सुभाष बावनी भाग १३ | वडिलांचा मृत्यू

सुभाष बावनी भाग १३ | वडिलांचा मृत्यू

सुभाष बावनी भाग १३ | वडिलांचा मृत्यू –

इटलीच्या दौऱ्यात मुसोलिनीची भेट घ्यावी आणि त्याची भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल अनुकूलता चाचपडून पाहावी, या हेतूने झालेली पहिली भेट समाधानकारक होती.

ओरिएंटल इन्स्टिट्यूटच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याची दृश्यं डोळ्यासमोर तरळवितच सुभाषबाबू व्हिएन्नाला परतले. येऊन पाहतो तो कलकत्त्याहून आईची तार आलेली! तसेच काही कारण असल्याशिवाय आई तार करणार नाही, असा विचार करून सुभाषबाबूंनी घाईघाईनं तार वाचली- “बाबांची प्रकृती चांगली नाही; ते तुझी सारखी आठवण काढत आहेत.”

कशीबशी बॅग भरून गडबडीने सुभाषबाबू विमानतळावर आले. एकदाचं विमानानं उड्डाण केलं. बाहेरचं दृश्य मनोहारी होतं. घाईघाईने ढगांच्या पांढऱ्या दुलईत शिरणारं विमान लगबगीनं बाहेरही येत होतं. मध्येच केव्हातरी इजिप्तची पिरॅमिड्सही डोळ्यासमोरून झळकून गेली होती. पण या कशाकशाकडे सुभाषबाबूंचं लक्ष नव्हतं. दिसत होते फक्त बाबा!

दहावीच्या वेळी “पास तरी होशील ना सुभाष?” असे आपल्या कटकमधील खोड्यांनी त्रस्त होऊन विचारणारे;

“हा पोरगा जीवाला घोर लावणार!” असं आपण हरिद्वारला निघून गेल्यावर चरफडणारे; पण परत घरी जाताच चिडायच्या जागी ओक्साबोक्शी रडणारे; आयसीएसचा राजीनामा द्यायच्या वेळी “घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नकोस सुभाष, सनद स्वीकारून भारतात ये, मग सावकाश विचार करता येईल” असं काकुळतीला येऊन सांगणारे; पण आपण राजीनामा देत आहोत हे कळताच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे; आपण मंडालेला असताना रोज बसूबाडीतील घराच्या अंगणात येऊन आपली वाट पाहणारे बाबा!

डमडम विमानतळावर सुभाषबाबूंचे विमान लँड करते न करते, तोच सायरनचा कर्कश्श आवाज ऐकू येऊ लागला. खाडखाड बुटांचा आवाज करत पोलिस विमानाला गराडा घालू लागले.

“तुम्हाला अटक करण्यात येत असून तुमच्या घरातच स्थानबद्ध रहावे लागणार आहे. आठवडाभराच्या आत एकतर युरोपला परत जायचे किंवा तुरुंगवास!” विमानातून उतरणाऱ्या सुभाषबाबूंच्या हाती पोलिसांनी ऑर्डर्स ठेवल्या.  सुभाषचंद्रांना पहिल्यांदा अगतिक झाल्यासारखं वाटू लागलं. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. लोक उत्साहाने नारे देत होते. गाडीवर हार भिरकावत होते. सुभाषबाबू त्या पोलिस व्हॅनमध्ये अवघडलेल्या अवस्थेतही हात बाहेर काढून लोकांना प्रतिसाद देत होते.

३८/२, बसूबाडी, एल्गिन रोडवरील घरात पाऊल टाकताच शरदबाबू सामोरे येत म्हणाले, “सुभाष तुझं नाव घेत घेत गेले रे आपले बाबा!” असं म्हणत शरदबाबूंनी हंबरडा फोडला. धक्का बसलेल्या सुभाषचंद्रांनी थोरल्या बंधूंच्या मिठीत शिरत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता त्यांचे डोळे माँना शोधत होते.

त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं विभाभाभींकडे पाहिलं. त्यांना काय विचारायचं आहे हे ध्यानात येऊन विभावती म्हणाल्या,

“माँ ठाकूर घरात आहेत छोटेदादा. आत्ताच डोळा लागलाय त्यांचा”

सुभाषबाबू धीर करून ठाकूरघरात शिरले. सगळी शक्ती एकवटून त्यांनी ‘माँ’ अशी हाक मारली मात्र! एका हाकेसरशी प्रभावतीदेवी उठून बसल्या. क्षणभर कुणातरी अनोळखी व्यक्तीकडे पाहत असावं तसं सुभाषकडे बघत राहिल्या. सुभाषबाबूही त्या श्वेतवस्त्रांकित भग्नमूर्तीकडे पहातच राहिले, “हीच का आपली आई? भलाथोरला अंबाडा घालून कपाळावर ठसठशीत कुंकू लावलेली आणि दागिन्यांनी आपादमस्तक लगडलेली ती कटकच्या रायबहादुर जानकीनाथ बोसांची पत्नी कुठे गेली?”

दुसऱ्या क्षणाला ती मायलेकरं दुःखावेगानं एकमेकांना बिलगली. उन्मळून पडलेल्या वेलीसारख्या माँ सुभाषच्या मिठीत गदगदू लागल्या.

सुभाषबाबू पितृशोकाचे कढ आतल्याआत जिरवीत आईला सावरण्याचा प्रयत्न करू लागले.

“बाबांना तुझा खूप अभिमान होता सुभाष!” थोड्या शांत झाल्यावर माँ जानकीनाथांबद्दल भरभरून बोलू लागल्या. “म्हणायचे ‘या पोराला जन्म देऊन आपण माता पिता म्हणून कृतकृत्य झालो आहोत प्रभा! आता आपल्याला आपलं पोरगं नेहमीच डोळ्यासमोर हवं असतं, पण आपल्या म्हातारपणात तो आपल्याजवळ नाही यासाठी दुःख करत राहायचं की पस्तीस कोटी पुत्रांच्या अभागी मातेचे दुःख दूर करण्यासाठी तो झीजतो आहे, यातच समाधान मानायचं?’”

दुःखाच्या प्रसंगातही प्रभावतीदेवींना सुभाषचं जवळ असणं वेदनेवर फुंकर घालणारं होतं.

माँना भेटून बाहेर आल्यावर सगळी भावंडे खालीच मांडी घालून बसली. सुभाषच्या तब्येतीची चौकशीही करून झाली. सुभाष आपल्या देशाबाहेर जाण्यानंतर काय काय झालं हे विचारू लागले-

“तुम्ही तुरुंगातून केव्हा सुटलात मेजदा?”

“अजून सुटलो कुठे राजा. तुझ्यासारखाच मीही नजरकैदेत आहे.” सुभाषबाबूंच्या प्रश्नाला उद्वेगाने उत्तर देत शरदबाबू बोलले.

“केव्हापासून?”

“बाबा जायच्या आदल्या दिवशीपासून”

“म्हणजे तेवढी तरी माणुसकी अजून शिल्लक आहे म्हणायची.”

“माणुसकी? अरे ‘अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची ऐनवेळी परवानगी मिळेल की नाही हे सांगता येणार नाही- आत्तापासून अर्ज करून ठेवा! निदान अधिकारी विचार तरी करतील’ असं ऐकवलं जेलरनी मला. आता बोल!”

“म्हणजे? तुम्ही बाबा जिवंत असताना अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याचा अर्ज…?” विस्फारल्या डोळ्यांनी सुभाषबाबूंनी आपल्या सगळ्या भावांकडे आळीपाळीने पाहत विचारलं.

“हो सुभाष; करावा लागला.”

संतापलेले सुभाषबाबू मुठी आवळत स्वतःशीच बोलू लागले,

“कैदीही माणसं असतात. त्यांनाही मनं असतात. तुरुंग ही सुधारगृहं व्हायला हवीत. ही थेम्स नदीच्या तीरावर सुचलेली वाक्यं भारतात पाय ठेवल्याबरोबर कुठे जातात यांची?

“इथेही हाडामासाची जिवंत माणसंच राहतात ना? ते काही नाही. आपल्या अस्मितेची प्रेतं खांद्यावर घेऊन जोपर्यंत इथला समाज तांडव करत नाही ना, तोपर्यंत त्यांची सिंहासनं दोलायमान होणार नाहीत; आणि ते या समाजाला मी करायला लावीन. भलेही त्यासाठी मला अंगाला चिताभस्म फासून आयुष्याचं जिवंतपणी स्मशान करून घ्यावं लागलं, तरी पर्वा नाही.”

भारतात राहायची मुदत संपली होती. सुभाषबाबू जड पावलांनी युरोपात परतत होते. आज सुभाषबाबूंची इच्छा नसताना सरकार त्यांना भारताबाहेर पाठवत होतं; पण लवकरच परिस्थिती विपरित होणार होती. सरकारची इच्छा नसताना सुभाषबाबू भारताबाहेर निसटणार होते. पण त्याआधी त्यांना राजकारणाचे काही महत्त्वाचे धडे गिरवायचे होते.

क्रमशः

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत.)

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment