साक्षीदार आणि भागीदार

bhampak-banner

साक्षीदार आणि भागीदार –

माणसाला आपल्या आनंदात साक्षीदार हवा असतो आणि दुःखात भागीदार हवा असतो. ही सर्वांचीच अपेक्षा असते, परंतु दुर्दैवाने बरोबर याच्या उलट आपला प्रत्येकाचा अनुभव असतो. माणसं आपल्या आनंदात भागीदार होतात आणि आपल्या दुःखात साक्षीदार राहतात.(साक्षीदार आणि भागीदार)

जीवनातील सगळ्यात मोठी खंत हीच असते, म्हणूनच आपल्या जीवनात येणारा कोणताही आनंद हा निर्भेळ रहात नाही आणि जीवनात येणारे दुःख आपल्याला सहन होत नाही. दुसरी व्यक्ती आपल्या जीवनात आलेला आनंद भागीदार होऊन लुटून नेण्यापूर्वी, आपण स्वतःहून तो वाटला पाहिजे.

जगातील प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा असतो, दुर्देवाने तो दुसऱ्याला द्यावा असे वाटणारी माणसे समाजात खूप कमी असतात. आपला आनंद आपल्या एकट्यालाच हवा असतो हा आपला स्वार्थ कधीच संपत नाही, त्यामुळे *आपल्या आनंदाचा निःस्वार्थी साक्षीदार आपल्याला कधीच भेटत नाही. आपल्या जीवनात येणारा छोट्यात छोटा आणि मोठ्यात मोठा आनंद वाटायची सवय लावा, जग तुम्हाला आनंद मूर्ती बनविल्याशिवाय रहात नाही.

सेवितो हा रस  वाटीतो आणिका l घ्या रे होऊ नका रानभैरी ll
विटेवरी ज्याची पाऊले समान l तोचि एक दानशूर दाता ll

भगवान परमात्मा सुखरूप आणि खरा आनंदमूर्ती आहे.

विटेवरी नीट आनंदाचा कंद l तुका नाचे छंदे नामघोषे ll

आपल्या जीवनात येणारे दुःख कोणालाच वाटू नका कारण ते कोणालाही नको आहे. आपण नको असलेली गोष्ट अगदी आपल्या जवळच्या माणसाला देण्याचा प्रयत्न केला, तरी तो माणूस ती स्वीकारत नाही. बळजबरीने दिलेली गोष्ट नाईलाजाने गरज आहे तोपर्यंत सांभाळली जाते, गरज संपताच ती फेकून दिली जाते. याचा अर्थ

कितीही अपेक्षा केली तरी आपले दुःख वाटून घेणारा भागीदार आपल्याला कधीच मिळत नाही. कोणतीही व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाकडे साक्षीदार म्हणूनच पहात असते. समाजाची ही साक्षीदाराची भूमिका आपल्या जीवनातील दुःखात भर घालते, म्हणून आपल्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखात भागीदार शोधू नका, आपले दुःख आपणच भोगून संपवा.

दुःखापासून पळून जाणारी माणसे दुबळी असतात. धैर्याने दुःखाला सामोरे जाणारी माणसे शूर आणि वीर असतात. आपल्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही दुःखाला रडतरडत सामोरे जाण्याऐवजी लढत लढत सुखाने सामोरे जाण्यात खरा पुरुषार्थ असतो. कोणताही शूर आणि वीर आपल्या शौर्याला आणि पराक्रमाला भागीदार शोधत नाही.

तुका म्हणे सुखे l तया हरतील दुःखे ll
रुळे तळील पायरी l संत पाय देती वरी ll

हे शौर्य आणि धैर्य अंगी येण्यासाठी संतांच्या चरणाजवळच जावे लागते. आनंदात भागीदार आणि दुःखात साक्षीदार ही सामान्य माणसाची धारणा असते, आनंदात साक्षीदार आणि दुःखात भागीदार ही असामान्य माणसाची धारणा असते. जीवन सुख-दुःखाने भरलेले आहे, काय वाटावे⁉️ आणि काय भोगावे⁉ हे ज्याला व्यवस्थित समजते, त्याचे जगणे सफल होते.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment