सुभाष बावनी भाग ११ | भारताबाहेर

सुभाष बावनी भाग ११ | भारताबाहेर

सुभाष बावनी भाग ११ | भारताबाहेर –

“बंगालमध्ये घडणार्‍या सगळ्या क्रांतिकारी घटनांच्या मागे तोच आहे. गोपीनाथ सहाच्या मागेही तोच होता. लाहोर तुरुंगात उपोषणाने मेलेला जतीन दास हाही त्याचाच माणूस. चितगाव शस्त्रागार लुटणारे सूर्यसेन, प्रीतीलता वड्डेदार हीसुद्धा त्याचीच माणसं. पूर्व बंगाल असो की पश्चिम बंगाल; युगांतर असो की अनुशीलन समिती; सगळ्या क्रांतिकारकांचं याच्याकडे जाणं-येणं आहेच. सव्य हातानं तो आंदोलनं, सत्याग्रह करतो. अपसव्य हातानं ब्रिटिशांचे मुद्दे पाडतो. ब्रिटिश साम्राज्याशी लढणारा असा सव्यासाची योद्धा दुसरा नाही. ते काही नाही. सुभाषचंद्र बोस या उपद्व्यापी माणसाला उचलून आठ दहा वर्षांसाठी दूर कुठेतरी नेऊन ठेवलं, तरच बंगाल शांत होऊ शकतो; अन्यथा नाही.” बंगाल सरकारचे मुख्य सचिव हॉकिन्स तावातावाने बोलत होते. सुभाषबाबूंना पकडण्याचा वॉरंट तयार होऊन कलकत्त्याला येऊनही पडला.(सुभाष बावनी भाग ११ | भारताबाहेर)

“घ्या हे वॉरंट! जा. आता त्या सुभाष बोसला पकडून घेऊन या.”- हॉकिन्स पोलीस आयुक्तांना म्हणाले.

२ जानेवारी १९३२ ला सुभाषबाबू मुंबईतील काँग्रेस कार्यकारिणीने गोलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर बोलावलेली बैठक संपवून कलकत्त्याला जायला कलकत्ता मेलमध्ये बसले. गाडी कल्याण स्टेशनवरून निघण्याच्या बेतात असतानाच, अचानक चेन ओढली गेली. शिट्ट्या वाजू लागल्या. स्टेशनवर धावाधाव सुरू झाली. सुभाषबाबू ‘काय झालं’ म्हणून खिडकीतून बाहेर पाहतात; तोच त्यांच्या पहिल्या वर्गाच्या कक्षात पोलिसांचा एक जथ्था आला. हातातला वॉरंट फडकावत पोलीस म्हणाले,

“आम्ही तुम्हाला अटक करत आहोत”

पोलिसांनी सुभाषबाबूंना कलकत्ता मेल मधून उतरवले व दुसऱ्याच एका ट्रेन मध्ये बसवले. आपण कुठल्या दिशेला जात आहोत, याचा काही अंदाजही सुभाषबाबूंना लागेना. शेवटी तो ओसाड प्रदेशातला एकाकी तुरूंग दिसला. मध्य प्रांतातला शिवणीचा तुरुंग!

मंडालेची आठवण यावी, असेच वातावरण. ना वीज, ना पाण्याची सोय. फक्त गर्मी. उन्हाच्या झळा. कोठडीला वरतून पत्रा. ना खिडक्या ना दरवाजे. अंगाला टोचणाऱ्या काथ्याच्या खाटांवर झोपायचं आणि दूर डोंगरावर मावळणारा सूर्य पाहत दिवस घालवायचा.

पण मंडालेशी नातं सांगणाऱ्या या वातावरणाला मोठा अपवाद लवकरच घडला. सुभाषबाबू शिवणीला पोहोचल्यानंतर दोनच दिवसांनी शरदबाबूंना तिथे आणलं गेलं. त्यांना तिथे पाहून खेदमिश्रित आश्चर्यानं सुभाषबाबू विचारते झाले,

“तुम्हाला कशासाठी अटक केली आहे मेजदा?”

“असं बघ; की तुझा भाऊ असणं हाच माझा खरा अपराध! बाकीच्या सगळ्या गोष्टी तोंडी लावायला.”

दोघेही खळखळून हसले.

एके दिवशी सकाळी स्वतः विभाभाभीच शिवणीमध्ये उतरल्या. त्यांना पाहताच सुभाषबाबूंनी घाईघाईने प्रश्न केला-

“भाभी आपलं घर कसं आहे हो?”

“सरकारने घराला कुलूप ठोकले. सगळ्या कागदपत्रांची नासधूस केली. सगळे विद्यार्थी आता अर्धेच पैसे घेतात. थोडी धावपळ होते माझी; पण चाललंय.” विभावती आपल्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करत होत्या.

“आम्ही दोघंही नसल्याने तुमच्यावर, बाबांवर खूप ताण पडलेला आहे ना?”

“अजिबात नाही. उलट तुमच्यामुळे आपल्या घराण्याचं नाव उज्वल होतंय असंच वाटतंय बाबांना आणि सगळ्यांना”

थोडं थांबून विभावती पुढे म्हणाल्या, “तुम्ही स्वतःची काळजी घ्या फक्त. तुमच्याकडे पहावत नाही छोटे दादा…”

तेवढ्यात वेळ संपल्याची सूचना वॉर्डरने कर्कश्श आवाजात दिली. डोळे पुसत पुसत विभावती जायला निघाल्या; मध्येच थांबत स्वतःशी बोलाव तसं म्हणाल्या,

“बोस घराण्याच्या सुना आजवर कधीही घराच्या बाहेर पडल्या नव्हत्या; पण तुम्हा दोघांसाठी मी व्हॉइसरॉयला भेटायलाही मागेपुढे पाहणार नाही.”

विभावतींनी आपले शब्द खरे करून दाखवले. एका सकाळी पदर खोचलेल्या सौभाग्यवती बोस दिल्लीच्या गव्हर्नर ऑफीससमोर उभ्या होत्या.

“माझे दीर क्षयाने आजारी आहेत. शिवणीतलं वातावरण त्यांच्या प्रकृतीसाठी हानिकारक आहे” मोरीस हॅलेट नावाच्या अधिकाऱ्याला विभावती समजावू लागल्या.

“अरे मग तर त्यांची ताबडतोब मुक्तता केली पाहिजे. काय नाव आपल्या दिराचं?”

“सुभाषचंद्र बोस”

हे नाव ऐकताच हॅलेट साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. थोडं मागे रेलून आवंढा गिळत साहेब म्हणाले,

“ सुभाषचंद्र बोस या माणसाला ठेवून घ्यायला कोणतंही राज्य तयार नाही. बंगाल इज आऊट ऑफ क्वेश्चन.

“पंजाबात भगतसिंगमुळे आग लागली आहे, तिथे पाठवू शकत नाही. महाराष्ट्रही क्रांतिकारकांचं केंद्र आहे, तिथेही ठेवू शकत नाही.”

“एकूण काय तर खाली इहलोकात त्यांच्यासाठी कोणतीच जागा योग्य नाही, म्हणून त्यांना मरायला तिथे पाठवले आहे का तुम्ही?”

“माझा नाईलाज आहे.”

सुभाषबाबूंची प्रकृती बिघडत गेली. आता एकच उपाय- सुभाषचंद्रांनी भारताबाहेर जावं. प्रवासाचा, उपचाराचा खर्च त्यांनी स्वतः करावा. सरकार काहीही देणार नाही. स्वित्झलँड, फ्रान्स, इटली आणि ऑस्ट्रिया या चार देशात जायला परवानगी. जर्मनी आणि इंग्लंडमध्ये पायही ठेवायचा नाही. बोटीने भारताचा किनारा सोडल्यानंतरच सुटका. घरातल्या कोणालाही न भेटता परस्पर निघावं लागेल.

सुभाषबाबूंना स्ट्रेचरवरून तुरूंगातून बाहेर काढलं. कोठडीतच धोतराचा शेव तोंडापाशी धरून शरदबाबू हुंदका आवरताहेत. माँ-बाबा-वहिनी सुभाषबाबूंसाठी प्रार्थना करताहेत. गॅंजे बोटीवर चढवण्यासाठी सुभाषबाबूंना ॲम्बुलन्समधून बाहेर काढलं. धाकटा भाऊ शैलेश दूर उभा होता. कुणालाही जवळ यायची परवानगी नव्हती. सर्वांचा निरोप घेण्यासाठी हात उचलायचे त्राणही त्यांच्यात नव्हते. बोट सुटल्यावर ‘आता आपण मुक्त झाला आहात’ अशी माहिती पोलिसांनी सुभाषबाबूंना दिली. तिकडे लक्ष न देता सुभाषबाबू एकटक दूर जाणाऱ्या आपल्या प्राणप्रिय मातृभूमीचा किनारा पहात होते. ही जमीन आता जिवंतपणी पाहायला मिळेलच याची शाश्वती उरली नव्हती.

क्रमशः सुभाष बावनी भाग ११ | भारताबाहेर.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment