आधार | Support –
या जगातील कोणतीही वस्तू आधाराविना स्थिर राहू शकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते एकमेकांच्या आधाराने स्थिर आहेत. यापासूनच मानवाची आणि विश्वाची निर्मिती झालेली आहे.आधार.
आज गुरुत्वाकर्षण नसते, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरू शकली नसती. पृथ्वीचे फिरणे थांबले असते, तर विश्वाचे अस्तित्व काही वेगळेच असले असते. आजही पृथ्वीवर आपल्याला उभे राहण्यासाठी, चालण्यासाठी आणि शरीराची कोणतीही कृती करण्यासाठी, गुरुत्वाकर्षण शक्तीचा आधार आहे. या आधाराविना माणसाची एकही क्रिया होऊ शकणार नाही.
पंचमहाभूतांचे जर आपले शरीर असेल, तर आधार देणे हा आपला मूळ गुणधर्म आहे. आज या भयानक परिस्थितीत आपल्याजवळ सर्वोत्तम दान करण्यासारखी गोष्ट जर कोणती असेल, तर तो आधार आहे.
आज प्रत्येक व्यक्तीला आधाराची गरज आहे. सर्वांना मानसिक आधाराची गरज आहे, काहींना शारीरिक आधाराची गरज आहे, तर काहींना आर्थिक आधाराची गरज आहे. ⁉️मानवी जीवन किती असाह्य आहे⁉️ ⁉️त्याच्या विज्ञानाला किती मर्यादा आहेत⁉️ हे अधोरेखित करणारा हा काळ आहे.
या विश्वाचे आणि आपल्या जीवनाचे आपल्या हातात काहीच नाही, याची सत्यता अनुभवाने आज प्रत्येकाला पटत आहे. या विश्वाला आधार देणारी, सांभाळणारी संतुलित करणारी, एक अलौकिक शक्ती आहे हे आज मान्यच करावे लागते. विज्ञान त्याला फंडामेंटल एनर्जी, ग्रॉस एनेर्जी किंवा कॉस्मिक एनर्जी, हे नाव देते, तर परमार्थ त्याला परा शक्ती, परमात्मा किंवा विश्वंभर म्हणते.
नाव काहीही द्या पण आज तरी या शक्तीचे अस्तित्व आपल्याला मान्यच करावे लागेल.
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते l
कोण बोलवितो हरीवीण ll
देखावी ऐकावी एक नारायण l
तयाचे भजन चुकू नका ll
माणसाची देव चालवी अहंता l
मीच एक कर्ता म्हणोनिया ll
वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता l
मग अहंता राहिली कोठे ll
तुका म्हणे_ विठू भरला सबाह्य अंतरी l
तया ऊणे काय आहे चराचरी ll
आज गरज असेल त्याला, मग कोणालाही, कोणताही आधार देणे, हेच दैवी कार्य आहे आणि आधार देणारा आज तरी देवच आहे.
डॉ. आसबे ल.म.