कोमात चाललेली लोकशाही | Democracy

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 4 Min Read
bhampak post

कोमात चाललेली लोकशाही –

विषमता ही लोकशाही ची जननी आहे. समाजामध्ये ज्यावेळी विषमता निर्माण होते, त्यावेळी प्रबळ वर्गाकडून कमजोर वर्गावर अन्याय होत असतो. त्या अन्यायाचा उद्रेक झाला की लोकशाहीचा जन्म होतो. भारताच्या लोकशाहीचाही अशाच विषमतेतून जन्म झालेला आहे.

समता, बंधुता आणि स्वतंत्रता यावर भारताचे संविधान उभे आहे. लोकशाहीची ही त्रिसूत्री जेवढी भक्कम असेल, तेवढी लोकशाहीची इमारत मजबूत असते. लोकशाही निर्माण झाल्यानंतर संख्येला महत्त्व येते कारण बहुसंख्य असणाऱ्या मतदारांच्या मतदानाच्या अधिकारांनी लोकप्रतिनिधी, म्हणजेच राज्यकर्ता निवडला जातो.

निवडून येण्यासाठी नैतिकता, सेवा, त्याग, समर्पण, प्रामाणिकपणा या गोष्टीचा निकष असायला हवा असतो, परंतु निवडून येण्यासाठी, आपल्याला आवश्यक असणारे बहुमत मिळवण्यासाठी, या सर्व गोष्टींना मूठमाती दिली जाते. काहीही करून निवडून येण्यासाठी आवश्यक असलेली संख्या जमविली जाते आणि हे समर्थक आपल्या नेत्याचा आधार घेऊन वाट्टेल तो अन्याय आणि अत्याचार समाजावर करत राहतात. या लोकांची गरज असल्यामुळे नेताही हतबल असतो, यातूनच लोकशाहीतील विषमता जन्म घेते आणि ही लोकशाहीतील विषमता लोकशाहीला घातक असते.

सर्व माध्यमातून, देशातून जमा होणारा महसूल, याच्यावर सर्वांचा समान हक्क आणि अधिकार असतो. ज्यावेळी विशिष्ट वर्गाची मक्तेदारी महसुलावर निर्माण होते, त्यावेळी हा वर्ग उन्मत्त आणि मुजोर होतो आणि सर्व समाजावर अन्याय करतो.

आज भारतामध्ये निवडून आलेले नेते म्हणजे शासन आणि प्रशासन यांची मक्तेदारी महसुलावर निर्माण झालेली आहे. परिणामी या दोन्ही वर्गाला समाजाचे काहीही देणे घेणे उरले नाही. निवडून येण्यासाठी कर्जमाफी आणि विज बिल माफी ही आश्वासने प्रत्येकाने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी माफ होईल म्हणून कर्ज व वीज बिल भरले नाही.

आज कर्जाचा आणि विज बिल यांचा आकडा शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला आहे. ऐन उन्हाळ्यात जप्ती आणि विज बिल तोडणी एकाच वेळी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना हप्ते बांधून दिले असले, तरी शेतीतील उत्पन्नातूनच आपण हे हप्ते आणि कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाही, हे वास्तव आहे. शेतमालाचा उत्पादनखर्च परवडणारा राहिला नाही कारण शेतमालाला हमीभाव नाही.

आज जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात सत्तर टक्के शेतकरी आहेत आणि या वर्गावर सर्वच बाजूंनी सतत अन्याय आणि अत्याचार होत आहे.

भारताच्या महसुलावर या वर्गाचा सुद्धा समान हक्क आहे.* शासन आणि प्रशासन या हक्काचा विचारच करत नाही. सुदैवाने आजचा शेतकरी शिकलेला आहे, त्याला हा अत्याचार आणि अन्याय समजतो आहे. जाणीवपूर्वक निर्माण केलेली ही विषमता, भारताच्या लोकशाहीला घातक आहे.

आज शेतकऱ्यांचा मुलगा आणि शेतकरी आम्हाला लोकशाहीने काय दिले ? हा प्रश्न विचारत आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यातील शेतकरी आणि आजच्या लोकशाहीतील शेतकरी यांच्यात किती मोठा फरक आहे ?विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानात अपेक्षित असलेली समता, स्वतंत्रता आणि बंधुता कोठे आहे ? असे प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात निर्माण होत आहेत.

नेपाळच्या जंगलापासून ते दक्षिण भारतातल्या जंगलापर्यंत चीने मावोवादाने नक्षलवाद्यांच्या रूपात भारताचा हा भाग पोखरला आहे. प्रचंड चिडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या मनात राग ज्वालामुखी सारखा धगधगत आहे. हा चिडलेला वर्ग चुकून नक्षलवाद्यांच्या हाती लागला तर भारताच्या लोकशाहीच्या ठिकर्‍या उडायला वेळ लागणार नाही.

लाखो स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाने प्राप्त झालेले स्वातंत्र्य आणि निर्माण झालेले प्रजासत्ताक, शासन आणि प्रशासन यांच्या असंवेदनशील मुजोरपणामुळे मातीमोल ठरण्याची वेळ आलेली आहे. भारताच्या लोकशाहीत आम्हाला किमान माणसासारखे तरी वागवा ! एवढी एकच सामान्य अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

डॉ. आसबे ल. म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment