सुभाष बावनी भाग १७ | नवी दिशा

सुभाष बावनी भाग १७ | नवी दिशा

सुभाष बावनी भाग १७ | नवी दिशा –

“मी तुम्हाला लिहून देतो, येणाऱ्या काही दिवसातच युरोपात महायुद्ध सुरू होणार! इंग्लंड त्यात ओढला जाणार आणि इंग्लंड या युद्धात गुंतला असतानाच आपल्याला या अन्यायकारी साम्राज्याविरुद्ध अंतिम संघर्षासाठी कंबर कसावी लागेल…” मद्रासच्या मरिना बीचवरील सभेत सुभाषबाबू सांगत होते. तेवढ्यात एकजण वर्तमानपत्राचे भेंडोळे घेऊन मंचाच्या दिशेने धावला. सुभाषबाबूंनीही भाषण थांबवून बातमी वाचली. क्षणभर स्तब्ध उभे राहिले. श्रोतेही श्वास रोखून पाहू लागले. हातातलं वर्तमानपत्र फडकवत सुभाषबाबू पुन्हा बोलू लागले- “मी सांगत नव्हतो? हे घ्या. पहा! इंग्लंडला काय वाटले? म्युनिक कराराच्या अहेरात सुडेटेनलँड हिटलरला देऊन टाकला, तर तो शांत बसेल? अरे थांबेल तो हिटलर कसला! आता त्याला रोखण्यासाठी इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. माझ्या देशबांधवांनो! शतकांच्या प्रतीक्षेनंतर अशी एखादीच संधी स्वातंत्र्येच्छूंना मिळत असते. या संधीचा उपयोग जर आपल्याला करता आला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच!”

वीस वर्षांपूर्वी व्हर्सायच्या तहात झालेला अपमान आठवत वाढलेला ऍडॉल्फ हिटलर सुडाने बेभान झाला होता. १ सप्टेंबर १९३९ या दिवशी हिटलरच्या वेगवान सेना पोलंडवर चालून गेल्या. पोलंडचा प्रतिकार पालापाचोळ्यासारखा उडवला गेला. विजयी जर्मन सैन्य वॉर्सामध्ये शिरू लागलं.

चौखूर उधळलेल्या हिटलरचा अश्वमेधाचा घोडा नॉर्वे, डेन्मार्क, बेल्जियम, हॉलंड असे एकामागून एक देश पादाक्रांत करत निघाला. लवकरच हिटलरची सेना फ्रान्सच्या मॅजिनो तटबंदीवर धडका देऊ लागली. ज्या तटबंदीच्या भरवशावर फ्रान्स निर्धास्त होता, त्या तटबंदीला खिंडार पडलं. पॅरिसवर भयाची कृष्णछाया पसरली. फ्रान्सला पराभवाची स्वप्नं पडू लागली. जर्मनीची विमानं आता  इंग्लंडकडे सरकू लागली. ब्रिटनमध्ये आणि पर्यायाने भारतातही धावपळ सुरू झाली. पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेनची झोप उडाली. व्हॉइसरॉय लिनलिथगोच्या टेबलावरचा टेलीफोन दिवस-रात्र घणाणू लागला. सैन्य भरतीचे आवाहन भारतीय तरुणांना केले जाऊ लागले. जणू लगीनघाई सुरू झाली.

महायुद्ध! महायुद्ध! ‘आता आपण काय केले पाहिजे?’ या ‘अचानक’ उद्भवलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक भरली. विशेष म्हणजे त्यात सुभाषबाबूंनाही बोलावले गेले. पण या बैठकीतून ‘आपली सहानुभूती इंग्लंडच्या बाजूने असली पाहिजे’, ‘विस्तारवादी जर्मनीचा आपण निषेध केला पाहिजे’ असल्या भाकड वाक्यांपेक्षा अधिक काही निष्पन्न होऊ शकले नाही. ते पाहून सुभाषबाबू हतबुद्ध झाले. आक्रमण नेमकं कोणावर झालं आहे? इंग्रजांवर की भारतीयांवर? आपले चेहरे का सुतकी? आपल्या मनात का मरगळ?

सुभाषबाबू उसळून म्हणाले, “नियती पुन्हा पुन्हा अशी संधी देत नाही. भाकड तत्त्वांच्या मागे लपायचा प्रमाद केलात, तर आपल्याच देशाशी द्रोह केल्यासारखं होईल! कृपा करा! आपणच आपल्यासाठी विणलेल्या नीतिमत्तेच्या जाळ्यात अडकू नका. शत्रूचे हात युद्धात अडकले असतानाच त्यांच्यावर अंतिम प्रहार करण्याची सिद्धता आपण केली पाहिजे!”

पण अपेक्षेप्रमाणे सुभाषबाबूंच्या संघर्षाच्या सूचनेला केराची टोपली दाखवली गेली. काँग्रेसकडून पुन्हा एकदा निराशा पदरी पडून सुभाषबाबू कोलकात्त्याला परतले- ते चडफडत होते, हळहळत होते, मुठी आवळत होते. ‘सोन्यासारखा काळ हातून निघून चालला! काही तरी केले पाहिजे.’

‘भारताबाहेर जाऊन पहावं का?’ सुभाषबाबूंनी चीनला जाण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज केला.

‘अनायसे ही ब्याद भारतातून जाते म्हणते तर जाऊ द्यावं’ असा विचार करून मिटक्या मारत सुभाषबाबूंच्या अर्जावर गव्हर्नर हर्बर्टने शिफारशीची मोहर उठवली, कागदपत्र परवानगीसाठी व्हाईसरॉयकडे पाठवून दिले आणि निश्चिंत मनाने झोपी गेला. मध्यरात्री अचानक व्हॉइसरॉयच्या ट्रंककॉलने त्याला जाग आली,

“कुणाची शिफारस करता आहात? काही भान आहे तुम्हाला?”

“माफ करा सर.. पण काही वर्षांपूर्वी आपणच बोस यांना भारताबाहेर घालवण्याच्या प्रयत्नात होतो” त्या अचानक झालेल्या माऱ्याने गोंधळलेल्या हर्बर्टला आपले काय चुकले हेच कळेना!

“तो काळ वेगळा होता! तेव्हा युद्ध सुरू नव्हतं! आता हा उपद्व्यापी मनुष्य चीनला जायच्या निमित्ताने कुठे कुठे फिरून येईल; कुणाकुणाला भेटून येईल; काय उद्योग करेल याची कल्पना आहे तुम्हाला?” व्हाइसरॉयचा पारा आणखी चढला.

“पण सर काही महिन्यांपूर्वीच आपण नेहरूंना चीनला जायची परवानगी दिली होती” हर्बर्टने आता तांत्रिक अडचण पुढे केली.

“नेहरूंची गोष्ट वेगळी आहे; त्यांना हवं तर पुन्हा परवानगी देऊ. पण सुभाष बोसांना नाही!!”

“पण सर, कारण काय?”

“काहीही कारण द्या. मी तर म्हणतो त्यांना पुन्हा एकदा तुरूंगातच टाकण्याच्या हालचाली सुरू करा.”

पण सुभाषबाबूंची भारताबाहेर जाण्याची पूर्वतयारी मात्र सुरू झाली. सत्यरंजन बक्षींच्या माध्यमातून सरकारदरबारी आपल्याबद्दल काय काय बोललं- लिहिलं जातं; कोण त्यांना बातम्या आणून देतो याचा अभ्यास सुभाषचंद्रांनी सुरू केला. गुप्तचर खात्यातील एक व्यक्ती बक्षींच्या ओळखीची होती. त्याच्यामार्फत सुभाषबाबूंना त्यांच्याशी संबंधित फाईली रोज मध्यरात्री वाचायला मिळू लागल्या. पहाट होताच त्या परत नेल्या जात. आपल्या संबंधित कोण कोण बातम्या नेऊन सरकारला पोहोचवतो, याची यादीच सुभाषबाबूंनी केली; त्यात त्यांच्या काही नातेवाईकांचीही नावे होती.

ज्योतिषाला पत्रिका दाखवून ‘यानंतर आपल्या आयुष्यात परदेशगमनाचा योग तर नाही ना?’ याची खात्री करून घेतली. मानेवर असणारा एक काळा मस त्यांनी ऑपरेशन करून काढून घेतला. पण अजूनही मन द्विधेत होते- भारताबाहेरचं आकाश कवटाळायचं की भरतभूमीवरच्या आंदोलनांची धग तीव्र करायची? भारतातली आंदोलनं तीव्र करायची असतील तर एकच माणूस आहे, ज्याच्या इशाऱ्यावर लक्ष लक्ष स्त्रिया-पुरुष मागचा पुढचा विचार न करता स्वतःला आंदोलनात झोकून देतात. ज्याला राजकारणी नाही, स्वातंत्र्यसेनानी नाही, तर देवतुल्य-ऋषितुल्य समजतात. भारतीयांच्या मनामनात ते वसतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात भारताचे दर्शन होते. महात्मा गांधी! एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? असा विचार करून सुभाषबाबूंची मोटार वर्ध्याच्या दिशेने धावू लागली.

क्रमशः सुभाष बावनी भाग १७.

ग्रंथ सूची:
१) दुसरे महायुद्ध- वि. स. वाळिंबे
२) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी
३) नेताजी- वि. स. वाळिंबे.
४) महानायक- विश्वास पाटील

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment