायची वेळ आली की गडबडून जातात!’
हजारो हजारो स्त्री-पुरुषांच्या वेदनांची, अनेकानेक क्रांतिकारकांच्या आत्माहुतीची पार्श्वभूमी लाभलेल्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचा शेवट अवसानघाताने झाला होता. स्वातंत्र्याकाशात पूर्व दिशेला फटफटलं होतं. पण काही क्षणात पुन्हा चहूबाजूंनी अंधारून आलं. पूर्वीपेक्षाही गडद अंधार पसरला.
क्रमशः सुभाष बावनी भाग १० | स्वातंत्र्य मागणी दिन
ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
२) नेताजी- वि. स. वाळिंबे
३) महानायक- विश्वास पाटील
(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)
लेखक- अंबरीश पुंडलिक