सुभाष बावनी भाग ८ | मुख्य कार्यकारी अधिकारी

सुभाष बावनी भाग ८ | मुख्य कार्यकारी अधिकारी

सुभाष बावनी भाग ८ | मुख्य कार्यकारी अधिकारी –

सुभाष बावनी भाग ८ – “ब्रिटिशांना त्यांच्याच आखाड्यात धोबीपछाड मारावी लागेल. हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये बसून जनतेच्या कल्याणाच्या गोष्टी करणाऱ्यांचा बुरखा विधिमंडळात घुसून टराटरा फाडावा लागेल. बोला आहे तयारी?”

१९२२ मध्ये गया येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष या नात्याने देशबंधू चित्तरंजन दास बोलत होते.

दासबाबू अध्यक्ष; तर या मताला विरोध करणारे गांधीजी तुरुंगात. तरीही मताला पडलेल्या विधिमंडळ प्रवेशाच्या या प्रस्तावात गांधीजी विजयी झाले, तर अध्यक्ष पराभूत! ठराव फेटाळला गेला- १९४८ विरुद्ध ८९० मतांनी. अशा परिस्थितीत अध्यक्षपदावर राहणे दासबाबूंना प्रशस्त वाटेना. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१ जानेवारी १९२३ ला चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यांना मोतीलाल नेहरू आणि लाला लजपतराय येऊन मिळाले. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आदी मध्ये अस्सल देशी विचार करणाऱ्यांनी शिरकाव करण्याची रणनीती तयार होऊ लागली. दासबाबू व मोतीलाल नेहरू यांचे देशभर झंझावाती दौरे सुरू झाले. स्वराज्य पक्ष पवित्रा घेऊन कलकत्ता महापालिकेच्या निवडणुकीची वाट पाहू लागला.

‘सप सप सप..’ प्रेसिडेन्सी तुरुंगाच्या कोठडीत पोलीस आयुक्त टेगार्टने गोपीनाथ सहाच्या पाठीवर ओढलेल्या आसूडाचा आणि टेगार्टनेच टाकलेल्या धापांचा आवाज घुमू लागला. गोपीनाथच्या मुखातून वेदनेची लकेरही नव्हती.

“बोल! कुणी सांगितले तुला डे साहेबांचा खून करायला?”

“हा खून तर गैरसमजुतीतून झाला टेगार्टसाहेब. खरंतर तुमचाच मुडदा पाडायचा होता मला!” बेदरकारपणे गोपीनाथ म्हणाला. टेगार्टच्या सर्वांगातून जणू वीज चमकून गेली.

“या सगळ्याच्या मागे त्या सुभाष बोसचीच फूस आहे ना?”

“सुभाषचंद्र! आम्हा बंगाली तरुणांच्या दिलांचा अनभिषिक्त सम्राट! त्याच्यापाशी असे अनेक पेटते पलिते आहेत. ज्या दिवशी सुभाष असं काही करायचं मनातही आणेल ना टेगार्ट महाशय, ब्रिटिश साम्राज्याच्या राजप्रसादावर उल्कापात झाल्याशिवाय राहणार नाही.”

प्रेसिडेन्सी तुरुंग मान खाली घालून शरमेने उभा होता. त्याला बाहेरच्या अंधाराचा आधार वाटला. त्याच्याच साक्षीने आज कोवळ्या गोपीनाथ सहाला मातृभूमीवर प्रेम करण्याच्या बदल्यात फाशीची शिक्षा होणार होती.

“आता तर तुझं आयुष्य संपलं. आता तरी सांग यामागे कोण आहे ते?”- टेगार्ट

“टेगार्ट साहेब! माझं आयुष्य संपलं म्हणून तुम्ही वाचलात असं समजू नका. फाशीच्या तख्तावरून बाहेर पडणाऱ्या माझ्या शेवटच्या निःश्वासातून सहस्त्रो गोपीनाथ पैदा होऊन तुमचा अंत घडवून आणतील. वंदे मातरम्!!”

चित्तरंजन दासांमुळे कलकत्ता महापालिका जिंकणे स्वराज्य पक्षाला मुळीच जड गेले नाही. सुभाष व शरद हे दोघेही बोस बंधू निवडून आले. महापौर म्हणून चित्तरंजन दास यांची निवड झाली. महापौरांच्या हाताखाली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपलीच नियुक्ती व्हावी, असं प्रत्येकाला वाटू लागलं. त्या पदासाठी आपल्यापेक्षा अधिक पात्र अन्य कुणीच नाही, अशी खात्रीच! पण दासबाबूंनी नाव उच्चारलं सुभाषचंद्र बोस!

खादीचे पायघोळ स्वच्छ धोतर, सदरा आणि खादीची टोपी या अस्सल देशी पेहरावात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वारी कलकत्ता महापालिकेत फेरफटका मारतांना दिसू लागली. डोक्यावरून पदर घेतलेल्या एका अधोवदन स्त्रीपाशी सुभाषबाबू थबकले.

“काय हवंय माई?”

“ओळखलंस सुभाष?”

आवाज ओळखीचा वाटतोय पण चेहऱ्यात काहीतरी बदल आहे. अचानक प्रकाश पडला- डॉक्टर भट्टाचार्य यांच्या पत्नी! पण मग कपाळ असं ओकंबोकं का?

डोक्यावरून घट्ट घेतलेला पदर केसांविषयी शंका निर्माण करत होता.

“माई… डॉक्टर साहेब?”

“आहेत…” इकडे तिकडे पाहत दबक्या आवाजात माई म्हणाल्या. “क्रांतिकार्य करतात ना? त्यात बॉम्ब बनवण्याचं कौशल्य! पोलिसांनी हैराण करून टाकलं होतं रे! शेवटी एक दिवस त्यांनीच हे कुंकू पुसून टाकलं. आता त्यांना निश्चिंतपणे काम करता येतं आणि पोलीस त्रासही देत नाहीत, सोप्पं झालं सगळं!” कसनुसं हसत माई म्हणाल्या.

“माई तुझ्या या वैधव्यातून भारतमातेचं सौभाग्य जन्म घेईल.” सुभाषबाबू भारावून बोलले.

“पोलिसांनी पाठ सोडली रे, पण गरिबीनं नाही सोडली. घरी लहानगी मुलं उपाशी आहेत. तू मोठा अधिकारी झालास. म्हटलं काही काम देशील तर फार उपकार होतील बाबा!” असं म्हणून ती पाया पडू लागली, तेव्हा तिचे दोन्ही हात गच्च धरून सुभाषबाबूंचे शब्द बाहेर पडले, “स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिशांना पिटाळून लावणे एवढाच नाही. काश्मीर ते कन्याकुमारी पसरलेल्या या देशातील लक्ष लक्ष कुटुंबांच्या पोटात सुखाचे दोन घास जातील याची काळजी करणे हे सुद्धा स्वातंत्र्याने साध्य करायचंय!”

दासबाबूंनी कलकत्ता महापालिकेचा साहेबी चेहरामोहरा केळाच्या सालीसारखा उतरून ठेवला. सुभाषबाबू त्यावर खादीचा स्वदेशी लिबास चढवू लागले.

“म्हणजे आम्ही कलकत्ता हातून गेलं असं समजायचं का?” रॉयटर्स बिल्डिंगमध्ये आलेल्या फोनमधून व्हॉईसरॉय रीडिंग साहेब आग ओकत होते.

“सर तो सुभाष बोसच या सगळ्याचा सूत्रधार आहे” लॉर्ड लिटन थरथर कापत बोलले.

“मग उचला त्याला! डांबून ठेवा काळकोठडीत! त्याची सगळी मस्ती जिरेल तिथे!”

२५ ऑक्टोबर १९२४! पहाटेच्या अंधारात सुभाषबाबूंना अटक करायला डेप्युटी पोलीस कमिशनर येऊन थडकले. आधी अलीपुर तुरुंग, मग बेहरामपुर, लाल बाजार पोलीस चौकी येथे मिरवत शेवटी चार दिवस – चार रात्री अनोळखी वाटेवरच्या जलप्रवासाने सुभाषबाबूंना मंडालेच्या त्या अक्राळविक्राळ कारागृहासमोर आणून उभे केले.

आधी तुरुंगात जाण्यासाठी आसुसलेल्या सुभाषची ही हौस मंडालेत चांगलीच पूर्ण होणार होती; एवढी की तुरुंग हे आपले दुसरे घरच आहे, असे सुभाषबाबू नंतरच्या काळात सांगू शकणार होते.

सुभाषबाबूंना गिळंकृत करण्यासाठी करकरत उघडलेला महाकाय दरवाजा आत प्रवेश करताच ढेकर देत बंद झाला होता.

क्रमशः सुभाष बावनी भाग ८.

ग्रंथ सूची:
१) शृंखला खळखळा तुटल्या- वि. श्री. जोशी.
२) नेताजी- वि. स. वाळिंबे.
३) महानायक- विश्वास पाटील

(प्रस्तुत लेख हे लेखकाच्या आगामी पुस्तकातील निवडक अंश आहेत. विस्तृत लेख २३ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित होणाऱ्या “सुभाष बावनी” या पुस्तकात वाचावेत. शेअर करताना लेखकाच्या नावसाहितच शेअर करावेत)

लेखक- अंबरीश पुंडलिक

Leave a comment