बोन्साय भाग १

By Bhampak Story Sameer Khan 8 Min Read
बोन्साय भाग १ २ | कथा बोन्सायची

बोन्साय भाग १ –

(पैंजणपाकीजा ला दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर घेऊन येत आहे एक नवी कथा बोन्साय मानवी निखळ मैत्री, कुठलाही स्वार्थ नसणारी. बालपणात घडलेल्या अशाच एका सत्यघटनेवरून प्रेरीत होऊन ही कथा लिहीली आहे. धर्म बाबतीत काहीही गैरसमज करून घेऊ नये. वाचकांना ती आवडेल अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. काही चुकले असल्यास क्षमस्वः ।)

“सागर ऽऽऽऽऽऽ ….ऐ सागर्या… बहिरा झालास का…?? तुला ऐकू येत नाहीये का? थांब काकूलाच ईथे घेऊन येते.. ” चिंचेच्या झाडावर चढून चिंचा तोडणार्या सागरला सबा खाली ऊभी राहूनच ओरडत होती.

” सबा ऽऽऽऽ ,थांब सबा, ऐक….चमच्ये… ” धप्पकन  सागरने खाली ऊडी मारली.

“मला चमच्ये म्हणतोय होय, थांब तुझ डोकंच फोडते… ” सबा सागरमागे दगड घेऊन पळत धावू लागली.

“जाड्ये तुला पळता येत होय.. ऽऽ  पळ  जाड्ये पळ ऽऽऽ हा हा हा ऽऽऽ हा हा हा ऽऽऽऽ   …….सबा ऽऽऽऽऽऽऽऽऽ”

“काय झालं गं ऽऽऽ खुप लागलं का गंऽ  …? ” धापा टाकत सागर बोलला.

“हाड.. पळ ईथून…हात नको लावू मला.. मी चमची.. मी जाडी… ” सबा रडवेली बोलत होती.

“दाखव गं, खुप रक्त येतयं… ”

“मरू दे, तुला काय करायचयं? सांडू दे सगळे रक्त.. मी मेले ना नाव तुझ्यावरच येणार… ” निरागस डोळ्यांची सबा ऊद्गारली.

“सबा ऽऽऽऽऽ…. याद राख जर पुढे असं मरायच बोललीस तर… ” टप टप टप सागरच्या डोळ्यातून अश्रू पडत होते. काही थेंब त्या फुटलेल्या गुडघ्यावर ही पडले व सबा वेदना विसरून त्याकडे पाहण्यातच रममाण झाली. आपल्याला झालेल्या वेदना त्यालाही जाणवतात तर..

“जाड्ये, आता ईथेच राहणार आहे का? ”

“नाटक्या, खोट खोट रडत होतास ना? त्या कसौटी जिंदगी की मधल्या कोमलिका सारखा? ”

“हाड, डेलिसोप कुठली . मुर्खांसारखी त्या आरती कडे जातेस ना केबल पहायला. कसली भाव खाते ती. कशाला जातेस गं?”

“मोठी आहे रे ती आपल्यापेक्षा ”

“मोठी असली म्हणून काय झालं? भाव किती खाते आणि काही तुला लाज वाटत नाही का गं तिथं जाऊन बसायला? ”

” मूर्ख आहे मी, त्या कोमोलिकाचं नाव घेतलं. चल आता”

आलिशान 2 bhk flat मधल्या मोठ्या led tv वर झळकत असलेल्या पुन्हा नव्याने आलेल्या त्याच मालिकेतली ती नविन अभिनेत्री कोमोलिकाचं पात्र रंगवताना पाहून सबा १९ -२० वर्षांपूर्वीच्या भूतकाळात फेरफटका मारून आली. जी मजा त्या भाव खाणार्‍या आरतीच्या घरात बसून ती मालिका पाहण्यात होती ती नक्कीच या flat मधल्या led tv मध्ये नाही याची पुरेपूर जाणीव सबाला झाली. नकळत सागर ही आठवला.

सागर… सबाचा बालमित्र. जिवलग दोस्त. एकाच मोहल्ल्यात राहणारे. फक्त झोपण्यापुरते आपापल्या घरी परतणारे. खाणे, पिणे, हुदडने, अभ्यास, शाळा सर्व सर्व गोष्टी एकत्रच करणारे. सागर सबाच्या आईला अम्मी तर सबा सागरच्या आईला आई म्हणणारी. त्या माऊल्याही कधीच दोघात फरक करत नसत. सागरचे बाबा मात्र घरी असल्यावर ऊगाचच धीरगंभीर वातावरण निर्माण झाल्यासारखे भासत असे. एरवी सबाला ईतकी माया लावणारी आई सागरचे बाबा असल्यावर स्वयंपाकघरातून बाहेरच येत नसे. याचा ऊलगडाच सबाला होत नसे.

“हे शिकून आलास का तू तिथुन? हे शिकुन आलास का? एका ताटात जेवणारे ते घाणेरडे लोक कुठले.. ही असली थेरं ईथं चालणार नाही सागर. हजार वेळा बोललोय आज शेवटचं बोलतोय ” सागरचे बाबा सागरला खुप फटकारत होते. सागरला भेटण्यासाठी गेलेली सबा तिथेच थबकली. आल्यापावलीच ती सागरला न भेटताच माघारी परतली.

“अम्मी, हम सब एक साथ खाना खाने बैठते है ये बुरी बात है क्या? साथ बैठते तो है पर दस्तरख्वान भी तो बिछा हुवा होता है और खाना झुठा भी तो नही होता फिर ये गलत कैसा? ”

“क्या हुआ बेटी ? किसीने कुछ कहा क्या? ”

“नही अम्मी, बस सागर के यहा सब अलग अलग ताट मे खाते है और पाट पर बैठते है वैसे हम क्यू नही करते? ”

“सबकी अलग अलग तहजिब होती है बेटी , अलग खाओ या साथमे बात तो एक ही है ना, बस मिलझुलकर खाओ यह बडी बात है. समझी बुद्धु.. ”

“खाना लगा दूँ मेमसाहब? ” मोलकरणीच्या आवाजाने सबा भानावर आली. मोठ्या डायनिंग टेबल वर ती एकटीच बसली होती. होते तरी कोण घरात? अम्मी व ती.अब्बु या flat मध्ये रहायला आल्यावर काही वर्षांतच वारले होते. अम्मी व सबा एका नातेवाईकाच्या लग्नात गेले होते. ती तसंच न जेवता परतली होती flat वर. ड्रायव्हर ला अम्मीला घरी आणण्यास सांगितले होते. त्या दिवसानंतर सबा कधीच एका ताटात जेवली नव्हती. अगदी कुणाचं लग्नही असलं तरी ती न जेवताच घरी परतत असे कारण एका ताटात जेवावे लागू नये म्हणून. बुद्धु ची बुद्धु च राहीली होती ती.

” रफत बी.. रफत बी… ”

“जी मेमसाहब…. ”

“ये क्या परोसा है थाली मे ? आपको पता चला है ना मै आमरस नही खाती ? फिर भी ये यहाँ क्यो रखा है? ”

“जी…. वो….. ”

“बस रहने दो आप…… ”

**************************

“सबा बघ आईने तुझ्यासाठी काय पाठवलंय? ”

“wow, आमरस? My favorite. ”

“हो, जसं अम्मीने माझ्यासाठी खीर पाठवली होती ना तसच”

“हम्म, पण ना आईच्या हातचं आमरस ना अप्रतिम अगदी डबा भरून खाल्लं ना तरी मन भरत नाही. आणि ते काय रे सागर्या.. पोली? ”

“सबा, पुरणपोळी रे… तुझ्या लक्षात कस राहत नाही गं? ”

“हो जसं तुला शिरखुरमा लक्षात राहत नाही ना तसं. “असं म्हणताना लाडीकपणे सबाने सागरच्या पाठीत धपका मारला.

“आऽह.. स्स स्स… ”

“सागर्या, काय झालं? दाखव? काय झालं? ”

“काही नाही गं , असच ”

“ते काही नाही, शर्ट काढ ”

“नको ”

“मी बोलतेय ना शर्ट काढ ”

“या खुदा, कुणी मारलं रे तुला? तुझ्या वडीलांनी ना? का? ”

“काही नाही गं , अभ्यास नव्हता केला म्हणून.. ”

“सपशेल खोटं, अभ्यास नेहमीच पुर्ण असतो तुझा, मला नको शिकवू, नायतर मीच जावून विचारते काकांना, थांब ”

“सबा ऽऽऽ ,थांब गं सबा , सबा ऽऽऽ एवढं मारलं ते कमी आहे का??? “अनपेक्षितरित्या सागरच्या तोंडून त्याला मारण्याच्या कारणाचा ऊलगडा झाला.

सबा जागच्या जागीच थबकली , “काय ऽऽ ??”

“पुन्हा एकदा बोल सागर… ”

“सबा तू पण ना… काहीच नाही जाऊदे… ” म्हणत सागर घराकडे वळाला .त्यामागोमाग सबाही न रहावून आली. सबा आलेली सागरने पाहीलेच नाही. आत शिरताच सागरचे वडील त्याच्यावर खेकसले..

“चला, तर आता बारी ईथवर आलीये की पट्टयाने सोलून काढूनही राजे ऐकायला तयार नाहीत. थांबा. आणखी थोडे दिवस.बंदोबस्त होईलच तुमचा. या असल्या ‘मोहल्ल्यात ‘रहाव लागतयं त्याचीच ही शिक्षा समजायची आणखी काय? ”

“अहो, लहान आहेत हो मुलं ” सागरची आई रडतच बोलली.

“छान, तुमचाच पाठींबा आहे त्याला, द्या आणखीन डबे भरून द्या, आमच काय जातयं? नाही म्हणायला दारात कुत्रा आल्यावर त्यालाही पोळी टाकायची संस्कृती आहे म्हणा आमची, डबा देताय त्यात वाईट नाही पण त्याने आणखीच बंध घट्ट करून काय मिळवणार आहात तुम्ही? सांगाल का? ” यापुढचे शब्द ऐकण्याचे धाडसच झाले नाही सबाचे. तरातरा ती घराकडे परतली. आईने मायेने पाठवलेल्या आमरसाची गोडी कडू कारल्यागत कशी जिभेवर पसरली सबाला कळलेच नाही.

क्रमश:

आपलाच समीर खान।

Leave a comment