निगडीचा राजवाडा –
प्रत्येक गावाच्या नावामागं कुठलासा इतिहास असतो, परंपरा असते. गावाच्या नावातही गमतीजमती दडलेल्या असतात. तशीच एकाच नावाची गावंही वेगवेगळ्या भागात वसलेली दिसतात. निगडी गावाबाबत असंच सांगता येईल. अलीकडंच कराड अन् कोरेगाव तालुक्यातल्या निगडी गावांची भटकंती झाली. दोन्हीही गावं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना मोठा इतिहास आहे. कराड तालुक्यातल्या निगडी इथला ऐतिहासिक निगडीचा राजवाडा प्रसिद्ध आहे. अर्थात आताच्या काळात त्याचं सारं वैभव ओसरलं आहे. तरीही इतिहासाच्या पुसटशा पाऊलखुणा का होईना अद्यापि जिवंत आहेत.
साताऱ्याहून हायवेनं उंब्रज. मग डाव्या हाताचा रस्ता मसूरकडं जातो. रेल्वे गेट ओलांडून पुढं गेलं, की काही वेळातच मसूरची बाजारपेठ येते. मसूरहून आधी किवळ अन् मग निगडी. किवळ हे स्वातंत्र्यलढ्यातलं महत्त्वपूर्ण गाव. संत सखुबाईचं माहेर हेच. संत नावजीनाथही इथलेच. जोतिबाच्या सासनकाठीचं आध्यात्मिक महत्त्वही मोठं. तिथून काही वेळातच निगडीत पोचता येतं.
निगडीतल्या चिटणीसांचा वाडा प्रसिद्ध आहे. महादजी शिंदे हे मराठेशाहीतले पराक्रमी सरदार. बाळोजी अन् अाबाजी हे त्यांचे चिटणीस. त्यांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी हा राजवाडा बांधला. सद्यस्थितीत त्याची मोठी पडझड झाली आहे हे खरे. मात्र त्याचा पश्चिममुखी दरवाजा, प्रवेशद्वाराची बाजू यावरून त्याच्या भव्यतेची साक्ष पटते. वाड्याची दर्शनी बाजू तुलनेने चांगली आहे. मात्र अन्यत्र मोठी पडझड झाली आहे. आतील बाजूस पाण्याचा आड आहे.
सध्या चिटणिसांचे वंशज मध्य प्रदेशात ग्वाल्हेरला वास्तव्यास असल्याची माहिती ग्रामस्थ देतात.
वाड्यापासून काही अंतरावरच हनुमान मंदिर आहे. ते लक्षवेधक आहे. कळसाची कलाकुसर अप्रतिम आहे. प्रांगणातील दोन्ही दीपमाळा आजही भक्कम दिसतात. मंदिराचे सारे बांधकाम दगडी आहे. तिथून नजीक पाण्याचे तळे आहे. दगडी विहीर आहे. विहिरीचे बांधकाम नजरेत भरणारे आहे.
निगडीतून घोलपवाडी, गायकवाडवाडी, साठेवाडी या डोंगरमार्गातल्या आडवाटेनं वाठार किरोलीत पोचता येतं. तिथं तारगावलगत कृष्णातीरी बोरबन नावाचं आणखी एक शांत, रम्य धार्मिक स्थान आहे. मग रहिमतपूर- कोरेगाव रस्त्यावर येते ती दुसरी प्रसिद्ध निगडी. अर्थातच रंगनाथस्वामींची निगडी!
सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा