खटकलेले शब्द आणि कृती

bhampak-banner

खटकलेले शब्द आणि कृती –

एखाद्याचे बोलणे किंवा वागणे आपल्याला विनाकारण खटकत असते. खटकलेले शब्द किंवा कृती आपल्याला विसरता विसरत नाही. आयुष्यभर असे बरेच खटकलेले शब्द आणि कृती आपण बरोबर घेऊन जगत असतो. या दोन्हीची आठवण झाली की आपण आपोआप अस्वस्थ होतो. वास्तविक हा अंतःकरणातील कचराच असतो, ज्याचा आपल्याला कधीच फायदा होत नाही, परंतु तोटा झाल्याशिवाय रहात नाही, तरीही आपल्याला हे टाळता येत नाही.

एखाद्याचा शब्द किंवा कृती तरी  ⁉️आपल्याला का खटकते⁉️ याचे कारणही आपल्याला आपल्या स्वतःतच सापडते. आपण एखाद्या बद्दलचे मत पक्के ठरवलेले असते. आपल्या मनातील त्या व्यक्तीची प्रतिमा आपण त्या चौकटीत पक्की बसवलेली असते. त्या चौकटीच्या बाहेर त्या व्यक्तीची कृती अथवा शब्द गेला की आपल्याला तो खटकतो. वास्तविक त्या व्यक्तीचे वागणे किंवा बोलणे त्याच्या स्वभावानुसार नैसर्गिक असते.

आपणच मनात त्या व्यक्तीविषयी चौकट तयार करून अनैसर्गिक झालेलो असतो. आत्मपरीक्षण करून पाहिले, तर ही आपली स्वतःचीच संकुचित वृत्ती असते. आपली वृत्ती व्यापक झाली, तर आपल्याला कोणाचाही शब्द आणि कृती कधीच खटकत नाही.

एका साधूला एक व्यक्ती माणसात सतत शिव्या देत होती. साधूच्या वृत्तीवर त्याचा कोणताच फरक पडत नव्हता. न राहून एका साधकाने साधूला प्रश्न विचारला, तो माणूस सतत तुम्हाला शिव्या देतोय, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का ? तुम्ही त्यावर काहीच प्रतिक्रिया का देत नाही ? अशाने तो माणूस उन्मत्त होऊन विकृत होईल असे आपल्याला वाटत नाही का ? त्यावर साधूची प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होती. साधू म्हणाले, “तो मला शिव्या देतोय, परंतु मी त्या कधीच घेतल्या नाहीत !” “जे मी स्वीकारलेच नाही, त्याचा मला त्रास होईलच कसा ?” _”माझी प्रतिक्रिया जशास तशी असेल, तर त्याची विकृती निश्चित वाढेल !”_ “तो  अग्नि झाला, तर मी पाणी होतोय, मग आग भडकेलच कशी ?”

योगी पावन मनाचा l साहे अपराध जनाचा ll
विश्व रागे झाले वन्ही l संती सुखे व्हावे पाणी ll
शब्द शस्त्रे झाले क्लेश l संती मानावा उपदेश ll
विश्व पट ब्रह्म दोरा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll

आपल्या जीवनातील खटकलेले शब्द आणि कृती, हा अंतःकरणातील कचरा साफ केल्याशिवाय आपल्याला शांती लाभत नाही. संत मुक्ताबाई यांच्या या अभंगातून आपल्याला खटकणारे शब्द आणि कृती यावर आपली प्रतिक्रिया काय असावी ? याची दिशा सापडल्याशिवाय रहात नाही.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार

Leave a comment