कर्म आणि प्रारब्ध

bhampak-banner

कर्म आणि प्रारब्ध –

आपले कर्म जसे असेल, तसेच त्याचे फळ मिळाल्याशिवाय रहात नाही. प्रारब्ध, नशीब, प्राक्तन, संचित या सगळ्यांचा हिशोब आपण केलेल्या कर्मानुसार ठरत असतो. प्रयत्नवादी माणसे यशस्वी होतात, त्याचे कारण त्यांच्या जीवनात येणाऱ्या यशाला, ते कर्तृत्व समजतात आणि येणाऱ्या अपशात ते स्वतःला जबाबदार धरतात ,स्वतःची चूक शोधून दुरूस्त करतात आणि त्याचे कारण ते प्रारब्ध किंवा कर्म समजतात.

परीयेसी गव्हारा सादर l कर्मे निर्वंश झाले सगर l भिल्ले विंधिले शारंगधर l झाला पुरंदर पंचानन ll

धर्मग्रंथातील या सर्वांना आपण केलेल्या कर्मानुसार फळ मिळालेले आहे. वर्तमान काळात गरजेचे काय आहे ? योग्य काय आहे ? नित्य काय आहे ?आणि सत्य काय आहे ? हे समजायला विवेक असावा लागतो. विवेक हा संत्संगतीने जागा होतो. भूतकाळात केलेली कर्मे माणसाला बदलता येत नाहीत. भविष्यकाळ आपल्या हातात नसतो, त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी आपल्याला करता येतीलच असे नाही, परंतु वर्तमान काळात केलेली कोणतीच गोष्ट निष्फळ ठरत नाही.

सत्कर्म केले, तर त्याचे फळ चांगले मिळते आणि दुष्कर्म केले, तर त्याचे फळ निश्चित वाईट मिळते.

आज समाजात अनेक दुष्कर्मे करूनही काही माणसे श्रीमंत व प्रतिष्ठित झालेली दिसतात, त्याचे कारण वर्तमानातील त्यांचे कर्म जरी खराब असले तरी त्याचे दुष्फळ भविष्यात निश्चित मिळणार असते. वर्तमानात चालू असलेला भरभराटीचा काळ , हे त्याच्या पूर्व कर्माचे फळ असते, याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल.

कर्मे मन्मथ झालासे राख l कर्मे चंद्राशी घडलासी दोष l कर्मे भार वाहती कुर्मशेष l कर्मे खरमुख ब्रम्हा देखा ll

आजच्या महामारीच्या भयानक परिस्थितीत आपल्याला या कर्माचा विचार करावाच लागतो. अनेक घरे आणि कुटुंबे उध्वस्त होत आहेत. अनेक प्रयत्न करूनही रोग थांबत नाही. मृत्यूची भीती टांगत्या तलवारी सारखी प्रत्येकाच्या डोक्यावर नाचत आहे. यातून मानसिक शांती मिळवायची असेल, तर कर्म आणि प्रारब्ध स्वीकारावेच लागेल.

कर्मे वासुकी लंके दिवटा l कर्मे हनुमंता उदरी कासोटा l कर्मे शुकदेव गर्भी काष्टा l पातळावाटा बळी गेला ll

कधी कधी आपले काही चुकत नाही, आपण सदाचारी आहोत, पवित्र आहोत, परोपकारी आहोत, धर्माचरणी आहोत, तरीही आपल्याला जीवनात दुःख का भोगावे लागते ? असा प्रश्न निश्चित पडतो. त्यासाठी रामायणात पहावे लागते.

कर्मे दशरथ वियोगे मेला l कर्मे श्री राम वनवासाला गेला l कर्मे रावण क्षयो पावला l वियोग घडला सीतादेवी ll

यात ही सगळी चांगले वागणारी माणसे होती, केवळ कर्मामुळे या वेदना त्यांना भोगाव्या लागल्या.

कर्मे दुर्योधनादी रणी नासले l कर्मे पांडव महापंथी गेले l कर्मे सिंधूजळ शोषिले l नहुष झाला सर्फ देखा ll

ज्या व्यक्तीने कर्माची आणि प्रारब्धाची शक्ती जाणली आणि मानली, त्या व्यक्तीची कर्माचे भोग भोगताना भक्कम मानसिक तयारी आपोआप होत असते. कर्म आणि प्रारब्ध चुकणार नाही याचे भोग भोगावेच लागतात. हे सर्व भोग शरीराला भोगावे लागतात, शरीराचा संबंध सोडला म्हणजेच विदेही अवस्थेत आपण पोहोचलो तर आपोआप आपण मुक्त आणि आत्मिक आवस्थेत येतो.

ही अवस्था भक्ताची सत्चिदानंद अवस्था आहे. या अवस्थेला भगवान परमात्म्याशी अद्वैत भाव निर्माण होतो. ज्यावेळी हा भाव निर्माण होतो त्यावेळी कर्माच्या आणि प्रारब्धाच्या भोगाची कोणतीच वेदना शरीराला त्रास देत नाही किंवा अशा आत्मस्थित असलेल्या व्यक्तीला शारीरिक वेदना होत नाहीत. याला योग शास्त्रांमध्ये प्रत्याहार असे म्हणतात आणि परमार्थात स्थितप्रज्ञ आवस्था म्हणतात. याचा अर्थ कर्म आणि प्रारब्ध यांचा भोग आणि त्याची वेदना जीवनातून संपवायची असेल, तर आत्मिक आवस्थेतच यावे लागेल आणि हे अध्यात्मशिवाय शक्य नाही.

कर्मा ते शंभू मानी आपण l किती भेशील कर्मभेण l बापरखुमादेवीवरु विठ्ठल शरण l केली कर्मे निवारी नारायण ll

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment