सुभाष बावनी भाग १४ | देशगौरव

By Bhampak Articles 6 Min Read
सुभाष बावनी भाग १४ | देशगौरव

सुभाष बावनी भाग १४ | देशगौरव –

“उपचारही करून झाले, आरामही झाला आणि एक पुस्तकही लिहून झालं; आता युरोपात थांबून काय करू? ब्रिटिश काय मला जन्मभरासाठी माझ्याच देशातून हद्दपार करणार आहेत का? ते काही नाही. मी आता भारतात जाणार; बघूयात सरकार काय करतंय ते!”

कमला नेहरूंच्या उपचारासाठी युरोपात आलेल्या जवाहरलाल नेहरूंशी सुभाषबाबू बोलत होते.

जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आदि समाजवादी नेत्यांना सुभाषबाबूंची उणीव भासत होती, गांधीजींनाही सुभाषशिवाय राजकारण बेचव वाटत होतं.

सुभाषबाबूंनाही आता भारताबाहेर राहवत नव्हतं. ते लगोलग ‘काउंट वर्दे’ या बोटीने भारताकडे निघाले.

गुप्तहेरांनी बातमी भारतात पोहोचवली. सुभाषबाबू भारतात येणार! बोट किनार्‍याला लागायच्या आधीच पोलिस, कार्यकर्ते, जनता हे सगळे स्वागतासाठी तयार होते. कार्यकर्ते-जनता हारतुरे घेऊन; तर पोलीस हातकड्या घेऊन. डमडम विमानतळावरचा अंक पुन्हा घडला.

काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट नाही, जनतेला दर्शन नाही. सुभाषबाबूंना सरळ हातकड्या घालून तुरुंगात टाकण्यात आले! मुंबईवरून येरवडा तुरुंगात, येरवड्याहुन दार्जिलिंग जवळील कुर्सियांग येथील शरदबाबूंच्या घरात नजरकैद.

कुर्सियांगला असताना प्रकृती बिघडली, म्हणून तिथून कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आणलं गेलं. या सगळ्यांमध्ये एक वर्ष निघून गेलं आणि १९३७ च्या जानेवारी महिन्यात सुभाषबाबूंच्या हातात ‘आपणाला मुक्त करण्यात येत आहे’ असे पत्र पडले. पाच वर्षांची धावपळ थांबली.

आयसीएसच्या राजीनाम्यापासून आत्तापर्यंतच्या प्रवासावर नजर टाकता बरेच अनुभव पदरात पडले होते. त्या अनुभवांचं आणि वेदनांचं योग्य मूल्यमापन होण्याची वेळ येऊन ठेपली होती. १९३८ मध्ये हरिपुरा येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? असा प्रश्न जो तो एकमेकांना विचारू लागला. आपापल्या परीने आडाखेही बांधणं सुरु झालं होतं. गांधीजींनी लाहोर काँग्रेसचा प्रयोग पुन्हा करून पाहायचे ठरवले.

त्यावेळी बंड करू पाहणारे जवाहर लाहोर काँग्रेसचे अध्यक्ष केल्याबरोबर जे त्यांच्या विश्वासू आणि आज्ञाधारक गटात ओढले गेले ते आजतागायत! सुभाषही असा येणार नाही कशावरून? प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

सरदार पटेल, आचार्य कृपलानी यांच्यासारख्या अनेकांची नाराजी असतानाही गांधीजींनी हा जुगार खेळायचे ठरवले. अखेर सुभाषबाबूंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

बंगालचा आनंद गगनात मावेनासा झाला. कलकत्त्याला आपल्या लाडक्या नेत्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले. काँग्रेसमधले डावे बेहोश होऊन नाचू लागले.

एकावन्नाव्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी हरिपुऱ्याच्या रस्त्यावर एकावन्न कमानी उभारलेल्या होत्या. एकावन्न बैलजोड्या अध्यक्षांचा रथ ओढत होत्या. उजवीकडे सरदार पटेल तर डावीकडे जवाहरलाल उभे होते. आजपासून सुभाषचंद्र ‘देशगौरव’ झाले होते.

आपल्या पोराचा हा दिमाख पाहायला त्याचे वडील असायला हवे होते, असं प्रभावतीदेवींना राहून राहून वाटत होतं, तर चित्तरंजन दास यांच्या शिष्याने विस्तारलेल्या क्षितिजावर किती आत्मविश्वासाने पंख पसरले, हे पाहून बासंतीदेवी डोळे पुसत होत्या. शरदबाबूंचं कुटुंब सुभाषला-रंगाकाकाबाबूला कौतुकाने न्याहाळत होतं.

महात्मा गांधी, पटेल, नेहरू यांच्या उपस्थितीत गजबजलेल्या मंडपात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण सुरू झाले-

“महात्मा गांधींचे आशीर्वाद आणि नेतृत्व या देशाला दीर्घकाळ लाभो” या पहिल्या वाक्यासरशी टाळ्या, घोषणा, जयजयकार सुरु झाले. गांधीजी समाधानाने सुभाषचंद्रांकडे पाहत होते. आपल्या प्रयोगाचं त्यांना कौतुक वाटत होतं. तेवढ्यात पुढचं वाक्य आलं,

“काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने कामगार संघटना तसेच समाजवादी पक्षालाही आपला पाठिंबा राहील, असं मी आश्वासन देतो” डाव्या गटातील तरुण आनंदाने टाळ्या वाजवू लागले. गांधीजींच्या चेहर्‍यावरचे भाव बदलायला सुरुवात झाली.

“कुटीर उद्योगासोबतच आता अवजड उद्योगांकडेही या यंत्रयुगात प्रवेश करणाऱ्या आधुनिक भारताने लक्ष द्यायला हवे.”

आता मात्र उजव्या गटाचे कार्यकर्ते चुळबूळ करू लागले. सर्वात शेवटी “रोमन लिपी ही हिंदुस्थानची राष्ट्रीय लिपी व्हावी अशी माझी इच्छा आहे” या वाक्याने तर अनेकांच्या टोप्या उडवल्या.

आचार्य कृपलानींसारखे नेते “भोगा आता आपल्या कर्माची फळं” असं आपसात कुजबुजत हसू लागले. अधिवेशन संपता संपताच अनेक नव्या कुरबुरींना जन्म देऊन ‘विठ्ठलभाई पटेल नगरी’ची पालं पडली.

उजव्या गटाच्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्या,

“काय हो? ही बापूंचीच काँग्रेस आहे का? नाही म्हणजे व्यापार, कारखाने, यंत्र वगैरे शब्द काँग्रेसच्या मंचावरून ह्यापूर्वी कधीच ऐकू आले नव्हते.”

“काही नाही हो! यांना अध्यक्ष करून बापूंनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे.”

कुजबूज वाढू लागली. त्याचं गोंगाटात रूपांतर झालं; इतकं की खुद्द गांधीजींना आपला प्रयोग फसला असं वाटू लागलं.

नव्या रक्ताला सुभाषबाबू पुढच्या वर्षीही काँग्रेसचे अध्यक्ष राहावेत, अशी स्वप्ने पडू लागली. त्यांच्यावर भविष्यात येणाऱ्या संकटाचा संकेत देण्यासाठीच की काय ना. भा. खऱ्यांचा प्रसंग घडला.

“खरे तुम्ही पक्षशिस्तीच्या विरोधात वागताय असं लक्षात आलंय.”-सुभाषचंद्र

“पक्षशिस्तीच्या की महात्माजींच्या इच्छेच्या?” डॉ खऱ्यांनी सुभषचंद्रांच्या डोळ्यात पाहत थेट सवाल टाकला.

“हे बघा, आपले वर्तन जर असेच राहणार असेल तर मला आपल्यावर निलंबनाची कारवाई करावी लागेल”

“त्याची काहीएक गरज नाही. मी स्वतःच काँग्रेस सोडून जातोय. पण लक्षात ठेवा बाबूजी; आज जी वेळ माझ्यावर आली आहे ना, तीच वेळ हे लोक उद्या तुमच्यावर आणतील.”

खरे यांच्या भविष्यवाणीचा प्रवास इतक्या वेगानं वास्तवाच्या दिशेनं सुरु असेल, असं कुणालाही वाटलं नसावं. जणू काही खरे सुभाषबाबूंच्या कक्षात बोलत असताना भविष्याच्या पोटातली ती घटना गुपचूप दाराआडून आत येऊन प्रकट होण्यासाठी योग्य वेळेची वाटच पाहत होती.

अध्यक्षपदाचं एक वर्ष संपलं. आगामी काळात उद्भवणाऱ्या संघर्षाचे पडघम ऐकू यायला लागले होते. त्या संघर्षाची युद्धभूमी म्हणून सजू पाहणाऱ्या मध्यप्रदेशातल्या त्रिपुरीला बावन्नाव्या अधिवेशनाच्या तयारीचे डेरे-कनाती येऊन पडू लागले होते.

क्रमशः सुभाष बावनी भाग १४ | देशगौरव.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील.

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत.)

लेखक- अंबरीश पुंडलिक, ९८९०५३१२२०

Leave a comment